Jump to content

महात्मा फुले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जोतीराव गोविंदराव फुले या पानावरून पुनर्निर्देशित)
महात्मा जोतीराव फुले

टोपणनाव: जोतीबा, महात्मा
जन्म: ११ एप्रिल, १८२७
कटगुण, सातारा
मृत्यू: २८ नोव्हेंबर, १८९० (वय ६३)
पुणे, महाराष्ट्र
संघटना: सत्यशोधक समाज
प्रमुख स्मारके: भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे
धर्म: हिंदू
प्रभाव: थॉमस पेन आणि लहुजी वस्ताद साळवे

छत्रपती शिवाजी महाराज

प्रभावित: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील: गोविंदराव शेरीबा फुले
आई: चिमणाबाई फुले
पत्नी: सावित्रीबाई फुले
अपत्ये: यशवंत फुले (दत्तक)


जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०), महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.[][] सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले.[]

महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.[][] जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.[] खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती.[][]

महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.

१९७७ च्या टपाल तिकीटावर महात्मा फुले

'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.

बालपण आणि शिक्षण

[संपादन]

जोतीराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी जोतीराव यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला, जोतीराव यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

महात्मा फुले वाडा, पुणे. याच ठिकाणी महात्मा जोतिराव फुले त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत आयुष्यातील काही काळ राहिले होते. हा वाडा १८५२ मध्ये बांधला होता.

जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे.[] जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीरावकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले. त्यातील एक "नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हं, कैसे सूद "[]

शैक्षणिक कार्य

[संपादन]
भिडे वाडा, बुधवार पेठ, पुणे. येथेच १ जानेवारी १८४८ रोजी फुले दांपत्यांनी मुलींची शाळा सुरू केली होती.

महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.

महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती (मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत). त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केलीत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण -सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली. जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधनेनी उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थांना निःशुल्क शिक्षण द्यावे, अशी त्यांनी प्रार्थना केली होती. त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला.[१०]

महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. भारत सरकारचे १९९८ चे टपाल तिकीट

सामाजिक कार्य

[संपादन]

मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील प्रवेशद्वारातील पुतळा, फोटो: ऑगस्ट २०१०

‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्त्वाची वचने लिहिली.

  • संसाराविषयी फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देत. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. 'कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो', असे त्यांचे मत होते.[११]
  • सर्व गावाच्या, प्रांताच्या, देशाच्या, खंडाच्या संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात, स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे.
  • आपणां सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे.
  • आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री - पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही, अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला 'सत्यवर्तन करणारा' म्हणावे.
  • आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री - पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही, त्याप्रमाणे जबरी न करणाऱ्या सत्यवर्तन करणारे म्हणावे.
  • स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदांस, आपल्या सोयऱ्याधायऱ्यांस आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत, आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
    औरंगाबाद येथील पुतळे
  • स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात, परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
  • महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते , जोतीरावांचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता. त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात काय आमूलाग्र बदल घडवून आणायला हवा यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत, याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे. 'अखंड' या काव्यप्रकारात त्यांनी 'मानवाचा धर्म', आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णुता, सदसदविवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्यदक्षता, इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे.जोतिरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले, मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला, त्यामुळे व त्यांच्या समतावादी दृष्टिकोनामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली. पुढे हा वारसा त्यांच्या अनुयायांनी चालू ठेवला; त्यामुळे सामाजिक समतेचा जागर कायम राहिला.
  • जोतीराव हे संशोधक नव्हते. ते पंडित नव्हते. ते भाषाशास्त्रज्ञही नव्हते. परंतु ते मूलग्राही विचारवंत होते. अवतारवादाची कल्पना त्यांना समूळ निर्मूलन करावयाची होती. महाभारताच्या काळापर्यंत ही अवतारवादाची कल्पना नव्हती. नंतर पुराणात ती घुसडली गेली असे दिसते. जोतीराव हे धर्मशास्त्राचे पंडितही नव्हते. तथापि चित्पावन ब्राह्मण हे आफ्रिकेतील पूर्व किना-यावरून किंवा इराण, इजिप्त किंवा पेलेस्टाईनमधून आले असावेत, हे त्याचे विधान कोणत्याही इतिहासकाराने खोदून काढलेले नाही. उलटपक्षी काही इतिहासकार आणि संशोधक यांना, जोतीरावांच्या विधानाला पाठिंबा मिळेल असे पुरावे आढळले आहेत.[१२]
  • आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजाचा आवाज ही हिंदुस्थानात अनेक शतके दडपून टाकलेल्या कनिष्ठ समाजाची किंकाळी होय.[१३]
  • वेद हे ईश्वरनिर्मित नसून ते मानवनिर्मित आहेत, असे जोतीरावांचे ठाम मत होते. वेदाने समाजात भेद पडले . म्हणून वेद म्हणजे भेद असे त्यांना वाटे. ब्राह्मणांच्या पोथीतील जातींच्या उत्पत्तीविषयीची कल्पना त्यांना मुळीच मान्य नव्हती. ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, क्षत्रिय बाहुतून जन्मले, शूद्र त्याच्या पायातून निघाले हे विधान त्यांना भयंकर आणि धादांत असत्या वाटे. "मनुस्मृती" ही शूद्रांच्या बोकांडी गुलामगिरी बसविते म्हणून ती अपवित्र आहे, असे म्हणून त्यांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला आहे. बुद्धाविषयी जोतिरावांना नितांत आदर वाटे. महाराष्ट्रातील संत कवींचा जोतीरावांनी धिक्कार केला आहे. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, रामदास यांनी ब्राह्मणांच्या दुष्टाकर्मांचा उघड रीतीने त्याग करण्याचे धैर्य दाखविले नाही. समाजातील ब्राह्मणांचे वर्चस्व राहण्यासाठी ह्या महाराष्ट्र संत कवींनी साह्य केले, असा जोतीरावांनी निष्कर्ष काढला आहे.[१४]

सत्यशोधक समाज

[संपादन]

२४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली.

कृषी महाविद्यालय, पुणे येथील पुतळा

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्याशाळेच्या शिक्षिकाही होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन-प्रकाशनचे काम केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारांपासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.[१५]

लेखन साहित्य

[संपादन]

'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जाई. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

तत्कालीन पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी 3 डिसेंबर 2003 रोजी नवी दिल्लीतील संसद भवन येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' हा फुले यांचा शेवटच ग्रंथ. तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे थोरपण या ग्रंथातून लक्षात येते. 'सत्यमेव जयते' हे बीजसूत्र घेऊन साकारलेला हा ग्रंथ सत्यावर आधारलेल्या नव्या सर्वसमावेशक धर्माच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करणारा ग्रंथ आहे. प्रस्थापित हिंदू धर्मातील सनातनी ब्राम्हण्यावादी तत्त्वज्ञाने निर्माण केलेल्या शोषण व्यवस्थेने बहुजन समाज समूह पूर्णतः नागवला गेला होता. त्याला नवा जीवनमार्ग दाखवण्यासाठीच २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सत्यशोधक समाजासाठी आचारधर्म सांगण्याच्या आवश्यकतेतून सार्वजनिक 'सत्य धर्म पुस्तका'ची निर्मिती झाली आहे. डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणतात, "सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक म्हणजे सत्याशोधाकांचा आचारधर्मच होय. परंतु हा आचारधर्म कर्मकांडाच्या पातळीवरील नाही तर एकूण माणसाला सुखाकडे नेहरा, विचारशक्तीला प्राधान्य देणारा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना केद्रवर्ती स्थान देणारा असा आहे. पारलौकिक विश्व फुले यांना मान्यच नाही. तेव्हा याच लौकिक जीवनाच्या सुखाचा शोध घेणारा असा हा सत्य धर्म आहे." त्यामुळेच माणसाच्या सुखाचे चिंतन प्रकट करणारा हा ग्रंथ मौलिक आहे.[१६]

कराड

रा. ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते. महात्मा फुले यांचं समग्र लेखन आणि साहित्य हे समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी असंच आहे लोकशाही राज्यव्यवस्थेत वर्तमानपत्र ही लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जातात तत्कालीन स्थितीमध्ये हे वर्तमानपत्र लिहिणारे वर्तमानपत्रांचा अधिकार हा उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा होता त्यामुळे या काळात महात्मा फुले यांनी तत्कालीन पत्रकारितेवर टीका केली त्याचप्रमाणे पत्रकारिता तशी असावी याविषयीचा मापदंड देखील त्यांनी घालून दिला. एक मूलगामी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या काळामध्ये वृत्तपत्र लिखाणदेखील केले. क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाङ्मय लिहिले आहे त्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूड', 'गुलामगिरी' या ग्रंथांतून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे. त्यांच्या लिखाणात तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून, त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकद निर्माण करण्याची क्षमता होती. यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी आहे.

जोतीराव फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे जोतीराव फुले हे "महात्मा फुले" या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :-

लेखनकाळ साहित्य प्रकार नाव
इ.स.१८५५ नाटक तृतीय रत्‍न
जून, इ.स. १८६९ पोवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा
जून इ.स. १८६९ पोवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी
इ.स.१८६९ पुस्तक ब्राह्मणांचे कसब
इ.स.१८७३ पुस्तक गुलामगिरी
सप्टेंबर २४ , इ.स. १८७६ अहवाल सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत
मार्च २० इ.स. १८७७ अहवाल पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
एप्रिल १२ , इ.स. १८८९ निबंध पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ
२४ मे इ.स. १८७७ पत्रक दुष्काळविषयक पत्रक
१९ ऑक्टोबर इ.स. १८८२ निवेदन हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
१८ जुलै इ.स. १८८३ पुस्तक शेतकऱ्याचा असूड
४ डिसेंबर इ.स. १८८४ निबंध महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत
११ जून इ.स. १८८५ पत्र मराठी ग्रंथागार सभेस पत्र
१३ जून इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक १
ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक २
१ ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक इशारा
२९ मार्च इ.स.१८८६ जाहीर प्रकटन ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर
२ जून इ.स. १८८६ पत्र मामा परमानंद यांस पत्र
जून इ.स. १८८७ पुस्तक सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी
इ.स. १८८७ काव्यरचना अखंडादी काव्य रचना
१० जुलै इ.स. १८८७ मृत्युपत्र महात्मा फुले यांचे उईलपत्र
इ.स. १८९१ (प्रकाशन) पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक

जीवनक्रम

[संपादन]
अ.क्र. दिनांक / महिना इ.स. घटना
१. एप्रिल ११ इ.स.१८२७ जन्म (कटगुण, सातारा)
२. इ.स. १८३४ ते १८३८ पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण.
३. इ.स. १८४० नायगावच्याच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सात वर्षाच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येशी विवाह.
४. इ.स. १८४१ ते १८४७ मिशनरी शाळेत माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण.
५. इ.स. १८४७ लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार.
६. इ.स. १८४७ टॉमस पेन कृत “राईट ऑफ मॅन” या ग्रंथाचे मनन.
इ.स. १८४८ उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान .
८. इ.स.१८४८ शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा.
इ.स. १८४९ शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्‍नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग.
१० इ.स. १८४९ मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणाऱ्या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण.
११ इ.स. १८५१ चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.
१२ नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
१३ इ.स. १८४७ थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
१४ इ.स. १८४८ मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
१५ इ.स.१८४८ भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
१६ सप्टेंबर १७ इ.स.१८५१ भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
१७ इ.स.१८५२ पूना लायब्ररीची स्थापना.
१८ मार्च १५ इ.स.१८५२ वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१९ नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
२० इ.स.१८५३ 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग अँड अदर्स' स्थापन केली.
२१ इ.स.१८५४ स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी.
२२ इ.स.१८५५ रात्रशाळेची सुरुवात केली.
२३ इ.स.१८५६ जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्‍न झाला.
२४ इ.स.१८५८ शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
२५ इ.स.१८६० विधवाविवाहास साहाय्य केले.
२६ इ.स.१८६३ बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
२७ इ.स.१८६५ विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
२८ इ.स.१८६४ गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
२९ इ.स.१८६८ दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
३० इ. स. १९६९ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा लेखन
३१ जून इ. स. १९६९ 'शिक्षण विभागाचे ब्राह्मण पंतोजी' रचना
३२ इ. स. १९६९ 'ब्राह्मणाचे कसब' या पुस्तकाचे लेखन
३३ १३ ऑगस्ट इ. स. १९६९ भगवान परशुराम याला नोटीस
३४ इ. स. १८७३ ' गुलामगिरी'
३५ २४ सप्टेंबर इ.स.१८७३ सत्यशोधक समाजची स्थापना केली.
३६ इ.स.१८७५ शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
३७ इ.स. १८७५ स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
३८ इ.स. १८७६ ते १८८२ पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
३९ इ.स. १८८० दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
४० इ.स.१८८० नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
४१ इ.स.१८८२ 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
४२ इ.स.१८८७ सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
४३ इ.स.१८८८ ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
४४ ११ मे  इ.स.१८८८ मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
४५ नोव्हेंबर २८ इ.स.१८९० पुणे येथे निधन.

प्रभाव

[संपादन]

महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकरकेशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.

पुणे येथील सुप्रसिद्ध महात्मा फुले मंडई
कोल्हापूर येथील बिंदू चौकातील महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे

तृतीय रत्‍न

[संपादन]

तृतीय रत्‍न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. जोतीरावांनी २८ व्या वर्षी इ.स. १८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून, काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली."

महात्मा फुले. चित्र दिनांक: इ.स. १८९१ च्या पूर्वी

या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात, ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णूदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई. पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.[ संदर्भ हवा ]

आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.

नाटकाचे स्वरूप

[संपादन]

या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वतःचे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसऱ्या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे.

नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ. कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल. दोन फेऱ्या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे. ठराविक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. ‘पथनाट्य’ म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे.

या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे.

हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते.

  • महात्मा फुले लिखित ऐतिहासिक 'तृतीय रत्न' हे नाटक 2015 साली पुण्यामधून दिग्दर्शक सिद्धार्थ सिताराम मोरे यांनी बसवायला सुरुवात केली. यातील विदूषकाची भूमिका ते स्वतः करत होते. तर जोगबाईची भूमिका अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या करत होत्या. या नाटकाचे सुरुवातीचे निर्माते विजय कांबळे होते. काही कारणास्तव कांबळे साहेब यांनी माघार घेतली त्यानंतर सिद्धार्थ मोरे यांनी निर्मितीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन या नाटकाचे प्रयोग सादर केले.

फुलेंवर लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • असूड (मराठी नाटक) लेखक : डॉ. सोमनाथ मुटकुळे
  • क्रांतिजागर : महात्मा फुले यांची समग्र कविता (डॉ. रवींद्र ठाकूर)
  • क्रांतिबा फुले (नाटक) अनुवादक : फ.मुं. शिंदे. (मूळ आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्य अकादमीचे प्रकाशन)
  • गोष्टीरूप महात्मा फुले (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
  • पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखक : बा.ग. पवार
  • भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले (ना.ग. पवार)
  • महात्मा (मराठीत आणि इंग्रजीत, डॉ. रवींद्र ठाकूर)
  • महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक : ग.द. माळी
  • महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखिका : गिरिजा कीर
  • महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर
  • महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका : अनुराधा गद्रे
  • महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
  • महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक : विठ्ठलराव भागवत
  • महात्मा जोतीबा फुले (चरित्र) लेखक : सुखदेव होळीकर
  • महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन साहित्य
  • महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन : नागनाथ कोतापल्ले
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : नागेश सुरवसे
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी
  • महात्मा ज्योतीराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम पाटील
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : वसंत शांताराम देसाई
  • महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर
  • महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन विभूते ; मनोविकास प्रकाशन
  • महात्मा जोतीराव फुले - वारसा आणि वसा. लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
  • महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक सत्यधर्म (विश्वनाथ शिंदे)
  • महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा प्रकाशन
  • महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. बागडे
  • महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके
  • महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित). प्रकाशक : भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे
  • महात्मा फुले टीका आणि टीकाकार. लेखक : नीलकंठ बोराडे
  • महात्मा फुले दुर्मिळ वाङ्‌मय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा.गो. माळी
  • महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण
  • महात्मा फुले यांची कविता-एक विचार मंथन (शशिशेखर शिंदे)
  • महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
  • महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे
  • महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
  • महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक : विद्याकर वासुदेव भिडे
  • महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे
  • महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर
  • महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं.बा. सरदार
  • महात्मा फुले समग्र वाङ्मय - संपादक धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
  • महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी
  • युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार
  • युगार्त (जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरी, लेखक - बाळ लक्ष्मण भारस्कर)
  • महात्मा जोतीराव फुले - नजरीयात और ऊन का अदब.सरसरी जायजा,(ऊर्दू) लेखिका - डाॅ.नसरीन रमझान सैय्यद (पुणे)
  • महात्मा फुलेंचे कार्य : शोध आणि बोध -- संपादक ..प्रा.डॉ. नरसिंग कदम ( उदगीर )
  • महात्मा फुले : साहित्य आणि विचार संपादक प्रा.डॉ. नरसिंग अप्पासाहेब कदम

फुलेंवरील नाटके व चित्रपट

[संपादन]
  • महात्मा फुले (मराठी चित्रपट) निर्माते-दिग्दर्शक आचार्य अत्रे.
  • महात्मा जोतीबा फुले (लोकनाट्य) लेखक : शंकरराव
  • महात्मा जोतीराव फुले (नजरियात और उनका अदब (उर्दू) लेखिका : डा नसरीन रमजान सैय्यद)
  • मी जोतीबा फुले बोलतोय (एकपात्री नाटक) : लेखक-सादरकर्ते कुमार आहेर. कुमार आहेरांना या कार्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्‍कार’ दिला आहे.
  • सत्यशोधक (मराठी नाटक) लेखक : गो.पु. देशपांडे; दिग्दर्शक अतुल पेठे
  • जोती सावित्री ( मराठी ऐतिहासिक नाटक ) लेखक व निर्माते : मंगेश एस.पवार,कविता मोरवणकर,दिग्दर्शक : प्रमोद सुर्वे
  • सावित्रीजोती ही फुले दांपत्यावरील मालिका सोनी मराठी वाहिनीवर ६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित होत होती. ही मालिका दशमी क्रिएशनची निर्मिती होती. सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार यांनी साकारली होती, तर जोतीराव फुले यांची भूमिका ओंकार गोवर्धन यांनी केली होती. मालिकेचे दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे असून नितीन वैद्य यांची निर्मिती होती.[१७]

प्रभाव आणि सन्मान

[संपादन]
३ डिसेंबर २००३ रोजी नवी दिल्लीतील संसद भवन येथे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
फुले दांपत्याचे पुतळे, औरंगाबाद
  • महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवन-कार्यावर आधारित, नाटक "मी जोतीराव फुले बोलतोय ..!" ...याची सुरुवात २००२पासून पुण्यातून झाली. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-संगीतकार-गीतकार आणि निर्माते सिद्धार्थ सीताराम मोरे हे आहेत तसेच महात्मा जोतिराव फुले यांची प्रमुख भूमिका सुद्धा सिद्धार्थ मोरे यांनीच साकारली आहे. तर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या आहेत. हे नाटक मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये सादर केले जाते. हे नाटक संपूर्ण देशभर देखील सादर झाले आहे. सन २०१० साली या नाटकाचा पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे ७५० वा प्रयोग सादर झाला.
  • पिंपरी-चिंचवड महापालिका ही 'फुले आणि आंबेडकर' यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते.
  • जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर इ.स. १९५५ साली आचार्य अत्रे यांनी 'महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
  • जोतिबांच्या जीवनावर 'असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.
  • जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.
  • महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Remembering Jyotirao Phule: The Pioneer Of Girls' Education In India". NDTV.com. 2022-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ "Mahatma Jyotirao Phule: Reformer far ahead of his time". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-06-27. 2022-01-01 रोजी पाहिले.
  3. ^ a b November 28, India Today Web Desk; November 28, 2016UPDATED:; Ist, 2016 14:21. "Remembering the pioneer of women's education in India: Contributions by Jyotirao Phule". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-01-01 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ "Savitribai Phule: The pioneer of women's education in India". The Week (इंग्रजी भाषेत). 2022-01-01 रोजी पाहिले.
  5. ^ Sperandio, Jill (2018-12-11). Pioneering Education for Girls across the Globe: Advocates and Entrepreneurs, 1742-1910 (इंग्रजी भाषेत). Rowman & Littlefield. ISBN 978-1-4985-2488-9.
  6. ^ "Who was Jyotirao Phule?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-11-28. 2022-01-01 रोजी पाहिले.
  7. ^ "जोतिबा फुले 'महात्मा' कसे बनले?".
  8. ^ गुंदेकर, श्रीराम. "महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा जोतीबा फुले" (PDF). महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ. 2016-04-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.
  9. ^ कांडगे, राम (मार्च २००४). महा - महात्मा जोतीराव फुले व्यक्ती व कार्य. चाकण: राजश्री प्रकाशन, चाकण. pp. १४६, २६, २७.
  10. ^ कीर, धनंजय (२०२०). महात्मा जोतीराव फुले. मुंबई: पॉप्युलर प्रकाशन. pp. १७७. ISBN 978-81-7185-554-4.
  11. ^ चव्हाण, रा. ना., संपादक श्री. रमेश चव्हाण (२०१३). संत-सुधारक व त्यांचे धर्मविचार एक अभ्यास. पुणे: रा.ना. चव्हाण जन्मशताब्दी वर्ष प्रकाशन. pp. २४७.
  12. ^ कीर, धनंजय (२०२०). महात्मा जोतीराव फुले. मुंबई: पॉप्युलर प्रकाशन, मुंबई. pp. १५३. ISBN 978-81-7185-554-4.
  13. ^ कीर, धनंजय (२०२०). महात्मा जोतीराव फुले. मुंबई: पॉप्युलर प्रकाशन. pp. १६४. ISBN 978-81-7185-554-4.
  14. ^ कीर, धनंजय (२०२०). महात्मा जोतीराव फुले. मुंबई: पॉप्युलर प्रकाशन मुंबई. pp. १४८. ISBN 978-81-7185-554-4.
  15. ^ समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी. 1887.
  16. ^ कालवणे, केदार (सप्टेंबर 2020). "लौकिक जीवनमार्गाचे वैश्विक तत्त्वज्ञान". अक्षर वाड्.मय. पहिला: ७९ - ८०.
  17. ^ "सावित्री-जोतिरावांच्या चरित्रावर मालिका". ६ जून २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.: