श्री अरविंद आश्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी या पानावरून पुनर्निर्देशित)
श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी
श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी
श्रीमाताजींचे प्रतीक
श्रीमाताजींचे प्रतीक

श्री अरविंद आश्रम किंवा श्री अरबिंदो आश्रम हे केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी स्थित एक आध्यात्मिक केंद्र आहे. योगी अरविंद घोष राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर इ.स. १९१० मध्ये पाँडिचेरी ऊर्फ पुदुच्चेरी येथे स्थायिक झाले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांच्या समूहातून या आश्रमाची स्थापना करण्यात आली. २४ नोव्हेंबर १९२६ रोजी, एका मोठ्या आध्यात्मिक अनुभूतीनंतर, अरविंद घोष यांनी आश्रमाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आध्यात्मिक सहकारी मीरा अल्फासा उर्फ श्री माताजींकडे सोपवली. म्हणून ही तारीख सामान्यतः आश्रमाचा स्थापना दिवस म्हणून ओळखली जाते.[१]

स्थापना[संपादन]

मीरा अल्फासा ऊर्फ श्रीमाताजी यांच्या मार्गदर्शनाखाली इ.स.१९२६ साली श्रीअरविंद आश्रमाची स्थापना झाली. आश्रमाच्या मुख्य इमारतीमध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे अनुक्रमे इ.स. १९५० आणि इ.स.१९७३ पर्यंत वास्तव्य होते.

स्थान[संपादन]

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर, पाँडिचेरी येथे हा आश्रम आहे. चेन्नईपासून १६० कि.मी.अंतरावर, बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर पाँडिचेरी वसलेले आहे. पाँडिचेरीच्या पूर्व भागात, ज्याला White town असे संबोधले जाते तेथे आश्रम आहे.

आश्रमातील जीवन[संपादन]

आश्रमाच्या केंद्रस्थानी श्रीअरविंद ऊर्फ अरविंद घोष आणि श्रीमाताजी यांचे समाधि-स्थान आहे. आज आश्रमामध्ये सुमारे १६०० साधक राहतात. येथील सामुदायिक जीवनात साधकांच्या साधनेबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य सुविधा ह्याचीही काळजी घेतली जाते. आश्रमाच्या विविध खात्यांमध्ये चालणाऱ्या व्यवहारातून आश्रम स्वयंपूर्ण रीतीने चालविला जातो. शेती, बागा, आरोग्यसेवा, विश्रामगृहे, आर्ट गॅलरी, कॉटेज इंडस्ट्री, भरतकाम, सुगंधालय, शारीरिक शिक्षण विभाग, संगणक विभाग, ग्रंथालय, छपाई कारखाना, प्रकाशन उद्योग इत्यादी सुमारे ८० खात्यांमधून आश्रमातील साधक कार्यरत असतात. त्यांच्या दृष्टीने हे कर्म म्हणजे साधनेचाच एक भाग असतो. तेथे नियमितपणे चालणाऱ्या शारीरिक शिक्षण उपक्रमामध्ये आश्रमवासी सहभागी होतात. यामध्ये क्रीडा, जलतरण, आसने, कवायती इ.चा समावेश असतो.

आश्रमाचे प्रशासन[संपादन]

श्रीमाताजींच्या मार्गदर्शनाने इ.स. १९५५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या 'श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट' या सार्वजनिक विश्वस्त संस्थेमार्फत याचे प्रशासन केले जाते.

आश्रमाची प्रकाशने[संपादन]

आश्रमातर्फे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींच्या तत्त्वज्ञान आणि योगाशी संबंधित अनेक नियतकालिके प्रकाशित केली जातात. त्यातील बहुतांशी प्रकाशने श्रीअरविंद आश्रम प्रेसमध्ये छापली जातात.

इंग्रजीतील महत्त्वाची नियतकालिके अशी -

आश्रमातील महत्त्वाचे दिवस - दर्शन दिन[संपादन]

नोव्हेंबर १९२६ च्या सिद्धी दिनानंतर श्रीअरविंद उच्चतर साधनेसाठी एकांतवासात गेले आणि त्यांनी आश्रमाची सर्व व्यवस्था श्रीमाताजी यांच्याकडे सोपविली. त्यानंतर वर्षातील काही ठरावीक दिवसच ते आश्रमवासियांना व साधकांना दर्शन देत असत. म्हणून या दिवसांना दर्शन दिन असे संबोधण्यात येते. आजही जगभरातून या दर्शन दिनी साधक आवर्जून येतात. हे दर्शन दिन आणि त्यांचे प्रयोजन पुढीलप्रमाणे [१]-

तारीख प्रयोजन
१५ ऑगस्ट १८७२ श्रीअरविंद यांचा जन्मदिन
२१ फेब्रुवारी १८७८ श्रीमाताजी यांचा जन्मदिन
२४ एप्रिल १९२० श्रीमाताजींचे पाँडिचेरी येथे कायमस्वरूपी आगमन
२४ नोव्हेंबर १९२६ सिद्धी दिन - अधिमानस चेतनेचे अवतरण
०२ डिसेंबर १९४३ नवीन शाळेचे उद्घाटन
०५ डिसेंबर १९५० श्रीअरविंद महासमाधी दिन
०९ डिसेंबर १९५० श्रीअरविंद यांचा देह समाधी-स्थित
२९ फेब्रुवारी १९५६ अतिमानस अवतरणाचा दिन
१७ नोव्हेंबर १९७३ श्रीमाताजी यांचा महासमाधी दिन
२० नोव्हेंबर १९७३ श्रीमाताजी यांचा देह समाधी-स्थित

बाह्य दुवे[संपादन]

श्रीअरविंद आश्रम - माहितीपट (मराठी)

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]

https://www.sriaurobindoashram.org/

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Sri Aurobindo Ashram" (इंग्रजी भाषेत).