ग.दि. माडगूळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग.दि.माडगूळकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
ग.दि. माडगूळकर
जन्म नाव गजानन दिगंबर माडगूळकर
टोपणनाव गदिमा
जन्म १ ऑक्टोबर १९१९
शेटफळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १४ डिसेंबर १९७७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र साहित्य, चित्रपट
भाषा मराठी
साहित्य प्रकार गीतरचना, कथा, कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती गीतरामायण
वडील दिगंबर बळवंत माडगुळकर
आई बनुताई दिगंबर माडगुळकर
अपत्ये आनंद माडगुळकर,श्रीधर माडगुळकर
टीपा ग. दि. माडगूळकर संकेतस्थळ

माडगूळकर गजानन दिगंबर : (जन्म : शेटफळे-सांगली जिल्हा, १ ऑक्टोबर १९१९; मृत्यू : पुणे, ४ डिसेंबर १९७७). हे विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक होते.त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची पतेउत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी (१९४२) आणि पहिला पाळणा (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संग्रहित आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते, तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२), 'अजून गदिमा' आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).

माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.

ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत

ग दि माडगूळकर यांनी 'भूमिकन्या सीता'या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी', 'मानसी राजहंस पोहतो','सुखद या सौख्याहुनी वनवास' ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांचे संगीत स्नेहल भाटकर यांनी दिले होते, आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी ती गायिली होती.

त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपटतंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यांतून लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत पुढचं पाऊल (पटकथा, संवाद, गीते १९५०), बाळा जो जो रे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२), पेडगावचे शहाणे (१९५२), ऊन पाऊस (१९५४), मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), जगाच्या पाठीवर (१९६०), संथ वाहते कृष्णामाई (१९६७) ह्यांचा समावेश होतो. (कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांपैकी सर्व वा काही).

तूफान और दिया (१९५६), दो आँखे बारह हाथ (१९५७), गूँज उठी शहनाई (१९५९) हे त्यांनी लिहिलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट.

माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३) ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत.

त्यांच्या जोगियामंतरलेले दिवसचैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन (१९६९) त्यांचा सन्मान केला. १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते. त्यांच्या नावाचे 'गदिमा प्रतिष्ठान' काढण्यात आले आहे.

माडगूळकर पुणे येथे निधन पावले.

पुस्तके[संपादन]

ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]