खानवडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खानवडी हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव सासवड पासून पूर्वेला ७ कि.मी. सासवड – सुपा रस्त्यावर असून, गावाची लोकसंख्या सुमारे एक हजार आहे . गावचे क्षेत्रफळ साधारण ९ चौ. कि. मी. असून, गावाच्या पुर्वेला बेलसर व पारगाव ही गावे आहेत. दक्षिणेला वाळूंज व खळद, तसेच पश्चिमेला एखतपुर, मुंजवडी तर उत्तरेला सिंगापुर हे गाव आहे. खानवडी गावाला 'खानवडी ' हे नाव फार पूर्वीपासूनच आहे. पूर्वीच्या काळी चुनखडीच्या खाणी या गावामध्ये होत्या व अजूनही आहेत म्हणून खानवडी हे नाव पडले असेल अशी ग्रामस्थांची समजूत आहे. गावामध्ये बाळसिध्दनाथ हे गावाचे मुख्य व आराध्य दैवत असून त्याची यात्रा चैत्र वद्य चतुर्थीस भरवली जाते. त्याचप्रमाणे गावाच्या पश्चिम बाजूस पांडवकालीन व पाच पांडवांनी बांधलेली जुन्या पध्दतीचे व घडीव दगडात बांधकाम केलेले मल्लिकार्जुनाचे शिवालय आहे .

खानवडी गावामध्ये पूर्वीपासून 'होले व फुले ' आडनावाची माळी समाजाचे लोक राहतात. गावामध्ये चार उपवाड्या आहेत.

१)बोरावके मळा(शिंदे मळा)

२)मधला मळा(पाटिल वस्ती)

३)खालचा मळा(होले वस्ती)

४)फुले वस्ती. व गावठाणामध्ये हरीजन वस्ती असून मातंग व दलित समाजाचे लोक एकत्र राहत असून सर्वजन गुण्यागोविंदाने नांदत आहेत .

येथील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून गावाची सर्व अर्थव्यवस्था शेतीवर आधारीत आहे. गावमध्ये १ ली ते ७ वी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून पुढील शिक्षणासाठी मुलांना सासवड येथे जावे लागते.पुरंदर तालुका हा पुर्णपणे पठारी भागात असल्याने दुष्काळी समजला जातो त्याचप्रमाणे खानवडी गाव ही दुष्काळी भागात मोडते. दरवर्षी पडणारा अपुरा पाऊस, त्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरद्वारे किंवा २-२ कि. मी. अंतरावरून पाणी अणावे लागते. दिंवसेंदिवस जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न उद्भवत आहे. गावामध्ये साक्षरतेचे प्रमाण ९०% आहे .

सध्या गावामध्ये 'महात्मा फुले स्मारक समितीने' 'महात्मा फुले' यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक भवनाची उभारणी केली असून अनेक सामाजीक कामांमध्ये स्मारक समिती भाग घेऊन महात्मा फुले यांचे कार्य चालू ठेवण्याचा प्रयत्न करित आहे .