Jump to content

विजय बळवंत पांढरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजय बळवंत पांढरे हे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीच्या (मेटा) या शासकीय संस्थेचे मुख्य अभियंता (संकल्पन, प्रशिक्षण, संशोधन, सुरक्षितता), तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य आणि संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.[१][२][३]

शिक्षण[संपादन]

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा विशेष पगडा महाविद्यालयीन जीवनात पांढरे यांच्यावर पडला. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले.

जलसंपदा विभागातील कारकीर्द[संपादन]

१९८० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पांढरे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दाखल झाले. पुढे पाटबंधारे विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून ते रुजू झाले. दशकभरानंतर त्यांना कार्यकारी अभियंता म्हणून बढती मिळाली. काही वर्षांनंतर त्यांनी ‘मेरी’चे मुख्य अभियंता म्हणून जबाबदारी स्वीकारली. या पदावर ते सात वर्ष कार्यरत होते. अलीकडेच त्यांची या संस्थेचा एक भाग असलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीच्या (मेटा) मुख्य अभियंतापदी नियुक्ती झाली. जलसंपदाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचेही काम त्यांनी प्रदीर्घ काळ पाहिले आहे.

राज्यातील धरणांची कामे, धरणांचा आराखडा, संशोधन, धरणांची सुरक्षा व प्रशिक्षण, या कामांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. शासनाने त्यांची नियुक्ती धरणांची गुणवत्ता सांभाळणाऱ्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सदस्यपदी केली. अनेक धरणांचे धोरण आणि अहवाल तयार करण्यासाठी अनेक समित्यांवर त्यांची आजवर नियुक्ती झाली आहे.

संतसाहित्याचे अभ्यासक[संपादन]

पांढरे हे मराठी संतसाहित्याचे अभ्यासक आहेत. संत साहित्य संमेलनात पांढरे यांनी सुबोध मराठीत भाषांतरित केलेल्या ‘ज्ञानेश्वरी’चे प्रकाशन करण्यात आले होते.

‘ज्ञानेश्वरी’च्या पद्यमय स्वरूपाचे सोप्या मराठीत रूपांतर, मूळ संस्कृत भाषेतील भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर, ‘अमृतानुभव’ आणि ‘चांगदेव पासष्टी’ आदी पुस्तकांच्या भाषांतराचे कामही त्यांनी केले आहे. जानेवारी २०१२ मध्ये नाशिक येथे संत साहित्य संमेलन झाले. या संमेलनात पांढरे यांनी ‘शासकीय अधिकारी व अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानातही त्यांनी शासकीय अधिकारी अध्यात्माशी जोडले गेले तर चुकीचे काम करण्यास धजावणार नाहीत, असे स्पष्टपणे नमूद केले . साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांनाही त्यांचा गौरव करावासा वाटला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ कोण आहेत हे पांढरे? http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252209:2012-09-25-22-12-48&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2 [मृत दुवा]
  2. ^ विजय पांढरे यांनी २१ सप्टेंबर, २०१२ रोजी होणाऱ्या अभियंता महासंघाच्या बैठकीपूर्वी सर्व संबंधित अभियंत्यांसमोर पत्राद्वारे मांडलेली स्वतःची बाजू पत्र http://sparkmaharashtra.blogspot.in/2012/09/blog-post_28.html
  3. ^ http://1.bp.blogspot.com/-SRt8nvc88js/UGVlDX7iQQI/AAAAAAAAAx4/8H0hnmqT6eI/s1600/0001.jpg