Jump to content

गझनीचा महमूद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गझनीच्या महमूदचा दरबार

गझनीचा महमूद (पूर्ण नाव : यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन) (जन्म नोव्हेंबर २, ९७१ - एप्रिल ३०, १०३०) हा भारतावर आक्रमण करणारा अफगणिस्तानातील गझनीचा शासक होता. असे मानतात की याने भारतावर १७ वेळा लुटीच्या मोहिमा आखल्या होत्या. आपार संपत्ती व लूट करून तो परते. भारतात हा कॄरकर्मा समजला जातो तर पाकिस्तान व अफगणिस्तानात तो महान राज्यकर्ता व सेनानी मानला जातो.

पार्श्वभूमी[संपादन]

इ.स. ९९७ मध्ये बल्ख सीमेवर सैन्याचे नेतृत्व करत असताना महमुदच्या पित्याचे निधन झाले. त्याला महमुद, नासेर, इस्माईल आणि युसुफ असे चार पुत्र होते. त्याचा ज्येष्ठ पुत्र महमूद हा खोरासान प्रांताचा राज्यपाल होता. पित्याच्या मृत्यूसमयी तो खोरासानची राजधानी निशापूर येथे होता. पित्याच्या मृत्यूवेळी महमूदचे त्याच्या पित्याशी संबंध दुरावलेले होते त्यामुळे त्याच्या पित्याने आपला दुसरा मुलगा इस्माईल याची गझनीच्या अमीरपदी नियुक्ती केली. त्याप्रमाणे सुमारे सात महिने इस्माईलने गझनीवर राज्य केले. महमूदला ही नियुक्ती पसंत नसल्याने त्याने आपल्या वडिलोपार्जित वारशाच्या विभाजनाची मागणी केली. इस्माईलने ही मागणी मान्य न केल्याने दोन भावात वारसा युद्ध सुरू झाले. त्यामध्ये इस्माईलचा पराभव झाल्याने त्याला कैद करण्यात आले आणि इ.स.९९८ मध्ये वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी महमूद गझनीच्या राजेपदी आला.