भोवडे
भोवडे हे गाव संगमेश्वर तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे.ते तालुक्याच्या आग्नेय दिशेला १६°५७'४४" उत्तर अक्षवृत्त ते ७३°४३'१६" पूर्व रेखावृत्ता दरम्यान विशाळगडाच्या पायथ्याशी व काजळी नदीच्या तीरावर वसलेलं आहे.भोवडे गावाचे क्षेत्रफळ सुमारे 909.43 हेक्टर आहे.
गावाच्या चतुःसीमा
[संपादन]भोवडे गावाच्या पूर्वेला किरबेट गाव व आंबा घाट, दक्षिणेला विशाळगड, नैर्ऋत्येस माचाळचे पठार, पश्चिमेला मुचकुंद ऋषींची प्रसिद्ध गुहा, गावच्या वायव्य दिशेला कोचरी, उत्तरेला भडकंबा व ईशान्य दिशेला मुर्शी या गावांची सीमा लाभली आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
गावाकडे जाण्याचा मार्ग
[संपादन]भोवडे गावाच्या तिन्ही बाजूला डोंगर असल्यामुळे गावात जायला एकच मार्ग आहे. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर साखरपा बाजारपेठ आहे. तिथून 'साखरपा-देवडे' हा जिल्हामार्ग आहे. या मार्गाचा वापर करून गावात जाता येते. साखरपा बसस्थानकापासून ४ कि.मी.अंतरावर व कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकापासून ४२ कि.मी.अंतरावर भोवडे गाव आहे.
इतिहास
[संपादन]भोवडे गावाला शिवकालीन इतिहास लाभला आहे.गावाच्या दक्षिण सीमेवर स्वराज्या मधील किल्ला खेळणागड (विशाळगड)आहे.भोवडे गाव विशालगडाच्या घेऱ्यात पायथ्याला वसलेला आहे. गडाचा चौकी पहारा भोवडे गावामध्ये होता. गावातून गडावर जाण्यासाठी देवडेमार्गे वाट होती.त्यावेळी गडावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची भोवडे गावामध्ये तपासणी होत असे.छत्रपती शिवाजी महाराज पावनखिंडीची लढाई झाल्यावर विशाळगडावर काही काळ वास्तव्य केल्यानंतर याच मार्गे राजगडावर गेले व छत्रपती संभाजी महाराज इ.स १६८९ मध्ये विशाळगडावरून रायगडाकडे जात असताना याच मार्गाचा वापर केला होता. नंतर संगमेश्वर येथे पकडले गेले होते. अशा महान व्यक्तींच्या पदस्पर्शाने हा गाव पावन झालेला आहे. त्याकाळी गावची ग्रामदेवता श्री उदगिरी देवीची पालखी चौकीवर जात असे.ती परंपरा आजही कायम आहे.सध्या त्याठिकाणी घनदाट जंगल वाढले आहे.तेथील वास्तू नामशेष झाली आहे. परंतु हा विशाळगडाचा चौकी पहारा गावाच्या इतिहासात भर टाकत आहे.
गावचे नाव कसे पडले ?
[संपादन]श्री बोरेश्वर मंदिर हे पंचक्रोशीतील प्रसिद्ध मंदिर आहे. फार वर्षांपूर्वी गावामधील एका शेतकऱ्याची गाय घरी दूध देत नव्हती. त्यामुळे तो शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.म्हणून त्याने त्या गाईवर पाळत ठेवली.एके दिवशी ती गाय देवमळ्यात बोरीच्या झाडाखाली असलेल्या भोंबाडावरती (वारूळ) पान्हा सोडत असताना दिसली.तेव्हा त्या शेतकऱ्याने रागाने हातात असलेली कुऱ्हाड त्या भोंबाडावरती मारली.त्यावेळी ती कुऱ्हाड भोंबाडा मध्ये असलेल्या शिवलिंगाला लागली व त्या शिवलिंगाचे कवच उडाले आणि त्यामधून रक्त येवू लागले.हे पाहून तो माणूस घाबरला व त्याने ही घटना तेथील गावकऱ्यांना सांगितली.तेव्हा त्यांनी देवाची क्षमा मागुन पूजाअर्चा केली. हे देवस्थान बोरीच्या झाडाखाली प्रकट झाले म्हणून त्या देवाला 'बोरेश्वर'हे नाव पडले व गावाला भोंबाड या शब्दाचा अपभ्रंश होऊन भोवडे हे नाव पडले.
मंदिर स्थापत्य
[संपादन]कोकणातील गावात आलं की,प्रामुख्याने जाणवते ती धार्मिकता.सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेला माणूस हा रांगडा असला तरी धार्मिकता हा त्याचा स्थायीभाव आहे. देव हे त्याच्या आयुष्यातील सर्वोच्च स्थान! म्हणूनच इथे पावलोपावली मंदिरे आढळतात.
भोवडे गावात ग्रामदेवतेंची तीन मंदिरे आहेत. येथील खास वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही मंदिरे एकमेकांपासून लांबच्या अंतरावर असून सुद्धा एकाच सरळ रेषेत आहेत.
श्री देव बोरेेेश्वर मंदिर -श्री बोरेश्वर मंदिर हे गावाच्या मध्यावर 'देवमळ्यात' नदीच्या काठावर आहे.याचे बांधकाम आधुनिक पद्धतीचे आहे. या मंदिरात श्री बोरेश्वरदेव प्रमुख देवता असून गांगेश्वरदेव, विठ्ठलाईदेवी व मानाईदेवी या देवाच्या परिवार देवता आहेत तसेच मंदिरात बोरेश्वरदेवाचे स्वयंभू शिवलिंग आहे.
श्री उदगिरी देेेवी मंदिर- उदगिरीदेवी मंदिर हे गावच्या दक्षिणेला वरचीवाडी मध्ये वसलेलं आहे.हे मंदिर कौलारू आहे.मंदिरात उदगिरीदेवी,बोरेश्वरदेव,विठ्ठलाईदेवी आणि कालंबादेवी या देवतांच्या स्वयंभू मूर्त्या आहेत.
श्री देेेव गांगेश्वर मंदिर- गांगेश्वर मंदिर हे 'गांगोबाच्या मळीत' मराठवाडी मध्ये वसलेलं आहे. मंदिराचे बांधकाम आधूनिक पद्धतीचे आहे. या मंदिरात गांगेश्वर,पार्वती,गणेश,कार्तिकेय या शिवपरिवाराच्या स्वयंभू मुर्त्या आहेत.
तसेच गावामध्ये गणपती, दत्तगुरू, श्रीराम,साईबाबा या देवतांची मंदिरे आहेत.
सण व उत्सव
[संपादन]भोवडे गावामध्ये परंपरेने सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. यामध्ये गुढीपाडवा, रामनवमी, वटपौर्णिमा, नागपंचमी, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा,दिवाळी,तुळशी विवाह,दत्त जयंती, बैलपोळा, मकर संक्रांत, होळी हे सण साजरे केले जातात.
याशिवाय गावच्या गावरहाटीमध्ये महाशिवरात्री, शिमगोत्सव, पालिक जत्रा, जागर,नवरात्रोत्सव,देवदिवाळी, कौलीजत्रा,आणि पालिक सोमवार ह्या ग्रामदेवतेच्या धार्मिक विधी गावचे गावकर व ग्रामस्थ करतात.
महाशिवरात्र- माघ महिन्याच्या चतुर्दशीला गावामध्ये मोठी यात्रा भरते.
होळी- फाल्गुन महिन्याच्या शु.पंचमी ते एकादशी फाग, द्वादशीला जांगलं होळी,त्रयोदशीला आंबेहोळी व पौर्णिमेला होम अशारितीने होळी साजरी केली जाते.
शिमगा- फाल्गुन पौर्णिमेला गावदेवांना रूपे लावून पालखी घरोघरी भक्तांच्या भेटीला जाते.
पालीक जत्रा-आषाढ महिन्याच्या कोणत्याही शुक्रवारी गावदेवीला राखण दिली जाते.
जागर- श्रावण शुद्ध त्रयोदशीला देवांच्या गळ्यात पोवते(रक्षासूत्र) घातले जाते.
देेेवदिवाळी- देवदिवाळीला देवाचा कळस चढवला जातो.तांदळाच्या पिठाचे दिवे केले जातात.आणि "इडा पिडा दूर टळो, बळीचं राज्य चांगभलं"अशी देवाला विनवणी केली जाते.
कौली जत्रा- पौष पौर्णिमेच्या अगोदरच्या शुक्रवारी गावदेवीला शेती सुरुवात करण्याचा कौल घेतला जातो.देवीला राखण दिली जाते.नंतरच कवळ तोडण्यास सुरुवात होते.
पालिक सोमवार- दर मराठी महिन्याचा पहिला सोमवार हा देवाच्या नावाने पाळला जातो.या दिवशी कोणीही शेतीची कामे करत नाहीत.
लोकजीवन
[संपादन]भोवडे गावचा बहुतांश भाग डोंगरदऱ्यात आहे.पूर्ण सपाटीचा भाग येथे आढळत नाही.त्यामुळे गावातील लोकवस्त्या दऱ्या-खोऱ्यात,टेकड्या-टेकड्यांवर विसावली आहे.गावात लहान-मोठ्या नऊ वाड्या आहेत.गावात एक हजाराच्या आसपास लोकसंख्या आढळते.यामध्ये पुरुषवर्ग नोकरीधंद्या निमित्त मुंबईला स्थलांतरित झाल्यामुळे येथे स्रियांचे प्रमाण जास्त आहे.गावात विविध जातिधर्माचे लोक यामध्ये कुणबी,मराठा,गवळी,चर्मकार व बौद्ध गुण्यागोविंदाने राहतात.
घरे-गावात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथे उतरत्या छपराची, जांभ्या दगडाची कौलारू घरे आढळतात.
व्यवसाय- येथील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून पशुपालन व कुक्कुटपालन हे जोडधंदे केले जातात.
पिकेे- शेतीमध्ये भात हे मुख्य पीक असून नाचणी,वरी,तीळ ही जोडपीके घेतली जातात.त्याचबरोबर पालेभाज्यांची लागवड केली जाते.
आहार- तांदूळ हे प्रमुख पीक असल्यामुळे येथील लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात व तांदळाची भाकरी आढळते.त्याचबरोबर डाळ, भाजी, व मांसाहारी जेवण इत्यादी आहार घेतला जातो.
पोशाख- गावामध्ये पुरुष व मुले शर्ट व पॅन्ट, स्रिया साडी-चोळी व मुली पंजाबी ड्रेस हा पोशाख वापरतात.
भाषा- येथील लोक कोकणी-संगमेश्वरी बोलीभाषा बोलतात.
वाड्यावस्त्या- वरचीवाडी,बाईंगवाडी,महादेववाडी,बकारवाडी,अडबलवाडी, लोंढेवाडी, आंबेवाडी, बौद्धवाडी, मराठवाडी, रवंदेवाडी, या वाड्या आहेत.
सांस्कृतिक जीवन- गावामध्ये नमन, जाखडी,भजन,फुगडी व पालखी नृत्य इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम केले जातात.श्री उदगिरी देवी नमन मंडळ,भोवडे वरचीवाडी हे प्रसिद्ध नमन मंडळ आहे. तसेच गावात जाखडी मंडळे ही आहेत.
हवामान- येथील तापमान उष्ण व दमट आहे. येथे फेब्रुवारी ते मे उन्हाळा,जून ते सप्टेंबर पावसाळा आणि ऑक्टोबर ते जानेवारी हिवाळा हे ऋतु असतात.
गावचे प्रशासन
[संपादन]गाव रहाटी- भोवडे गावरहाटीचा कारभार परंपरेने बाईंग घराणे ग्रामस्थांच्या मदतीने चालविते. बाईंग घराणे भोवडे गावचे गावकर(गावप्रमुख) आहे.ते गावच्या देवस्थानांचे व्यवस्थापन करणे,गावातील सार्वजनिक कार्यक्रमांचे नेतृत्व करणे, ग्रामदेवतेचा धार्मिक विधी करणे, खाजगी कार्यक्रम (विवाह,मंगल कार्ये,अंतिम कार्ये इत्यादी)व्यवस्थित पार पाडणे, गावातील छोटा-मोठा भांडणतंटा पंचांच्या साहाय्याने गावपातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करणे, पंचक्रोशीमध्ये गावाचे प्रतिनिधित्व करणे.ही कामे करतात.
ग्रामपंचायत- भोवडे व किरबेट या दोन गावांची मिळून ग्रुपग्रामपंचायत आहे.ग्रामपंचायत कार्यालय किरबेट गावामध्ये आहे.सरपंचांसह नऊ सदस्य व ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा कारभार बघतात.
तलाठी कार्यालय- भोवडे व भडकंबा गावचे मिळून एक तलाठी कार्यालय आहे. तलाठी सजा हे कार्यालयाचे काम पाहतात.
टपाल कार्यालय - गावचे टपाल कार्यालय किरबेट गावात आहे.
पोलीस ठाणे- भोवडे गाव हा साखरपा पोलीस दूरक्षेत्राअंतर्गत येतो. पोलीस पाटील गावपातळीवर काम पाहतात.
पंचायत समिती- भोवडे गाव हा संगमेश्वर पंचायत समितीच्या कोंडगाव गटाअंतर्गत येतो.पंचायत समिती कार्यालय देवरुख या शहरात आहे.
जिल्हा परिषद - हा गाव रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या दाभोळे गटाअंतर्गत येतो.
विधानसभा - भोवडे गाव 'राजापूर लांजा साखरपा' विधानसभा मतदारसंघात येतो.
लोकसभा- हा गाव रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात येतो.
नैसर्गिक संपत्ती
[संपादन]भोवडे गाव हा सह्याद्रीच्या कडेकपारीत डोंगराळ भागात वसलेला आहे.गावाचा बहुतांश भाग वनांने व्यापला आहे.त्यामुळे हा गाव दुर्मिळ औषधी वनस्पती, पाने, फळा-फुलांनी समृद्ध आहे. गावच्या पश्चिम डोंगरावरती मुचकुंदी नदीचा उगम झाला आहे.त्यामुळे भूपृष्ठाखालील पाण्याची पातळी जमिनीलगत आहे.म्हणून गावात पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. गावात पाण्याचा दुष्काळ कधीही पडला नाही.
गावात खालील प्रकारच्या वनसंपत्ती आढळतात.
मोठे वृक्ष-आंबा,फणस,वड,पिंपळ,सागवान,शिसव,कळंब,साधनेर, जांबा,सातीवन,भेला,ऐन,किंजल,चीर,पायर,आमन,हरड, करंबेला, म्होवट,कुंबया इत्यादी.
बेटे(झुडुपे)- असोल, धावसड, निगड, कुडा, चितरंगा, बांबू, वाकेरी, बगोली, इत्यादी.
औषधी वनस्पती- सापधनी, वाकेरी, ओवी, घनसरी, मुरुडशेंग, देवनल, हळद, तांबडा, काजरा, निवडुंग, पांगला, अडुळसा, इत्यादी.
रानमेवा- आंबा, फणस, करवंद, काजू, जांभूळ, आटके, तोरणे, उंबर, कण्हेरी, चिकण्या, इत्यादी.
रानभाज्या- टाकळा, कवला, कुर्डू, भारंग, थरंबरे, फोडशी, काटले, कुडा, अळू, इत्यादी.
कंदमुळे- कनग, टका, रताळे, घोरकंद, लोकरी, भिरंबोले, सुरण, इत्यादी.
जंगली प्राणी- वाघ, बिबट्या, भेकरे, रानडुक्कर, हरीण, कोल्हा, गवारेडा, सांबर, साळिंदर, पिसोरी, माकड, ससा, घोरपड, खवल्यामांजर, इत्यादी.
पक्षी- मोर, पोपट, कबुतर, कवडा, लाव्हा, [[धनेश], सुतारपक्षी, घार, रानकोंबडी, सुगरण, किकेर्डी, चिमणी, इत्यादी.
या गावाच्या जंगलात ज्यांची नावे सुद्धा माहीत नाही अशा हजारो दुर्मिळ वनस्पती व प्राणी आहेत.
संदर्भ व बाह्यदुवे
[संपादन]भोवडे ग्रामस्थ, गावकर मंडळी आणि 'भोवडे वरचीवाडी ग्रामस्थ मंडळ'