Jump to content

मार्गारेट वूड्रो विल्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्गारेट वुड्रो विल्सन (जन्म - १६ एप्रिल, १८८६ - मृत्यु - १२ फेब्रुवारी, १९४४) ही राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन आणि एलेन लुईस ऍक्सन यांची सर्वात मोठी मुलगी होती. जेसी आणि एलेनॉर या त्यांच्या दोन भगिनी होत्या. १९१४ मध्ये त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर, मार्गारेटने आपल्या वडिलांची व्हाईट हाऊसची सामाजिक परिचारिका म्हणून सेवा केली. [] त्यामुळे त्यांना अमेरिकेच्या 'प्रथम महिला' या नात्याने सन्मान प्राप्त झाला होता. त्यांच्या वडिलांनी १९१५ मध्ये दुसरे लग्न केले तेव्हा त्यांचा तो मान संपुष्टात आला.

मार्गारेट वूड्रो विल्सन

जीवन

[संपादन]

मार्गारेट वुड्रो विल्सन यांचा जन्म १६ एप्रिल १८८६ रोजी जॉर्जियामधील गेनेसविले येथे झाला. आई-वडील दोघेही उत्तर अमेरिकेत राहत होते तरीदेखील दोघांचेही दक्षिण अमेरिकेशी घनिष्ठ नाते होते.

परिणामी, एलेन विल्सनला (मार्गारेट यांच्या आईला) त्यांची मुले यँकीज म्हणून जन्माला यावी असे वाटत नव्हते आणि त्यांनी पहिल्या दोन मुलींच्या जन्मासाठी गेनेसव्हिलमध्ये कुटुंबासोबत राहण्याची व्यवस्था केली. मार्गारेट, त्यांचे वडील ज्या महाविद्यालयात शिकवायचे त्या महाविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या स्थानिक शाळेमध्ये शिकल्या.

मार्गारेटच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात, मार्गारेट यांना वार्षिक $2,500 ची रक्कम दिली होती. जोपर्यंत ती रक्कम त्यांच्या इस्टेटच्या वार्षिक उत्पन्नाच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त होत नाही आणि जोपर्यंत मार्गारेट अविवाहित राहतील तोपर्यंत त्यांना ती रक्कम मिळत राहील अशी वडिलांनी व्यवस्था केली होती. []

मार्गारेट यांचे १२ फेब्रुवारी १९४४ रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी युरेमियामुळे निधन झाले आणि भारतातील पॉंडिचेरी येथे त्यांचे दफन करण्यात आले. []

कार्य

[संपादन]

मार्गारेट गायिका म्हणून सुविख्यात होत्या. युद्धजन्य परिस्थितीत त्या सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गाण्याच्या मैफिली आयोजित करत असत. ऑक्टोबर १९१५ ते मार्च १९१८ या काळामध्ये या कार्यासाठी त्यांनी प्रचंड प्रवास केला. या काळात त्यांनी त्यांच्या गळ्यावर एवढा ताण दिला की नंतर त्यांचा गाता गळा बंद झाला. [] त्यांची अनेक रेकॉर्डिंग प्रकाशित करण्यात आली होती. १९१४ मध्ये, "माय लॅडी" नावाचा अल्बम कोलंबिया रेकॉर्ड्स, वर प्रदर्शित झाला. []

१९३८ मध्ये मार्गारेट विल्सन भारतातील पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात आल्या आणि नंतर पूर्ण आयुष्यभर त्या तिथे राहिल्या. मार्गारेट या आश्रमवासी झाल्या. त्यांना श्रीअरविंद यांनी 'निष्ठा' हे नाव दिले. श्रीअरविंद यांनी लिहिलेले लिखाण मार्गारेट टंकलिखित करत असत. []

मार्गारेट आणि अभ्यासक जोसेफ कॅम्पबेल यांनी स्वामी निखिलानंद लिखित श्री रामकृष्ण परमहंस यांच्या द गॉस्पेल ऑफ श्री रामकृष्ण या अभिजात साहित्याचे इंग्रजी भाषांतर संपादित केले, ते रामकृष्ण-विवेकानंद सेंटर, न्यू यॉर्क यांनी १९४२ मध्ये प्रकाशित केले होते. []

बाह्य दुवे

[संपादन]

श्रीअरविंद आश्रमातील मार्गारेट

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "First Lady - Ellen Wilson". C-SPAN. Ellen Wilson died during her husband’s presidency. Their daughter, Margaret Woodrow Wilson, served as hostess until her father married Edith.
  2. ^ Wills of the U.S. Presidents, edited by Herbert R Collins and David B Weaver (New York: Communication Channels Inc., 1976) p. 176, आयएसबीएन 0-916164-01-2.
  3. ^ "Woodrow Wilson Daughter Dead". The Milwaukee Sentinel. February 14, 1944. p. 1. 2015-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 January 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "motherandsriaurobindo.in".
  5. ^ "W. A. Thayer (composer) - Discography of American Historical Recordings". adp.library.ucsb.edu (इंग्रजी भाषेत). 2018-01-03 रोजी पाहिले.
  6. ^ Narayan Prasad (24 November 2010). Life in Sri Aurobindo Ashram. West Bengal, India: SRIAUROBINDO KARMI SANGHA TRUST.
  7. ^ Nikhilananda, Swami (1942). "Preface". The Gospel of Ramakrishna. Chennai: Sri Ramakrishna Math.