अशोक चक्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अशोक चक्र

अशोकचक्र म्हणजे ‘धम्माने प्रेरित असलेल्या सदाचरणाचे चक्र.’ सम्राट अशोकांचे चक्र म्हणजे धम्मचक्राचेच रूप समजले जाते. या चक्राला २४ आरे असतात. मौर्य साम्राज्याच्या अनेक अवशेषांवर असे अशोकचक्र मोठ्या प्रमाणात कोरलेले आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचे अवशेष म्हणजे सारनाथ येथील सिंहाचे प्रतीक आणि अशोकस्तंभ, हे समजले जातात. आता हे अशोकचक्र प्रामुख्याने भारतीय बौद्ध ध्वजात (निळा भीम ध्वज) आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी विराजमान झालेले दिसते, जे २२ जुलै १९४७ रोजी स्विकारले गेले. भारताच्या राष्ट्रध्वजात अशोक चक्राला स्थान मिळवून देण्याचे श्रेय प्रसिद्ध बौद्ध विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. पांढऱ्या रंगाच्या पाश्वभूमीवर हे गडद निळ्या रंगाचे चर्र खूप उठावदार दिसते. भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून जे चार सिंहाचे प्रतीक स्वीकारले गेले आहे, त्याला आधार देणाऱ्या दहडावरही मध्यभागी अशोक चक्र कोरलेले आहे.

आपल्या राज्यकारभाराच्या काळात सम्राट अशोकांनी या चक्राची निर्मीती केली. ‘चक्र’ हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘स्वतःभोवती स्वतःगोल फिरणारा’ असा होतो. ही गोल फिरण्याची क्रिया ‘समयचक्र’ दर्शवते, म्हणजे काळाबरोबर जग कसे बदलत राहते ती क्रिया दाखवण्यासाठी चक्राचे उदाहरण दिले जाते. घोडा हे अचूकता आणि वेग यांचे प्रतीक आहे, तर बैल हा कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे.

भारतीय राष्ट्र ध्वजात अशोकचक्र[संपादन]

भारताचा ध्वज

आॅगस्ट १९४७ पूर्वी म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी राज्यघटना लिहिण्यासाठी एक विशेष समिती नेमली होती, त्या समितीने असा निर्णय घेतला की, भारताचा राष्ट्रध्वज हा सर्व पक्षांना, सर्व जाती-धर्मीयांना मान्य होईल असा असायला हवा. अनेक नमुण्यातून केशरी, पांढरा आणि हिरवा हे तीन रंग असणारा आणि पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र असणारा ध्वज ‘राष्ट्रध्वज’ म्हणून निवडला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांनी व तर्कशुद्ध विचारांनी या अशोकचक्राला राष्ट्रध्वजात स्थान मिळाले.

राष्ट्रध्वजातील भगवा किंवा केशरी रंग सर्वसंगपरित्याग किंवा निष्काम-निःस्वार्थी बुद्धी दर्शवतो. मध्यभागी असणारा पांढरा रंग म्हणजेप प्रकाशाचे द्योतक, सत्याचा मार्ग आणि हिरवा रंग म्हणजे वनस्पती-जीवन-मातीशी- असलेले नाते, ज्यावर इतर सगळी सृष्टी अवलंबून असते आणि म्हणून हे नाते कायम स्मरणात ठेवायला हवे हे या रंगातून ध्वनीत केले आहे. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावर मध्यभागी रेखलेले अशोकचक्र म्हणजे धर्म-नियमांचे चक्र आहे. या राष्ट्रध्वजाच्या साक्षीने काम करणाऱ्यावर नियमत्रण ठेवणारे तत्त्व म्हणजे सत्य आणि धर्मपालन (धम्मपालन) म्हणजेच सदाचार हेच असायला हवे. याखेरीज हे चक्र म्हणजे गतिमानतेचे द्योतक आहे. जो कोणतेही कार्य न करता, आळसातून क्रियाशून्य होतो तो मृतवतच होतो म्हणजे आजच्या रूढ वाक्यप्रचारानुसार ‘थांबला तो संपला’. क्रियाशीलता म्हणजेच आयुष्य, जिवंतपणा. यापुढे भारताने कुठल्याही बदलाला अकारण विरोध करता कामा नये. देशाने आणि देशातल्या नागरिकांनी सतत कार्यरत राहून प्रगती साधली पाहिजे. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या बदलांची, सुधारणांची आणि प्रगतीची गतिशीलता दाखवणारे प्रतीक म्हणजे हे चक्र होय. त्यावरील २४ आरे हे दिवसाचा २४ तासांचे प्रतिनिधित्व करतात.

या ध्वजाचे असेही वैशिष्ट्य, अगदी सर्वसामान्यपणे सांगितले जाते की, त्यातला केशरी रंग हा पवित्रता आणि त्यागाचे प्रतिक आहे, पांढरा रंग हा शांतता आणि सत्याचे प्रतीक आहे आणि हिरंवा रंग हा सुपीकता, सुफलता आणि भरभराटीचे द्योतक आहे आणि निळे अशोकचक्र हे न्याय आणि सदाचरण यांचे प्रतीक आहे.

भारतीय बौद्ध ध्वजात अशोकचक्र[संपादन]

भारतीय बौद्ध ध्वज (भीम ध्वज)

जगभरातील आंबेडकरवादी या भारतीय बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात. बौद्ध विहारे, दलित - बहुजन आंदोलनात, घरांवर हा ध्वज बौद्ध वापरतात. निळा रंग हा आंबेडकरवादी बौद्धांचे प्रतीक आहे.

 अशोक चक्र हे वेळेचे प्रतीक आहे. 24 आरेे हे 24 तासाचेे प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी अशोक चक्राचा उपयोग वेळ पाहण्यासाठी केला जात होता. सूर्योदयापासून अशोक स्तंभाची सावली ची उंची कमी होत जात होती नंतर उंची वाढत जात होती यावरून वेळ ठरवले जात होते.

२४ आऱ्यांचा अर्थ[संपादन]

अशोकचक्रावरील २४ आरे, म्हणजे पुढीलप्रमाणे २४ सद्गुणांचे द्योतक आहे :-

  1. प्रेम
  2. शौर्य
  3. सहनशीलता
  4. शांतताप्रियता
  5. दयाळूपणा
  6. चांगुलपणा
  7. प्रामाणिरपणा
  8. सभ्यता
  9. स्व-नियंत्रण
  10. निःस्वार्थीपणा
  11. स्वार्थत्याग
  12. सच्चेपणा
  13. सद्ववर्तन / सदाचार
  14. न्याय
  15. अनुकंपा / करुणा
  16. आनंदी-वृत्ती
  17. विनम्रता
  18. सहभावना (दुसऱ्याचा भावना समजून घेण्याची क्षमता)
  19. सहानुभूती / इतरांबद्दल कळवळा
  20. सर्वोच्च दर्जाचे ज्ञान
  21. सर्वोच्च दर्जाचे चातुर्य
  22. सर्वोच्च नैतिकता / सर्वोत्तम चारित्र
  23. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम
  24. निसर्गाच्या भलेपणावर दृढ विश्वास, निष्ठा आणि आशा

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

iee33