Jump to content

फाल्गुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फाल्गुन हा एक भारतीय पंचांगानुसार वर्षातील बारावा महिना आहे.

फाल्गुन हा हिंदू पंचांगाप्रमाणेही बारावा महिना असतो. या महिन्यात होळी (हुताशनी पौर्णिमा) हा सण येतो.

फाल्गुन महिन्यात श्रीमुख फाल्गुन व भाव फाल्गुन आदी प्रकार असतात. अर्जुनाचा जन्म श्रीमुख फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला झाला, तर नकुल-सहदेव यांचे जन्म भाव फाल्गुन महिन्यात अमावास्येच्या दिवशी झाले.

फाल्गुन शुक्ल द्वितीयेला फुलेरा दूज म्हणतात. हा सण फाल्गुन महिन्यातला सर्वात शुभ आणि धार्मिक समजला जातो. या दिवशी श्रीकृष्ण होळीच्या सणात भाग घेतो आणि रंगांऐवजी रंगीबेरंगी फुलांनी होळी खेळतो.

फाल्गुन महिन्यातल्या शुद्ध एकादशीला आमलकी एकादशी आणि कृष्ण एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात.

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पौर्णिमा असते. या दिवशी होलिकादहन होते. शुक्ल अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंतच्या काळाला होलाष्टक म्हणतात.

फाल्गुन वद्य षष्ठीला (एक)नाथ षष्ठी म्हणतात.

फाल्गुन हा हिंदू कालगणनेप्रमाणे वर्षाचा शेवटचा म्हणजे बारावा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास (पूर्वी किंवा उत्तरा) फाल्गुनी नक्षत्रात चंद्र असतो म्हणून याला फाल्गुन हे नाव पडले आहे. याला तपस्य असेही नाव आहे. शिशिर ऋतूतील हा दुसरा महिना आहे. यातील पौर्णिमा व अमावास्या या तिथी १४ मन्वादि तिथींपैकी (मन्वंतरांच्या प्रारंभ-तिथींपैकी) आहेत. या महिन्याच्या पौर्णिमेस होळी, वद्य प्रतिपदेस धूलिवंदन आणि वद्य पंचमीला रंगपंचमी हे सण येतात. यांशिवाय श्री रामकृष्ण परमहंस यांची जयंती शुद्ध द्वितीया तुकारामबीज वद्य द्वितीया, नाथषष्ठी ही वद्य षष्ठी. वद्य तृतीयेस शिवजयंती असल्याचे काहींचे मत आहे. दक्षिण भारतातील बहुतेक देवस्थानांचे उत्सव फाल्गुनात असतात. भारताच्या राष्ट्रीय पंचांगाचा फाल्गुन महिना ३० दिवसांचा असून तो लीप वर्षात १९ व एरवी २० फेब्रुवारीस सुरू होतो .


हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  फाल्गुन महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या