Jump to content

दलित वाङ्मय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दलित साहित्य या पानावरून पुनर्निर्देशित)

दलित वाङ्मयाची वाटचाल

[संपादन]

दलित वाङ्मयाचा उदय १९६० नंतर झाला. चीड आणि बंड ही चळवळीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये होती; तर वेदना विद्रोह आणि नकार ही या साहित्यातील महत्त्वाची तत्त्वे होती.[] स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा, न्याय आणि लोकशाही ही मूल्दोये दलित साहित्याचा मूलाधार आहेत.[ संदर्भ हवा ]

हिंदु समाज व्यवस्थेमध्ये जातीची उतरंड आहे. त्अयामुळे उच्माच जात व कनिष्नुठ जात अशी विषमता असून 'दलितत्त्व' हे या विषमतेचे अपत्य आहे. दलितांवर या विषमतावादी समाजव्यवस्थेने पिढ्यांपिढ्या अन्याय केला. त्याला विरोध करण्यासाठी साहित्यकलेला दलितांनी त्यांच्याविरुद्ध लढण्याचे एक हत्यार बनविले आहे. त्यामुळे दलित लेखकांची जबाबदारी या विषमतेविरुद्लेध लेखन करून लढा देणे ही आहे, असे हा साहित्यप्रवाह मानतो. ही जबाबदारी स्पष्ट करताना अण्णा भाऊ साठे , "आम्ही दलित साहित्यिकांनी दलितांना वास्तव जगण्याच्या सर्व जुलुमातून मुक्त करणारे साहित्य निर्माण केले पाहिजे' असे यांनी सांगितले आहे.[ संदर्भ हवा ]

शत्रूंवर मात करण्यासाठी आयुधापेक्षा विचार हे फार मोठे शस्त्र आहे. ही इतिहासाची साक्ष असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील रक्तपातविरहित समाज परिवर्तनासाठी शब्दशस्त्रांचाच वापर करून, आपल्या तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्यावर भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणले. अण्णा भाऊ साठे यांनी त्याच शब्दसामर्थ्याची जाणीव ठेवून समाजप्रबोधनासाठी लेखनमाध्यम उपयुक्त असल्याचे दलित साहित्यिकांना सांगितले. त्याचप्रमाणे स्वतःही लेखन केले. दलितकथा लिहून त्यांनी मोलाचे काम केले आहे.

दलित लेखनाचे प्रकार

[संपादन]

आत्मकथन

[संपादन]

मराठीमध्ये दलित आत्मकथने हा प्रकार इ.स.१९६० नंतरच्या काळात मराठीत विशेष लोकप्रिय झालेला असून दलित साहित्यालाच नव्हे तर मराठी साहित्याला समृद्ध केलेले आहे. आत्मकथनांमुळे मराठी साहित्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहे. बलुतं- दया पवार, आठवणींचे पक्षी- प्र.ई. सोनकांबळे, उपरा- लक्ष्मण माने, मुक्काम पोष्ट देवाचे गोठणे- माधव कोंडविलकर, जिणं आमुचं- बेबी कांबळे, मला उद्ध्वस्त व्हायचंय- मल्लिका अमरशेख, माझ्या जल्माची चित्तरकथा-शांताबाई कांबळे, उचल्या- लक्ष्मण गायकवाड, कोल्हाट्याचं पोर- किशोर शांताबाई काळे, अक्करमाशी- शरणकुमार लिंबाळे, बेरड- भिमराव गस्ती, काट्यावरची पोटं- उत्तम बंडू तुपे, आमचा बाप आन आम्ही- नरेंद्र जाधव, अंतःस्फोट- कुमुद पावडे, तराळ अंतराळ - शंकरराव खरात, ढोर - भगवान इंगळे, संगराच्या पायवाटा - मारोतराव गोविंदराव भवरे ही मराठीतील काही गाजलेली दलित आत्मकथने आहेत.

नाटके

[संपादन]

ही नाटके अशी आहेत; वाटा पळवाटा (दत्ता भगत), अमली (ऋषिकेश सुलभ), अश्मक (दत्ता भगत), आगट (अशोक बुरबुरे), आग्या वेताळ (जॉनी मेश्राम), उचक्का (लक्ष्मण गायकवाड), कथा खैरलांजी (प्रा. अनिलकुमार साळवे), कॅम्पस (वामन तावड़े), काॅम्रेड जोशी (अमर रामटेके), कालचक्र (हेमचंद्रजा), काळोखाच्या गर्भात (भि.शि. शिंदे), कैफियत (रुस्तुम अचलखांब), कोर्ट मार्शल (स्वदेश दीपक), खेळीया, गांडू बगिचा (नामदेव ढसाळ यांच्या कवितासंग्रहावर आधारित एकांकिका), गावकी (आत्मचरित्र, रुस्तुम अचलखांब), चक्रांत, जय जय रघुवीर समर्थ, जाता नाही जात (सिद्धार्थ तांबे), झाडाझडती (शिल्पा मुंब्रिसकर), झुंबर विदूषक (प्रभाकर दुपारे), बाबा भांड लिखित ‘तंट्या’ कादंबरीवर आधारित ‘तंट्या’ तनमाजोरी, तृष्णापार (फ.मु. शिंदे), थांबा रामराज्य येत आहे (प्रकाश त्रिभुवन), देवनवरी, किरवंत (प्रेमानंद गज्वी), धादान्त खैरलांजी (प्रज्ञा पवार), पांढरा बुधवार, पुन्हा एकदा नव्याने (भगवान हिरे), पैदागीर, पोतराज, बळी अडगुळ (गुणशेखरन), भाई तुम्ही कुठे आहांत? (डॉ. ऋषिकेश कांबळे), महाभोज (मन्नू भंडारी), युगयात्रा (म.भि. चिटणीस), रापी (संजय जीवने), (डॉ. अरुण मिरजकर ) निब्बान, पिलर, ब्लॅक नाईटस ..... अंडरग्राऊंड व्हाया भीमनगर मोहल्ला (राजकुमार तांगडे), सुनो शेफाली (कुसुमकुमार), सुंबरान (रामदास कांबळे), स्त्री (कमल अडिकणे, १९८०), स्मारक (कुमार देशमुख), आदि. [ संदर्भ हवा ]

  • सन १९८२मध्ये पहिला दलित नाट्यमहोत्सव.

दलित रंगभूमीचा उदय

[संपादन]
  • सन १९५५मध्ये मिलिंद महाविद्यालयात स्नेहसमेलनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी तिथे विद्यार्थी व प्राध्यापकांनी सादर केलेली नाटके पाहिली. सर्वसाधारण विषयावर नाटके लिहिण्यापेक्षा 'दलित जीवनावर नाटके लिहा' असे त्यांनी सांगितले आणि तिथेच दलित रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य म.भि. चिटणीस यांनी 'युगयात्रा' (१९५६) लिहून आंबेडकरांच्या समाजप्रबोधन हाकेला प्रतिसाद दिला. १९५६ मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांच्यासमोर या नाटकाचा प्रयोग झाला. त्यानंतर काही वर्षात दलित व अन्या लेखकांनी अनेक दलित नाटके, एकांकिका लिहिल्या.[ संदर्भ हवा ]
  • 'दलित' ह्या शब्दाचाच अर्थ मुळी पीडलेले, नाडलेले, तुडवलेले, शोषित, वंचित, उपेक्षित, असा आहे. अशा समूहाचा दडपलेला आवाज ज्या नाटकामध्ये, ज्या जाणिवेने प्रगट होतो, ते दलित नाटक होय.[ संदर्भ हवा ]

दलित नाटकांची वैशिष्ट्ये

[संपादन]
  • मराठी नाटय परंपरेच्या इतिहासात दलित नाटकांचे वेगळे अस्तित्त्व आहे हे मान्य करायला हवे. आजपर्यंत लिहण्यात आलेली दलित नाटके ही सामाजिक परिवर्तनाची आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्रबिंदू आहेत. म्हणजेच सामाजिकतेला व परिवर्तनाला सामोरे जाणारे विचारप्रवाह दलित नाटकाला मंजूर आहेत.
  • या देशातील समाजव्यवस्थेला एक जबरदस्त हादरा देणारे धारदार हत्यार म्हणून दलित नाटकाचे एक वेगळे अस्तित्त्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नाट्य परंपरेतील नाटकीपणा दलित नाटकाला मान्य नाही.
  • प्रस्थापित वर्गाकडून दलितांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे कार्य दलित नाटकाने केले आहे.
  • आपल्या वेदना दलित नाटककारांनी नाटक व एकांकिकातून मांडल्या.
  • इतर दलित साहित्यप्रकाराप्रमाणे वेेदना, विद्रोह, नकार ही दलित नाटकाची वैशिष्ट्ये आहेत.
  • दलित नाटक सामाजिक दुःखातून जन्माला येते. दलित नाटकातून येणारा इतिहास हा केवळ एक इतिहास म्हणून येत नाही तर मानवी संस्कृतीची साक्ष म्हणून येतो. दलित नाटक हे इतिहासाचे गोडवे गात नाही, तर इतिहासाचे विश्लेषण करून भविष्याचा वेध घेते.
  • मानवतेविषयी, माणुसकीविषयी दलित नाटक आग्रही आहे.
  • दलित नाटक हे वैचारिक बांधिलकी मानणारे, अखिल मानव कल्याणासाठी सिद्ध झालेले व ह्या जगात जे सर्वोत्तम असे मूल्य 'माणूस' त्याच्या रक्षणासाठी सिद्ध झालेले आहे.

दलित नाटकांचे स्वरूप आणि वाटचाल

[संपादन]
 मानवी मन निर्भय करणारे, रोखठोकपणाची भाषा बोलणारे, प्रस्थापितांविरूद्ध उघडपणे संघर्ष करणारे हे दलित नाटक, मनोरंजनापेक्षा  प्रबोधनाचीच कास पत्करते. विद्रोही जाणिवांचा पेटता आविष्कार म्हणजे दलित नाटक. वेदनाचा हुंकार म्हणजे दलित नाटक. काही नव्या विरोधी आणि विद्रोही जाणिवा पोटात घेऊन दलित रंगभूमीने आपल्या प्रवासाला सुरुवात केली. ज्या अनुभवांना, जीवनाला, दलित नाटककारांनी आकार दिला, ते अनुभव विदारक रीतीने आपल्या उघड्या नागड्या स्वरूपात समोर आले. त्यामुळेच दलित विषयावरील ही नाटके लक्षवेधी ठरतात, महत्त्वाची ठरतात. तर कधी कधी प्रस्थापितांच्या जाणिवेला, चमत्कारिक, ओंगळ, प्रक्षोभक व अस्वस्थ अशा स्वरूपाची वाटतात.(उदा.'तनमाजोरी' व  'देवनवरी' ह्या नाटकांचा शेवट इ. तेव्हा ह्या दलित नाटकांत नाटककारांनी आपले विशिष्ट अनुभव मांडले आहेत, त्यांचे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे. गेल्या दोन दशकांपूर्वी  (केव्हापासून मोजायची?) मराठीत दलित विषयावरील व दलित जाणिवांविषयीच्या नाटकांना बहर आला. दलित लेखकांनी दलित नाटक व रंगभूमी दलित चळवळीचे एक साधन बनविले आहे. ह्या वर्गाच्या वाट्याला आलेले दैन्य व  अप्रतिष्ठा ही माणसाला किती खालच्या पातळीवर नेते याचे विषण्ण करणारे दर्शन या नाटकांत घडते. (उदा. 'तनमाजोरी'तील वेठबिगारी, 'खेळीया'तील नारायणचा खून इ.). तरीदेखील दलित समाजाला हळूहळू प्रबोधनाची चाहूल लागल्याने ह्या दलित रंगभूमीच्या माध्यमातून दलितांच्या जीवनातच नव्हे तर सबंध समाजात होत असलेल्या परिवर्तनाचीही कल्पना येऊ शकते.(उदा.' युगयात्रा ' व 'कैफियत' नाटक).
 दलित नाटक  हे केवळ आंबेडकरी  विचारांच्या प्रचारासाठीच जन्मले नसून  त्या विचारांच्या  साक्षात्कारासाठी जन्मले आहे. दलित रंगभूमी आणि चळवळीतील हा जिवंतपणा आंबेडकरी विचारांच्या चळवळीमुळे आणि चळवळीतून जन्माला आला आहे. ह्या लढ्याने सांस्कृतिक क्रांतीला जन्म दिला. तेव्हा ह्या दलित नाटकाचा निर्मितीची मूळ प्रेरणा, म्हणजे 'आत्मशोध ' होय. स्वत्वाचा शोधाविषयीचे प्रश्न दलितांच्या जीवनात निर्माण झाले. जगण्याच्या दणकट जिद्दीमुळे सोसाव्या लागणाऱ्या यातनांमधून जन्मलेले हे प्रश्न आहेत. म्हणून दलित रंगभूमीवरील चळवळीच्या .नाटकांमध्ये अनुभवाचा जिवंतपणा आहे. ह्या दलित नाटकांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आढळून येणारा सामाजिक संदर्भ होय. " आंबेडकरी विचार आत्मसात केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या जीवनविषयक दृष्टिकोनाच्या आधारे स्वतःला आणि स्वतः भोवतीच्या वास्तवाला जाणून घेण्याच्या उत्कट इच्छाशक्तीचा शब्दरूप आविष्कार म्हणजे दलित नाटक " असे प्रा.दत्ता भगत यांनी एके ठिकाणी म्हणले आहे . आंबेडकरी तत्त्वज्ञानाची शक्ती घेऊन कोणत्याही संघर्षात सिद्ध झालेली आंबेडकरी चळवळ ही दलित नाट्य चळवळीची प्रेरक शक्ती आहे.  दलित शोषितांची अस्मिता जागृत केली.म्हणून आंबेडकरी चळवळीशी दलित रंगभूमीचे जे नाते आहे ते विसारस येत नाही असे डॉ. भालचंद्र फडके यांचे मत आहे ते योग्यच म्हणले पाहिजे. [ संदर्भ हवा ]
 मराठी नाटकांच्या इतिहासातील हा दलित नाटकांचा प्रवाह अविभाज्य भाग आहे . हा दलित नाट्यचळवळीचा नवोन्मेष प्रवाह म्हणजे नावीन्याचा, नवसमाज जाणिवांचा एक नवा आकृतीबंध आहे असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. मानवी जीवनविषयक मूल्य, परिवर्तनशील समतेचा प्रवाह बलदंड करणारी अशी ही दलित नाटके आहेत. उदा० .न्याय, मन्वंतर इत्यादी. तसेच मध्यमवर्गीय जाणिवांवर आघात. उदा. आम्ही देशाचे मारेकरी. याबरोबरच  अंधश्रद्धाविरोधी जागृती.  "थांबा रामराज्य येतंय", "पोतराज ",  "देवनवरी" इत्यादी. परिवर्तनाचा विचार देणाऱ्या नाट्यकृती 'भिक्षुणी वासवदत्ता', 'न्याय ', मुख्य म्हणजे बौद्ध धम्मातील सद्धम्माचा विचारही काही दलित नाट्यकृतींत आढळतो. विषम समाजरचनेचा व अर्थव्यवस्थेचा धिक्कार, आदर्श मानवी जीवनाचा स्वीकार ही दलित नाटकाची प्रयोजने आहेत . तेव्हा दलित नाटक ही सामाजिक व सांस्कृतिक चळवळ आहे. निव्वळ मनोरंजन हा उद्देश तिच्या पाठीमागे नाही. येथील रुढी परंपरेने, जाती धर्माने एका विशिष्ट समाजाचे, माणुसकीचे अधिकार नाकारणे, त्याविरुद्ध विद्रोह करण्याची दलित रंगभूमीची भूमिका आहे. शिवाय दलित रंगभूमीने ही प्रस्थापित परंपराही नाकारली आहे. 
 दलित नाटकाचा सांधा वर्तमानाशी आहे. कारण दलित नाटक हे दलितांच्या वर्तमान चळवळीतून जन्माला येत आहे. चळवळ जन्मदात्री असल्यामुळे येथे हाडाचा जिवंतपणा आहे. तसा हा जिवंतपणा येथील मातीतून उगवला आहे. त्यामुळे ह्या नाटकात तंत्राचीही मोडतोड केलेली आढळते .उदा. ('थांबा ! रामराज्य येतंय') दलित नाटकात मूळ संकेतांचे भंजन केलेले आढळते. दुःख टोकदार करण्यातून कधी वक्तृत्वाचा, तर कधी आवेशाचा आधार घेतलेला आढळतो. (उदा० 'काळोखाच्या गर्भा'तील सूत्रधाराचा सुरुवातीचा व शेवटचा भाग) दुःखाची उत्कटता व्यक्त करण्यासाठी दलित नाटक कधी कवितेकडे सरकते. उदा.  'साक्षीपूरम',  'न्याय', 'युगयात्रा', ' कैफियत' मधील काव्यपंक्ती इत्यादी. अशा तऱ्हेने दलित रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाट्यकृतींना एक दिशा आहे . स्वतःची गती आहे, एक इतिहास आहे. स्वतःचे असे एक तत्त्वज्ञान आहे  भारतीय समाज हा विषमतेवर आधारित असल्यामुळे माणूस माणसापासून अलग झाला, वेगळा झाला. आता तसे न होता समान मानवी मूल्यांची समाजमंदिरात प्रतिष्ठापना करण्याचे ध्येय बाळगणारे दलित नाटक आज आपल्यासमोर उभे आहे.
 दलित नाटकांचे विषय दलितांवरील अत्याचार, त्यांची उपेक्षा,  त्यांच्या जीवनातील दुःखे आणि सर्व प्रकारच्या  अन्यायाविरुद्ध बंड असे असावेत हे स्पष्टच आहे. परंतु दलित नाटके म्हणजे केवळ एवढेच नव्हे; ह्या सर्व दलित नाटकांतून धर्मशास्त्रांतून निर्माण झालेली अंधश्रद्धा, दैववाद, जातीयवाद यांवर कठोर आणि मर्मग्राही आघात आहे. शिवाय या दलित नाटकांत विद्रोह व बंडखोरीचे लक्षण असून दुःख आणि आक्रोशही त्यांच्या जोडीला जाणवतो . परंतु ही नाटके निराश आणि वैफल्यग्रस्त नाहीत.  हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ह्या दलित रंगभूमीवरील नाटकांचे आणखीही वैशिष्ट्य सांगताना, ते केवळ दलितांच्या दुःखांपुरते मर्यादित नाही. तर मजुरांची होणारी पिळवणूक  'तनमाजोरी' आणि साऱ्या जगभराच्या मानवी अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभे राहण्याची क्षमता व निर्धार ह्या नाटकाच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होतो.  ह्या दलित रंगभूमीवरील नाटकात अस्पृश्यांच्या वाट्याला आलेले हिणकस जीवन, दारिद्ऱ्य  उपासमार, पोटासाठी चाललेली धडपड , अस्पृश्यतेमुळे समाजजीवनात होणारी उपेक्षा, दलितांवर  सवर्णाकडून होणारे अत्याचार, अंधश्रद्धा , गैरसमजुती यांचे प्रामुख्याने चित्रण आलेले आहे . तसेच दलितेतर समाजाबद्दल आणि त्यांच्या सर्वकष परंपरेबद्दल दलितांना आलेली चीडही समजून येते.[ संदर्भ हवा ]
   दलित रंगभूमी आणि चळवळीचे नाटककार सामाजिक बांधिलकी मानणारे आहे. ह्या बांधिलकीमुळेच समाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतेची व अन्यायाची चित्रे चळवळीच्या नाटकातून रेखाटण्यास उद्युक्त झालेले दिसतात. ह्या जाणिवेने निर्माण होणारे ताणतणाव त्यांनी धिटाईने व बारकाईने चित्रित केलेले आहेत. आजच्या दलित रंगभूमीवरील नाटकांचे स्वरूप प्राधान्याने प्रतिक्रियात्मक, निषेधात्मक , नकारप्रचुर असे आहे . त्यात बंडखोरी , संतप्तता, आक्रमकता,  त्वेषपूर्णता, झालेल्या अन्यायाचा दंश, सरळ सरळ आणि उघड स्वरूपात बहुतांशी प्रगट असल्याचे दिसून येते. जळजळीत वेदना भोगणारा दलित माणूस ह्या दलित नाटकांत प्रथमच भेटतो. देव, दैव अंधश्रद्धा, कर्मकांड, पुराणमतवाद किंवा पारंपरिक संकल्पना नाकारणे, तसेच बद्ध विचारातून आलेला अनिश्वरवाद, अनात्मवाद, तर्कवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, नीतिवाद स्वीकारणे हेच दलित जाणिवेचे नाटक होय! सामाजिक क्रांतीचे एक साधन म्हणून दलित नाट्य चळवळीचा विचार होत असला तरी ह्या विषयाच्या अनुषंगाने कलात्मकतेचा ही विचार होणे आवश्यक आहे. दलित रंगभूमीवरील नाटके ही प्रचारी असल्यास हरकत नाही; पण प्रचारालाही कलात्मकतेचे भान असणे आवश्यक आहे. आक्रस्ताळी लेखनातून काहीच साध्य होत नाही हे लक्षात घेऊन दलितांना सोसाव्या लागणाऱ्या दुःखांचे, व्यथांचे दर्शन या नाटककारांनी जरुर दाखवावे, पण त्याचे प्रदर्शन करण्याची वृत्ती असू नये,  हे महत्त्वाचे आहे. ह्या सगळ्या दलित नाटकात आता एक प्रकारचा एकसुरीपणा जाणवू लागला आहे. त्याच एक  आवर्त निर्माण झाले आहे. त्या दलित नाटकाच्या मुळाशी जी बंडखोर वृत्ती आहे, त्याचा परिपोष करण्याऐवजी आपले नाटक हे एका मोठ्या व्यापक चळवळीचे शक्तिस्थान आहे, याचे ह्या दलित नाटककारांनी अजिबात भान विसरता कामा नये. 
   या सर्वच दलित नाटकांमध्ये नाट्यप्रयोगाचे सर्व गुण ओतप्रोत भरलेले आहेत. त्यातील आशय व्यापक आणि सखोल आहे . अभिव्यक्ती चैतन्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण आहे आणि तांत्रिकदृष्ट्याही ते अधिक सफाईदार आहे. मात्र ह्या सर्व नाटकांमध्ये अनुभवाची खोली वाढणे आणि मानवी समाजातील गुंतागुंतीचे योग्य दर्शन घडविणे आवश्यक आहे. दलितांना येणारे विदारक अनुभव एका नाट्यात खच्चून भरण्यापेक्षा एका एका अन्यायाच्या, उपेक्षेच्या घटना, घडामोडी याभोवती कथासूत्र गुंफून त्यातून मानवी मनाच्या स्वभावाच्या क्रिया- प्रतिक्रिया, आघात- प्रत्याघात यांचे कौशल्यपूर्ण- कलापूर्ण चित्रण प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न होणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
   दलित रंगभूमीवरील नाटके प्रचारी, एकसुरी, बेेेढब आहेेेत. ती फारच 'लाऊडी' (भडक) आहेत अशी टीका वारंवार केली जाते. याला उत्तरही असे देण्यात येते की, दलित नाटक व सामाजिक समस्या, दलित जीवन हे वेगळे असू शकत नाही; ते अविभाज्य घटक आहेत. चांगली कलाकृती हे नेहमीच जीवनमूल्यांचा प्रचार करीत असते, म्हणून कलावंत व प्रचारक यांच्यातील अविभाज्य रेषा पुसून टाकता येत नाही. सामाजिक समस्याप्रधान नाटकातून एखाद्या तत्त्वाची व मूल्यांची मांडणी होत असेल तर आणि नाट्यमयतेला बाधा देत नसेल तर केवळ दलित नाटक आहे असे म्हणून त्यावर टीका करणे योग्य होणार नाही.दलित नाटक भडक आहे , तसेच दलित रंगभूमीतील नाटकात व्यक्त होणारे सामाजिक वास्तव एकपदरी आहे, असे म्हणले जाते. पण ही गोष्ट विषय वस्तूच्या मर्यादेमुळे आलेली नसून नाट्य विषयाच्या अपुऱ्या कलहामुळे निर्माण  झाली आहे; ही वस्तुस्थिती आहे. ह्याकडे बऱ्याच या दलित नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षांनी लक्ष वेधले आहे. दलित रंगभूमीतील नाटकात तोचतोपणा टाळण्यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक दत्ता भगत मलाकर डहाट, टेक्सास गायकवाड, प्रेमानंद गज्वी, रामनाथ चव्हाण, भि.शी. शिंदे इत्यादी आघाडीवर असून त्यांच्या नाट्य कलकृती मधील विविधता ही लक्षणीय आहे.
   प्रस्तुत  दलित रंगभूमीवरील नाट्यकृतींचे अंतरंग तपासताना असे दिसून येते की , लेखकांनी ह्या नाटकात दलितांच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या समस्या व प्रश्न यांनाच अधिक प्राधान्य दिलेले दिसून येते . त्या दृष्टिकोनातून ही नाटके संघर्ष प्रधान असण्याबरोबरच समस्याप्रधान असलेली अधिक जाणवतात. याचे कारण म्हणजे समस्येतून  संघर्ष निर्माण झाले आहेत . दलितांना आपले प्रश्न व समस्या यांची जाणीव होणे हीच मुळी दलित नाट्यप्रयोजनांची व अस्मितेची निदर्शक मानता येईल . त्या दृष्टिकोनातून ही नाटके  संघर्षप्रधान असण्याबरोबरच समस्याप्रधान असलेली अधिक जाणवतात . याचे कारण म्हणजे समस्येतून संघर्ष निर्माण झाले आहेत . दलितांना आपले प्रश्न व समस्यांची जाणीव होणे हीच मुळी दलित नाट्यप्रयोजनांची व अस्मितेची निदर्शक मानता येईल. संघर्ष हा नाट्याचा प्राण असून दलित नाटकांचा तर तो अभिजात पैलु आहे . कारुण्य व संघर्ष नाट्य रूपाने सादर होत असताना त्यामध्ये दलित जीवनाचे रंग-रूप यांचा जिवंतपणे आविष्कार होतो यात शंका नाही.  मानवी जीवनातील दुःखांच्या व वेदनांच्या आघातांनी सोसलेल्या दलीतांचा , त्यांच्या स्वतःचा असा हा जीवन अनुभव हाच ह्या नाटकातील संघर्षाचा स्थायीभाव आहे.
   दलित नाटक हे 'दलित' जीवनाचे नाट्य असल्याने ते प्रस्थापित रंगभूमीला जवळचे राहणार नाही,हे उघड आहे. ग्रामीण भागातील महार, मांग, चांभार, लोहार,  सुतार, घिसाडी, कैकाडी, साळी, कोळी, कोष्टी, कुंभार, भराडी, अशा बारा बलुतेदारांचे, आदिवासींचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, पिचलेल्यांचे, रंजल्या - गांजल्यांचे, अन्याय-अत्याचारग्रस्तांचे प्रश्न दलित साहित्याने, दलित नाटकांनी प्रकर्षाने मांडले.
   या दलित रंगभूमीवर दलितांच्या जीवन दर्शनाच्या अनुषंगाने प्रगट झालेला विद्रोह व नकार प्रामुख्याने दलित मुक्ती कडे झेपावणारा आहे. प्रस्थापित समाज व संस्कृती यांवर हल्ला चढविताना या नाटकातून विद्रोहाचा अंगार  ठसठसितपणे प्रगट झाला आहे. दलितांनी ज्या  मूल्यसंकल्पना स्वीकारल्या आहेत त्यासाठी या नाटकातील संघर्ष निर्माण झाला आहे , तो वास्तव पूर्ण पातळीवरचा असून त्याआधारे "स्व" त्वाचा शोध , परंपरेला नकार , परिवर्तनाची दृष्टी , क्रांती प्रवणता , जीवनातील न्याय , स्वातंत्र्य , समता , बंधुता यांच्याशी बांधिलकी इत्यादी असणे प्रस्तुत दलित नाटकात व्यक्त होतात . याशिवाय प्रस्थापितांच्या विरोधातील दलित मनात असलेली चीड तीव्रतेने प्रगट होते. दलितांचे जीवन, त्यांचे राहणीमान, त्यांचे त्यांच्यातील परस्पर संबंध , त्यांचे भाव  , विचार त्यांची राजकीय सामाजिक चळवळ पाहतांना भडक विषय ,आक्रस्ताळी भाषा, हृदयाला थेट जाऊन भिडणारा असे हेच दलित जीवन दर्शनाची प्रमुख अंग आहे. ह्या बहुतांश नाटकातील दलितांचे प्रश्न व समस्या यांचे स्वरूप एक सारखे असल्याचे दिसून येते. राखीव जागा , अस्पृश्यता , आंतरजातीय दलित-सवर्ण प्रेमविवाह संबंध , पिण्याचा पाण्याचा प्रश्न , जातीयता , अंधश्रद्धा , समाजकारण , राजकारण , दलित चळवळ , नामांतर इत्यादी प्रश्न बहुतांशी दलित नाटकात आढळले आहेत . दलितांचे दुःख हे एक सांस्कृतिक दृष्ट्या नाकारलेल्या माणसाचे दुःख आहे. मानव्यच नाकारल्या गेलेल्या दलित व्यक्तीचे दुःख आहे . त्यामुळे ह्या दुःख , व्यथा आणि वेदना यांचा अविष्कार आवेशाने , त्वेशाने दलित रंगभूमीवरील नाट्य कृतीतून व्यक्त होणे यात अस्वाभाविक असे काहीच नाही. ह्या दलित नाटकातील संघर्षाच्या संदर्भात कथानक , विषय इत्यादींना नाट्यमयता प्राप्त होण्यास त्यामुळे मदत झाली आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात

खरेखुरे दलित जाणिवेचे , दलित दुःखांचे , वेदनांचे आणि व्यथांचे जिवंतपणे सहृदयतेने दर्शन घडविण्यात हे दलित नाटककार यशस्वी झाले आहेत. जा दलित समाजातून ते पुढे आले आहेत त्या अनुभवांशी इमान राखून , अधिकारवाणीने सत्यनिरपेक्षतेने जीवनदर्शन घडविण्याची त्यांची लेखणी वचनबद्ध झाली . हा त्यांचा प्रयत्न बऱ्यापैकी साध्य झाला आहे . दलित चळवळीला गतिमान करण्याचे कार्य ह्या व्यासपीठाला मार्फत होत आहे असे ह्या नाटकांच्याअंतरंगाचा अभ्यास करताना दिसून येईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदयाने व त्यांच्या विचारसरणीमुळे , शिकवणुकीमुळे भारतातील समग्र दलित समाजात जागृती निर्माण होऊ लागली . त्यांच्या समाज सुधारणांच्या विचारांनी व आंदोलनांनी दलितांचे एक नवे विश्व निर्माण झाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात दलित समर्थपणे उभा राहिला. साहित्य हा एक त्याचाच प्रभावी आविष्कार होय . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानातून दलित साहित्य व दलित नाट्य जन्माला आले . प्रस्तुत दलित रंगभूमीवरील नाट्यकृती हे दलित चळवळीचे एक महत्त्वपूर्ण साधन मानले गेले असून त्यासाठी प्रामुख्याने आधारस्तंभ असणारे घटक म्हणजे दलित पॅंथर , आंबेडकरवाद , नामांतर चळवळ , धर्मांतर , दलितांवरील अत्याचाराचा जोरदार प्रतिकार तसेच दलितांच्या राखीव जागांच्या संदर्भात घटनात्मक तगादा , दलितांच्या विद्यमान परिस्थितीतील राजकारण व समाजकारण इत्यादी कार्यक्रम व विषय प्रामुख्याने दलित नाटकांमध्ये चित्रित झाले आहे. .

प्रस्तुत दलित रंगभूमीवरील नाट्यकृतीत अस्पृश्य समाजाचे हिणकस जीवन , प्रस्थापितांना कडून झालेली उपेक्षा , अत्याचार , छळ अंधश्रद्धा यांचे दर्शन घडते . प्रस्थापित समाजव्यवस्थेविषयी चीड म्हणजे विद्रोहाची प्रवृत्ती हे दलित नाट्य वाड् .मयचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल . ह्या दलित नाटकांचे स्वरूप प्राधान्याने प्रतिक्रियात्मक , संतप्तता , त्वेषपूर्णता , झालेल्या अन्यायाचा तीव्र निषेध इत्यादीचे दर्शन घडते .सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून निर्माण झालेले ही दलित नाट्य वाड् .मय त्यातून निर्माण झालेला संघर्ष अत्यंत धिटाईने व बारकाईने आपल्या नजरेसमोर उभा राहतो. त्यादृष्टीने ही दलित नाटके सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक बांधिलकीची केंद्रबिंदू आहेत . उदाहरणार्थ मन्वंतर, न्याय , युगयात्रा इत्यादी समाजातील वस्तुस्थिती आणि मानवी जीवनातील वास्तवता दलित नाटक नाकारू शकत नाही. म्हणूनच परिवर्तनाचा विचार देणारे सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे एक प्रभावी हत्यार मानले गेले आहे.

ही दलित नाट्य चळवळ खरी म्हणजे अस्सल देशी आहे असे म्हणले तर वावगे ठरू नये.ह्या नाटकाची निर्मितीच मुळी एका विचारांच्या प्रचारासाठी झाली आहे. ती गोष्ट म्हणजे आंबेडकरी चळवळीचा प्रचार व प्रसार होय! मला जाणवणारा, समजलेला भाग, समाजासाठी व्यक्त झाला पाहिजे. त्यांच्यापर्यंत नेण्याची एक नैतिक जबाबदारी माझ्यावर आहे. अशी एक भूमिका ह्या चळवळीच्या नाटकाच्या पाठीमागे आहे. आंबेडकरी विचाराने त्याला प्राप्त झालेला दृष्टीकोण दलित नाटककार ह्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी तो स्वतः या अभिव्यक्तीचा शोध घेत आहे. महात्मा फुले यांच्या " तृतीय रत्न " या नाटकात पासून ते सत्यशोधक तमाशा पर्यंत हा प्रयत्न झालेला दिसतो .तमाशातील मुक्त नाट्यचा वापर करून पुढे आंबेडकरी जलसे विकसित झाले. तेव्हा दलित नाटकांचा उगम शोधायचा झाल्यास ह्या जलसा शोधा घ्यावा लागणार आहे. जलसा हा त्यांच्या विचारांची अभिव्यक्तीची स्वतंत्र निर्मिती आहे. ह्याअविष्कार पद्धतीला ह्या समाजातील लोककलांची एक जणपरंपरा आहे. ह्या लोककलेतूनच तमाशा , सत्यशोधक तमाशे व पुढे आंबेडकरी चळवळीचे दलित नाटक जन्माला आले आहे. अशी ही दलित रंगभूमीवरील नाटकांची चळवळीच्या बरोबर चालत आलेली देशी परंपरा आहे.

ही नाटके नकार व विद्रोहाची जाणीव जोपासणारीच आहेत.दलितांच्या व्यथा , वेदना प्रस्तापित जोपर्यंत समजून घेत नाहीत तोपर्यंत ह्या चळवळीच्या नाटकांची अभिव्यक्ती ही विद्रोहीच राहणार. उदा. तनमाजोरी, देवनवरी ,साक्षीपुरम ,काळोखाच्या गर्भात, इत्यादी तेव्हा दलित चळवळीची ,आंबेडकरी विचारांची नाटके म्हणजे मूल्यवाचक, मूल्याधिष्ठित संकल्पना व जीवनपद्धती स्वीकारणारी साहित्यकृती होय ! असे निश्चितपणे म्हणता येऊ शकते.तेव्हा ह्या दलित नाटकांचा वेगळा प्रवाह, मानवी जीवनविषयक मू ल्ये परिवर्तनशील समाजाला परावर्तित विचारांची , शोषणा विरहित समाजजीवनाचा , समतेचा प्रवाह बलदंड करणारा ; मूल्याधिष्ठित विचार प्रणाली स्वीकारून वेगळे अस्तित्त्व असलेला असा हा मूलतःच वेगळा वाड्. मयप्रकार आहे याची नोंद ह्या ठिकाणी घेणे जरूर आहे. समाजक्रांतीचे जनक मराठीचे अध्य नाटककार महात्मा ज्योतिराव फुले हेच दलित नाट्य चळवळीचेही प्रेरणा स्थान होत . म्हणजेच दलित रंगभूमीवरील नाट्य चळवळीचा उगम महात्मा फुले यांच्या "तृतीय रत्न "(इ .स.१८५५ )यामध्ये निश्चित सापडतो. त्यांनी स्वतंत्र व वास्तवपूर्ण कथानकाचा आश्रय घेऊन धर्माच्या नावाखाली चालणारे शोषण ह्या नाटकात दाखवून दिले आहे. हा दलित नाटकांचा पहिला महत्त्वपूर्ण टप्पा होय .दलित नाट्याचे एक चांगले रूप म.भी.चिटणीस यांच्या" युगयात्रा "या नाटकात पहावयास मिळते. ह्या नाटकात ग्रीक शोकांकोचे येणारा "कोरस "जणू बोलका निवेदक म्हणून समोर उभा राहतो. दलित नाट्य चळवळीचे अभिमानाचे व गौरवाचे मानचिन्ह म्हणजे "युगयात्रा" नाटक होईल.[ संदर्भ हवा ]

समीक्षा आणि मूल्यमापन

दलित नाट्य चळवळीचे अप्रतिम, वैभवसंपन्न, कुशल, समर्थ लेखणीचे नाट्यलेखक श्री. प्रेमानंद गज्वी यांच्या गाजलेल्या अनेक नाट्यकृतींचा उल्लेख ह्याच ठिकाणी करावा लागतो. पहिली कलाकृती म्हणजे" देवनवरी"(१९८०). यात कथानकाचा प्रपंच न करता देवदासींच्या आयुष्याची परवड महत्त्वाच्या घटनातून व्यक्त होते .त्याविषयीचे स्फोटक चित्र ह्या ठिकाणी, ह्या नाटकात केले आहे.ज्या पौराणिक घटनांतून ही कथा सुरू झाली ती सुरुवातीलाच संक्षेपाने ;पण प्रभावीपणे सादर केले आहे. त्यानंतर ह्या कथेत गुंतलेल्या प्रातिनिधिक व्यक्तींच्या आधारे देवदासींचे आयुष्य चित्रित करण्यात आले आहे. त्यात आई-वडील, पुजारी ,इनामदार आणि वेश्या व्यवसायाचा दलाल अशा व्यक्ती येतात . ह्या चित्रणातील त्वेष इतका अनावर आहे की , त्यामध्ये कथेची रूपरेखा ही स्पोटक रूप धारण करते. इनामदार हा एक माणूस परंपरेचा व प्रवृत्तीचा प्रतिनिधी ! देवदासींची जीवघेणी व्यथा ,वीठबिगारीचे जिने जगणाऱ्या या दुर्दैवी व्यक्ती यांना मुक्ती कधी मिळणार? असा प्रश्न ह्या नाटकाच्या निमित्ताने आपणापुढे उभा राहतो. ह्या नाटकात व्याकुळ , व्यथित , सामाजिक दुःखाने ग्रस्त असणारे , दैन्य आणि अन्याय हेच नशिबी असणारे अशा ह्या देवदासी ! त्यांच्या मनःस्थितीचे दर्शन ह्या नाटकात घडते. तिचा नाट्यरूप अविष्कार हा उद्रेकासारखा आहे . मग तो संवाद अगर कवितेच्या ओळी यातून प्रकट होताना आपला मूळ आवेग किंवा कायम ठेवतो .‘ देवनवरी ’ला राम गणेश गडकरी नाट्य पुरस्कार (१९८२—८३) मिळाला म्हणून ह्या ठिकाणी पुन्हा एकदा आवर्जून नोंद घ्यावी लागते. गज्वीचे दुसरे वैशिष्ट्यपूर्ण गाजलेले नाटक म्हणजे ‘ तनमाजोरी ’ या नाटकाला अनंत काणेकर पुरस्कार आणि इ.स.१९८४–८५–८६ ह्या तीन वर्षातील ‘ सर्वोत्कृष्ट नाटक आणि मामा वरेरकर ( १९८५ ) नाट्यपुरस्कार ’ लाभले असून हे नाटक अतिशय गाजले . तसेच ‘ तनमाजोरी ’ह्याच नाटकाला ‘राम गणेश गडकरी ’ पुरस्कार सालचा लाभला असून या नाटकाचा प्रयोग लंडन येथे देि.२/११/१९८५ रोजी ग्रँड हॉल , फुलहम रोड लंडन येथे सायंकाळी ७:२० वाजता झाला. यावेळी ‘ तनमाजरी ’ नाट्यग्रंथाचे प्रकाशन डॅडी दंडवते यांच्या हस्ते झाले . या नाटकाच्या निमित्ताने श्री. प्रेमानंद गज्वी ३० ऑक्टोबर १९८५ला लंडनला गेले होते. तसेच सध्या अलीकडच्या प्रेमानंद गज्वी यांच्या गांधी-आंबेडकर (१९७७) या नाटकात प्रथमच मराठी रंगभूमीच्या इतिहासात स्री पात्र विदूषकाची निर्मिती करून दाखवली आहे. त्यामुळे या नाटकाला वेगळीच परिणामकारकता प्राप्त होते. त्याचप्रमाणे मागे उल्लेख केलेल्या ‘तनमाजोरी’ ह्या नाटकात समाजातील अन्यायाची प्रखर जाणीव एकजीव सामर्थ्याने व्यक्त झाली आहे . या नाटकाचा प्रयोग लंडन नेते रंगभूमी दिनानिमित्त २ नोव्हेंबर १९८५ रोजी करण्यात आला . सेक्सपियरच्या रंगभूमीवर इतक्या प्रचंड ताकतीचे मराठी नाटक सादर केले जाते जागतिक नाट्य परंपरेला शोभणारी घटना होती . ‘तनमाजोरी’ हे नाटक असे आहे की, त्यामध्ये कौर्य , अन्याय , सूड यांचा सच्चा उद्रेक होणारा अनुभव साकार केला गेलाआहे .ह्यानिमित्ताने श्री. प्रेमानंद गज्वी लंडनला गेले होते. धरणावर काम करणाऱ्या वेठबिगारांच्या जीवनावरचे हे नाटक आहे . अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी माणूस कसा पेटून उठतो याचे चित्रण ह्या नाटकात सामर्थ्य संपन्नतेने प्रगट झाले आहे. आत्तापर्यंत ह्या नाटकाचे बावन्न प्रयोग झाले असून लंडन येथील नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन श्री. विक्रम गोखले यांनी केले होते.

प्राध्यापक दत्ता भगत यांच्यासारख्या दलित रंगभूमी आणि चळवळीला आकार देणाऱ्या व तिला पुढे नेणाऱ्या , समृद्ध करणाऱ्या नाटककाराचा आवर्जून उल्लेख समृद्ध करणाऱ्या नाटककाराचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे , अशी त्यांची ‘खेळिया’ (१९८६)‘ वाटा-पळवाटा’ (१९८८)आणि ‘अश्मक’(१९९० )अशी दलित नाट्य सृष्टीची परिपूर्ण असणारी व मानदंड लागणारी प्रसिद्ध नाट्यकृती! प्रेक्षकांच्या अभिरुचीचे भान ठेवणाऱ्या ह्या नाट्यकृती आपणाला अंतर्मुख करतात. समाज प्रबोधनाचे व्रत स्वीकारून दलितांमधील अंतर्गत संघर्ष, विद्यमान दलित चळवळीची दिशा , त्यांच्या लढ्याचे सामर्थ्य –मर्यादा ह्याविषयी वस्तुनिष्ठतेने, अलिप्तपणे चित्रण करणारी हे नाटके लोकप्रिय आहेत . ह्या त्यांच्या कलाकृतीला मराठी नाट्यसृष्टीत तोड नाही. दलित नाट्य चळवळीतील आघाडीचे नाट्यलेखन करणारे प्राध्यापक दत्ता भगत ह्यांचा ह्या नाट्यकृती दलितांमधील अंतर्गत व बहिर्गत संघर्षात त्यातील नाट्य रंगवीत आपल्यासमोर साकार करतात.[ संदर्भ हवा ]

दलित रंगभमीवरील नाटकांचा केंद्रबंदू दलित समस्या हा आहे.जात,धर्म, पंथ हा त्यांचा समस्येचा संदर्भ आहे. हे खरे असले तरी तो एका मानवजातीचा संघर्ष आहे. हे खरे असले तरी तो एका मानव जातीचा संघर्ष आहे. अशी ही दलित चळवळीची नाटके मानवाच्या मुक्तीसाठी चाललेल्या धडपडीचे , चळवळीचे साधन आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या मानवी मूल्यांसाठी हा संघर्ष आहे.दलित दलितेतर अशा सर्व प्रेक्षकांपर्यंत जाणारी ही दलित नाट्यचळवळ आहे. केवळ अन्याय , दारिद्र्याचे, अत्याचाराचे चित्रण, सवर्ण विरुद्ध दलित हा या प्रस्तुत नाटकांचा केवळ विषय नाही, तर मानवाच्या प्रति असणाऱ्या ‘करुणेपोटी’ निर्माण झालेले हे नाट्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाची जीवन ज्योत असलेल्या ह्या दलित नाट्य चळवळीने धर्मांधता, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध संघर्ष करण्याचे योजनाबद्ध कार्य स्वीकारले आहे. परंपरावाद्यांची इच्छा एकच आहे, माणसाने परंपरेनुसार जगावे आणि प्रबोधनाने जागवलेली माणसे आता तशी कृती करण्यास तयार नाहीत. हा खरा संघर्षाचा ,विद्रोहाचा मुद्दा आहे, विशेष म्हणजे ह्या आंबेडकरी चळवळीच्या दलित नाट्यकृतीत परंपरावादी व्यक्ती ‘खल’ म्हणून वावरते.

आत्तापर्यंत नऊ अखिल भारतीय स्वरूपाची दलित नाट्य संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. शिवाय वेळोवेळी दलित नाट्यमहोत्सव देखील आयोजित करण्यात आले आहेत. दलित रंगभूमी समृद्ध करण्याचे श्रेय सर्वस्वी भि. शि. शिंदे , प्रेमानंद गज्वी , प्राध्यापक दत्ता भगत, श्री रामनाथ चव्हाण, श्री टेक्सास गायकवाड , श्री प्रभाकर दुपारी, श्री प्रकाश त्रिभुवन , श्री रुस्तम अचलखांब ,प्राध्यापक अविनाश डोळस, प्राध्यापक मधुसूदन गायकवाड यांच्याकडे प्रामुख्याने जाते. दलित रंगभूमीवर नाट्यकृती सादर करणाऱ्या नाट्यसंस्था खालील प्रमाणे:

पुणे  :-- दलित रंगभूमी , दलित थिएटर अकादमी , शाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंच , प्रबुद्ध रंगभूमी , क्रांती थेएटर्स.

नागपूर :- नवचैतन्य रंगमंच , पॅंथर्स थिएटर्स , संकेत थिएटर्स , भारतीय दलित रंगभूमी , मुक्तवाहिनी , नागसेन , अभिनव कला , विप्लवी.

मुंबई - ठाणे :-अभिरुची, नालंदा.

औरंगाबाद :- दलित थिएटर्स , प्रतिभा थेएटर्स , दलित नाट्य अकादमी , क्रांती थेएटस.

सोलापूर :- समता रंगमंच , प्रज्ञा रंगमंच , बुद्धिष्ट कल्चर अकादमी .

अमरावती  :-दलित थिएटर

दिल्ली  :-आव्हान .

आंबेजोगाई  :- दलित युवक आघाडी , कला विभाग.

ननेर :- नवनिर्माण रंगमंचम

मध्यप्रदेश :- जग नाटयमंच

बिहार- पाटणा  :-लोक समिती , जनपथ .

आणि याबरोबरच अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाची नोंदही ही जाता-जाता करणे इष्ट ठरते. संमेलन. अध्यक्ष. ठिकाण वर्ष पहिले भि. शि.शिंदे पुणे फेब्रुवारी १९८४

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ पुस्तके

[संपादन]
  • समकालीन दलित कथा : एक अभ्यास - डॉ. मनोहर सुरवाडे.
  • दलित रंगभूमी आणि नाट्य चळवळ : डॉ. मधुकर मोकाशी
  • दलित रंगभूमी : भालचंद्र फडके
  • दलित साहित्य : उद्गम आणि विकास -डॉ. योगेंद्र मेश्राम
  • दलित साहित्य एक सामाजिक सांस्कृतिक अभ्यास : प्रा. गो. म. कुलकर्णी डॉ . विद्याधर पुंडलिक
  • नामांतर लढा शोधयात्रा प्रा. सुधीर गव्हाणे
  • आंबेडकरी शाहिरी : एक शोध , डॉ. कृष्णा किरवले
  • दलित चळवळ आणि साहित्य, डॉ. कृष्णा किरवले
  • दलित कवितेतील नवेे प्रवाह : महेंद्र भवरे
  • फुले आंबेडकरी साहित्य : आकलन आणि आस्वाद, मोतीराम कटारे
  • फुले-आंबेडकर दलित साहित्य : प्र. श्री. नेरूरकर
  • दलित साहित्य समीक्षा : डॉ. ज्योती लांजेवार
  • समाज आणि साहित्य - समीक्षा डॉ. यशवंत मनोहर
  • दलित साहित्याची चिकित्सा : डॉ. सदा कराडे
  • बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉ. भिवराव रामजी आंबेडकर
  • आंबेडकरी कवितेचे अंतरंग : हरीश खंडेराव
  • दलित साहित्य प्रवाह आणि प्रतिक्रिया: गो.म. कुलकर्णी
  • साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती डॉ. गंगाधर पानतावणे
  • दलित साहित्याच्या नामांतराचा वाद: संपादक: धम्मपाल रत्‍नाकर
  • दलित साहित्य : एक अभ्यास , संपादक  : अर्जुन डांगळे
  • दलित कथा उद्गम आणि विकास :डॉ . प्रकाश खरात
  • वादळाचे वंशज : डॉ. गंगाधर पानतावणे
  • प्रेमानंद गज्वी निवडक एकांकिका : संपादक म. द. हातकणंगलेकर
  • दलित नाटक प्रेरणा व विकास प्रा. शैलेश त्रिभुवन
  • प्रेमानंद गज्वी यांचा लेखनप्रवास : संपादक महेंद्र भवरे
  • भूमिपुत्र टेक्सास गायकवाड यांचे प्रबुद्ध जलसे संपादक : आयु .कीर्तीपाल गायकवाड
  • दलित रंगभूमी :संपादक डॉ . भालचंद्र फडके
  • दलित नाट्य वाड्.मय : डॉ. संजय राऊत
  • दलित नाटक आणि रंगभूमी  : डॉ. ईश्वर नंदपुरे
  • दलित स्वकथने, आरती कुसरे-कुलकर्णी, विजय प्रकाशन, नागपूर

संदर्भ

[संपादन]

साचा:प्रा. दत्ता भगत, अध्यक्षीय भाषण, तिसरे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, आंबेजोगाई मे १९८६

  1. ^ Mourya, dr. Kalpana (2017-06-02). "दलित चेतना एवं साहित्य". Anusanadhan: A Multidisciplinary International Journal (In Hindi). 2 (1): 25–38. doi:10.24321/2456.0510.201704. ISSN 2456-0510.