राज कुमार
राज कुमार | |
---|---|
राज कुमार | |
जन्म |
राज कुमार ८ ऑक्टोबर, १९२६ बलुचिस्तान |
मृत्यू |
३ जुलै, १९९६ (वय ६९) मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
राज कुमार हे एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते होते. 8 ऑक्टोबर 1926ला बलुचिस्तानात जन्म झालेले कुलभूषण पंडीत आपले पदवी शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या माहिम पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम करु लागले. एकेदिवशी रात्री गस्त घालत असताना एका शिपायाने त्यांना सांगितले की, तुमचे व्यक्तिमत्व एका हिरोपेक्षा कमी नाही. तुम्ही जर चित्रपटातून हिरो म्हणून काम कराल तर प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य कराल. मग काय कुलभूषण यांनी ही गोष्ट मनावर घेतली. माहीम पोलीस स्टेशनला नेहमीच चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांचे येणेजाणे सुरू असायचे. असेच एकदा निर्माते बलदेव दुबे काही महत्त्वाच्या कामाने पोलीस स्टेशनला आले आणि त्यांना कुलभूषण यांच्या बोलण्याची शैली फारच आवडली. त्यांनी लगेचच त्यांच्या ‘शाहीबाजार’ या चित्रपटात काम करण्यासाठी कुलभूषण यांना विचारले. शिपायाने सांगितलेली गोष्ट मनात घोळत असतानाच संधी चालून आली होती. त्यामुळे आपल्या इन्स्पेक्टरच्या नोकरीचा राजीनामा देऊन कुलभूषण यांनी चित्रपटसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. पण शाहीबाजारच्या चित्रीकरणासाठी खूपच वेळ लागत होता. त्यादरम्यान मुंबईत राहण्याचा खर्च भागविणे कठीण झाल्याने कुलभूषण यांनी 1952 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगिली’ या चित्रपटात छोटीसी भूमिका स्वीकारली. पण हा चित्रपट कधी चित्रपटगृहात लागला आणि कधी गायब झाला हे लक्षातच आले नाही. त्याचदरम्यान शाहीबाजार पण प्रदर्शित झाला पण तो ही बॉक्सऑफिसवर सपाटून आपटला. या अपयशानंतर कुलभूषण यांना त्यांचे नातेवाईक व मित्रांनी चित्रपटसृष्टी सोडण्यासाठी आग्रह करायला सुरुवात केली. काही लोकांनी तर नायकाऐवजी खलनायक करण्याची सूचनाही कुलभूषण यांना दिली. मात्र जिद्द कायम ठेवून 1952 ते 1957 पर्यंत कुलभूषण चित्रपटसृष्टीत यश मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. या दरम्यान त्यांनी अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी और कृष्ण सुदामा या चित्रपटातून कामे केली, पण यापैकी एकही चित्रपट यशस्वी होवू शकला नाही.
ंंमहबूब खान यांच्या 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटात राजकुमार गावातील एका छोट्या शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसले. पूर्ण चित्रपट नरगिस यांना केंद्रित ठेवून केलेला होता पण आपल्या छोट्याशा भूमिकेतील दमदार अभिनयाने राजकुमार यांना केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून ख्याती मिळवून दिली. या चित्रपटाच्या यशानंतर एक अभिनेता म्हणून राजकुमार यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली.
1959 मध्ये प्रदर्शित पैगाम या चित्रपटात त्यांच्यासमोर अभिनय सम्राट दिलीपकुमार होते पण राजकुमार यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर दर्शकांची वाहवा मिळविली. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांच्या यशाने तर राजकुमार यांना अभिनयसम्राटाच्या पदावर पोहचवले. मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरू झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरू राहिला.
1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या काजल या चित्रपटापासून राजकुमार एक सुपरस्टार अभिनेता म्हणून आपल्या अभिनयाचा वेगळा पैलू दाखविण्यात यशस्वी ठरले. याचवर्षी आलेल्या बी.आर.चोपडांच्या वक्त या चित्रपटात आपल्या संवादफेकीने राजकुमार लक्षात राहिले. त्यांचा या चित्रपटातील ‘चिनायसेठ जिनके घर शीशेके बने होते है, वो दुसरों पे पत्थर नही फेका करते’ तसेच ‘चिनायसेठ ये छुपी बच्चों के खेलने की चीज नही. हाथ कट जाये तो खून निकल आता है’ हे संवाद लोकप्रिय होण्यासोबत त्यांना डॉयलॉगकिंग ही पदवी प्रेक्षकांनी बहाल केली. या चित्रपटानंतर राजकुमार चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च स्थानी पोहचले. या ठिकाणी पोहचल्यानंतर बहुतेक अभिनेते एका ठराविक इमेजमध्ये बांधले जातात आणि त्याच त्या भूमिका स्वीकारतात. मात्र राजकुमार याला अपवाद होते. यानंतर आलेल्या हमराज (1967), नीलकमल (1968), मेरे हुजूर (1968), हीररांझा (1970), पाकीजा (1971) या चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या इमेजला साजेशा नसलेल्या भूमिका केल्या. तरीही या प्रयोगात राजकुमार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पाकिजा हा चित्रपट पूर्णतः मीनाकुमारी यांच्यावर केंद्रित असलेला चित्रपट होता पण आपल्या सशक्त अभिनय आणि संवादफेकीने राजकुमार इथेही सरस ठरले. ‘आपके पांव देखे बहुत हसीन हैं, इन्हे जमीन पर मत उतारियेगा, मैले हो जायेंगे’ हा संवाद एवढा लोकप्रिय झाला की, बऱ्याच अभिनेता, कॉमेडियननी त्या संवादशैलीची कॉपी केलेली दिसून येते.
1978 मध्ये आलेल्या कर्मयोगी चित्रपटातून राजकुमार यांच्या अभिनयातील विविधतेचा एक वेगळा आयाम प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यात त्यांनी केलेल्या दुहेरी भूमिकांमधून त्यांनी चरित्र भूमिकांकडे जाणारा आपला अभिनयाचा प्रवास विविधतेने नटलेल्या अनोख्या भूमिकांकडे वळवला. तरीही 1980 मध्ये बुलंदी चित्रपटात चरित्र भूमिका करण्याचे धाडस त्यांनी केलेच. यानंतर कुदरत (1981), धर्मकांटा (1982), शरारा (1984), राजतिलक (1984), एक नयी पहेली (1984), मरते दम तक (1987,), सूर्या (1989), जंगबाज (1989), पुलिस पब्लिक (1990) या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातून राजकुमार यांचे चित्रपटसृष्टीतील राज्य अधिक विस्तारीत केले.
1991 मध्ये आलेला सौदागर या चित्रपटात राजकुमार यांच्या अभिनयाचा वेगळा आयाम प्रेक्षकांना पाहावयास मिळाला. शोमॅन सुभाष घई निर्मित या चित्रपटात 1959च्या पैगाम चित्रपटानंतर प्रथमच दिलीपकुमार व राजकुमार हे दोन्ही महारथी एकमेकांसमोर उभे होते. 90च्या दशकात राजकुमार यांनी चित्रपटातून काम करणे कमी केले. तरीही तिरंगा (1992), पुलिस और मुजरिम, इंसानियत के देवता (1993), बेताज बादशहा (1994), जवाब (1995), गॉड और गन हे त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले. एकांतवासात राहणाऱ्या राजकुमार यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती. कायम आपल्या वेगळेपणाने चर्चेत राहिलेल्या राजकुमार यांनी आपला मुलगा पुरु राजकुमारकडे व्यक्त केलेली अखेरची इच्छा होती ‘मौत और जिंदगी इंसान का निजी मामला होता है। मेरी मौत के बारे में मेरे मित्र चेतन आनंद के अलावा और किसी को नही बताना। मेरा अंतिम संस्कार करने के बाद ही फिल्मउद्योग को सूचित करना।’
3 जुलै 1996ला अलविदा म्हणणारे डॉयलॉगकिंग राजकुमार आजही प्रेक्षकांच्या मनात आपल्या अनोख्या संवादशैलीने जिवंत आहेत. त्यांचे अजरामर झालेले संवाद....
चिनायसेठ, जिनके घर शीशे के (वक्त)
आपके पैर बहुत खुबसूरत है (पाकीजा)
हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। लेकिन वह वक्त भी हमारा होगा। बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी।
काश कि तुमने हमे आवाज दी होती तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते। ('सौदागर')
हम आंखो से सुरमा नहीं चुराते। हम आंखें ही चुरा लेते हैं।
हम तुम्हें वह मौत देंगे जो न तो किसी कानून की किताब में लिखी होगी और न ही किसी मुजरिम ने सोची होगी।
हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है। दुश्मन से सीधी बात करती है। ('तिरंगा')
दादा तो इस दुनिया में दो ही हैं। एक ऊपर वाला और दूसरा मैं।
हम कुत्तों से बात नहीं करते। ('मरते दम तक')
राजकुमार यांना त्यांच्या कारकिर्दीत दिल एक मंदिर, वक्त या चित्रपटांकरिता सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता पण कोणत्याही पुरस्कारापेक्षा या अनोख्या अभिनेत्याने चार दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात आपले साम्राज्य निर्माण केले होते.