Jump to content

झुआरी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झुआरी नदी ही गोवा राज्यातील एक (९२ किलोमीटर लांबीची) मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे. हिचे अघनाशिनी असेही नाव आहे. (अघनाशिनी नावाची दुसरी एक नदी कर्नाटक राज्याच्या जंगलाजंगलातून आणि शेवटी कुमठा तालुक्यातून वहाते. तिची लांबी ११७ किलोमीटर आहे.)

गोव्यात अकरा मुख्य नद्या आणि त्यांच्या ४२ उपनद्या आहेत. त्यांपैकी. झुआरी ही दक्षिण गोव्याची जीवनदायिनी नदी कर्नाटकातल्या ‘दिधी’ घाटात उगम पावते. त्यानंतर ही नदी खाण परिसरातून तुडव, पात्रे या परिसरातून पुढे वाहत जाते. चिरक नदी, गुळेली नदी, कुशावती नदी, उगे नदी अशा लहान मोठ्या उपनद्या झुआरीला मिळतात. झुआरीच्या उत्तरेला तिसवाडी आणि फोंडा हे तालुके आहेत, तर दक्षिणेला मोर्मुगाव आणि सालसेटी हे तालुके आहेत.

झुआरी नदीपासून मांडवी नदीला जोडणारा कुंभारजुवे (कुंभारजुवा) नावाचा कालवा आहे. त्या कालव्यातून छोट्या नावांची आंतरनदी वाहतूक होते. अरबी समुद्राला मिळेपर्यंत झुआरी नदी खाणमाती, रासायनिक खते, जंतुनाशके आणि शेकडो रासायनिक घटके यांमुळे पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. जेथे ही नदी समुद्राला मिळते तिथे बनलेल्या खाडीवर मोर्मुगाव (मार्मागोवा) हे बंदर आहे.