भारत सरकार
भारतामधील राजकारण |
---|
भारत सरकार (इंग्लिश: Government of India) हे भारताच्या प्रजासत्ताकाचे संवैधानिक सरकार आहे. केंद्र सरकार ह्या नावाने देखील ओळखले जाणारे भारत सरकार भारतामधील २८ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेशांचे सर्वभौम प्रशासक आहे. भारत सरकारचे काम राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथून चालते.
संसद
[संपादन]भारताचे सरकार संसदीय राज्यपद्धतीनुसार चालते ज्यामध्ये भारताची संसद देशाचे सर्व कायदे ठरवते व बव्हंशी कामकाज पाहते. संसदेची दोन सदने आहेत.
- लोकसभा - ह्यामधील ५४३ सदस्य निवडणुकीमध्ये थेट नागरिकांद्वारे निवडले जातात.
- राज्यसभा - ह्यामधील २४५ सदस्य अप्रत्यक्षपणे राज्य व केंद्रशासीत प्रदेश विधिमंडळांद्वारे निवडले जातात.
भारताचे पंतप्रधान तसेच केंद्रीय मंत्रिमंडळामधील सर्व सदस्यांना संसद सदस्य असणे बंधनकारक आहे.
कार्यकारिणी शाखा
[संपादन]राष्ट्रपती
[संपादन]राष्ट्रपती हा भारताचा राष्ट्रप्रमुख असून संविधानाच्या कलम ५३ (१) अन्वये त्याला अनेक अधिकार दिले गेले आहेत. राष्ट्रपतीचे कामकाज पंतप्रधानाच्या सल्ल्याने चालत असून त्याचे बहुतेक हक्क केवळ औपचारिक स्वरूपाचे आहेत. खालील महत्त्वाच्या पदांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
- भारतामधील राज्यांचे राज्यपाल
- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व उच्च न्यायालयांचे न्यायाधीश
- ॲटर्नी जनरल
- प्रमुख निवडणुक अधिकारी
- कॅबिनेट सचिव
उपराष्ट्रपती
[संपादन]उपराष्ट्रपती हा राष्ट्रपतीखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा वरिष्ठ नेता असून राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत कारभार संभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे.
मंत्रीमंडळ
[संपादन]भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान व ३५ कॅबिनेट मंत्री असतात.