Jump to content

बालकुमार साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे

बालसाहित्यकार अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ आणि त्यांचे सहकारी सुधाकर प्रभू, श्यामला शिरोळकर, श्रीधर राजगुरू, लीला दीक्षित इत्यादींनी इ.स.१९७५मध्ये मराठी बालकुमार साहित्य संमेलन या नावाने संस्था स्थापन केली. पुढे २००० साली संस्थेच्या नावातील संमेलन हा शब्द काढून त्याजागी संस्था हा शब्द टाकण्याचा बदल संमत झाला. त्यानंतर २००३ मध्ये दुसऱ्यांदा संस्थेच्या नावात बदल करून ते अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था असे करण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु धर्मादाय आयुक्तांकडे पाठविलेल्या या बदलाची पूर्तता झाली आहे, की नाही याची खातरजमा करून न घेतल्याने हा बदल केवळ कागदोपत्रीच राहिला आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या अनधिकृत नावानेच संस्था काम करीत राहिली. याच तांत्रिक कारणासाठी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे काम २०१५ मध्ये संस्थगित केले व तांत्रिक अडचण दूर करून मूळ संस्था पुन्हा सुरू करावे, असे ठरले; परंतु ते काम लवकर होण्याची चिन्हे दिसेनात, यामुळे बालसाहित्य चळवळीला खीळ बसली. बालसाहित्य क्षेत्राचे अधिक नुकसान होऊ नये; म्हणून २०१७ साली झालेल्या सर्वसाधारण सभेत अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था या नावाने नवीन संस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला व संस्थेची नोंदणी करण्याचे सर्व अधिकार माधव राजगुरू यांना देण्यात आले. अर्जदार म्हणून माधव राजगुरू यांनी 'अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था' या नावाने नवीन संस्थेची नोंदणी केली. सन २०१५ मध्ये संस्थगित केलेली संस्था दि. २३ आॅगस्ट, २०२३ रोजी पूर्वकार्यकारिणी सदस्य माधव राजगुरू आणि पूर्वकोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने पुन्हा सुरू झाली असून विद्यमान कार्यकरिणी पुढीलप्रमाणे आहे, अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कार्यवाह राधिका लोखंडे, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड, कार्यकारिणी सदस्य - निर्मला सारडा, अशोक सातपुते, सुनील महाजन, श्रीकांत चौगुले, लक्षमण चाळक, सचिन बेंडभर. राजेंद्र कुलकर्णी व सु. वा. जोशी हे दोन विश्वस्त आहेत. नुकतेच अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय ५२१ अथर्व, नारायण पेठ, पुणे येथे सुरू करण्यात आले आहे.

साहित्य संमेलने

[संपादन]

बालकुमार साहित्य संमेलन या नावाची एकाहून अधिक संमेलने महाराष्ट्रात भरतात. त्यांपैकी आद्य संमेलनाचे नाव ’अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन’ असे आहे. हे संमेलन ’अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था’ भरविते. इतर संस्थांच्या संमेलनांची माहिती या लेखात तळाशी दिली आहे. याव्यतिरिक्त ’बाल साहित्य संमेलन’ या नावाची बालकांचा सहभाग असलेली काही अन्य संमेलनेही आहेत.

२६वे मराठी बालकुमार साहित्य संंमेलन पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१४ या काळात झाले. कवयित्री डॉ. संगीता बर्वे अध्यक्षस्थानी होत्या.

पंचविसावे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१३ या काळात राजीव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाले आणि चोवीसावे संमेलन, १४ ते १६ डिसेंबर २०१२ या काळात ओणी (राजापूर तालुका, रत्‍नागिरी जिल्हा) येथे मदन हजेरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते, तर तेविसावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन आजरा येथे १५ ते १७ मार्च २०१२ या काळात गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. बावीसावे बालकुमार साहित्य संमेलन कवी मंगेश पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर जि. अहमदनगर येथे झाले.

विदर्भ साहित्य संघाचे बालकुमार साहित्य संमेलन

[संपादन]

विदर्भ साहित्य संघाने पाचवे बालकुमार साहित्य संमेलन साने गुरुजी साहित्यनगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशीम रोड, अकोला येथे १ व २ डिसेंबर २०१७ या दिवशी आयोजित केले आहे. विदर्भ साहित्य संघाची अकोला शाखा ही संमेलनाची निमंत्रक असून, प्रभात किड्स स्कूल ही संस्था प्रमुख आयोजक आहे. सुप्रसिद्ध कवी व बालसाहित्यिक शंकर कऱ्हाडे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

आजपर्यंतची अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष

[संपादन]
  1. भा.रा. भागवत, १९७५, पुणे
  2. सुमती पायगावकर, १९७७, सोलापूर
  3. मालती दांडेकर, १९७८, जळगाव
  4. अमरेंद्र गाडगीळ, १९८१, इचलकरंजी
  5. यदुनाथ थत्ते, १९८३, वेंगुर्ले
  6. राजा मंगळवेढेकर, १९८५, पुणे
  7. लीलावती भागवत, १९८७, कराड
  8. अनंत पै, १९८९ पुणे
  9. सुधाकर प्रभू, १९९०, कोल्हापूर
  10. महावीर जोंधळे, १९९२, सेलू
  11. दिनकर देशपांडे, १९९३, ठाणे
  12. शंकर सारडा, १९९४, सावंतवाडी
  13. प्रभाकर पुराणिक, १९९९, नागपूर
  14. दत्ता टोळ, २०००, अहमदनगर
  15. रत्‍नाकर मतकरी, २००१, पुणे
  16. पु.ग. वैद्य, २००२, सातारा
  17. डॉ. न.म. जोशी, २००३, निगडी, पुणे
  18. गिरिजा कीर, २००४, कऱ्हाड
  19. लीला दीक्षित, २००५, परभणी
  20. विजया जहागिरदार, २००६, सोलापूर
  21. डॉ. विजया वाड, २००७, सांगली
  22. मंगेश पाडगांवकर, २०१०, संगमनेर
  23. गोविंद गोडबोले, २०१२, आजरा
  24. मदन हजेरी, २०१२, ओणी (राजापूर)
  25. राजीव तांबे, २०१३, पुणे
  26. कवयित्री डॉ. संगीता बर्वे, १४-१५ फेब्रुवारी २०१५ (मारुंजी - मुळशी तालुका)
  27. चित्रकार ल.म. कडू, २०१८, (शेवगाव - अहमदनगर जिल्हा)
  28. साहित्यिक अनिल अवचट : २८ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन भिलारमध्ये १८ ते २० जानेवारी २०१९ दरम्यान.
  29. लेखक-कवी प्रा. प्रवीण दवणे, २९वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुण्यामध्ये बालेवाडी येथे, ८-९ फेब्रुवारी २०२० या दिवसांत.

अन्य बालकुमार साहित्य संमेलने

[संपादन]
  • उचगाव येथील मळेकरणी सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित पहिले बालकुमार साहित्य संमेलन दि.१९-१२-२०१३ रोजी झाले. संमेलनापूर्वी मळेकरणी देवीची पूजा करून तिच्या आमराईत इंजिनियर आर. एम. चौगुले आणि माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन करण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष मळेकरणी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष जवाहर देसाई होते.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने पिकुळे (ता. दोडामार्ग) येथे ७ जानेवारी २०१४ला एक बालकुमार साहित्य संमेलन झाले. हे जिल्हास्तरीय संमेलन होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी बालसाहित्यकार सुभाष कवडे होते. एक हजार शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, कोकणातील बालसाहित्यिक आदींचा या बालकुमार साहित्य संमेलनात सहभाग होता. संमेलनात काव्यवाचन, बालकुमार कथाकथन, परिसंवाद, सत्कार सोहळा, ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन आदी उपक्रम झाले. हे संमेलन दर वर्षी होते.
  • लोणावळा गावात मनःशक्ती प्रयोग आणि मसाप यांच्यातर्फे २० सप्टेंबर २०१७ रोजी एक तथाकथित पहिले बालकुमार साहित्य संमेलन भरले होते. डॉ. अनिल अवचट संमेलनाध्यक्ष होते.
  • मुलांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नावाचे एक (पहिले) मराठी साहित्य संमेलन २००२ साली भरले होते. डॉ. मधुसूदन घाणेकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेतर्फे मोहननगर- चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात ११-११-२०१७ रोजी बालकुमार साहित्य संमेलन झाले. लक्ष फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई संमेलनाध्यक्ष होत्या.
  • मुंबईतील चेंबूरमध्ये २९ नोव्हेंबर २०१७ रोजी एक बालकुमार साहित्य संमेलन झाले. मुंबई मराठी साहित्य संघ आणि चेंबूरमधील स्वामी मुक्तानंद हायस्स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बालसाहित्यिक ल.म. कडू होते.
  • पहिले सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन वडाळी येथे झाले.
  • २रे सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन शिरूर कासार येथे झाले.
  • ३रे सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन तागडगाव येथे १७ ते १८-१-२०१७ या काळात झाले.
  • ४थे : सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन शिरूर कासार येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत १७ ते १८ जानेवारी २०१८ या काळात झाले. हे तेथे भरणारे चौथे संमेलन असून डॉ. सतीश साळुंके हे त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
  • वसई माणिकपूर येथील सहकार शिक्षण संस्थेच्या विद्यमाने शुक्रवार १४ डिसेंबर २०१२ रोजी वनमाळी विद्यासंकुलातील जी.जे. वर्तक विद्यालय येथे 'पाचवे बालकुमार मराठी साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आले होते. या मराठी साहित्य संमेलनास वसई - विरार शहर महापालिकेने ७५ हजार इतके अनुदान दिले होते.
  • वसई माणिकपूर येथील सहकार शिक्षण संस्था व वसई-विरार शहर पालिकेच्या वतीने सहावे एकदिवसीय बालकुमार मराठी साहित्य संमेलन २० डिसेंबर २०१३ रोजी वसई रोड (पश्चिम) येथील वर्तक विद्यालयात झाले. नगरपालिकेने या संमेलनास एक लाखाचे अनुदान दिले होते. संमेलनात, तालुक्यातील मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील, तसेच जिल्हा परिषद शाळांमधील पालक, विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
  • वसई-विरार शहर महापालिकेच्या सहकार्याने वसई रोड येथील सहकार शिक्षण संस्थेने सातवे बालकुमार मराठी साहित्य संमेलन वसईत आयोजित केले.. वसई रोड पश्चिम आनंद नगर येथील वनमाळी विद्यासंकुलातील जी. जे. वर्तक विद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवार १२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७.३० च्या कालावधीत ७ वे बालकुमार मराठी साहित्य संमेलन झाले.
  • अकोला : येथे २-३ डिसेंबर २०१७ या कालावधीत दोन दिवसीय ५वे राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन झाले.ज्येष्ठ बाल साहित्यिक शंकर कऱ्हाडे अध्यक्ष होते.

बाह्य दुवे

[संपादन]

पहा :

  1. मराठी साहित्य संमेलने
  2. बाल साहित्य संमेलन