Jump to content

कल्पना सरोज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कल्पना सरोज
जन्म डिसेंबर, १९६१ (1961-00-00) (वय: ६३)
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा उद्योजक
धर्म बौद्ध धर्म
संकेतस्थळ
www.kalpanasaroj.com

कल्पना सरोज ह्या भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक महिला उद्योजक आहेत. त्या मुंबईत कमानी-ट्यूब्स या कंपनीच्या अध्यक्ष आहेत.

मूळ "स्लमडॉग मिलियनेयर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्पना सरोजांनी कमानी ट्यूब्स कंपनीच्या वादात सापडलेल्या मालमत्तेची खरेदी केली आणि ती कंपनी यशस्वीपणे चालवून तिला नफ्यात आणले.

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

विदर्भातील रोपरखेडा ता. मूर्तिजापूर जि. अकोला येथील एका बौद्ध कुटुंबात कल्पना सरोज ह्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल असल्यामुळे त्यांचे कुटुंब पोलीस क्वार्टर्समध्ये राहत. त्याच्या कुटुंबात तिघी बहिणी व दोन भाऊ, त्यामध्ये कल्पना सर्वात मोठया होत. मुलीने खूप शिकावे ही त्यांच्या वडलांची इच्छा होती, परंतु नातेवाईकांच्या आग्रहामुळे कल्पना सरोज यांचे लग्न बालवयात म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी झाले.

लग्नानंतर

[संपादन]

कल्पनाच्या लग्नामुळे त्यांच्या वडिलांना आनंद झाला. लग्नानंतर काही दिवसांनी ते कल्पना यांच्या घरी गेले. त्या साधारपण परंतु अन्नधान्याने परिपूर्ण असलेल्या माहेरी वाढल्या होत्या, परंतु सासरी मोठे कुटुंब असल्यामुळे घरच्या सर्व कामाचा भार, तसेच घरकामे न झाल्यास मारहाण होत असे. यामुळे त्यांची शारीरिक अवस्था कृश व बिकट झाली होती. सासरी कामाचा अधिक भार असल्यामुळे त्यांना जेवणही वेळेवर मिळत नसे. म्हणून कल्पना यांच्या वडिलांनी त्यांना कायमचे त्यांच्या घरी आणले.

त्यानंतर त्यांच्या जवळील नातेवाइकांनी त्यांना सासर सोडल्याबद्दल दूषणे देण्यास सुरुवात केली. यातूनच कल्पना सरोज यांनी नैराश्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या त्यातून बचावल्या. त्या नंतर मात्र त्यांनी स्वतःला खंबीर व जिद्दी बनविले.

मुंबईत वास्तव्य

[संपादन]
कल्पना सरोज, दिलीप आणि मन्नन गोरे खैरलांजी चित्रपट चित्रीकरणावेळी अकोला येथे

पुढे काही दिवसांनी त्यांनी मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. आता परिस्थितीशी लढायचे असा पक्का निर्धार केला. त्या मुंबईत दादरला त्यांच्या काकाकडे रहायला गेल्या. एका गारमेंट्सच्या कंपनीत कामाला लागल्या. त्यावेळी त्यांना दररोज फक्त दोन रुपये मजुरी मिळत असे. तसेच त्यांचे वय तेव्हा वय १६ वर्षे होते. तेवढ्यातच काही कारणास्तव वडिलांची नोकरी गेली त्यामुळे घरची थोरली ह्या नात्याने घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. पैशाची चणचण वाढली म्हणून त्यांनी घरी कपडे शिवायचे काम सुरू केले. दरम्यान त्या दररोज १६-१६ तास काम करत असत. अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या बहिणीला कॅंसर झाला. पैशाअभावी पुरेसा उपचार करता आला नाही व तिचा मृत्यू झाला. आता कल्पना सरोज आणखी जिद्दीने पेटल्या. त्यांनी ज्योतीबा फुले योजने अंतर्गत कर्ज घेऊन त्यांनी काही शिलाई मशिने विकत घेतली व कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. आणखी काही दिवसांनी परत कर्ज घेऊन फर्निचर विकायचा व्यवसाय सुरू केला. आता परिस्थितीत हळूहळू बदल होत होता. थोडफार पैसेही जमा झाले होते. तेवढ्यातच एक भूखंड विक्रीस आहे व तुम्ही तो घ्या असा त्यांना प्रस्ताव आला. जमीन मालक कुठल्याही किमतीत द्यायला तयार होता. कारण तो भूखंड जरी मोक्याच्या ठिकाणी होता पण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याची किंमत कमी झाली होती. कल्पना सरोज यांनी तो विकत घेतला व बरेच दिवस न्यायालयात पायपीट करून सगळे अडथळे दूर केले. आता रातोरात त्या भूखंडाची किंमत वाढली. आणि भूमाफियांनी त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या खंबीर परिस्थितीतून आल्यामुळे डगमगल्या नाही. पुढे एका बिल्डरच्या मदतीने तेथे एक बहुमजली इमारत उभी राहिली. त्यातून कल्पना सरोज ह्यांना तब्बल ५ कोटीचा फायदा झाला. आणि त्यांनी त्यानंतर बांधकाम व्यवसायात प्रवेश केला. पुढे त्यांनी अनेक इमारती उभ्या केल्या.

रामजी हंसराज कमानी एक स्वातंत्र्य सेनानी व प्रख्यात उद्योजक. स्वातंत्र्यानंतर त्यांनी कुर्ला येथे येऊन "कमानी ट्यूब्स व कमानी इंजनिअरिंग" ही ब्रास ट्यूब तयार करण्याची कंपनी सुरू केली होती.. त्यांच्या मृत्युपश्चात मुलांमध्ये संपत्ती वरून वाद निर्माण झाले व हायकोर्टाने त्या कंपनीची मालकी कामगार यूनियनकडे सोपवली. कंपनीचे २००० कामगार मालक झाल्याने काही दिवसातच कंपनी कर्जामुळे बंद झाली. कर्ज परतफेडीसाठी ती कंपनी उच्च न्यायालयाने लिलावात काढली. कल्पना सरोज यांच्याकडे कामाला असलेल्या काही लोकांनी ही बातमी त्यांच्या कानावर घातली व तुम्ही ती कंपनी विकत घ्या असा आग्रह केला. त्यांनी त्या कंपनीची माहिती घेतली व कंपनी विकत घ्यायचे ठरवले. इथे दोन मोठे अडथळे होते. एक तर कंपनीवर असलेले कर्ज व शेकडो दावे. त्यांनी २००० सालापासून २००६पर्यंत कोर्टात चकरा मारून सगळे दावे दूर केले. शेवटी २००६मध्ये हायकोर्टाने त्यांना कंपनीचे सर्वेसर्वा बनवले व कर्ज फेडायला सात वर्षाची मुदत दिली. कल्पना सरोज यांनी कर्ज देणाऱ्या बँकाशी बोलून पेनल्टी व व्याज माफ करवून घेतले. आता कर्जाची किंमत अर्ध्यावर आली. ते त्यांनी एका वर्षात फेडले. शिवाय कामगारांचा थकीत पगारही देऊ केला. काही दिवसातच तोट्यामध्ये असणाऱ्या कंपनीला नफ्यात बदलवले. आज कमानी ट्यूब्स कंपनीचे बाजारमूल्या ७५० कोटीपेक्षा जास्त आहे, तर कल्पना सरोज ह्यांची संपूर्ण संपत्ती १२.२ कोटी डाॅलर आहे.

कल्पना सरोज यांना सामाजिका कार्यात रस आहे. त्यासाठी त्यानी एक N G O पण उघडले. शिक्षण संस्था सुरू केली. दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर एक पुरस्कार त्या देऊ करतात. त्यानी KS Films नावाचे एक फिल्म प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. त्याच्या बैनरवर त्यांनी "खैरलांजी" नावाचा मराठी चित्रपट तयार केला.

२०१६ साली युनो हेडक्वार्टर्समध्ये झालेल्या झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीच्या साजरीकरणात त्यांची मुख्य भूमिका होती. त्या DICCI (Dalit Indian Chamber of Commerce And Industry) ह्या संघटनेच्या सदस्य आहेत. त्या "भारतीय महिला बँकेच्या "डायरेक्टर बोर्डावर आहेत.

त्यांच्या वुमन एम्पाॅवरमेंट कारकिर्दीसाठी व आंत्रप्रेनुअरशिपसाठी भारत सरकारने २०१३ साली त्यांचा पद्मश्री हा किताब देऊन गौरव केला.

पुरस्कार

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]


संदर्भ

[संपादन]