जयम्मा बंडारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जयम्मा बंडारी
जन्म १९७८
नालगोंडा, तेलंगणा
नागरिकत्व भारतीय
शिक्षण १०वी
पेशा सामाजिक कार्यकर्ती
ख्याती हैदराबादमधील सेक्स वर्कर्सना मदत करणे
पूर्ववर्ती देह विक्रेते
अपत्ये मुलगी

जयम्मा बंडारी ( इ.स. १९७८) ह्या एक भारतीय महिला असून त्या पूर्ववर्ती देह व्यापारी होत्या. त्यांनी देह व्यापार सोडून देऊन सामाजिक कार्याची धुरा सांभाळली आणि हजारो महिलांना त्यातून सोडवले. या कामामुळे त्यांना इ.स. २०१८ मध्ये नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१]

वैयक्तिक आयुष्य[संपादन]

बंडारीचा जन्म इ.स. १९७८ मध्ये नालगोंडा जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. तीन वर्षांची असताना त्या अनाथ झाल्या आणि त्यामुळे त्यांचे पुढील पालनपोषण त्यांच्या एका आजोळच्या नातेवाईकाकडे झाले.[२] या नवीन पालकाची घरची परिस्थिती सुद्धा हालाखीची असल्याने त्यांचे बालपण कष्टात गेले. या पालकाने बंडारी अवघ्या चौदा वर्षे वयाच्या असताना त्यांचे लग्न एका तीस वर्षे वय असलेल्या पूर्व विवाहित व्यक्तीशी लावण्याचा असफल प्रयत्न केला. यानंतर मोठ्या मुश्किलीने बंडारीचे शिक्षण दहावी पर्यंत झाले. इ.स. १९९८ मध्ये योग्य संधी पाहून बंडारी ने घरच्यांच्या मर्जीविरुद्ध पळून जाऊन लग्न केले. सुरुवातीचे एक वर्ष आनंदाचे गेले, पण त्यानंतर त्यांच्या पतीने दारू पिऊन भांडणास आणि मारझोड करण्यास सुरुवात केली. इ.स. १९९९ मध्ये बंडारीला एक मुलगी झाली आणि तेव्हा हे जोडपे हैदराबाद येथे स्थानांतरित झाले. हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांच्या पतीने त्यांना देह व्यापार करण्यासाठी प्रवृत्त केले. यावेळी त्यांना त्यांच्या पालकांनी कोणत्याही प्रकारची मदत करण्यास नकार दिला आणि शेवटी बंडारी अनिच्छेने देह विक्रेत्या बनल्या.[३]

याच काळात म्हणजे १९९९ मध्ये भारतात एड्स विरुद्ध जनजागृतीस सुरुवात झाली होती. त्यावेळी बंडारीचा संपर्क 'जया सिंग थॉमस' या सामाजिक कार्यकर्ती सोबत झाला. जया सिंग ने त्यांना एड्स जनजागृतीच्या कामासाठी त्यावेळेस ३,००० रु प्रतिमाह पगार दिला. देह विक्रीचा व्यवसाय सोडून बंडारी भारतभर देह व्यापाराशी निगडित महिलांच्या घरोघरी जाऊन एड्स विरुद्ध जनजागृती करू लागल्या.

चैतन्य महिला मंडळी[संपादन]

अवघ्या दोन वर्षांनी म्हणजे इ.स. २००१ मध्ये हैदराबाद येथे जया सिंग थॉमस यांच्या सहयोगाने जयम्मा बंडारी यांनी 'चैतन्य महिला मंडळी' (CMM) नावाची एक संस्था स्थापन केली. ही संस्था देह व्यापार करणाऱ्या महिलांचे प्रबोधन करणे, त्यांचे पुनर्वसन करणे, योग्य ते सहकार्य आणि कायदेशीर मदत करणे आदी काम करू लागली.[३] [४] ही संस्था अशा लैंगिक कामगारांच्या मुलांची पण काळजी घेते जेणेकरून ते त्यांच्या पालकांचे अनुसरण करणे टाळतील.[५] यामुळे जवळपास ३,५०० च्या वर मुलांचे पुनर्वसन करण्यात आले आणि एक हजार अशा महिलांना नवीन काम मिळाले.[२] यापैकी अनेक महिलांची मुले शिकून मोठी झालीत. काही जण तर अगदी परदेशात पण स्थायिक झाले. परंतु दुःखाची बाब म्हणजे, प्रारंभी समाज यासाठी दान किंवा कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यास तयार होत नव्हता. लोकांची भावना अशी होती की, वेश्येची मुले शिकून तरी काय करणार, शेवटी तेच करतील जे त्यांचे मायबाप करतात. लोकांचा (आणि शासनाचा सुद्धा) हा भ्रम दूर करण्यासाठी बंडारीला खूप अवघड जात होते.[३]

पुरस्कार[संपादन]

इ.स. २०१४ मध्ये जयम्मा बंडारी यांना 'व्हिजिल इंडिया मुव्हमेंट' नावाच्या संस्थेद्वारे 'एम ए थॉमस राष्ट्रीय मानवाधिकार' पुरस्कार दिल्या गेला.[५] इ.स. २०१७ मध्ये 'भारतीय उद्योग मंडळ' तर्फे 'आदर्श पुरस्कार' देण्यात आला.[२] इ.स. २०१८ मध्ये बंडारी यांना ८ मार्च (आंतरराष्ट्रीय महिला दिन) रोजी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे देण्यात आला. त्या वर्षी एकूण ३९ व्यक्ती किंवा संस्थांचा सन्मान करण्यात आला, ज्यात त्यांना पुरस्कार आणि १,००,००० रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले.[१]

८ मार्च २०१८ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना जयम्मा बंडारी

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "International Women's Day: President Kovind honours 39 achievers with 'Nari Shakti Puraskar'". The New Indian Express. 2021-01-13 रोजी पाहिले.
  2. ^ a b c Somasekhar, M. "An award for a woman extraordinaire". @businessline (इंग्रजी भाषेत). 2021-01-10 रोजी पाहिले.
  3. ^ a b c Gupta, Poorvi (2017-08-21). "This woman works to better lives of sex workers in prostitution". SheThePeople TV (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-04-23. 2021-01-10 रोजी पाहिले.
  4. ^ "Jayamma Bandari - a warrior of dignity". World Pulse (इंग्रजी भाषेत). 2012-07-18. 2021-01-10 रोजी पाहिले.
  5. ^ a b vigilindia. "Smt. Bandari Jayamma received M A Thomas National Human Rights Award 2014". Vigil India Movement. 2021-01-10 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]