उंबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

उंबर किंवा औदुंबर (शास्त्रीय नाव: Ficus racemosa, फायकस रेसिमोझा ; कुळ: मोरेसी; ) हा मुख्यतः भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणार्‍या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात.[१] ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात.

वापर[संपादन]

सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो.

उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. या झाडापाशी दत्ताचे स्थान असते असे हिंदुधर्मीय समजतात आणि त्या वृक्षाला पवित्र मानतात.

याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी पूर्वी वापर होत असे.[२]त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होत होता.

हा शीतगुणांचा असून त्यायोगे दाहाचे शमन होते.[२]

आख्यायिका[संपादन]

विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपू चा वध उंबऱ्यावर बसून केला.त्याचेशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या.नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले.लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांमुळे होणारा दाह थांबला.[२]

आराध्यवृक्ष[संपादन]

हा कृत्तिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. "उंबर". मराठी कुमार विश्वकोश. (मराठी मजकूर)
  2. २.० २.१ २.२ साने, (डॉ.) हेमा. लोकमत,नागपूर -ई-पेपर,दि.१३/०१/२०१४, पान क्र.११, लेखमथळा: विषशामक. लोकमत प्रकाशन. (मराठी मजकूर)

बाह्य दुवे[संपादन]