मदर इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मदर इंडिया
दिग्दर्शन मेहबूब खान
निर्मिती मेहबूब खान
कथा मेहबूब खान
प्रमुख कलाकार नर्गिस
सुनील दत्त
राजेंद्र कुमार
राज कुमार
संगीत नौशाद
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २५ ऑक्टोबर १९५७
अवधी १७२ मिनिटेमदर इंडिया हा इ.स. १९५७ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट होता. त्यातल्या आदर्शवादी भूमिकेमुळे चित्रपटाने प्रचंड यश मिळवलेच पण समाजमनावरही छाप ठेवली. याचे दिगदर्शन मेहबूब खान यांनी केले होते. चित्रपटाची कथाही मेहबूब खान यांनी लिहिली होती.

याच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी इ.स. १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. यात प्रमुख भूमिकांत नर्गिस , सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकपूर हे होते. चित्रपटाला संगीत नौशाद यांनी दिले होते. तर गाणी लता मंगेशकर , शमशाद बेगम, महम्मद रफी, मन्ना डे यांनी गायली होती.

हा चित्रपट भारतातर्फे ऑस्कर अ‍ॅकॅडमी पुरस्काराच्या विदेशी भाषा विभागासाठी पाठवण्यात आला होता. तो पुरस्कार हुकला असला तरी, ऑस्कर नामांकन मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट होता.

कथा[संपादन]

कथानक राधा या स्त्रीभोवती फिरते. मेहबूब खान यांच्या मते ती स्वातंत्र्योत्तर काळातील आदर्श भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करते, म्हणून त्यांनी चित्रपटाचे नावही मदर इंडिया असे ठेवले. नवीन बांधून झालेल्या कालव्याचे उद्‌घाटन बुजुर्ग राधेच्या हस्ते होते हा चित्रपटाच्या सुरुवातीला प्रसंग. याचवेळी राधेला आपल्या आयुष्याचा प्रवास आठवतो. आणि तिची गोष्ट पडद्यावर साकारते.

शामूशी लग्न झालेली नववधू राधा गावात येते. या लग्नासाठी राधेच्या सासूने सुखीलाला या सावकाराकडून कर्ज घेतलेले असते. हे कर्ज कधी संपतच नाही. केवळ कर्जाच्या व्याजापोटी शामूच्या पिकाचा मोठा हिस्सा सुखीलाला घेऊन जातो. पंचायतीचा निर्णयही सावकाराच्याच बाजूने जातो. तेव्हा शामू शेतात जास्त राबायचे व जास्त उत्पन्न काढायचे ठरवतो. पण त्यामुळे त्याला एक अपघात होतो व त्याचे हात निकामी होतात. आपण आता आपल्याच कुटुंबावर ओझे आहोत या विचाराने तो ग्रासतो व निराशेतच घर सोडून कायमचा निघून जातो.

राधेला यावेळी २ मुले असतात तसेच ती गर्भारही असते. काहीच दिवसात तिची सासू मरते. राधा बाळंत होते व पुन्हा शेतात राबते. सुखीलाला तिचा विनयभंग करायचा प्रयत्न करतो, पण ती झगडून स्वतःची सुटका करून घेते. यानंतर पूर येतो व सर्व गावाची वाताहात होते. यात राधेचे लहानगे बाळ दगावते. गावकरी हार मानून गाव सोडून निघतात पण राधा खंबीरपणे थांबून गावकऱ्यांचेही मन वळविते. बैलाऐवजी स्वतः नांगर ओढते. हेच दृश्य सिनेमाच्या जाहिरातींत व भित्तिचित्र म्हणून वापरले गेले आहे.

पुढे तिची मुले मोठी होतात व आईऐवजी ती नांगर ओढतात. काहीशी परिस्थिती स्थिर होत असते. पण सुखीलाला अजूनही त्याचा कर्जाचा हप्ता वसूल करतच असतो. लहान मुलगा बिरजू काहीसा उग्र स्वभावाचा असून सुखीलालावर खार खात असतो. सुखीलालाच्या मुलीला त्रास देणे त्याच्या नित्याच्या टवाळकीचा भाग असतो. तर मोठा रामू स्वभावाने शांत असतो. रामूचे लग्न गावातच राहणाऱ्या मुलीशी होते. तर बिरजू मात्र शस्त्र बाळगतो आणि दरोडेखोर बनतो. सुखीलालाच्या घरावर दरोडा टाकून तो त्याच्या कधीही न संपणाऱ्या कर्जाच्या चोपड्याच जाळतो. पुढे सुखीलालाला ठार मारून तो सुखीलालाच्या मुलीला तिच्या लग्नाच्या मांडवातून पळवतो. ही बातमी राधेला कळताच ती बंदूक घेउन बिरजूला शोधत त्याला गाठते. घोड्यावरून सुखीलालाच्या मुलीला घेऊन पळणाऱ्या बिरजूला ती मुलीला सोडून देण्यास फर्मावते. पण बिरजू तिची टर उडवत तू तर माझी आई आहेस म्हणत तिच्याकडे पाठ फिरवतो. अखेर राधा आपल्याच मुलाला, बिरजूला गोळी घालून सुखीलालाच्या मुलीला सोडवते व शेवटी बिरजू रक्ताने माखलेल्या राधेच्या बांगड्या ज्या सावकाराकडे पडल्या असतात त्या राधेला सोपवत राधेच्याच मांडीवर प्राण सोडतो.

कलावंत व त्यांच्या भूमिका[संपादन]

चित्रपट निर्मिती कथा[संपादन]

मेहबूब खान याच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी इ.स. १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. दोन्ही चित्रपटात सुखीलालाची भूमिका एकाच कलाकाराने केली. असे म्हणतात की मेहबूब खान यांना या कथेचा शेवट एका वृत्तपत्रीय बातमीच्या कात्रणातून सुचली. त्या बातमीत एका स्त्री आपल्याच दरोडेखोर मुलाला बलात्कार करण्यापासून रोखण्यासाठी गोळी घालुन ठार केल्याची वार्ता होती. मेहबूब खान हे जवाहर लाल नेहरूंचे मोठे चाहते होते. मदर इंडिया नंतर त्यांनी ' सन ऑफ इंडिया ' चित्रपटाची निर्मिती केली. पण तो मदर इंडिया इतकी उंची गाठु शकला नाही. नेहरूंच्या निधनाचे वृत्त ऐकताच मेहबूब खान यांनी ही प्राण सोडला.

मदर इंडिया[संपादन]

मदर इंडिया नावाचे एक इंग्रजी नियतकालिक होते. बाबूराव पटेल त्याचे संपादक होते. गुळगुळीत कागदावर छापण्यात येत असलेले हे जाडजूड नियतकालिक मुख्यत्वे चित्रपट विषयावरील नियतकालिक असले तरी त्यात बाबूराव पटेल आणि इतर काही लेखक प्रचलित राजकारणावर लिहीत. नियतकालिक, त्यातली इंग्रजी भाषा आणि त्यातील लेखांचा दर्जा अत्युत्कृष्ट असे.

तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका सुशीलाराणी पटेल या बाबूरावांच्या तृतीय पत्नी.

संदर्भ[संपादन]