गजानन महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संत श्री गजानन महाराज या पानावरून पुनर्निर्देशित)
गजानन महाराज
जन्म जन्मदिनांक
२३ फेब्रुवारी १८७८ , जन्मस्थळ
मृत्यू ८ सप्टेंबर १९१० (संजीवन समाधी)
शेगाव, भारत
मृत्यूचे कारण
कालावधी १९ वे शतक( १८७८- १९१०
Gajanan Maharaj
गजानन महाराज

गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते.[१]महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे.[२]


शेगाव (बुलढाणा जिल्हा), महाराष्ट्र, भारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा (संप्रदाया)चे भारतीय गुरू होते त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी १८७८ च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला दिसले. त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून, आणि ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात.[ संदर्भ हवा ] गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहे, त्यांनी भक्ती मार्गाने देवा पर्यंत पोहचता येते हा संदेश दिला आहे. गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी ' श्रीगजानन विजय' ग्रंथामध्ये लिहिले आहे.[ संदर्भ हवा ]

गजानन विजय ग्रंथ[संपादन]

गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री. दासगणू महाराज यांनी लिहिला असून त्याचे नाव "श्री गजानन विजय असे आहे. या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात.[३]

इतिहास[संपादन]

माघ वद्य ७ शके १८००, (२३ फेब्रुवारी १८७८) या दिवशी ३० वर्षाचे गजानन महाराज शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले.[४] त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"[ संदर्भ हवा ]

महाराजांच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने शेगाव येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव होतो.[५]

असे म्हटले जाते की गजानन महाराज शेगावी येण्याच्या आधी बाल दिगंबर अवस्थेत अक्कोलकोटचे दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले तेथे राहुन त्यांनी बाललीला दाखवल्या. मग, स्वामींनी त्यांना त्यांच्या कार्याची अनुभुती करून दिली व गुरुदिक्षा दिली मग तिथुन गजानन महाराज शेगावी आले.[ संदर्भ हवा ]

शरीरयष्टी[संपादन]

सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढीकेस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती.[६] पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे.[७]

अन्नसेवन[संपादन]

महाराजांची अशी मूर्ती एखाद्याच्या घरात लगबगीने घुसत असे, किंवा अंगणात, ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावा, अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.[ संदर्भ हवा ]

महाराजांना झुणका भाकरीसोबतच [मुळा|मुळ्याच्या]] शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.[ संदर्भ हवा ]

मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहानलहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत.[८]

महाराजांचे भक्त[संपादन]

 1. बंकटलाल अग्रवाल : सुसंस्कारीत अशा अग्रवाल कुटुंबात बंकटलालांचा जन्म सन १८५५ साली झाला. श्रीगजानन महाराजांमधील साधूत्वाचा 'अंश' जाणण्याचे महान कार्य बंकटलाल अग्रवाल यांनी केले. महाराजांना सर्वप्रथम शेगांवी पाहिले ते बंकटलाल अग्रवाल व दामोदरपंत कुलकर्णी या दोघांनी. माघ वद्य सप्तमी, दि. २३/२/१८७८,वार शनिवार. देविदास पातुरकर यांच्या घरी ऋतुशांतीचा कार्यक्रम साजरा होत होता.दोन वाजण्याच्या सुमारास, भर उन्हांत उष्ट्या पत्रावळीवरील भातशिते खात असतांना महाराजांचे, बंकटलाल यांस प्रथम दर्शन झाले. वयाच्या २०-२२ व्या वर्षी साधू संत पारखण्याइतकी बुद्धी, जिज्ञासा, आवड व भक्ती असणे हे खरोखरच ईश्वरी कृपेचे द्योतक आहे. बंकटलालच्या घरी महाराजांचा मुक्काम दुसऱ्या मजल्यावर होता. त्याने महाराजांसाठी वरचा मजला संपूर्णपणे राखून ठेवला होता व तो स्वतः खाली पहिल्या मजल्यावर राहत असे. महाराजांची सर्व बडदास्त तो स्वतः चोखपणे सांभाळीत होता. महाराजही त्याच्या भक्ती व सेवेवर प्रसन्न होते. बंकटलाल यांच्या निवासस्थानात महाराजांनी अनेक चमत्कार केले, एकदा जानकीराम सोनाराने महाराजांच्या चीलमिला विस्तव दिला नाही, तेव्हा महाराजांनी बंकटलाल यांना चीलमिवर काडी धरण्यास सांगितले व काडी लावताच चीलिमित अग्नी प्रकट झाला.बंकटलाल यांच्या घरीच महाराजांना काशीच्या गोसाव्याने चिलीम दिली होती. महाराज समाधीस्त होईपर्यंत बंकटलाल यांनी त्यांची मनोभावे सेवा केली आणि त्यानंतरही त्यांचा "श्रीगजानन महाराज संस्थान" च्या कार्यकारिणीत सक्रिय सहभाग होता. अशा या गजानन भक्ताची सन १९२६ साली प्राणज्योत मावळली.[ संदर्भ हवा ]
 2. पितांबर सैतवाल : शेगांव येथे बालाजी सैतवाल यांच्या घरी १८५८ साली पितांबर यांचा जन्म झाला. पितांबर हे पेश्याने शिंपी होते.ते बंकटलाल यांचे बालमित्र होते.पितांबर हे महाराजांचे पट्टशिष्य होते. महाराजांनी अनेकवेळा पितांबर यांची परीक्षा घेतली व पितांबर यांची गुरुभक्ती पाहून महाराज पण प्रसन्न झाले, महाराजांच्या आज्ञेने पितांबर कोंडोली या गावी आले. याच गावी सन १९०२ साली महाराजांच्या कृपेने पितांबर यांनी एका वाळलेल्या आंब्याच्या झाडाला पाने आणून दाखवले व तेथील गवकऱ्यांसठी पितांबर वंदनीय झाले. कोंडोली येथे पितांबर यांनी महाराजांच्या नावाचा मठ स्थापन केला,संत पदावर पोहोचलेला महाराजांचा हा परम भक्त १९१३ साली अनंतात विलीन झाला.[ संदर्भ हवा ]
 3. भास्कर पाटील : महाराजांच्या पट्ट शिष्यांपैकी भास्कर पाटील एक होते. अकोली जहागीर येथे १८८८ रोजी दुष्काळ पडला होता व महाराज चालत चालत भास्कर पाटील यांच्या शेतात आले.भास्कर पाटील यांनी आपल्या शेतात फार दुरून एक घागर पाण्याने भरून आणली होती, महाराजांनी त्यांना प्यायला पाणी मागितले व त्यांनी महाराजांना पाणी देण्यास नकार दिला आणि ते महाराजांना वाईटसाईट बोलले. अकोली ग्रामस्थांची समस्या महाराजांना कळली व साक्षात पांडुरंगाला प्रार्थना करून महाराजांनी भास्कर पाटील यांच्या शेतातील १२ वर्षापासून कोरड्या असलेल्या विहिरीला जलमय केले व ही विहीर आजही जलमय आहे. तेव्हापासून भास्कर यांनी आपले घरदार सोडून महाराजांच्या बरोबर त्यांची सेवा करायला ते शेगावला आले.भास्कर पाटील हे सतत महाराजांबरोबर सावलीसारखे असायचे.सन १९०७ साली महाराजांच्या समक्ष भास्कर पाटील यांनी आपला श्वास सोडला व महाराजांनी त्यांना स्वहस्ते आडगाव येथे समाधी दिली.[ संदर्भ हवा ]
 4. सेवाधारी बाळाभाऊ : बाळाभाऊ हे ब्राम्हण गृहस्थ मुंबई येथे पोस्टात नोकरीला होते. बाळाभाऊ आणि गजानन महाराज यांची पहिली भेट महाराज अमरावती येथे आत्माराम भिकाजी देशपांडे यांच्या घरी आले असताना झाली. आत्माराम भिकाजी देशपांडे हे बाळाभाऊ यांचे मामा होते.महाराज हे फार मोठे सिद्ध पुरुष आहेत हे बाळाभाऊ यांनी ओळखले व तेव्हापासून त्यांची वृत्ती महाराजांप्रती अती विरक्त झाली, त्यांचे कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते व महाराजांची सेवा करण्यासाठी त्यांनी आपल्या चांगल्या नोकरीचा राजीनामा दिला. बाळाभाऊ यांनी अगदी निःस्वार्थ भावाने महाराजांची सेवा केली. महाराजांनी बाळाभाऊ यांच्याशी सामान्य माणूस समजू शकणार नाही अशा गोष्टींचा संवाद साधला, यावरून हे दिसून येते की बाळाभाऊंचा अधिकार खूप मोठा होता, जणू महाराज आणि बाळाभाऊ एकरूप झाले होते. महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी बाळाभाऊ यांना आपल्या गादीवर बसविले आणि उत्तराधिकारी म्हणून नेमले.महाराजांनी समाधी घेताना देखील बाळाभाऊ यांना जवळ बसवले होते.बाळाभाऊ यांनी २ वर्षे महाराजांची गादी सांभाळली.महाराजांनी समाधी घेतल्यानंतर बाळाभाऊ नेहमी महाराजांच्या देहविसर्जन स्थळाजवळच बसत असत. तेथे ते गीतेवर प्रवचन करीत असत. महाराजांनी दिलेल्या शक्तीच्या साहाय्याने भक्तांचे दुःख निवारण करीत असत. महाराजांनी समाधि पश्चात बाळाभाऊ कृश होत गेले. व त्यांचा विरह सहन न झाल्यामुळे दोनच वर्षानी, १९१२ साली वैशाख वद्य षष्ठीस बाळाभाऊ देह सोडून श्री गजानन महाराजांच्या चरणी कायमचे स्थिर झाले.त्यांची समाधी शेगाव येथील मंदिर परिसरात आहे.[ संदर्भ हवा ]
 5. हरी पाटील : शेगाव येथील गणेश पाटील घराण्यात हरी पाटील यांचा जन्म झाला.त्यांची संपूर्ण शेगावात सत्ता होती.त्यांना कुस्तीचा फार शौक होता. महाराज मारुती मंदिरात राहत असताना त्यांनी महाराजांना तालमीत येऊन कुस्तीसाठी आव्हान केले.महाराजांनी त्यांचे आव्हान स्वीकारले व हरी पाटलांनी महाराजांचा हात धरून त्यांना तालमीत घेऊन आले. तालमीत येताच महाराज मैदानात येऊन बसले व हरी पाटलांना ' मला बसल्या जागेवरून उठवून दाखव ' असे म्हटले. हरी पाटील हे महाराजांना हलवायचा प्रयत्न करू लागले पण ते सर्व वाया गेले. शर्थीचे प्रयत्न करूनही हरी पाटील महाराजांना हलवू शकले नाहीत व अखेरीस ते महाराजांसमोर नतमस्तक झाले.१९१० साली पंढरपूर येथे महाराज हरी पाटील यांच्या बरोबर गेले असताना त्यांनी पांडुरंगाला 'मला तुझ्याकडे येण्यास अज्ञा दे' असे म्हणून हरी पाटील यांना आपण समाधी घेणार आहे असा संकेत दिला.ते ऐकून हरी पाटील फार दुःखी झाले व महाराजांनी पांडुरंगा समक्ष हरी पाटील यांना 'तुला व तुझ्या वंशाला कधीही कशाचीही कमी पडणार नाही' असा आशीर्वाद दिला.शेगांव संस्थानचा कारभार त्यांनी बरेच वर्ष सांभाळला व १९१८ साली हरी पाटील स्वर्गवासी झाले.[ संदर्भ हवा ]
 6. कृष्णाजी पाटील : पाटील बंधवांपैकी कृष्णाजी हे सर्वात लहान होते.ते फार भाविक होते.महाराजांच्या पदस्पर्शाने त्यांचा मळा पवित्र झाला व याच मळ्यात महाराजांनी पलंग पेटवून ब्रम्हगिरी गोसव्याचे गर्वहरण केले.हा मळा २०२१ पासून संस्थानाने दर्शनासाठी खुला केला आहे.[ संदर्भ हवा ]
 7. बाळकृष्ण बीडवाई : बाळकृष्ण बुवा हे बाळापुरचे रहिवासी होते.महाराजांनी सन १९०६ साली दासनवमीला बाळापूर येथे बाळकृष्ण बुवांना समर्थ रामदास स्वामींच्या रूपात दर्शन दिले होते.[ संदर्भ हवा ]
 8. गंगाभारती गोसावी : श्री गजानन महाराजांनी सन १९०८ साली गंगाभारती यांना महारोगातून बरे केले.महाराजांना त्यांनी म्हटलेले भजन खूप आवडायचे व महराजांच्या आज्ञेने ते मलकापूरला गेले व तिथेच त्यांनी १९०९ मध्ये देह ठेवला.[ संदर्भ हवा ]
 9. पुंडलिक भोकरे : मुंडगाव येथे १८९५ साली पुंडलिक भोकरे यांचा जन्म झाला.महाराजांच्या भक्तमंडळी मध्ये पुंडलिक सर्वात लहान होते.पुंडलिक महाराजांना प्रेमाने 'बुढा' म्हणायचे. महाराजांनी पुंडलिक यांना पदुकांचा प्रसाद दिला होता.महाराजांनी मंदिर परिसरात १९०८ साली पुंडलिक यांना प्लेगच्या रोगतून बरे केले.महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते.महाराजांनी समाधिस्त झाल्यावरही त्यांना दर्शन दिले होते.मुंबई येथे १९६८ साली पुंडलिक भोकरे यांचा मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ]
 10. डॉ.भाऊ कवर : सन १८७९ साली त्र्यंबक(भाऊ) राजाराम कवर यांचा जन्म झाला.ते फार धार्मिक वृत्तीचे होते.त्यांची महाराजांवर खूप श्रद्धा होती.भाऊ विद्यार्थीदशेपासुनच महाराजांची भक्ती करीत.एकदा भाऊंनी महाराजांच्या आवडीचे जेवण बनविले आणि शेगावी निघाले.दुर्दैवाने ट्रेन निघून गेल्याने वेळ झाल्याने ते दुपारी उशिरा पोहोचले ,महाराज भाऊंची उपाशीपोटी वाट पहात होते.समोर पंचपक्वान्नची ताटे असुंनसुद्धा महाराज जेवले नाहीत परंतु भाऊ आल्यावर त्यांच्य़ा झुणकाभाकरीचे जेवण केले व महाराजांनी 'तू डॉक्टरकीच्या परीक्षेत पास होशील'असा भाऊंना आशीर्वाद दिला व त्र्यंबक डॉक्टर झाले.तसेच एकदा भाऊंना फोड झाला व सर्व वैद्यकीय उपाय हरले.त्रास असह्य झाल्यानंतर मात्र भाऊंनी मनापासून महाराजांचा धावा केला.महाराज ब्राह्मणरूपाने तीर्थअंगारा घेऊन आले.तीर्थअंगारा फोडाला लावताच फोडातुन पु वाहून गेला आणि काही दिवसांतच फोड बरा झाला.महाराजांचा प्रसिद्ध असलेला शाल पांघरलेला फोटो सन १९०६ साली भाऊ कवर यांनीच कॅमेराद्वारे

स्वहस्ते काढला होता.अशा ह्या गजाननभक्ताने २६ जानेवारी १९५६ रोजी गुरुपुष्य उत्तरायण योगावर देहत्याग केला.[ संदर्भ हवा ]

 1. बापूंना काळे : शेगांव येथे हरी पाटील यांच्या शेजारी बापूंना काळे राहत होते. त्यांची परिस्थिती गरिबीची होती. त्यांची पांडुरंगावर फार निष्ठा होती.१६ जुलै १९०२ रोजी पंढरपूर येथे महाराजांनी बापूंना काळे यांना विठ्ठल रूपात दर्शन दिले व महाराजांच्या कृपेने त्यांना मुलगा झाला व त्याचे नाव नामदेव ठेवण्यात आले.अशा या निस्सीम पांडुरंग भक्ताचे १९६४ साली निधन झाले.[ संदर्भ हवा ]
 2. झ्यामसिंग राजपूत : झ्यामसिंग शेखावत हे राजपूत गृहस्थ मुंडगांव येथे राहत होते. ते महाराजांचे फार मोठे भक्त होते.महाराजांनी पुंडलिक भोकरे यांना दिलेल्या पादुका ह्या झ्यामसींग यांच्याच हातून पाठवल्या होत्या. सन १९०८ साली महाराज सर्वप्रथम मुंडगाव येथे आले असताना ते झ्यामसींग यांच्या घरी राहिले.एकदा महाराजांची आज्ञा न ऐकता झ्यामसिंग यांनी घातलेल्या भंडाऱ्यात अचानक पाऊस आला व सर्व तयारी वाया गेली, तेव्हा महाराजांनी त्यांना दुसऱ्या दिवशी भंडारा ठेवायला सांगितले,असे म्हणताच महाराजांनी अकाशाकडे पाहिले व आभाळ फाकुन गेले. महाराजांच्या कृपेने दुसऱ्या दिवशी भंडारा निर्विघनपणे पार पडला.महाराजांची ज्या रथातून मिरवणूक काढण्यात आली होती त्या रथाचा अवशेष आजही मुंडगाव येथील मंदिरात आहे व झ्यमसिंग यांनी आपली सर्व इस्टेट महाराजांना अर्पण केले होती.[ संदर्भ हवा ]

उपदेश[संपादन]

महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये.[ संदर्भ हवा ]

विरक्ती[संपादन]

देवीदास पातुरकरांच्या अंगणात पक्वान्नाचे ताट समोर आल्यावर महाराजांनी सर्व पदार्थ एकत्र करून खाल्ले, आणि दाखवून दिले की ज्याने ब्रह्मरसाची माधुरी चाखली आहे त्याला पक्वान्नाची काय चव? ह्याच ठिकाणी महाराजांनी सांगितले की शुद्ध ब्रह्म हे निर्गुण असते आणि त्याच्यापासूनच हे जग निर्माण झालेले आहे.[ संदर्भ हवा ]

भक्तांकडून साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा करून घ्यावी तर कधी आंघोळीशिवाय कित्येक दिवस राहावे, तर कधी गळ्यात पडणारे हारही भिरकावून द्यावेत, अशी त्यांची बालोन्मत्तपिशाच्च वृत्ती होती.[ संदर्भ हवा ]

महाराज हे शुद्ध ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते. ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीव-शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहात नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष त‍री कुठे असणार? महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुशः दिगंब‍र अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठारसाहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले, "तुला काय करणे यासी|चिलिम भरावी वेगेसी|नसत्या गोष्टीशी|महत्त्व न यावे निरर्थक||." महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवीत, नाहीतर ती फेकून. पादुका, पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावीत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. इतकेच काय, त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती. क्वचितच ते चिलीम ओढीत. पण त्यांच्या फोटोत-मूर्तीत मात्र त्यांच्या हातात चिलीम दिलेली आढळते. या चिलिमीवरूनच ते ओळखले जातात. असत.[६]

भ्रमंती[संपादन]

आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे {शेगाव|शेगांवात]] व्यतीत केला असला तरी कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरशः धावावे लागे.[ संदर्भ हवा ]

महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मगिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराजमात्र हा पूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तेथे काही क्षण घालवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले, त्यांतलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात.[७]

समाधि[संपादन]

शेगाव येथील आनंद सागर उद्यान

जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला[ संदर्भ हवा ].

समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, "आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||"

लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती.

महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.[ संदर्भ हवा ]

त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, "जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरूपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||" आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली.

८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली. [६]

श्री गजानन महाराजांच्या पश्चात[संपादन]

संत गजानन महाराज समाधी सोहळा १९१०मध्ये झाला.[९]. १९६७पासून श्री गजानन महाराज पालखी माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले[१०] श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते.देहू, आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे. शेगावची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत विदर्भाचे, खानदेशाचे व मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात. दरवर्षी हे वारकरी परंपरेनुसार, नामस्मरण करत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. पालखी अश्व, गज, अंबारीसह निघते [११]

मंदिरे[संपादन]

महाराष्ट्रात सर्वत्र गजानन महाराजांची मंदिरे स्थापन झालेली आहेत. महाराष्ट्राबाहेरही अशी मंदिरे स्थापन झाली असून महाराजांचे उत्सव तेथे साजरे होतात.[१२]

पुणे येथील मंदिर
श्री गजानन महाराजांचे मंदिर, ओंकारेश्वर

श्री गजानन महाराज संस्थान मठ[संपादन]

महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला. त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. शेगावात नवीन मठ स्थापित झाला आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचा आणि संतत्त्वाचा महिमा सर्वदूर पसरला. भौतिक आणि आध्यात्मिक ग‍रजा पूर्ण क‍रून घेण्याकरिता लोक शेगावला अमाप गर्दी करू लागले. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे या स्टेशन वर अनेक रेल्वे गाड्या थांबतात स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त १५ मिनिटांचा रस्ता आहे. स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे १७२ बसेस येतात. त्या व्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बसेस चालतात.[ संदर्भ हवा ]

श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगाव गावाच्या मधोमध आहे.हे मंदिर काळ्या पाषाणाचे आहे. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. वरच्याबाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची स्थापल्या आहेत.[१३] मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री ९.३० पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकडआरती ते शयनआरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात. या मठाचे तसेच मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे असलेली स्वचछता, शांतता, शिस्त आणि कर्मचाऱ्यांची तसेच सेवेकऱ्यांची भक्तांशी उत्तम तसेच प्रेमळ वर्तणूक.. दर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली असून, दुपारच्या वेळी सर्व भक्तांना भोजन प्रसाद वाटतात. भोजनस्थळ देखील अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटके असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना जेवायला वाढतात.[१४] [१५]

पंढरपूर येथे प्रतिवर्षी शेगावहून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी जाते.[१६]

संदर्भ[संपादन]

 1. ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973.
 2. ^ Sāṭhe, Śarada Keśava (2001). Marāṭhī granthasūcī: 1951-1962. Rājya Marāṭhī Vikāsa Sãsthā.
 3. ^ Patukale, Pro Kshitij (2014-10-12). Shri Datt Parikrama. Kardaliwan Seva Sangh. ISBN 978-93-5196-148-2.
 4. ^ Patukale, Pro Kshitij (2014-10-12). Shri Datt Parikrama. Kardaliwan Seva Sangh. ISBN 978-93-5196-148-2.
 5. ^ "भाविकांच्या गर्दीने फुलली संतनगरी". महाराष्ट्र टाईम्स. २६. २. २०१९. १४. २. २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 6. ^ a b c जोशी, महादेवशास्त्री (२००० (पुनर्मुद्रण)). भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा. पुणे: भारतीय संस्कृती कोश मंडळ प्रकाशन. pp. ६९८. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 7. ^ a b "अवलिया-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-06 रोजी पाहिले.
 8. ^ "अवलिया-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-06 रोजी पाहिले.
 9. ^ http://beta.esakal.com/2009/03/16232106/vidarbha-nagpur-shevgaon-devel.html[मृत दुवा]
 10. ^ "loksatta.com". www.loksatta.com. Archived from the original on 2021-03-01. 2018-09-06 रोजी पाहिले.
 11. ^ "९ जूनला निघणार गजानन महाराज पालखी-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-06 रोजी पाहिले.
 12. ^ परदेशी, रणजीत कुमार (१५.२.२०२०). "https://www.patrika.com/burhanpur-news/gajanan-maharaj-s-prasad-will-be-prepared-for-15-thousand-devotees-on-5772804/". पत्रिका. १७.२.२०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |title= (सहाय्य)
 13. ^ Yangalwar, Pro Vijay (2013-09-18). Shree Kshetra Shegaon Darshan / Nachiket Prakashan: श्री क्षेत्र शेगाव दर्शन. Nachiket Prakashan.
 14. ^ Pinkney, Andrea Marion; Whalen-Bridge, John (2018-08-20). Religious Journeys in India: Pilgrims, Tourists, and Travelers (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 978-1-4384-6603-3.
 15. ^ संत कवी दासगणू महाराज, संत कवी दासगणू महाराज (08/04/2023). "श्री गजानन विजय ग्रंथ" (PDF). श्री गजानन विजय ग्रंथ. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 16. ^ "गजानन महाराजांची पालखी सोलापूर मुक्कामी". महाराष्ट्र टाईम्स. ६.७.२०१९. १५.२.२०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

नोंदी[संपादन]

श्री गजानन विजय या ग्रंथामधे त्यांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे.[१] हा ग्रंथ महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. त्याचे भक्तिभावाने पारायण केल्यास इच्छित मनोरथ पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे.

साहित्य संमेलन[ संदर्भ हवा ][संपादन]

संत गजानन महाराज साहित्य संघाच्यावतीने ’गजानन महाराज साहित्य संमेलन’ भरते.

 • रिसोड येथे असे तिसरे गजानन महाराज साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २००९ रोजी भरले होते. अध्यक्षस्थानी डॉ. बलभीमराज गोरे होते.
 • गजानन महाराज भक्त संमेलन नावाचेही एक संमेलन खर्डी (शहापूर-ठाणे जिल्हा) येथे ६ (की १०?) नोव्हेंबर २०१९ रोजी भरले होते.
 • गजानन महाराज भक्त संमेलन नावाने एक संमेलन वसमत (ता. वसमत, हिंगोली जिल्हा) येथे 26 व 27 नोव्हेंबर २०22 रोजी भरले.

गजाजन महाराजांवरील मराठी पुस्तके[संपादन]

 • Gajanan Jeevani (इंग्रजी, सावनी विभास)
 • श्री गजानन महाराज चित्रदर्शन, एकूण १२ भाग (ई-बुक, नचिकेत प्रकाशन)
 • संतकवी दासगणू महाराज आशिर्वादित श्री गजानन महाराज भक्तिविजय (मनोहर मिसार)
 • गजानन महाराजांच्या गोष्टीपासून काय बोध घ्याल? (वसंत गोगटे)
 • श्री गजानन विजय : कथासार आणि उपासना (चिंतामणी देशपांडे)
 • गणीं गण गणांत बोते (नचिकेत प्रकाशन)
 • गणीं गण गणांत बोते (ल.ह. पाठक, पद्मगंधा प्रकाशन)
 • परब्रम्ह आले घरा ! (जितेंद्र ठाकूर)
 • राणा शेगावीचा (जनार्दन ओक)
 • शेगावीचा योगीराणा (कादंबरी, लेखिका - लीला गोळे)
 • शेगावीचा राणा (विवेक दिगंबर वैद्य)


बाह्य दुवे[संपादन]

 1. ^ Chawla, Deepak (2015-03-02). Business as Usual (इंग्रजी भाषेत). The Write Place. ISBN 978-93-83952-22-9.