मधुसूदन घाणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ.मधुसूदन घाणेकर हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. ’सबकुछ मधुसूदन’ नावाचा एकपात्री विनोदी कार्यक्रम ते रंगमंचावर करतात. घाणेकरांनी त्यांचे एकपात्री नाट्यप्रयोग आतापर्यंत भारत, नेपाळ, सिंगापूर,थायलंड, मलेशिया, न्यू झीलंड, आणि श्रीलंका आदी देशांत केले आहेत. या ‘सबकुछ मधुसूदन‘चे १२०००हून अधिक प्रयोग झाल्यानंतर या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ़ रेकॉर्ड्‌स(२०१२)मध्ये झाली आहे.[१]

साहित्यविश्व संस्थेतर्फे मुंबईत फेब्रुवारी २०११त घेण्यात येणाऱ्या विश्वसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर यांची निवड करण्यात आली असल्याचे साहित्यविश्व संस्थेचे सहनिमंत्रक प्रा. श्रीराम चौधरी आणि हेमंत नेहते यांनी सांगितले.

डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी जागतिक हास्य परिषद, जागतिक हस्ताक्षर मनोविश्लेषक परिषद यांसह १० महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ. घाणेकर यांना चित्रपटगीत, गझल लेखन, कथा-पटकथा-संवाद लेखनासाठी तसेच हास्यकवितांसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

त्यांच्या ‘हाहाहाऽऽ’ या कवितासंग्रहाचे विदेशी भाषांत भाषांतर झाले आहे. डॉ. घाणेकर यांच्या ‘सिग्नेचर अ‍ॅनालिसिस’ या दोनशे एकाव्या पुस्तकाचे बॅंकॉक येथे प्रकाशन करण्यात आले.

‘बे दुणे चकली’ या बालकविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या ‘दिवस’, ‘टॉवर’ या कादंबऱ्या तसेच ‘झिंदाबाद झिंदाबाद’ नाटक आणि पुरस्कार एकांकिका आदी साहित्यास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार साहित्य संमेलनात पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. घाणेकर यांचे एकूण ३३ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

अखिल भारतीय बहुभाषिक हास्यकविसंमेलन (२०००), पहिले विनोदी साहित्य संमेलन (२००१), पहिले राज्य विद्युत साहित्य संमेलन (२००२), मुलांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (२००२), अखिल भारतीय मराठी कविसंमेलन (२००४), कवी केशवसुत शताब्दी स्मृती कविसंमेलन आदी महत्त्वाच्या दहा साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद डॉ. घाणेकर यांनी भूषविले आहे.

डॉ. घाणेकर हे साहित्यगौरव, व्ही.आर्ट्‌स, फ्रेंड्स इंटरनॅशनल हाहाहाऽऽ लाफ इंटरनॅशनल, हॅंडरायटिंग अ‍ॅनालिसिस रिसर्च फाऊंडेशन, युनिव्हर्सल अ‍ॅस्ट्रॉलॉजिकल फाऊंडेशन, दत्तोपासक कै. ताई घाणेकर शताब्दी समिती या संस्थांचे अध्यक्ष आहेत/होते.

एकपात्री कारकिर्दीची वैशिष्ट्ये[संपादन]

 • २०१३-१४ हे वर्ष त्यांच्या एकपात्री कलाप्रवासाचे ५०वे वर्ष आहे.
 • अध्यक्ष : एकपात्री कलाकार परिषद, पुणे (२०१२-१३)
 • भारत,नेपाळ, न्यूझीलंड, सिंगापूर, हॉंगकॉंग, मलेशियांसह १२ देशांत एकपात्री कलेने रसिकांना जिंकले
 • विश्वविक्रमवीर एकपात्री :
  • लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ४वेळा नोंद झालेले ते एकमेव एकपात्री कलाकार आहेत
 • रेकॉर्ड्‌स पुढीलप्रमाणे :

१) सलग ९ तास १२ मिनिटे, ७ विविध एकपात्री प्रयोग - सबकुछ मधुसूदन
२) एकपात्री प्रयोगात सर्वाधिक - ६३ पात्रे रंगविणे - (बे दुणे चकली)
३) एकपात्री कार्यक्रमाद्वारे सर्वाधिक - १०८ पात्रे सादर (बे दुणे चकली) विश्वविक्रम
४) सर्वाधिक १२०००हून अधिक कार्यक्रम सादर करणारे एकपात्री कलावंत
५) ५०हून अधिक प्रकारचे कार्यक्रम करणारे ते एकमेव एकपात्री कलावंत आहेत

कार्यक्रमांची काही ठळक नावे[संपादन]

 • बे दुणे चकली (लहान मुलांसाठी)
 • अक्षरातील प्रतिबिंब (प्रात्यक्षिकासह हस्ताक्षर-स्वभाव)
 • सबकुछ मधुसूदन (एकत्रित झलक)
 • हसण्याविषयी सर्व काही
 • संमोहन संमोहन
 • अश्या बायका तश्या बायका (महिलांसाठी)
 • मधुबोली (कुंडली, हस्तरेषा, अंकशास्त्र, वास्तुशास्त्रविषयक रंजक कार्यक्रम)

हे सुद्धा पहा[संपादन]

डॉ. मधुसूदन घाणेकर यांना मिळालेले (काही) पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]