Jump to content

नारायण मेघाजी लोखंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत सरकारचे २००५ मधील टपाल तिकीट

रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे (१८४८-१८९७) हे भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक होते. [] १९व्या शतकात कापड गिरणीच्या कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठीच नव्हे तर जातीय आणि सांप्रदायिक मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या धाडसी पुढाकारासाठीही त्यांची आठवण ठेवली जाते. [] याशिवाय १८९५ मध्ये हिंदू-मुस्लिमांदरम्यान झालेल्या दंगलीत केलेल्या कामाबद्दल त्यांना राव बहादूर ही पदवीही देण्यात आली होती. तत्कालीन ब्रिटिश भारत सरकारने त्यांना "जस्टिस ऑफ पीस" हा सन्मान देऊन सन्मानित केले होते. भारत सरकारने २००५ मध्ये त्यांच्या छायाचित्रासह एक टपाल तिकीट जारी केले.

सामाजिक योगदान

[संपादन]

नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा जोतिराव फुले यांचे प्रमुख सहकारी होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कण्हेरसर येथील माळी कुटुंबात झाला. [] त्यांचे शिक्षण हायस्कूलपर्यंत झाले होते. त्यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई होते. गोपीनाथ नावाचा त्यांना एक मुलगा होता. १८७४ मध्ये माहिती मिळाल्यानंतर ते सत्यशोधक चळवळीचे सदस्य झाले. []

१८८० पासून त्यांनी मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दीनबंधूचे व्यवस्थापन हाती घेतले. सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुट्टीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. नारायण मेघाजी यांनी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिलहॅंड्स असोसिएशन २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली[] आणि समाजसेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. []

नारायण मेघाजी यांच्यासह महात्मा फुले यांनी मुंबईतील कापड कामगारांच्या सभांनाही संबोधित केले. फुले व त्यांचे सहकारी कृष्णराव भालेकर आणि लोखंडे यांनी शेतकरी आणि कामगारांना संघटित करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न कोणत्याही संघटनेने केला नाही हे विशेष आहे. []

लोखंडे यांनी आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांकरिता साप्ताहिक सुटीसाठी लढा दिला आणि १० जून १८९० पासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली जी आजपर्यंत चालू आहे.[]

एन.एम.लोखंडे यांच्यामुळे गिरणी कामगारांना मिळालेले काही हक्क हे होते : []

  • गिरणी कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी.
  • दुपारी, कामगारांना अर्धा तास सुट्टी मिळावी.
  • मिल सकाळी साडेसहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करावी आणि सूर्यास्तानंतर बंद करावी.
  • कामगारांचे पगार दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत करावेत.

ब्रिटिश राजवटीने त्यांना राव बहादूर ही पदवी बहाल केली होती. त्यांनी 'मुंबई कामगार संघ' स्थापन केला.

पत्रकारिता

[संपादन]

इ.स. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले. हे नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडत असे; त्यांच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकारचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे. लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते.

सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधू ह्या मुखपत्रातून वाचा फोडली. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दीनबंधूने उठविला.[]

सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते आणि मुंबईतील आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संतुजी आवटे यांनी दीनबंधूची जबाबदारी स्वीकारली. पत्रावर असलेल्या कर्जाचा बोजाही दोघांनी स्वीकारला. मुख्य जबाबदारी लोखंडे यांच्यावर होती. त्यांनी हे पत्र पुण्याहून मुंबईला नेले. ९ मे १८८० रोजी मुंबईतून दीनबंधूचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. भालेकरांना या पत्राची जबाबदारी का सोडावी लागली, याचे विवेचन या अंकात लोखंडे यांनी केले होते. अनेक अडचणी सोसून भालेकरांनी निष्ठेने हे पत्र सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी यात भालेकरांचा गौरवही केला होता.

दीनबंधू मुंबईतून सुरू झाले, संपादक बदलले, तरी पत्राच्या धोरणात बदल झाला नाही. विरोधकांची पत्रावरील टीकाही तशीच सुरू राहिली. या सर्व टीकेला लोखंडे यांनी तेवढ्याच दमदारपणे उत्तर दिले. पण या टीकेमुळे लोखंडे यांचे सहकारी अस्वस्थ होत. लोखंडे हे जोतिबा, भालेकरांच्या पठडीतले निष्ठावंत कार्यकर्ते होते. आवटे यांची वृत्ती व्यापारी होती. ब्राम्हणांना आवडत नसेल, कशाला टीकेच्या फंदात पडायचे, अशी त्यांची व्यवहार पाहणारी दृष्टी होती. आपला व्यवसाय झाला, दोने पैसे गाठीला लागले, की पुरे असा व्यवहार ते पाहत. तर, ब्राम्हणांना न घाबरता त्यांच्याशी दोन हात करायला लोखंडे मागेपूढे पाहात नसत. यामुळे आवटे आणि लोखंडे यांचेच वाद होवू लागले. शेवटी आवटे बाजूला झाले. पण खचून न जाता लोखंडे जिद्दीने अखेरपर्यंत (९ फेब्रुवारी १८९७) पत्राचे काम सुरू ठेवले.[१०]

दीनबंधूची मालकी बदलली पण आर्थिक अडचणी कमी झाल्या नाहीत. लोखंडे संपादक झाल्यावर वर्गणीदार वाढले. पण त्यातून खर्च भागणे शक्य नव्हते. त्यामुळे लोखंडे यांच्या मुंबईतील नरसू सायबू, रामय्या व्यंकय्या, नागू सयाजी, जाया कराडी आदी हितचिंतकांनी वर्गणी गोळा करून चार हजार रुपये जमा केले आणि कर्जाचा बोजा हलका केला. डॉ. संतुंजी रामजी लाड यांनीही आर्थिक मदत करून पत्र बंद पडू दिले नाही.

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • लॉर्ड लॅन्सडाऊनच्या काळात मुंबईत १८९३ मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले. या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली.
  • ब्रिटिश सरकारने लोखंडे यांनी कामगारांसाठी केलेल्या कामगिरीची दखल देऊन त्यांना ‘जे.पी.’ (जस्टिस ऑफ पीस) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

मृत्यू

[संपादन]

मुंबईत इ.स. १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले; परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा अंत झाला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Pandit, Nalini (1997). "Narayan Meghaji Lokhande: The Father of Trade Union Movement in India". Economic and Political Weekly. 32 (7): 327–329. ISSN 0012-9976. JSTOR 4405089.
  2. ^ Pandit, Nalini (1997). "Narayan Meghaji Lokhande: The Father of Trade Union Movement in India". Economic and Political Weekly. 32 (7): 327–329. JSTOR 4405089.
  3. ^ "लोखंडे, नारायण मेघाजी". 4 July 2019.
  4. ^ a b Omvedt, Gail (2011). Cultural Revolt in a Colonial Society: The Non-Brahman Movement in Western India. New Delhi: Manohar. pp. 292–293. ISBN 978-81-7304-927-9.
  5. ^ Reddy, R.Jayaprakash (2004). Labour Legislation. New Delhi: APH Publishing Corporation. p. 34. ISBN 8176486264.
  6. ^ "Mahatma Jotirao Govindrao Pule". बहुजन समाज पक्ष India. 2012-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-05-02 रोजी पाहिले.
  7. ^ [१]
  8. ^ Sarkar, Aditya (2018). Trouble at the Mill: Factory Law and the Emergence of the Labour Question in Late Nineteenth-Century Bombay. New Delhi: Oxford University Press. ISBN 978-0199093298.
  9. ^ बावडेकर, ऋता (2009). महाराष्ट्रातील प्रमुख संपादक. पुणे: दत्तात्रय गं. पाष्टे. pp. 70, 71. ISBN 978-81-8483-217-4.
  10. ^ लेले, रा. के. (2009). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: अनिरुद्ध अनंत कुलकर्णी. p. 612.