राहीबाई पोपेरे
राहीबाई सोमा पोपेरे | |
---|---|
जन्म |
१९६४ कोंभाळणे अहमदनगर जिल्हा |
निवासस्थान | कोंभाळणे अहमदनगर जिल्हा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | अशिक्षित |
पेशा | शेतकरी |
धर्म | हिंदू |
पुरस्कार |
|
राहीबाई पोपेरे (जन्म : इ.स. १९६४) या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली पद्मश्री पुरस्कार दिला.[१]
कौटुंबिक माहिती
[संपादन]राहीबाईसह घरात एकूण आठ भावंडे होती व राहीबाई हे त्यांच्या आईचे पाचवे अपत्य होत्या. अल्पवयात त्यांच्या आईचा मृत्यू झाला. राहीबाईंचे वडील शेतकरी होते व त्यांची चार-पाच एकर कोरडवाहू शेती होती. सासरदेखील शेतकरी कुटुंबातील होते. तेथेही कोरडवाहू शेती होती. [२]
सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे निमित्त
[संपादन]अधिक उत्पादनासाठी शेतीमध्ये हायब्रीड बियाणे वापरात होते पण त्यांचा नातू आजारी पडू लागला तेव्हा मूळ कारणाचा शोध घेतला आणि लक्षात आले की सेंद्रिय बियाणे वापरली तर आरोग्य उत्तम राहते. आणि म्हणून तसा प्रयोग करून पाहिला. तो यशस्वी झाल्यावर कार्याला सुरुवात झाली. बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. त्यात बाइफ संस्थेचेही साहाय्य लाभले. त्यांनी देशी बियाणाची बँक सुरू केली. रानभाज्यांच्या बियासुद्धा या बँकेमार्फत पुरविल्या जातात.[२]
कार्य
[संपादन]राहीबाई मूळच्या याच गावच्या. राईबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बँकेत’ आज ५२ पिकांचे ११४ वाण आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा 'सीड मदर' म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला. बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.[३]
राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार स्त्रीया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.[ संदर्भ हवा ]
राहीबाईंनी कळसूबाई शिखर परिसरातील जैवविविधता जपण्यासाठी 'कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन समिती'ची स्थापना केली.[२] नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काही बियाणांचे जतन व संवर्धन त्यांनी केले आहे.
त्यांच्या प्रेरणेमुळे आज नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे चारशे एकर जमिनीवर गावरान वाणाची शेती केली जाते.[२]
महाराष्ट्राचे तत्कालीन महसूलमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी बीजबँकेच्या नवीन इमारतीस साहाय्य पुरविले.[२]
पुरस्कार
[संपादन]- देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली पद्मश्री पुरस्कार पुरस्कार दिला [१]. इ.स. २०२०चा हा पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.[४]
- महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागातर्फे आत्मा प्रकल्पांतर्गत आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
- दि. ०८ मार्च २०१८ रोजी, भारत सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे 'नारीशक्ती पुरस्कार' देण्यात आला.[२]
- महाराष्ट्र टाईम्स च्या मटा सन्मान सोहळ्यात राहीबाई पोपेरे ह्यांना 'वसुंधरा साथी सन्मान' देऊन गौरविण्यात आले.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "'मदर ऑफ सीड' राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार यांना पद्मश्री". Loksatta. 2020-01-27 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f डॉ. शिरीष लांडगे, डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. राजेंद्र सांगळे. उत्कर्षवाटा. पुणे.CS1 maint: multiple names: authors list (link)
- ^ "बीबीसीच्या यादीत राहीबाई पोपरेंचा समावेश; कोंभाळण्याची 'सीड मदर' जगाच्या पटलावर".
- ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. 2021-11-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "काळ्या मातीचे देणे". महाराष्ट्र टाइम्स. २५ मार्च २०२४ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]