Jump to content

श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन - पुणे विद्यापीठातर्फे (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) डिसेंबर १९८० मध्ये श्रीअरविंद स्मारक व्याख्यान-माला या अंतर्गत झालेली चौथी माला 'श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन' या नावाने ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात आली. तत्पूर्वी श्रीअरविंद यांच्या तत्त्वचिंतनावर आधारित एकही पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध नव्हते, त्यामुळे डॉ.ग.ना.जोशी लिखित या ग्रंथास वेगळे मोल आहे, असे विचार पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव श्री.सुभाषचंद्र भोसले यांनी मांडले होते.

श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन
लेखक डॉ.गजानन नारायण जोशी
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार व्याख्याने-संग्रह
प्रकाशन संस्था पुणे विद्यापीठ
प्रथमावृत्ती १९८२
विषय श्रीअरविंद आणि त्यांचे तत्त्वज्ञान
पृष्ठसंख्या २००

पुस्तकाची मांडणी

[संपादन]

श्रीअरविंद यांचा जीवन-परिचय (पृष्ठ संख्या - बारा)

श्रीअरविंद यांचे विश्व-चिंतन - या भाषणामध्ये श्री.जोशी यांनी श्रीअरविंद यांचे तत्त्वज्ञान पूर्णाद्वैत तत्त्वज्ञान कसे आहे याचे विवेचन केले आहे. आध्यत्मिक उत्क्रांती, श्रीअरविंद प्रणीत आरोहण आणि अवरोहण, अवतार, रूपांतरण या संकल्पना यांचे विवेचनही त्यांनी या भाषणात केले आहे. (पृष्ठ क्र. ०१ ते ५४)

श्रीअरविंद यांचे संस्कृति-चिंतन - या भाषणामध्ये श्री.जोशी यांनी संस्कृतीच्या समस्या, फिलीस्टीन मानव, मानवाचे खुजेपण, सुधारणेचे विविध उपाय, प्रज्ञेची समीक्षा, अहं, आध्यात्मिक रुपांतरण या मुद्द्यांचा उहापोह केला आहे. (पृष्ठ क्र. ५५ ते १०७)

श्रीअरविंद यांचा पूर्णयोग - या भाषणामध्ये श्री.जोशी यांनी योगाचे सार, पूर्णयोगाचे वैशिष्ट्य, तसेच हठयोग, राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, तंत्रयोग आणि पूर्णयोग यांच्यातील साम्यभेदाविषयी टिपण्णी केली आहे. श्रीअरविंद यांनी मनापासून ते अतिमानसापर्यंत जाणाऱ्या चेतनेच्या ज्या श्रेणी सांगितल्या आहेत, त्याचे वर्णन येथे करण्यात आले आहे. ते टप्पे अनुक्रमे असे आहेत - सामान्य मन, भौतिक मन, उच्च मन, प्रदीप्त मन, अंतर्ज्ञानात्मक मन, अधिमानस, अतिमानस. त्याचप्रमाणे मनाच्या चार अवस्था, म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीयावस्था यांचेही विवेचन येथे करण्यात आले आहे. दैवीकरण, अहंचे स्वरूप व कार्य, समर्पण, आश्रमजीवन, योगसाधना, आध्यात्मिक रूपांतरण या संकल्पनाही येथे सविस्तर स्पष्ट करण्यात आल्या आहेत. (पृष्ठ क्र. १०८ ते १८८)

परिशिष्ट - पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथ सूची, उल्लेख-सूची आणि निवडक पारिभाषिक शब्द देण्यात आले आहेत. त्यामुळे या पुस्तकाचे संदर्भ मूल्य अधिक वाढले आहे.

बाह्य दुवा

[संपादन]

हे पुस्तक येथे उपलब्ध