रघुवीर चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रघुवीर चौधरी (५ डिसेंबर, इ.स. १९३८:गुजरात - ) हे एक गुजराती भाषेत लिहिणारे लेखक आहेत. त्यांना २०१५चा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.

चौधरी यांचा जन्म गांधीनगरजवळील बापुपुरा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मन्सा येथे झाले. गुजरात विद्यापीठातून त्यांनी एम.ए.ची पदवी घेतली. त्यांनी गुजराती आणि हिंदी मौखिक साहित्याचा तौलनिक अभ्यास या विषयात पीएच. डी. मिळवली. गुजरात विद्यापीठातच ते १९७७ मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले आणि प्राध्यापक म्हणून १९९८ मध्ये निवृत्त झाले.

गांधीसाहित्य आणि सामाजिक कार्य[संपादन]

रघुवीर चौधरींवर बालपणापासून गांधीविचारांचा संस्कार झाला. गांधीसाहित्य, गीता, विनोबा भावेंचे साहित्य, काका कालेलकर, गोवर्धनराम त्रिपाठी, उमाशंकर जोशी रामदरकाश मिश्रा अशा लेखकांच्या लेखनाचे संस्कार त्यांच्यावर शाळकरी वयातच झाले. सामाजिक कार्याविषयी त्यांना मुळातच आस्था. त्यामुळे गांधीजींना अभिप्रेत असलेल्या प्रौढशिक्षणाच्या कामात त्यांनी झोकून दिले आणि आपल्या खेड्यात साक्षरतेचा प्रसार केला. तरुण वयात विनोबांच्या भूदान चळवळीतही त्यांनी भाग घेतला. त्यांनी स्वातंत्र्यसेनानी जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला तसेच आणीबाणीला विरोध केला.

लेखनाबरोबरच साहित्य चळवळीतील कार्यकर्ता म्हणून चौधरींनी भरपूर काम केले. अहमदाबादेत गुजरात साहित्य परिषदेची इमारत उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गुजरातच्या नवनिर्माण आंदोलनात सहभागी झालेल्या आणि आणीबाणीचे कट्टर विरोधक असणाऱ्या चौधरींनी आपले सारे जीवन मानवी मूल्यांची कास धरणाऱ्या व मानवी जीवन उन्नत करण्याचा आग्रह धरणाऱ्या साहित्याची पाठराखण करण्यात व्यतीत केले आहे.

लेखन[संपादन]

चौधरींचा मुख्य ओढा काव्यलेखनाकडे होता. त्यांच्या कवितांमधल्या प्रतिमा आणि प्रतीके हा साहित्याच्या अभ्यासकांच्या औत्सुक्याचा विषय ठरला. सर्जनशीलतेविषयी सूक्ष्म निरीक्षणे मांडणारे त्यांचे निबंध त्यांच्या लेखनसंपदेत मोलाची भर घालतात.

त्यांनी गुजराती साहित्यात त्यांनी विविध विषयांवर भरपूर लिखाण केले आहे. त्यांनी कथा, कादंबरी, नाटके, कविता, लघुकथा तसेच गुजराती भाषेतील दैनिकांमध्ये स्तंभलेखक म्हणून लेखन केले आहे.

चौधरींना मोठे नाव दिले ते त्यांच्या कादंबऱ्यांनी. १९६५ साली त्यांनी लिहिलेल्या 'अमृत' या कादंबरीवर अस्तित्ववादाची दाट सावली आहे. ही कादंबरी अतोनात लोकप्रिय तर झालीच पण समीक्षकांनीही तिची विशेष दखल घेतली. आजही गुजराती साहित्यातील सर्वोत्कृष्ट दहा कादंबऱ्यांमध्ये तिची गणना होते.

सहा दशकाच्या लेखन कारकिर्दीत ८०हून अधिक पुस्तके लिहिणारा आणि कविता, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, चरित्र, निबंधलेखन असे सर्व प्रमुख वाङ्मय प्रकार हाताळणारा हा लेखक आपल्या लेखनातला कस टिकवून राहिला आणि वाचकांबरोबर समीक्षकांच्याही कुतूहलाचा विषय ठरला.

पुस्तके[संपादन]

कादंबऱ्या[संपादन]

 • अमृता
 • आवरण
 • उपवास कथात्रयी
 • एक डाग आगल ने बे डाग पाछळ
 • पूर्वरंग लागणी
 • रुद्र महालय (ऐतिहासिक)
 • वेणू वत्सल
 • समज्याविना छुटा पडाऊं
 • सोमतीर्थ

नाटके[संपादन]

 • तिजो पुरुष
 • डिम लाइट
 • सिकंदर सानी

काव्यसंग्रह[संपादन]

 • तमासा
 • वहेता वृक्ष पवनमां

कथासंग्रह[संपादन]

 • चिता
 • पक्षाघात
 • पूर्ण सत्य
 • पोटकुन

पुरस्कार[संपादन]

 • २०१५ सालातला ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे चौधरी हे चौथे गुजराती लेखक आहेत. यापूर्वी उमा शंकर जोशी (१९६७), पन्नालाल पटेल (१९८५) आणि राजेंद्र शाह (२००१) यांना हा पुरस्कार मिळाला होता. सरस्वतीची प्रतिमा, प्रशस्तिपुस्तक आणि रोख अकरा लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • यापूर्वी रघुवीर चौधरी यांच्या ‘उपवास कथात्रयी‘ ('उपर्वास', 'सहवास' आणि 'अंतर्वास') या कादंबरीत्रयीला १९७७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.