माक्देबुर्गचा वेढा (१८०६)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माक्देबुर्गचा वेढा
चौथ्या संघाचे युद्ध ह्या युद्धाचा भाग
१८०६ मधील माक्देबुर्गचा किल्ला व परिसर
१८०६ मधील माक्देबुर्गचा किल्ला व परिसर
दिनांक ऑक्टोबर २५ - नोव्हेंबर ६, इ.स. १८०६
स्थान माक्देबुर्ग, जर्मनी
परिणती पहिल्या फ्रेंच साम्राज्याचा विजय
युद्धमान पक्ष
फ्रान्स पहिले फ्रेंच साम्राज्य Flag of Prussia (1892-1918).svg प्रशियाचे राजतंत्र
सेनापती
फ्रान्स मिशेल नेय Flag of Prussia (1892-1918).svg फ्रांत्स फॉन क्लाइस्ट
सैन्यबळ
१८,०००[१]-२५,००० सैनिक[२] २४,०००[२]-२५,००० सैनिक[१]
७०० तोफा[२]
बळी आणि नुकसान
अज्ञात किल्ल्यातील सगळी शिबंदी आणि[१] २० सरदार युद्धबंदी[२]
५४ ध्वज, ७०० तोफा फ्रेंचांच्या हाती पडल्या[२]

माक्देबुर्गचा वेढा हा वेढा जर्मनीतील माक्देबुर्ग शहराला ऑक्टोबर २५ - नोव्हेंबर ६, इ.स. १८०६ मध्ये फ्रान्सच्या सैन्याने घातलेला वेढा होता. प्रशियाच्या आधिपत्यात असलेले माक्देबुर्ग शहर पडल्यावर फ्रान्सचा विजय झाला.

या वेढ्याचे नेतृत्व सुरुवातीस मार्शल जोआकिम मुरातने तर नंतर मिशेल नेय यांनी केले होते. प्रशियन सैन्य फ्रांत्स फॉन क्लाइस्टच्या नेतृत्वाखाली लढले.[१][२] फ्रांसच्या ग्रांड आर्मेने जेना-आउअरश्टेटच्या लढाईतून पळ घेतलेल्या प्रशियन सैन्याचा पाठलाग करीत असताना प्रशियन सेनापती फ्रेडरिक लुईने माक्देबुर्गच्या किल्ल्यात आश्रय घेतला. मुरातने फ्रेडरिक लुईला शरण पत्करण्यास सांगितले आणि किल्ल्यास वेढा घालण्यास सुरुवात केली. फ्रेडरिक लुईने किल्ला आणि त्यातील २५,००० सैनिक जनरल फॉन क्लाइस्टच्या हवाली केले व तेथून पळ काढला. त्याच वेळी फ्रांसच्या सम्राट नेपोलियनने मार्शल ज्यॉं-दि-द्यू सूल्तच्या हाताखालील फौजेला परत बोलावून घेतले. माक्देबुर्गला वेढा घातलेले सैन्य याच फौजेचा भाग असल्याने मुरातने १८,००० सैनिक नेयला दिले व इतर सैनिकांसह फ्रांसकडे कूच केली.[१] नेयने एल्ब नदीच्या दोन्ही तीरांवर छावणी टाकली पण किरकोळ झटापटींशिवाय किल्ला घेण्याचे फारसे प्रयत्न केले नाहीत. फॉन क्लाइस्टनेही एखाददुसरा एल्गार सोडता फारशी हालचाल केली नाही. किल्ल्यातील सैनिकांचे ढासळते धैर्य पाहून फॉन क्लाइस्टने माझ्या खिशातील रुमाल जेव्हा जळेल तेव्हाच मी संधीची बोलणी सुरू करेन अशी घोषणा केली[२] पण इकडे फ्रेंचांनी आपल्या तोफा मोर्चावर आणीत असलेले पाहून प्रशियनांची गाळण उडाली व त्यांनी तहाची बोलणी सुरू केली. नोव्हेंबर ७ रोजी संधीची कलमे निश्चित झाली आणि पुढच्या दिवशी किल्ल्यातील सगळ्या शिबंदीने शरणागती पत्करली व ११ तारखेला फ्रेंचांनी सगळ्यांना युद्धकैदी बनवून किल्ल्याबाहेर काढले.[१]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b c d e f तुलार्ड, पृ.२४१.
  2. ^ a b c d e f g पिगेआर्ड, पृ.५०८.
  • (फ्रेंच) पिगेआर्ड, अलेन - डिक्शनेर देस बतेल्स दि नेपोलेऑन, टॅलांडिये, बिब्लियोथेक नेपोलेऑनियें, २००४, आयएसबीएन २-८४७३४-०७३-४
  • (फ्रेंच) तुलार्ड ज्यॉं - डिक्शनेर नेपोलेऑन”; दुसरा खंड, लिब्रैरी आर्तेमे फाया, १९९९, आयएसबीएन २-२१३-६०४८५-१