Jump to content

कुषाण साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुशाण साम्राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)
कुषाण साम्राज्य


इ.स. ३० - इ.स. ३७५
राजधानी बाग्राम
पेशावर
तक्षशिला
मथुरा
राजे कुजुल कॅडफिसस
कनिष्क
किपुनद
भाषा ग्रीक, बॅक्ट्रियन
क्षेत्रफळ ३८,००,००० वर्ग किमी

कुषाण साम्राज्य हे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात उदयास आलेले एक भारतीय साम्राज्य होते.

कुषाणांचा इतिहास

[संपादन]

सुरुवातीला चीनच्या वायव्य सरहद्दीवर यांचे वास्तव्य होते. इ.स. पूर्व १६५ च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना तेथून हाकलून लावले व तो प्रदेश काबीज केला. तेव्हा कुषाणांच्या या टोळ्या पश्चिमेकडे सरकल्या व त्यांचे दोन विभाग पडले. त्यापैकी एक विभाग तिबेटच्या सरहद्दीपर्यंत येऊन पोहोचला आणि तेथे स्थायिक झाला. दुसरा विभाग पश्चिमेकडे जात असताना त्यांचा संबंध शकांशी आला आणि त्यांनी शकांना भारताकडे पिटाळले. पण पुन्हा इ.स. पूर्व १४० च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण केले म्हणून ही टोळी दक्षिणकडे आणि त्यांनी इ.स. पूर्व पहिल्या शतकात बॅक्ट्रीया प्रांत जिंकून घेतला आणि तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. बॅक्ट्रीया प्रांतात कुषाणांची पाच राज्ये ह्यु-मी, चुऑंग-मो, कु-चुऑंग उर्फ कुषाण, ही-थू, आणि कु-फू आस्तित्वात आली. ही राज्ये जवळजवळ एक शतक आस्तित्वात होती. इ.स. ४५च्या सुमारास कुषाण टोळीचा पुढारी कुजुल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिला याने इतर चार टोळ्यांचा पराभव करून संपूर्ण बॅक्ट्रीया आपल्या ताब्यात घेतला.

कुजुल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिला

[संपादन]

कुजुल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिलाने संपूर्ण बॅक्ट्रीया आपल्या ताब्यात घेतल्यामुळे कॅडफिससचे सामर्थ्य वाढले. त्यानंतर तो साम्राज्यविस्ताराच्या मागे लागला. त्याने हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवर असलेली ग्रीक आणि पार्थियनांची सत्ता नष्ट केली. काबूल, गांधार, अफगाणिस्तान हे प्रदेश जिंकून घेतले आणि तेथे कुषाणांची सत्ता स्थापन केली. तेथून भारतात शिरण्याचा त्याचा विचार होता परंतु ती कामगिरी करण्यापूर्वीच तो इ.स. ६५ मध्ये मरण पावला.

व्हिम कॅडफिसस उर्फ कॅडफिसस दुसरा

[संपादन]

पहिल्या कॅडफिसस नंतर त्याचा मुलगा व्हिम कॅडफिसस सत्ताधीश बनला. भारत जिंकून घेण्याचे वडिलांचे स्वप्न याने बऱ्याच अंशी पूर्ण केले. उत्तर भारतात त्याची बरीच नाणी सापडली आहेत. या नाण्यांवरून त्याचे राज्य पंजाबपासून बनारसपर्यंत होते असे दिसून येते. त्याने भारतीय प्रदेशात प्रमुख ठिकाणी आपले सरदार नियुक्त केले होते. राज्यकारभार सुकर रितीने चालावा म्हणून या सरदारांना फार मोठे अधिकार देण्यात आले होते. यापैकीच एक सरदार कनिष्क हा कॅडफिससच्या मृत्यूनंतर कुषाणांचा सम्राट झाला. चीन आणि रोमन साम्राज्य या दोन्ही ठिकाणी त्याने व्यापारी संबंध प्रस्थापित केले त्यामुळे त्याचे राज्य वैभवशाली बनले.

सम्राट कनिष्क

[संपादन]

दुसऱ्या कॅडफिससच्या मृत्यूनंतर राज्यासाठी त्याच्या सरदारात भांडणे जुंपली. त्या भांडणात कॅडफिससचा मथुरेचा सरदार कनिष्क विजयी झाला आणि त्याने कुषाणांच्या भारतीय प्रदेशावर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली. सत्ता हाती आल्यावर त्याने त्याच वर्षी शक सुरू केला (इ.स. ७८ ) त्याला शक नृप काल असे म्हणतात.

कनिष्काचे विजय

[संपादन]
कनिष्काचे नाणे

कनिष्काने पार्थियनांचा नायनाट केला. काश्मीरवर आक्रमण करून त्याने हा प्रदेश कुषाण साम्राज्यास जोडला. पूर्वेकडे मगधापर्यंत त्याने आपले सैन्य नेले. मगधमधून त्याने आपल्याबबरोबर अश्वघोष नावाचा एक बौद्ध भिक्षू नेला होता. कनिष्काने चिनी वर्चस्वाखाली असलेल्या खोतान, यारकंद, काशगर या प्रदेशावर पामीरमार्गे हल्ला केला व ते प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. तेथून परत येताना त्याने अमाप संपत्ती लुटून आणली. मध्य आशियात कुषाण सत्ता प्रस्थापित झाली परंतु कनिष्काच्या कारकिर्दीच्या शेवटी त्याच्या सार्वभौमत्वाला चिनी सेनापती पॅन चाऊ याने आव्हान दिले. यावेळी कनिष्काने आपला एक दूत त्याच्याकडे पाठ‍वला पण पॅन चावूने या दूताला कैद केले म्हणून कनिष्काने त्याच्याविरूद्ध लष्करी मोहिम काढली पण झालेल्या संघर्षात कनिष्काचा पराभव झाला व त्याला जबरदस्त खंडणी द्यावी लागली. काही वर्षांनी पुन्हा कनिष्काने पामीरच्या पठारापलीकडे चिनी सत्तेविरूद्ध मोहिम काढली. यावेळी त्याने चिनी सेनापती पॅन यॉंग (पॅन चाऊचा मुलगा) याचा पराभव केला व त्याच्यापासून जबरदस्त खंडणी आणली.

कनिष्काचा साम्राज्यविस्तार

[संपादन]
कनिष्काच्या काळातील सोन्याचे नाणे

कनिष्काच्या ताब्यात फार मोठे साम्राज्य हाते. अफगाणिस्तान, बॅक्ट्रीया, काशगर, खोतान, यारकंद हे भारताबाहेरील प्रदेश त्याच्या वर्चस्वाखाली होते. भारतातही त्याचे साम्राज्य कौशांबी, पेशावर, बनारस, रावळपिंडी, मथुरा, सारनाथ या भागात होते. याच बरोबर काश्मीर, सिंध, पंजाब हे वायव्येककडील प्रदेशही होते. त्याच्या या विशाल साम्राज्याची राजधानी पुरूषपूर म्हणजे पेशावर हे शहर होते. साम्राज्यविस्तार करण्याच्या उद्देशाने कनिष्क सबंध हयातीत लष्करी मोहिमात गुंतलेला होता. परंतु या त्याच्या लष्करी मोहिमांमुळेच त्याचे अधिकारी त्रस्त झाले आणि त्यांनी कनिष्काला ठार करण्याचा कट रचला. तो आजारी स्थितीत पडलेला असतानाच त्याच्याजवळ असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला ठार केले. (इ.स. १०१).

कनिष्काची कामगिरी

[संपादन]

कनिष्काने परकीय व्यापारास उत्तेजन दिल्यामुळे व्यापार वाढला आणि देशाची भरभराट झाली. चीन आणि रोमशी त्याचे व्यापारी संबंध होते. या देशांशी संबंध आल्यामुळेच मध्य व पूर्व आशियात भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडला. त्याच्या काळात विद्या, कला, तत्त्वज्ञान या क्षेत्रात देशाची प्रगती झाली. त्याने काश्मीरमध्ये कनिष्कपूर नावाचे शहर वसवले. पेशावर येथे ग्रीक शिल्पकाराच्या देखरेखीखाली बुद्धावशेषांवर ६०० फूट उंचीचा लाकडी मनोरा बांधला. यालाच कनिष्क चैत्य असे म्हणतात. प्रसिद्ध बौद्ध पंडित अश्वघोष, वसुमित्र, पार्श्व हे बौद्ध धर्माचे विद्वान त्याच्या दरबारात होते. बौद्ध धर्माच्या दृष्टीने कनिष्काने मोठी कामगिरी केलेली आहे. त्याने पार्श्वच्या सल्ल्यावरून ५०० बौद्ध भिक्षूंची एक धर्मपरिषद बोलावली होती. ही परिषद काश्मीरमध्ये कुंदलवनच्या विहारात भरविण्यात आली. या परिषदेचा वसुमित्र हा अध्यक्ष तर अश्वघोष हा उपाध्यक्ष होता. या परिषदेस जमलेल्या विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारीत महाविभाषा नावाचा एक संस्कृत ग्रंथ तयार करण्यात आला होता.

हुविष्क

[संपादन]
हुविष्काच्या नाण्यावरील महासेन

कनिष्कानंतर मध्यवर्ती सत्ता काबीज करणारा हुविष्क हा कुषाण सम्राट होऊन गेला. याने मथुरा येथे बौद्ध भिक्षूंसाठी विहार बांधला. काश्मीरमध्ये हुविष्कपूर नावाचे शहर वसवले.

वसुदेव

[संपादन]
कुषाण राजा वसुदेव याचे एक नाणे

वसुदेव हा शेवटचा महत्त्वाचा कुषाण राजा होय. याची राजधानी मथुरा होती. याच्या हयातीतच कुषाण साम्राज्याला उतरती कळा लागली. मात्र काबूलच्या खोऱ्यांतील सत्ता मात्र बरीच वर्षेपर्यंत टिकली इ.स.च्या पाचव्या शतकात हुणांनी हल्ले करून तेथील कुषाण सत्ता संपुष्टात आणली.

हे सुद्धा पहा

[संपादन]