भारताचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारताचा राष्ट्रध्वज या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
भारताचा ध्वज
भारतचा ध्वज
नाव तिरंगा
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार २२ जुलै इ.स.१९४७

भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेलाhello. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृृती होते. त्यांनी ठरवले की काँग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.[१]

रचना[संपादन]

ध्वजातील गडद भगवा, पांढराहिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ :

रंग अर्थ
केशरी त्याग, शौर्य
पांढरा शांती
निळा २४ बुद्धांनी दिलेल्या २४ सत्यांच ते प्रतिक आहे. या द्वारे दु:खाचे कारण व त्यावरील उपाय सांगतात.[१][२]
हिरवा समृद्धी

भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे). २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत. मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.[ संदर्भ हवा ]

ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.

 • वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
 • मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
 • खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.
 • निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.[३][ संदर्भ हवा ]

फडकवण्याची नियमावली[संपादन]

भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी भारतीयांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की, तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो.. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोच. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.

संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो.. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो. प्लॅस्टिकचा ध्वज वापरण्यास मनाई असते.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.

संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.

राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.

ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमालावर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.

केवळ प्रजासत्ताक दिनस्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात. [ संदर्भ हवा ]

ध्वजांचा इतिहास[संपादन]

ध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे.

१८३१साली राजा राममोहन राॅय बोटीने इंग्लंडला जात असताना त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी झेंडा पाहिला व स्वातंत्र्य समता बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा असे त्यांना वाटले.पुढे १८५७च्या यूद्धात देशभक्तीच्या भावनेतून एक ध्वजगीतही निर्माण झाले.[ संदर्भ हवा ]


 • भगिनी निवेदिता ध्वज

बुद्धगयेला शिवमंदिरात वज्रचिह्न पाहून निवेदितांना ही कल्पना सुचली. चौरसाकृती तांबड्या ध्वजावर पिवळे वज्रचिह्न व शुभ्रकमळ व भोवती १॰१दिव्यांची अरास असलेला हा ध्वज.बंगाली लिपीत त्यावर वंदे मातरम् लिहीले आहे. लाल रंग हा स्वातंत्र्यसंग्रामाचे द्योतक तर पीतवर्णी वज्रचिह्न हे विजयाचे प्रतीक.श्वेतवर्णी कमळ हे शुचिता दर्शविते असे स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी नोदवले आहे.[४]

भारतीय राष्ट्रध्वजाचे साहित्यिक आणि सांस्कृतिक उल्लेख[संपादन]

भारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे. विवीध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येते. हिंदी कवी श्यामलाल गुप्त 'पार्षद' ह्यांनी लिहिलेल्या "विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।" ह्या गीतास १९३८च्या काँग्रेस आधीवेशनात[ दुजोरा हवा] 'झेंडा गीत' म्हणून स्वीकारले गेले.[ संदर्भ हवा ]


स्वांत्र्य लढ्यासाठी लिहिलेल्या प्रेरणादायी गीतात बा.भ. बोरकरांनी ' चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण, कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान अशी त्यांच्या गीतातून गर्जना केली, "अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरा रे" अशी ललकारी कवी योगेश्वर अभ्यंकरांनी दिली.[ संदर्भ हवा ]'हिंदूस्तान की कसम' या हिंदी चित्रपटात मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या हिंदूस्तान की कसम ह्या कैफी आजमी लिखीत मन्ना डे यांनी गायलेल्या गीतात कैफी आजमी म्हणतात, "दुनिया की याद अपना ये बाँकेपन रहेगा, लहरायेगा तिरंगा जबतक गगन रहेगा, ये निशान है हमारा इस निशान कि कसम, 'हिंदूस्तान की कसम'... तर खैय्याम यांनी संगित बद्ध केलेल्या (गायक: महेन्द्र कपूर), 'तू जान ले पाकीस्तान' या गीतात गीतकार साहीर बजावतात , "... हम अपने तिरंगे झंडे के दुश्मन को, कुचलकर रख देंगे..." [५] पुणे आकाशवाणीवरुन प्रकाशित सौ. अनुराधा ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या || उंच आकाशी फडके तिरंगा || या ध्वजगीतातून "देशप्रेमिंचा हा कैवारी | देशद्रोह्यांचा कट्टर वैरी | फितुरांना लावी सुरुंगा | उंच आकाशी फडके तिरंगा || १ ||" अशा शब्दात भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आभिमान व्यक्त केलेला दिसून येतो.[ संदर्भ हवा ]


स्वातंत्र्योत्तर गीत काव्यात लग्नाची वरात या मराठी चित्रपटात "नभी तिरंगा लहरत ठेऊ, करु त्याचा सन्मान" हे गीत स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजात शब्दबद्ध केले गेले आहे.[ दुजोरा हवा]


भारतीय संविधानात नमूद नागरीकांच्या कर्तव्याप्रमाणे भारतीय नागरीकांनी राष्ट्रगीतासोबतच राष्ट्रध्वजाचा आदर करणे अभिप्रेत असते. [६]

उंच राष्ट्रध्वज[संपादन]

 • पंजाब -
  • भारतातील पंजाब राज्यात अटारी येथे भारतीय सीमेच्या आत ३६० फूट (१०५ मीटर) उंचींचा भारतीय राष्ट्रध्वज आतापर्यंतचा (मार्च २०१७) सर्वाधिक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आहे. हा राष्ट्रध्वज १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे.[७]
 • महाराष्ट्र -
  • पुण्यातील कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरात पुणे महानगरपालिकेने उभारलेला २३७ फूट (७२ मीटर) उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज दैनिक लोकसत्ता वृत्तानुसार महाराष्ट्र राज्यातील आता पर्यंतचा (ऑगस्ट २०१६) सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज आहे.[८]
  • कोल्हापूर येथील ध्वज ८२ मीटर उंचीचा आहे.
  • पुण्यातील निगडी भक्ति-शक्ती उद्यानात २५-१२-२०१७ रोजी उभारलेला राष्ट्रध्वज १०७ मीटर उंचीचा आहे. या ध्वजाच्या कापडाची लांबी-रुंदी १२० गुणिले ९० फूट आहे.[९]
 • झारखंड -
  • झारखंडची राजधानी रांची येथील पहाडी मंदिराशेजारी सुमारे २९३ फ़ुट(८९ मीटर) उंचीचा ध्वज २३ जानेवारी २०१६ रोजी फडकवण्यात आला[१०]

ग्रंथ[संपादन]

ललितेतर[संपादन]

 • ध्वजप्रणाम लेखक प्रा. भा.स. गोडबोले [११]

ललित[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ फिरोदिया अरूण, भुवन मनमोहिनी,स्नेहवर्धन प्रकाशन,पृृ.७५
 2. ^ "Ashoka Chakra - Wikipedia". en.wikipedia.org (en मजकूर). 2019-08-17 रोजी पाहिले. 
 3. ^ मराठी विश्वकोश
 4. ^ फिरोदिया अरूण, भुवन मनमोहिनी,स्नेहवर्धन प्रकाशन
 5. ^ Author, No. Rashtriya Filmi Geet (hi मजकूर). Diamond Pocket Books (P) Ltd. आय.एस.बी.एन. 9788171821631. 
 6. ^ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10050-2012-07-19-04-32-22?showall=1&limitstart=
 7. ^ "अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा". Lokmat (mr मजकूर). 2017-03-06. 2018-09-02 रोजी पाहिले. 
 8. ^ "२३७ फूट उंचीचा राष्ट्रध्वज". Loksatta (mr-IN मजकूर). 2016-08-17. 2018-09-02 रोजी पाहिले. 
 9. ^ "Huge national flag to unfurl at Nigdi on Republic Day - Times of India". The Times of India. 2018-09-02 रोजी पाहिले. 
 10. ^ "Fate of 293-feet flagpole at Ranchi’s Pahari Mandir in limbo as Jharkhand plans to develop it as tourist destination". The Financial Express (अमे.- इंग्रजी मजकूर). १६-०८-२०१८. १८-१०-२०१८ रोजी पाहिले. 
 11. ^ "ध्वजप्रणाम-Dhwajpranam by Prof. B. S. Godbole - Anubandh Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-09-02 रोजी पाहिले.