घंटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संगीत दृष्ट्या एक आघात वाद्य व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे प्रतीकात्मक उपकरण. घंटेचा आकार सामान्यतः पालथ्या पेल्यासारखा असतो. ती टांगण्यासाठी तिच्या वरील भागाला कडी असून आतील पोकळ भागात एक लोळी लोंबत असते. ही लोळी घंटेच्या काठावर आपटली की तिच्यातून नाद निघतो.


घंटेची निर्मिती प्रथम आशियातच झाली असावी, असे अभ्यासकांचे मत असून, ब्रॉंझ युगात ती प्रथम बनल्याचे उल्लेख सापडतात. थाळ्या किंवा भांडी यांच्यापासून निघणारा नाद ऐकून त्यापासून मनोरंजन किंवा करमणूक होते अथवा दूर असणाऱ्यांना इशारा अगर सूचना देण्यासाठी हा नाद उपयुक्त आहे असे जेव्हा मानवाच्या ध्यानी आले, तेव्हा घंटेची निर्मिती झाली. प्राथमिक स्वरूपाची घंटा म्हणजे एक धातूची सपाट थाळी असून ती एका ठोक्याने बडविण्यात येई. पुढे मात्र गोलाकार भांड्याच्या आकाराच्या घंटा तयार होऊ लागल्या. त्या वेळी घंटेचा आकारही लहान असे. ती हाताने मागेपुढे हलवून किंवा लाकडी हातोडीने वाजवीत.

चीन, जपान, ब्रह्मदेश, भारत व ईजिप्त येथील प्राचीन संस्कृतीत घंटेचा उपयोग निरनिराळ्या स्वरूपांत केला जात असे. इ. स. पू. दहाव्या शतकात सॉलोमन राजाने आपल्या देवळावर सोन्याच्या घंटा टांगल्याचा उल्लेख सापडतो, तर इ. स.च्या पहिल्या शतकात ऑगस्टस राजाने जूपिटरच्या देवळासमोर मोठी घंटा टांगली होती, असे म्हणतात. बॅबिलनजवळ सापडलेली घंटा ३,००० वर्षांपूर्वीची आहे.