महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)
महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर) | ||
नाव: | करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई | |
---|---|---|
निर्माता: | चालुक्य राजा कर्णदेव | |
जीर्णोद्धारक: | चालुक्य राजा कर्णदेव | |
निर्माण काल : | ६३४ | |
वास्तुकला: | हेमाडपंथी | |
स्थान: | करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र | |
प्रधान देवता: | सर्वस्याद्या त्रिगुणात्मक महालक्ष्मी भगवती ( महामातृक स्थान ) | |
महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात.
मंदिरावर व्यवस्थित नजर टाकली तर जैन मुर्ती आढळून येतात.एकेकाळी येथे पद्मावती नावाची राणी राज्य करत होती असे सांगतात.या भागात त्या काळी ईडलिंबूच्या बागा असत.राणी निर्भयपणे राज्य करत असल्याने तिला सिंहासारखी शूर माणले जायचे .
देवीच्या मुर्तीमधे पद्मावतीचे चित्र रेखीवपणे कोरले आहे .ही मुर्ती पद्मावतीची असल्याचा काही ठिकाणी उल्लेख आढळतो.
पुराण
[संपादन]पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स. ६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे.[१] मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले.
पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.[२]
कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होतीअसे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.
मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे. अकराव्या शतकातील शिलालेखात 'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हणले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे. नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.[३]
सर्वस्याद्या महालक्ष्मी
[संपादन]पद्म पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथांत महलक्ष्मीचा उल्लेख आहे. मार्कंडेय पुराणातील शाक्त संप्रदायचे ग्रंथ दुर्गा सप्तशती नुसार सृष्टी निर्माणच्या व त्रीदेवांच्या आधी ब्रम्हांडात फक्त एक तेजस्वी उर्जा शक्ती होती. ती उर्जा शक्ती अर्थात परब्रम्ह निर्गुण निराकार होती. त्या उर्जा शक्तीने सगुण साकार रूप धारण केले. ती चतुर्भुज होती. ती तप्तकांचन वर्णभा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची होती. तीच्या उजव्या वरच्या हातात जमिनीला टेकलेली गदा, उजव्या खालच्या हातात म्हाळुंग फळ अर्थात बीजफळ, डाव्या वरच्या हातात खेटक, डाव्या खालच्या हातात पानपात्र, मस्तकी सयोनी लिंग आणी साडेतीन वेटोळे असलेला नाग आहे. तसेच ती सिंहावर विराजमान आहे. हिच मुळ सर्वस्याद्या शक्ती म्हणजे कोल्हापूर करवीर निवासिनी जगत जननी आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवी. ह्या देवीचे वास्तव्य कोल्हापूर येथे आहे. आई महालक्ष्मी देवीचा प्रमुख सण शारदीय नवरात्र उत्सव आहे.
देवी दुर्गा सप्तशती मध्ये महालक्ष्मीचे वर्णन -
मातुलुङ्गं गदां खेटं पानपात्रं च बिभ्रती। नागं लिङ्गं च योनिं च बिभ्रती नृप मूर्धनि।। तप्तकाञ्चनवर्णाभा तप्तकाञ्चनभूषणा। शून्यं तदखिलं स्वेन पूरयामास तेजसा।।
दुर्गा सप्तशती मुळ प्रकृती देवता
[संपादन]मुळ प्रकृती सर्वस्याद्या भगवती त्रिगुणात्मक परमेश्वरी पराशक्ती चतुर्भुज महालक्ष्मीच्या तमोगुणातून चतुर्भुज महाकाली व चतुर्भुज महासरस्वती प्रकट झाली. व तिघींनी मिळून त्रिदेव-देवींची उत्पत्ती केली. पहिल्या मुळ त्रिदेवींची पुढील स्वरूप.
प्राधानिक रहस्य :-
- चतुर्भुज महाकाली (तमोगुणी)
- चतुर्भुज महालक्ष्मी (त्रिगुणी सर्वस्याद्या पराशक्ती)
- चतुर्भुज महासरस्वती (सत्वगुणी)
वैकृतिक रहस्य :-
- योगमाया महाकाली (दशभुजा महाकाली)
- चंडिका महिषमर्दिनी दुर्गा (अष्टदशभूजा महालक्ष्मी)
- कौशिकी अंबिका (अष्टभूजा महासरस्वती)
योगमाया महाकाली :-
विष्णूंची योगनिद्रा. मधू कैठभ यांचा वध करण्यासाठी भगवान ब्रम्हदेवानी ज्या देवीची स्तुती केली तीच भगवती दशभुजा योगमाया महाकाली.
चंडिका महिषमर्दिनी दुर्गा :-
सर्व देवांच्या अंगापासून ज्या देवीची उत्पत्ती झाली. त्या देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला ती देवी म्हणजे भगवती अष्टदशभूजा चंडिका. अर्थात श्री महालक्ष्मी. महालक्ष्मी हीच त्रिगुणात्मक स्वरूपिनी व सर्वस्याद्या आहे. पुढे ह्याच देवीने दुर्गमासुर व कोल्हासूर राक्षसाचा वध केला व भक्तांची महालक्ष्मी अंबाबाई बनून करवीर नगरीत स्थायी झाली.
कौशिकी अंबिका :-
शुम्भ निशुम्भ मर्दन करण्यासाठी पार्वती देवीच्या शरीरातून जी देवी प्रकट झाली ती म्हणजे भगवती अष्टभूजा कौशिकी अंबिका. अर्थात महासरस्वती देवी.
दुर्गा सप्तशती त्रिदेव-देवी उत्पत्ती
[संपादन]सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मी देवीच्या तमोगुणातून चतुर्भुज आदिशक्ती महाकाली व सत्वगुणातून चतुर्भुज आदिशक्ती महासरस्वती प्रकट झाले. म्हणून सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मीला त्रिगुणात्मक स्वरूपिणि म्हणतात. नंतर तिघींनी मिळून त्रिदेवांची निर्मिती केली.
- महाकालीच्या गुणातून
शंकर-सरस्वती प्रकट झाले.
- महालक्ष्मीच्या गुणातून
ब्रम्हा-लक्ष्मी प्रकट झाले.
- महासरस्वतीच्या गुणातून
विष्णू-गौरी प्रकट झाले.
नंतर ह्या सहा जोड्यांचे विवाह करून दिले. त्यांना कार्य सोपविले.
- ब्रम्हा-सरस्वती : यांनी विश्व निर्मिती करावी.
- विष्णू-लक्ष्मी : यांनी विश्वाचे पालन करावे.
- शंकर-गौरी : यांनी संहार करावा.
अशी कामे सोपवून सर्वस्याद्या शक्ती जगत जननी सर्वस्याद्या महालक्ष्मी महाकाली व महासरस्वतीसह करवीर येथे वास्तव्यास राहिली.
महालक्ष्मीचे प्रमुख रूप
[संपादन]आपल्या हिंदू धर्मात महालक्ष्मी देवता श्री हरी विष्णूंची धर्मपत्नी व दागिने तसेच पैसे देणारी अर्थात ऐश्वर्य देणारी देवता समजली जाते. परंतु शास्र व पुराणाची माहिती नसल्याने अनेकांना महालक्ष्मीचे स्वरूप समजत नाही.
( देवी महालक्ष्मीचे प्रामुख्याने चार रूप आहेत )
१) सर्वस्याद्या महालक्ष्मी
जेव्हा सृष्टी शुन्य स्वरूपात होती तेव्हा निर्गुण निराकार परब्रम्हाने पहिले सगुण साकार रूप धारण केले. गदा, पानपात्र, म्हाळुंग, ढाल, सयोनी नागलिंग, सिंह वाहीनी असे स्वरूप असलेली देवी तापलेल्या सोन्यासारखी दिसणारी स्री रूपाची होती. परंतु ती ना स्री ना पुरूष ना नपुसक. ती तर लिंगायात्रित देवी होती जिचे नाव होते श्री महालक्ष्मी अर्थात आपल्या सर्वांची कुलस्वामिनी करवीर निवासीनी आई अंबाबाई. देवी महालक्ष्मी अंबाबाई ही त्रिगुणांची अधिष्ठात्री देवता. तिच्या तमोगुणातून चतुर्भुज महाकाली व सत्वगुणातून चतुर्भुज महासरस्वती प्रकट झाली. पुढे ह्या तिघिंनी मिळून त्रिदेव-देवींना प्रकट केले. देवी महालक्ष्मी अंबाबाई ही मुळ प्रकृती. त्रिदेव देवी सह सर्व देवतांची माता जगत जननी.
२) चंडिका महालक्ष्मी
जेव्हा जेव्हा सृष्टीवर दैत्यांनी आतंक माजवला तेव्हा तेव्हा जगदंबेने रौद्र रूप धारण करून दैत्यांचा संहार केला. सर्वस्याद्या महालक्ष्मीचे हे अष्टदशभुजा चंडिका स्वरूप आहे. अर्थात अठरा हातांची महादेवी. देवीने महिषासुर, कोलासुर व दुर्गमासुर राक्षसांचा वध केला. म्हणून देवीला महिषासुरमर्दिनी दुर्गा म्हणले जाते.
३) श्री लक्ष्मी देवी
सर्वस्याद्या महालक्ष्मीने तमोगुणातून चतुर्भुज महाकाली व सत्वगुणातून चतुर्भुज महासरस्वती प्रकट केली. तेव्हा तिघिंनी त्रिदेव-देवींची निर्मिती केली. त्यावेळी महालक्ष्मीच्या गुणातून ब्रम्हा व लक्ष्मी प्रकट झाले. पुढील अवतार सारणीसाठी भृगु ऋषींच्या यज्ञाद्वारे सर्वस्याद्या महालक्ष्मीने समुद्रदेव व त्यांची पत्नी तिरंगीनी ह्यांच्याकडे लक्ष्मीदेवी रूपात जन्म घेतले. ह्या देवीला श्री म्हणले जाते. श्री अर्थात ऐश्वर्य, सुख, समृद्धी. पाश, अंकुश, कमळ आणि शंख धारण करणारी ही महालक्ष्मी कन्या भगवान विष्णूंची अर्धांगिनी झाली.
४) विष्णूप्रिया श्री महालक्ष्मी
सर्वस्याद्या महालक्ष्मीची ह्या कन्येचा विवाह चतुर्भुज महासरस्वती देवी पुत्र भगवान विष्णूंशी झाला. आणि देवी लक्ष्मी हरीप्रिया अर्थात विष्णूपत्नी श्री महालक्ष्मी झाली. हीच देवी समुद्रदेव व तिरंगीनी मातेची कन्या म्हणून ओळखली जाते. दोन कमळ आणि वरद अभय मुद्रा धारण करणारी ही विष्णूपत्नी. साक्षात धन, धान्य, संतान, सुख, समृद्धी व ऐश्वर्यची अधिष्ठात्री देवता. समुद्रमंथनातून प्रकट झालेली ही चौदा रत्नांपैकी एक. ह्या देवीची प्रामुख्याने आठ रूपे म्हणून देवीला अष्टलक्ष्मी ही म्हणतात.
दक्षिण काशी करवीर
[संपादन]ब्रम्हदेवांनी सृष्टी निर्माण केली. तेव्हा श्री विष्णूंनी दोन काशी निर्माण केल्या. एक उत्तर काशी जी काशी विश्वेश्वर अर्थात महादेवांना समर्पित केले. व दुसरे दक्षिण काशी सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मीला समप्रित केले. दक्षिण काशी हे महालक्ष्मीला अत्यंत प्रीय असल्याने आदी व अनंत काळासाठी ती इथेच वास्तव्यास राहिली.
आद्य स्वयंभू शक्तीपीठ
[संपादन]आदिशक्ती महाकाली स्वरूप देवी सतीने आपल्या पतीच्या अर्थात महादेवांच्या अपमानाविरूद्ध आपले पिता प्रजापती दक्ष यांच्या यज्ञ होम अग्नीत स्वतःला नष्ट केले. तेव्हा महादेव सतीचे कलेवर घेऊन पृथ्वीलोक फिरत होते. सतीच्या पुर्न जन्मासाठी श्री विष्णूंनी सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले. ते ज्या ज्या ठिकाणी पडले तेथे देवीचे शक्तीपीठ निर्माण झाले. करवीर कोल्हापूर येथे सतीचे त्रिनेत्र पडले. येथे महिषमर्दिनी महाकाली शक्तीपीठ निर्माण झाले. हे क्षेत्र सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मीचे मुळ स्थान आहे. म्हणून हे मुळ आद्य शक्तीपीठ नावाने ओळखले जाते. पुराणात उल्लेख केलेल्या १०८ शक्तीपीठांपैकी व श्री महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्य शक्तीपीठ करवीर कोल्हापूर आहे. देवी सतीच्या आत्मदहन नंतर सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मी स्वरूप आदिशक्ती महाकालीने पार्वती देवी रूपात जन्म घेतले. पार्वती देवी ही अंबिका, चंडिका, तुळजाभवानी, रेणुका, एकवीरा, जीवदानी, प्रभादेवी, काळुबाई , नव दुर्गा अशा अनेक नावाने ओळखली जाते.
छत्रपती काळ
[संपादन]पुर्वी महाराष्ट्रात मोगलाईची हुकुमत होती. हिंदूंचे सर्व मंदिरे तोडून मशिद बांधले जात होते. याच काळात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्य शक्तीपीठ असलेलं कोल्हापूर करवीर निवासिनी सर्वस्याद्या शक्ती त्रिगुणात्मक स्वरूपीणी आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरावर ही संकट आले. मोगलांच्या विध्वंसामुळे देवी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची विटंबना होईल या भयाने मूर्ती अनेक वर्षे एका पुजाऱ्याच्या घरात लपवून ठेवली गेली. १७२० साली श्रीमंत छत्रपती महाराणी ताराबाई सरकारांनी करवीर संस्थानची स्थापना केली. सन् १७१५ साली नरहरभट सावगावकर यांना महालक्ष्मी देवीने मूर्ती कुठे आहे याचा दृष्टांत दिला. नरहरभट यांनी तत्कालीन करवीर श्रीमंत छत्रपती महाराज संभाजीराजे दुसरे यांना सांगितले. महाराजांच्या आज्ञेने सिदोजी घोरपडे (गजेंद्रगडकर) यांनी २६ सप्टेंबर १७१५ रोजी विजया दशमीला श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची पुन्हा स्थापना केली. आज या घटनेला ३०५ वर्षे पुर्ण होत आहेत.
मंदिराची वास्तू
[संपादन]कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे संमत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणाऱ्या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो.
देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्रकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.
महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे (जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.
शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे.
नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणाऱ्या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा महाराष्ट्रीय मंदिर-प्रथांचे उत्तम उदाहरण आहे.
इतिहास व माहिती
[संपादन]महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्चिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले.[१] ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते; कारण राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कऱ्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सीम भक्त होते. आपणास देवीचा "वरप्रसाद" मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो.
काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथीयांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ.स. १७२२ मध्ये दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांनी सिधोजी हिंदूराव घोरपडे यांना पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते.
हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात.
प्राध्यापक प्रभाकर माळशे म्हणतात, "करवीराचे नाव आजही स्थानिक पातळीवर कोल्हापूर शहर दर्शविण्यासाठी वापरले जाते".[४]
स्वरूप
[संपादन]प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती (३.०५ मी.उंच) लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभाऱ्यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालण्याऱ्या भाविक लोकांना त्रास होऊ नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना तसेच गाभाऱ्यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक लिंग आहे. मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे. थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले त्या बांधकामाला एक लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. ज्याला गरुड मंडप किंवा सभा मंडप म्हणतात. तो इ.स. १८४४ ते इ.स. १८६७ या दरम्यान बांधण्यात आला. महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, स्वामी समर्थ, विठोबा, काशीविश्वेश्वर, राम, कात्यायनी, पंचगंगा व साती आसरा आणि राधा कॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत. देवळाच्या सभोवारच्या मोकळया जागेत फसरबंदी केलेली आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते. या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत.
शिलालेख
[संपादन]देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे, आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो.
व्यवस्था व पालखी
[संपादन]महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक भाविक येतात. त्यात पुण्या-मुंबईहून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर २० पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो. त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो.या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखीमध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूरपासून ४.८३ कि. मी. वर असलेल्या टेंबलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंबलाईला कोहळयाचा नैवेद्य दाखवला जातो. अश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो.
अंबाबाई मंदिरातला किरणोत्सव
[संपादन]दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती अशी :-
१. ३१ जानेवारी (आणि ९ नोव्हेंबर) : सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. २. १ फेब्रुवारी (आणि १० नोव्हेंबर) : सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात. ३. २ फेब्रुवारी (आणि ११ नोव्हेंबर) : मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात.
या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो.
परिसर
[संपादन]महालक्ष्मीच्या देवळाच्या परिसरात असलेल्या देवळांपैकी शेषशायी व नवग्रहांचे देऊळ शिल्प आणि प्राचीनत्व या दृष्टीने महत्त्वाची आहेत. शेषशायीचे देऊळ पूर्व दरवाजाच्या दक्षिणेला आहे. या देवळामध्ये विष्णूची मूर्ती शेषनागाच्या अंगावर पहुडलेली आहे. या देवळामध्ये एक लिंग असून देवळाच्या समोरच सुंदर मंडप आहे. त्याच्या छताच्या आतल्या बाजूला जो घुमट आहे त्याच्यावरील शिल्प आणि कोरीव काम इतके अप्रतिम आहे की, त्याची तुलना अबू येथील विमलसभा या वास्तूच्या छतावरील कोरीव कामाबरोबरच करता येईल. या कोरलेल्या छताच्या खालच्या बाजूला जैन तीर्थकरांच्या दिगंबर मूर्ती कोरलेल्या असून त्यांच्या बाजूला कन्नड भाषेतील शिलालेख आहे. या मंडपाची बांधणी बहुधा एखाद्या भाविक जैन राजाने केली असावी.
नवग्रहांच्या देवळालाही दर्शनी बाजूला एक सुंदर मंडप असून त्या मंडपाच्या छताला आतील बाजूवर असलेल्या नऊ तावदानावरून या मंडपाला नवग्रह मंडप म्हणतात. वास्तविक या उत्तर-चालुक्य अथवा होयसाळ काळातील छताप्रमाणे या मंडपाच्या छतावर मुख्य देवतेभोवती अष्ट दिक्पालांचे चित्रण आहे. ही मुख्य देवता जैन असावी अशा अनुमानास बराच आधार आहे. आवरातील दोन देवळे (शेषशायी व नवग्रह) जैन आहेत हे अर्थपूर्ण आहे. हा मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पाचा एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे. मंडपाच्या वरच्या बाजूला हंसांच्या प्रतिकृती व टोकाला अप्सरांच्या अतिशय सुंदर मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. उजव्या बाजूच्या एका छोटया देवळात महिषासुराला मारणाऱ्या दुर्गेची प्रतिमा आणि सूर्यदेवाला वाहून नेणाऱ्या सात घोडयांच्या रथाचे उत्कृष्ट कोरीव काम आहे.डाव्या बाजूला असलेल्या देवळात नवग्रहांच्या मूर्ती असून त्यांची प्रतिष्ठापना अगदी अलीकडे करण्यात आलेली आहे.
वरील दोन देवळांव्यतिरिक्त आणखी छोटीछोटी पूजेची ठिकाणे मुख्य मंदिराच्या परिसरात असून त्या मध्ये हरिहरेश्वर, मुक्तेश्वरी आदि देवळांचा उल्लेख करावा लागेल. मंदिराच्या उत्तरेकडे पूर्वी काशी आणि मनकर्णिका या नावांची दोन कुंडे होती. ही कुंडे आता मातीने भरून गेलेली आहेत आणि तेथे असलेल्या मूर्ती आणि इतर प्रतिमा वस्तुसंग्रहालयात वा इतरत्र हलविण्यात आलेल्या आहेत. हल्ली महालक्ष्मीच्या देवस्थानाचा सर्व कारभार जिल्हाधिकारी एका समितीच्या मदतीने पहतात.
चित्रदालन
[संपादन]-
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
-
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर -प्रवेश
-
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर - तेथिल दिपमाळा
-
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर - बाह्यरूप -१
-
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर - बाह्यरूप - २
-
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर - बाह्यरूप - ३
-
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर - बाह्यरूप - ४
-
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर - बाह्यरूप - ५
हेसुद्धा पाहा
[संपादन]देवीची साडेतीन शक्तिपीठे :-
- श्री क्षेत्र माहूर - रेणुकामाता
- श्री क्षेत्र तुळजापूर - तुळजाभवानी माता
- श्री क्षेत्र सप्तशृंगी गड - सप्तशृंगी माता
- श्री क्षेत्र कोल्हापुर - अंबा माता उपपीठ उंब्रज पुणे
संदर्भ
[संपादन]- ^ a b Tate, Karen (2005). Sacred Places of Goddess: 108 Destinations. CCC Publishing. p. 197. ISBN 9781888729177.
- ^ Stephen Knapp (1 January 2009). Spiritual India Handbook. Jaico Publishing House. p. 169. ISBN 9788184950243.
- ^ "Rahasya Thrayam I- Pradhanika Rahasyam - Hindupedia, the Hindu Encyclopedia". www.hindupedia.com. 2021-05-08 रोजी पाहिले.
- ^ Prabhakar T. Malshe (1974). Kolhapur: A Study in Urban Geography. University of Poona. p. 3.