भिकाईजी कामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मादाम कामा या पानावरून पुनर्निर्देशित)
मादाम कामा

मादाम भिकाईजी रुस्तम कामा (रोमन लिपी: Bhikaiji Rustom Cama ;) (२४ सप्टेंबर, इ.स. १८६१; मुंबई, ब्रिटिश भारत - १९ ऑगस्ट, इ.स. १९३६; मुंबई, ब्रिटिश भारत) या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या फ्रेंच नागरिक होत्या व तर राज्य संघटनेचे अध्यक्ष भिकाजी कामा.

सुरुवात[संपादन]

मादाम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर, इ.स. १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव भिकाई सोराब पटेल असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. रुस्तम कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.

कार्य[संपादन]

दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्‍न करण्यास प्रवृत्त केले. त्या युवकांना ब्रिटिश सरकारच्या बातम्या वेळोवेळी देत असत. मादाम कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले. त्या विशेषेकरून देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करीत. सावरकरांचे '१८५७चा स्वांतत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मादाम कामांनी त्यांनी मदत केली. त्या स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणाऱ्या क्रांतिकारकांना आर्थिक मदतीसह अन्य प्रकारची मदत करत. इ.स. १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन या परिषदेतील सदस्यांना भारताबद्दल माहिती दिली.

मादाम कामांनी फडकविलेला पहिला झेंडा[संपादन]

जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे मादाम भिकाईजी कामा यांनी फडकवलेला भारताचा पहिला झेंडा

जर्मनीत श्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. [१]त्यात हिरवा, पिवळालाल रंगांचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो पिवळा विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. झेंड्यावरील ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांची प्रतीके होती. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर काढलेले सूर्य आणि चंद्र हे हिंदू-मुस्लिम विश्वास दर्शवणारे चिन्ह होते. दिनांक २२ ऑगस्ट, इ.स. १९०७ रोजी श्टुटगार्ट येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा झेंडा सर्वप्रथम फडकावतेवेळी मादाम कामा म्हणाल्या होत्या -

माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरून फडकवीत आहे. स्वातंत्र्यप्रेमी म्हणविणाऱ्या या परिषदेतील सदस्यांना स्वतंत्र हिंदुस्थानचे मानचिन्ह असणारा हा तिरंगा आव्हान देत येथे फडकत आहे. या ध्वजाला प्रणाम करा.

अखेरचे दिवस[संपादन]

मादाम कामांनी श्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारण इ.स. १९३५ सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली[२] आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. १९ ऑगस्ट, इ.स. १९३६ या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

मादाम कामा मार्ग[संपादन]

मुंबईतील ओव्हल मैदानाजवळच्या एका हमरस्त्याला ‘मादाम कामा’ यांचे नाव दिले आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ आर्य, दिव्या (2018-03-08). "वो औरत जिन्होंने विदेश में पहली बार फहराया भारत का झंडा". BBC News हिंदी (इंग्रजी भाषेत). 2018-08-20 रोजी पाहिले.
  2. ^ "राष्ट्रतेजाने तळपता मादाम कामा मार्ग". १३ फेब्रुवारी २००७. Archived from the original on 2007-05-13. २५ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.