मौर्य साम्राज्य
| मौर्य साम्राज्य | |
| इ.पूर्व ३२१ - इस.पूर्व १८५ | |
|---|---|
| राजधानी | पाटलीपुत्र |
| राजे | चंद्रगुप्त मौर्य बिन्दुसार अशोक |
| भाषा | संस्कृत,प्राकृत |
| क्षेत्रफळ | सुमारे ३० लाख वर्ग किमी |
मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारताच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य होते. त्यावर ख्रि.पू. ३२१ ते ख्रि.पू. १८५ पर्यंत मौर्य वंशाने राज्य केले होते. गंगेच्या खोर्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पटना) ही होती. हे साम्राज्य ख्रि.पू. ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने स्थापन केले. त्याने नंद घराण्याला पराभूत करून आपले साम्राज्य प्रस्थापित केले. त्याने भारतातील सत्तांच्या विघटनाचा फायदा उठवून आपल्या साम्राज्याचा पश्चिमेकडे व मध्य भारतात विस्तार केला. ख्रि.पू. ३२० पर्यंत या साम्राज्याने अलेक्झांडरच्या प्रांतशासकांना (सत्रप) हरवून पूर्णपणे वायव्य भारत ताब्यात घेतला होता.
५०,००,००० वर्गकिमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे त्याकाळी जगातल्या सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक, व भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते. आपल्या सर्वोच्च शिखरावर असताना हे साम्राज्य उत्तरेला हिमालय, पूर्वेला आसाम, पश्चिमेला पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणचे काही भाग इतके पसरले होते. भारताच्या मध्य व दक्षिण प्रदेशांमध्ये चंद्रगुप्त व बिंदुसार यांनी कलिंग (सध्याचा ओरिसा) हा प्रदेश वगळता विस्तार केला. कलिंग नंतर सम्राट अशोकाने जिंकून घेतला. अशोकाच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी मौर्य साम्राज्याचा अस्त झाला. ख्रि.पू. १८५ मध्ये शुंग साम्राज्याने मौर्यांना पराभूत करुन मौर्य साम्राज्य संपुष्टात आणले.
चंद्रगुप्ताने आपल्या कारकीर्दीत सिंधू नदीपलीकडील मॅसेडोनियाच्या प्रदेश जिंकून घेतला. चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटर याला पराभूत करून इराणचेही काही भाग जिंकून घेतले. कलिंगच्या युद्धानंतर ५० वर्षे मौर्य साम्राज्यात सम्राट अशोकाच्या काळात शांतता व सुरक्षितता होती.
|
|||||