Jump to content

जोगवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शारदीय नवरात्र उत्सवात जोगवा मागणारी महिला

जोगवा ही देवीच्या उपासनेतील एक संकल्पना आहे.[१]जोगवा मागणे म्हणजे भिक्षा मागणे अथवा कृपाप्रसाद मागणे. देवीचा म्हणजे अंबा, भवानी, रेणुका आदि शक्तिदेवतांपुढे पदर पसरून कृपाप्रसाद मागितला जातो.जोगते व जोगतिणी या प्रथेतील लोकसंस्कृतीचे उपासक मानले जातात.[२]

स्वरूप[संपादन]

देवीच्या नावाने जोगवा मागणे याचा अर्थ घरोघरी जाऊन भिक्षा मागणे आणि त्यामध्ये जो कोरडा शिधा किंवा धान्य मिळेल ते शिजवून खाणे. जोगते आणि जोगतीण यांचा निर्वाह यावर अवलंबून असतो, मात्र काही भक्त केवळ देवीचे वार मानल्या गेलेल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी असा जोगवा मागतात. शारदीय नवरात्री उत्सवात असा जोगवा मागितला जातो.[३]

संत एकनाथांचे भारूड[संपादन]

अनादि निर्गुण प्रगटली भवानी। मोहमहिषासुर मर्दनालागुनी।। त्रिविध तापांची कराया झाडणी। भक्तांलागुनी पावसी निर्वाणीं।। आईचा जोगवा जोगवा मागेन। व्दैत सारूनि माळ मी घालीन।। हातीं बोधाचा झेंडा घेईन। भेदरहित वारीसी जाईन।। नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा। करूनी पिटीं मागेन ज्ञानपुत्रा।।[४]

या भारूडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतु अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत. याबरोबरच भवानी आईचा रोडगा ही प्रसिद्ध आहे.

भवानी आईचा रोडगा[संपादन]

सत्त्वर पावगे मला। भवानीआई रोडगा वाहीन तुला।।१।। सासरा माझा गांवी गेला। तिकडेच खपवी त्याला।।२।। सासू माझी जाच करती। लवकर निर्दाळ तिला।।३।। जाऊ माझी फडफड बोलती। बोडकी करगं तिला।।४।। नणंदेचें पोर किरकिर करितें। खरूज होऊंदे त्याला।।५।। दादला मारून आहुती देईन। मोकळी करगे मला।।६।। एकाजनार्दनी सगळेंचि जाऊंदे। एकटीच राहूंदे मला।।७।।[५]

अनिष्ट प्रथा[संपादन]

जोगते किंवा जोगतिणी या अनुक्रमे देवदास आणि देवदासी वर्गात मोडत असल्या तरी देवदासी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यानंतर यल्लम्माला मुले किंवा मुली सोडण्याची अनिष्ट प्रथा पूर्णपणे बंद झालेली आहे असे नव्हे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित, अशिक्षित किंवा अल्पशिक्षित, श्रद्धेच्या किंवा अंधश्रद्धेच्या ओझ्याखाली वावरणाऱ्या समाजात अजूनही देवदासी परंपरा सुरू आहे.[६]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जोगवा मागेन..." Maharashtra Times. 2020-10-11 रोजी पाहिले.
  2. ^ Bhosale, D. T. (2001). Sãskr̥tīcyā pāūlakhuṇā. Padmagandhā Prakāśana.
  3. ^ "जोगवा मागेन..." Maharashtra Times. 2020-10-22 रोजी पाहिले.
  4. ^ Mācave, Prabhākara (1962). Hindī aura Marāṭhī kā nirguṇa santa-kāvya (हिंदी भाषेत). Caukhambā Vidyābhavana.
  5. ^ Deshpande, Achyut Narayan (1966). Prācīna Marāṭhī vāṅmayācā itihāsa: Ekanātha- Mukteśvara. Vhīnasa Prakāśana.
  6. ^ Gāyakavāḍa, Bāburāva (1994). Dalitetara lekhaka āṇi Dalita jīvana. Adhikā Prakāśana.