ज्ञानपीठ पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरस्कारात मिळणारी वाग्देवीची प्रतिमा

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो.

सुरुवात[संपादन]

हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. २२ मे, इ.स. १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रमा जैन यांनी १६ सप्टेंबर, इ.स. १९६१ यादिवशी संस्थेच्या बैठकीत ज्ञानपीठ पुरस्काराबाबतचा ठराव मांडला. या पुरस्काराचे स्वरूप ठरविण्यासाठी २ एप्रिल, इ.स. १९६२ या दिवशी दिल्लीत देशभरातून ३०० विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. या विद्वानांचे दोन सत्रांत संमेलन झाले. सत्रांचे अध्य्क्षपद डॉ. वी. राघवन आणि डॉ. भगवतीचरण वर्मा यांच्याकडे होते. सूत्रसंचालन डॉ. धर्मवीर भारती यांनी केले. या संमेलनाला काका कालेलकर, हरेकृष्ण मेहताब, निसीम इझिकेल, डॉ. सुनीति कुमार चॅटर्जी, डॉ. मुल्कराज आनंद, सुरेंद्र मोहंती, देवेश दास, सियारामशरण गुप्त, रामधारी सिंह दिनकर, उदयशंकर भट्ट, जगदीशचंद्र माथुर, डॉ. नगेन्द्र, डॉ. बी.आर. बेंद्रे, जैनेन्द्र कुमार, मन्मथनाथ गुप्त, लक्ष्मीचंद्र जैन यांसारखे विद्वान हजर होते. या संमेलनातून तयार झालेली पुरस्काराची संपूर्ण योजना डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सादर करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली व निवडसमितीचे प्रमुखपदही स्वीकारले पण इ.स. १९६३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर ही जबाबदारी काकासाहेब कालेलकर व डॉ. संपूर्णानंद यांच्याकडे आली. २९ डिसेंबर १९६५मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला.

पुरस्कारयोगय व्यक्तीच्या निवडीचे निकष व प्रक्रिया[संपादन]

भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो. ज्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेला असेल, त्याच्या पुढील तीन वर्षे त्या भाषेचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही. सुरुवातीला एक लाख, नंतर दीड लाख, नंतर पाच लाख त्यानंतर आता सात लाख रुपये एवढी रक्कम पुरस्कार विजेत्याला दिली जाते. काहीवेळा एका ऐवजी दोन साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड होते त्यावेळी ही रक्कम विभागून दिली जाते. इ.स. १९६७ मध्ये गुजरातीकानडी, इ.स. १९७३ मध्ये उडिया व कानडी तसेच इ.स. २००६ मध्ये कोकणी आणि संस्कृत अशा दोन भाषांना हे पारितोषिक विभागून देण्यात आले होते.

भारतातील विद्यापीठे, त्यांचे भाषाप्रमुख, अन्य शिक्षणसंस्थांचे प्रमुख, विख्यात साहित्यिक, समीक्षक, भाषाशास्त्रज्ञ अशा सर्वांना आपापल्या मातृभाषेतील साहित्यकृतीची शिफारस करण्याची विनंती करण्यात येते. ज्ञानपीठ पुरस्काराच्या पहिल्या निवडसमितीवर सातपेक्षा कमी व अकरापेक्षा जास्त मान्यवर असू नयेत असे धोरण ठरविण्यात आलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नावाची छाननी करण्यासाठी प्रत्येक भाषेची तीन सदस्यांची एक समिती असते. तिला एल.ए.सी. म्हणजेच लोकल अ‍ॅडव्हायझरी कमिटी म्हणतात. ही समिती आपल्या भाषेतील एका समर्थ साहित्यिकाच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ व्यवस्थापनाला करते. नंतर मध्यवर्ती निवड समितीत एकाच साहित्यिकाच्या ग्रंथाची निवड केली जाते.

पुरस्काराचे स्वरूप[संपादन]

ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो.

विजेते[संपादन]

ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने इ.स. १३०५ मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

वर्ष नाव कृति भाषा
१९६५ जी शंकर कुरुप ओटक्कुष़ल (वंशी) मलयाळम
१९६६ ताराशंकर बंधोपाध्याय गणदेवता बंगाली
१९६७[नोंद १] के.वी. पुत्तपा श्री रामायण दर्शणम कन्नड
उमाशंकर जोशी निशिता गुजराती
१९६८ सुमित्रानंदन पंत चिदंबरा हिंदी
१९६९ फ़िराक गोरखपुरी गुल-ए-नगमा उर्दू
१९७० विश्वनाथ सत्यनारायण रामायण कल्पवरिक्षमु तेलुगु
१९७१ विष्णू डे स्मृति शत्तो भविष्यत बंगाली
१९७२ रामधारी सिंह दिनकर उर्वशी हिंदी
१९७३[नोंद २] दत्तात्रेय रामचंद्र बेन्द्रे नकुतंति कन्नड
गोपीनाथ महान्ती माटीमटाल उडिया
१९७४ विष्णू सखाराम खांडेकर ययाति मराठी
१९७५ पी.वी. अकिलानंदम चित्रपवई तमिळ
१९७६ आशापूर्णा देवी प्रथम प्रतिश्रुति बंगाली
१९७७ के. शिवराम कारंत मुक्कजिया कनसुगालु कन्नड
१९७८ अज्ञेय कितनी नावों में कितनी बार हिंदी
१९७९ बिरेन्द्र कुमार भट्टाचार्य मृत्यंजय आसामी
१९८० एस.के. पोत्ताकट ओरु देसात्तिन्ते कथा मलयालम
१९८१ अमृता प्रीतम कागज ते कैनवास पंजाबी
१९८२ महादेवी वर्मा यम हिंदी
१९८३ मस्ती वेंकटेश अयंगार चिक्कवीर राजेंद्र कन्नड
१९८४ तकाजी शिवशंकरा पिल्लै कयर मलयालम
१९८५ पन्नालाल पटेल मानविनी भवाई गुजराती
१९८६ सच्चिदानंद राउतराय उडिया
१९८७ विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज विशाखा (काव्यसंग्रह) मराठी
१९८८ डॉ. सी नारायण रेड्डी विश्वंभर तेलुगु
१९८९ कुर्तुलएन हैदर आखिर-ए-शब के हमसफर उर्दू
१९९० वी.के.गोकक भारत सिंधू रश्मी कन्नड
१९९१ सुभाष मुखोपाध्याय बंगाली
१९९२ नरेश मेहता हिंदी
१९९३ सीताकांत महापात्र उडिया
१९९४ यू.आर. अनंतमूर्ति कन्नड
१९९५ एम.टी. वासुदेव नायर मलयालम
१९९६ महाश्वेता देवी बंगाली
१९९७ अली सरदार जाफरी उर्दू
१९९८ गिरीश कर्नाड साहित्यातील योगदानासाठी कन्नड
१९९९[नोंद ३] निर्मल वर्मा हिंदी
गुरदयाल सिंह पंजाबी
२००० इंदिरा गोस्वामी आसामी
२००१ राजेन्द्र केशवलाल शाह गुजराती
२००२ दण्डपाणी जयकान्तन तमिळ
२००३ विंदा करंदीकर अष्टदर्शने मराठी
२००४ रहमान राही[१] सुबहूक सोडा, कलमी राही काश्मिरी
२००५ कुॅंवर नारायण हिंदी
२००६[नोंद ४] रवींद्र राजाराम केळेकर कोंकणी
सत्यव्रत शास्त्री संस्कृत
२००७ ओ.एन.वी. कुरुप मल्याळम साहित्यातील योगदानासाठी मलयालम
२००८ अखलाक मुहम्मद खान शहरयार उर्दू
२००९[नोंद ५] अमर कांत हिंदी
श्रीलाल शुक्ल हिंदी
२०१० चन्द्रशेखर कम्बार कन्नड
२०११ प्रतिभा राय उडिया
२०१२ रावुरी भारद्वाज तेलुगू
२०१३ केदारनाथ सिंह हिंदी
२०१४ भालचंद्र वनाजी नेमाडे हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ मराठी
२०१५ रघुवीर चौधरी गुजराती
२०१६ शंख घोष बंगाली
२०१७ कृष्णा सोबती हिंदी
२०१८ अमिताव घोष इंग्रजी
२०१९ अक्कितम अच्युतम नंबुद्री मलयाळम
२०२० नीलमणी फूकन आसामी
२०२१ दामोदर मावझो कोकणी
  1. ^[नोंद १] १९६७ या वर्षासाठी गुजरातीकन्नड भाषांना संयुक्त पुरस्कार.
  2. ^[नोंद २] १९७३ या वर्षासाठी कन्नडउडिया भाषांना संयुक्त पुरस्कार.
  3. ^[नोंद ३] १९९९ या वर्षासाठी हिंदीपंजाबी भाषांना संयुक्त पुरस्कार.
  4. ^[नोंद ४] २००६ या वर्षासाठी कोकणीसंस्कृत भाषांना संयुक्त पुरस्कार.
  5. ^[नोंद ५] २००९ या वर्षासाठी अमर कांत आणि श्रीलाल शुक्ल यांना पारितोषिक विभागून देण्यात आले.

हे सुद्धा पहा[संपादन]

ज्ञानपीठ विजेत्यांची माहिती देणारी पुस्तके[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://jnanpith.net/images/40thJnanpith_Declared.pdf Archived 2009-04-07 at the Wayback Machine. 40th Jnanpith Award to Eminent Kashmiri Poet Shri Rahman Rahi