सम्राट अशोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चक्रवर्ती अशोक

अशोक (जन्म: इ.स.पूर्व ३०४ -मृत्यू इ.स.पूर्व २३२) हा मौर्य घराण्यातील प्रसिद्ध सम्राट होता. त्याने भारतावर इ.स.पूर्व २७२ - इ.स.पूर्व २३२ च्या दरम्यान राज्य केले. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्याने पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपला राज्यविस्तार केला. अशोकाला भारताच्या इतिहासात सर्वात महान सम्राटाचे स्थान दिले आहे. असे मानतात की प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटाची पदवी फक्त महान सम्राटांना दिली ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले. भारताच्या इतिहासात असे अनेक चक्रवर्ती सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये (रामायण, महाभारत इत्यादी) आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वा बाबतची साशंकता आहे. ( नहुष, युधिष्ठिर इत्यादी). असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट झाला त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. अशोकाने भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. पाकिस्तान ,अफगाणिस्तान पूर्वे कडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्याच्या राज्याचे केंद्रस्थान मगध होते. ज्याला आजचा बिहार म्हणतात व पाटलीपुत्र त्याची राजधानी होती. ज्याला आज पटना नाव आहे. काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्याने हिंसेचा त्याग केला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्याने स्वता:ला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपर्‍यात सापडतात त्यामुळे अशोकाबाबतची ऐतिहासीक माहीती भारताच्या प्राचीन कालातल्या कोणत्याही ऐतिहासीक व्यक्तीपेक्षा जास्त आहे.


अनुक्रमणिका

[संपादन] बालपण व सुरुवातीची कारकीर्द

अशोक हा बिन्दुसार या मौर्य सम्राटाचा पुत्र होता. बिन्दुसार यांना अनेक पत्न्या होत्यातील त्यातील धर्मा ही अशोक ची आई होती. ती जन्माने ब्राम्हण असल्याने, तिला राजपरिवारात फारसे मानाचे स्थान नव्हते. अशोक हा बिन्दुसार च्या अनेक पुत्रामध्ये शेवटून दुसरा धाकटा होता त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची आपेक्षा नव्हती. परंतु अशोकची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुस्वास वाढला होता. चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा जैन धर्म स्वीकारुन राज्य सुखाचा त्याग केला त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली ही तलवार अशोकाने सापडवून अशोकने आपल्याजवळच ठेवली.

Chandragupta Maurya,who was founder of Maurya dynasty,and grandfather to Ashoka

. अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होता. तसेच चांगला शिकारीही होता. त्याला तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्याच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिन्दुसार ने तरुण पणीच त्याला अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते जे त्याने सहज पार पाडले.


[संपादन] राज्यरोहण

चित्र:Maurya Dynasty in 265 BC.jpg
Maurya Empire at the age of Ashoka the Great. The empire stretched from Iran to Bangladesh/Assam and from Central Asia (Afghanistan) to Tamil Nadu/South India.

अशोकचे जसजसा सेनानी म्हणून परिपक्व होत गेला तसतसे त्याच्या भावांचा त्यावरील दुस्वास ही वाढत गेला. अशोकने मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते तसेच त्याच्या एका मागोमागच्या मोहिमांमुळे त्याची राज्यभर किर्ती दुमदुमु लागली. त्यामुळे त्याच्या भावांना असे वाटले की बिन्दुसार अशोकलाचा सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. अशोकचा दुस्वास करण्यात आघाडीवर होता बिन्दुसारचा जेष्ठ्य पुत्र सुशीम, सुशीमने अशोकला व्यस्त ठेवण्यासाठी अशोकला तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले. जिथे सुशीम अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते. अशोक येण्याच्या बातमीनेच उठाव शमला व अशोकची किर्ती अजून वाढली. (The province revolted once more during the rule of Ashoka, but this time the uprising was crushed with an iron fist)

अशोकच्या यशाने त्याच्या भावांवरील दु:स्वास अजून वाढला, घरातील वाढत्या अशांततेमुळे व सुशीमने बिन्दुसारला अशोकाविरुद्द भडकावले, या वादातून तात्कालीन मार्ग म्हणून बिन्दुसारने अशोकला काही काळ अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला जो त्याने पाळला. या काळात अशोकने कलिंग मध्ये जाउन वास्तव्य केले. या काळात त्याची कौरवाकी या कोळी मुलीशी ओळख झाली जी नंतर अशोकची दुसरी अथवा तिसरी पत्नी बनली. अशोकच्या काही कोरीवकामांवर तिचे उल्लेख आहेत.

मध्यतरीच्या काळात उज्जैन मध्ये हिंसक उठाव झाला, बिन्दुसारने अशोकला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमवण्यास सांगितले. अशोक उज्जैनला गेला व एका लढाईत घायाळ झाला. याकाळात असे मानतात की सुशीम द्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले झाले जे परतावून लावण्यात आले. अशोकची शुष्रुशा करण्यासाठी बौद्ध धर्मिय परिचारकांची नेमणूक करण्यात आली होती. यातील एक परिचारीका देवी हिच्याशी अशोकचा विवाह झाला. देवी ही विदीशा येथील एका व्यापा‍र्‍याची मुलगी होती. ती बौद्ध धर्मिय असल्याने बिन्दुसार ला हा विवाह पसंत पडला नाही त्याने अशोकला पाटलीपुत्र मध्ये रहाण्यास मनाई केली व अशोकला उज्जैन येथील प्रमुख करुन टाकले.

पुढील काही वर्षे अशोकची शांतीमय गेली. बिन्दुसारचे इसापूर्व २७३ मध्ये निधन झाले व सुशीम अशोकचा काटा काढण्यास अजून सक्रिय झाला. या प्रयत्नात देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला ज्यात अशोकची आई मारली गेली. या घटनेने व्यतीथ अशोकाने पाटलीपुत्रवर आक्रमण केले व लवकरच पाडाव केला. व आपल्या सर्व बंधूंची हत्या केली या घटनेनंतरही अशोकचा राग कमी झाला नव्हता मगध साम्राज्याचा सम्राट बनून त्याने अनेक प्रांत एकामागोमाग पार करण्याचा सपाटा लावला. या काळात अशोकला चंड अशोक म्हणू लागले व एक क्रूरकर्मा म्हणून उदयास येउ लागला.

चित्र:Newpaisa.jpg
Most of the Indian currencies including coins contain the symbol of Lion capital of Ashoka

राज्यरोहण झाल्यानंतर आठ वर्षाच्य काळात अशोकने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले व मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रम्हदेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान- इराणच्या सीमे पर्यंत, उत्तरेस अफगणिस्तान व दक्षिणेस केरळपर्यंत वाढवला. जवळपास सर्व भारत त्याने एका साम्राज्याच्या छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली.

[संपादन] कलिंगचे युद्ध

मुख्य पान: कलिंगचे युद्ध

कलिंग चे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा अध्याय आहे. अशोक वर नमूद केल्याप्रमाणे युद्धखोर झाला होता. सर्वत्र त्याची ओळख चंड अशोक म्हणून होउ लागली होती. भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओरिसा तसेच छत्तीसगडझारखंड मधील काही भाग येतात.

कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत. सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते. मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते. तसेच बाह्य जगाशी व्यावसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनार्‍यावर सत्ता हवी होती, जी कलिंगाकडे होती. तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हे खनिज समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे. कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. युद्ध साधारणपणे इस पूर्व २६५ सुमारास सुरु झाले. सुशीम चा एक भावाने कलिंगामध्ये मदत घेतली होती. अशोक ने हे कारण मानले व कलिंगला शरण येण्यास सांगितले.

सुरुवातीच्या लढायांमध्ये कलिंगाच्या सेनापतींनी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली. या पराभवाने अजून अशोकाने चवताळून जाउन अजून मोठ्या सैन्यासह कलिंगावर आक्रमण केले. कलिंगाच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले परंतु अशोकाच्या सैन्य ताकद व सैनिकी डावपेचापुढे काही चालले नाही. अशोकाने पुढे सैन्याला संपूर्ण कलिंग मध्ये दहशत माजवला मोठ्या प्रमाणावर लोकांचे शिरकाण करण्यात आले. या युद्दाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार साधारणपणे १ लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले.


[संपादन] बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार

चित्र:AshokStambhaThailand.jpg
A similar four "Indian lion" Lion Capital of Ashoka atop an intact Ashoka Pillar at Wat U Mong near Chiang Mai, Thailand showing another larger Dharma Chakra / Ashoka Chakra atop the four lions thought to be missing in the Lion Capital of Ashoka at Sarnath Museum which has been adopted as the National Emblem of India.

अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवली, व त्यावेळेस त्याने पाहिले ते फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडणाच्या दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता. हे पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले व हा विजय नाहीतर पराजय आहे असे म्हणून त्या प्रचंड विनाशाचे कारण स्वता:ला मानले. हा पराक्रम आहे की दंगल, व बायका मुले व इतर अबलांचा हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वता:लाच प्रश्ण विचारले. एका राज्याची संपन्नता वाढवण्यासाठी दुसर्‍या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे. ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसेचा, प्रेम दया हि मूलभूत तत्वे असलेला बौद्ध धर्मियांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले व तसेच त्याने स्वता.ला बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरावले. या नंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रुपांतर झाले. बौद्द धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जवाबदार असे बहुतेक इतिहासकार मानतात.

वैशाली (बिहार) येथील अशोक स्तंभ

अशोकाच्या ह्या कार्यात त्याच्या देवी पासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली,.अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाउन तेथील राजाला बौद्द धर्माची शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादीत राहिलेला हा धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्द धर्मियांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. आकडा खूप असला तरी त्यातील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला असे मानतात. अशोकाने आपल्या कारकीर्दीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनिसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर कोणत्याही प्रकारची हिंसकतेवरही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णू पणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकर्‍यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांना सहिष्णूरित्या वागवले जाई. तसेच अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबध वाढवले.

अशोकाने आपल्या कारकीर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड असे मानतात की अशोकाचीच कल्पना आहे. आपण सम्राट असल्याचा अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्वे विशारद केली, अहिंसा, सर्व जाती धर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधार्‍या माणसांना मान देणे, संत ब्राम्हण, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अश्या आचार तत्वांना जगात कोणताही समाज नाकारु शकणार नाही.

अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धा नंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्य याच्याशी त्याला नेहेमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाध्य ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्दच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची किर्ती ग्रीस, इजिप्त पर्यंत पोहोचली होती असे कळते.

सांची येथील जगप्रसिद्ध स्तूप

[संपादन] अशोकाचे स्तंभ व शिलालेख

अशोकाने शिलालेख स्तंभ अस्तित्वात असलेल्या जागा.

अशोकाने भारतीय इतिहासातील सर्वात महत्वाचा ऐतिहासिक वारसा दिला म्हणजे त्याने त्याच्या राज्यात सर्वत्र लिहिलेले शिलालेख. अशोका आगोदरच्या व नंतरच्या भारतीय राजांच्या फारश्या नोंदी आढळत नाहीत त्यामुळे तत्कालिन ऐतिहासिक मिळवणे जिकरीचे होते. अशोकाने आपल्या राज्याच्या सीमेवर महत्वाच्या शहरांमध्ये शिलालेखांद्वारे आपले विचार प्रकट केले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनुसार आजवर सापडलेल्या शिलालेखांपेक्षा अजून जास्त संख्येने अशोकाने शिलालेख बांधले असावेत व ते काळाच्या ओघात लुप्त झाले, अजूनही उत्खननांमध्ये स्तंभ व शिलालेख सापडण्याची शक्यता आहे. वर नमूद केल्याप्रमाणे अशोका संदर्भात बरीचशी माहिति शिलालेखांवरुन व स्तंभांवरुन आलेली आहे. अशोकाला मुख्यत्वे पियदसी ( पालीमध्ये) अथवा संस्कृतमध्ये प्रियदर्शी असा उल्लेख केला आहे. ज्याचा अर्थ चांगला दिसणारा व देवांचा चाहता असा होतो. त्याच्या सर्व लेखांमध्ये त्याची महानता जाणवते, अशोकाने हे सर्व शिलालेख आपल्या साम्राज्यातील मार्गांवर मुख्य चौकांमध्ये प्रस्थापीत् केले होते जेणेकरुन प्रजेला तसेच बाहेरच्या देशातून येणार्‍याला अशोकाच्या राज्यातील आचारविचार कळावेत. अशोक आपल्या प्रजेला आपली मुले संबोधत असे व अहिंसेबद्द्ल व बौद्ध धर्माच्या तत्वांवर (धम्म व योग्य आचरणावर) त्याचा भर असे. अशोकाच्या लेखांमध्ये त्याच्या स्तुतीपर अनेक सुमने आहेत. अशोकाने मिळवलेल्या प्रदेशाची माहीती देतात,

तसेच शेजारच्या राज्याबद्द्लही माहीती आहे. एका स्तंभामध्ये कलिंग युद्धावर वर्णन आहे त्यात अशोकाची सहाय्यक राज्ये व नागरी व्यवस्थापनेवरही माहीती कोरली आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभ हा अशोकाचा सर्वात प्रसिद्ध स्तंभ मानला जातो. हा सॅन्डस्टोन[मराठी शब्द सुचवा] चा बनला असून अशोकाने सारनाथला भेट दिल्याची त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे. इतिहासकारांना व शास्त्रज्ञांच्या अशोक कालिन चिन्हे, लेख, स्तंभांचा हा खूप महत्वपूर्ण ठेवा आहे. मौर्य साम्राज्याबद्दल अनेक गोष्टी उदृत करतात. अशोकाच्या चिन्हांवरुन त्याला भावी पीढ्यांनी त्याच्याबद्दल काय विचार त्याला कोणत्या गुंणांसाठी त्याला लक्षात ठेवावे यामागची त्याची तळमळ लक्षात येते. अशोक खर्‍या आयुष्यात असाच होता का? यावर दुजोरा देणारी माहीती अजून उपलब्ध नाही. [१]).

[संपादन] चित्रपटात व साहित्यात

  • अशोक हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला. यात शाहरुख खानने सम्राट अशोक ची भूमिका केली होती. हा चित्रपट मुख्यत्वे अशोकच्या तारुण्यातील दिवसांवर आधारित आहे. इतिहासकारांनी हा चित्रपट वास्तवापेक्षा बर्‍याच बदलांसाठी टिकेचे लक्ष्य बनवला. परंतु भारताच्या सर्वात महान सम्राटावर चित्रपट काढल्याने चित्रपट सृष्टीत समाधान मानले होते.


[संपादन] अशोकावरील प्रदर्शित साहित्य

अशोकावरील बहुतेक साहित्य इंग्रजी मध्ये प्रदर्शित आहे.

  • Asoka and the Decline of the Maurya लेखिका रोमिला थापर.
  • Early India and Pakistan: to Ashoka (1970) by Brigadier Sir Robert Eric Mortimer Wheeler.
  • Asoka the Great ले. मोनिशा मुकुंदन.
  • Asokan Sites and Artefacts, a Source-book with Bibliography. लेखक हॅरि फॉल्क, ISBN 978-3-8053-3712-0.
  • The Legend of King Asoka (१९४८) लेखक जॉन स्ट्राँग.
  • Ashoka the Great (१९९५) लेखक डी.सी. अहिर
  • Ashoka text and glossary (१९२४) लेखक अल्फ्रेड वूल्नर .
  • Asoka: The Buddhist Emperor of India by Vincent A. Smith.
  • Discovery of the Exact Site of Asoka's Classic Capital of Pataliputra (१८९२) लेखक एल्.ए. वॅडेल.
  • Asoka Maurya (१९६६) लेखक बी. जी. गोखले.
  • Asoka (1923) लेखक भांडारकर.
  • Ashoka, The Great लेखक बि.के. चतुर्वेदी.
  • Asoka लेखक राधाकुमुद मुखर्जी.
  • King Aśoka and Buddhism Historical And Literaray Studies लेखिका अनुराधा सेनैवितरना.
  • To Uphold the World: The Message of Ashoka and Kautilya for the 21st Century (२००८) लेखक ब्रुस रिच.
  • Asoka and His Inscriptions ले. मधाब बरुआ.
  • अशोकाज एडिक्टस (१९५६) ए.सी.सेन
  • अशोक कि चिंता ही हिंदीमध्ये प्रसिद्ध कविता आहे. कवी जयशंकर प्रसाद

[संपादन] बाह्यदुवे

साचा:S-start साचा:S-hou साचा:S-bef साचा:S-ttl साचा:S-aft साचा:End

[संपादन] संदर्भ व टिपा

  1. Full text of the Mahavamsa Click chapter XII