Jump to content

कुकडेश्वर मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुकडेश्वर मंदीर

कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक आहे. अखंड दगडात केलेले कोरीव काम आणि स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आहे. सदर मंदिर पांडवकालीन असल्याचे समजले जाते. प्रत्यक्षात इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे. या धरणामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे. कुकडेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरपासून १५ किमी अंतरावर कुकडी नदीच्या तीरावर असलेल्या पुर गावात आहे. हे 12 व्या शतकातील शिवमंदिर आहे जे हेमाडपंथी स्थापत्यशास्त्रानुसार बांधले गेले आहे. मंदिराची जागा अप्रतिम सुंदर दिसते आणि तिच्या उत्तरेकडील कुकडी नदी तिच्या सौंदर्यात भर घालते.हे भगवान शिवाचे एक लोकप्रिय मंदिर आहे जे मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतींवर त्याच्या भव्य कोरीव काम आणि शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.

इतिहास

[संपादन]

शिलाहार वंशातील/घराण्यातील अनेक राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन, पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव , अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते. ह्या शिलाहारांनी अनेक मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाणे येथील कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकिर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी शिवालये बांधली.

साधारण इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. तरीही यास पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडत नाही. या राजांनी बहुतेक पांडवकालीन वा पुरातन मंदिरांची स्थापत्य कलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असावी असाही एक मतप्रवाह आहे.

जायचे कसे?

[संपादन]

जुन्नर पासून १७ किमी अंतरावर वा चावंड किल्ल्यापासून ८-९ किमी अंतरावर हे मंदिर आहे. चावंडहून घाटघरला जाणाऱ्या मार्गावर चावंड किल्ल्याच्या पुढे ६ किलोमीटरवर एक फाटा फुटतो. तेथून पुढे ३ किलोमीटरवर हे मंदिर आहे. चावंड किल्ल्यापासून चालत गेल्यास अंदाजे २ तास लागतात. गावाचे नाव 'पूर' असले तरी कुकडेश्वर हेच नाव प्रचलित आहे.

जुन्नर स्थानकावरून बस व्यवस्था आहे पण वारंवारता कमी आहे.

बसच्या वेळा

[संपादन]

जुन्नर ते कुकडेश्वर

[संपादन]
  • जुन्नर ते घाटघर/अंजनावळ: सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
  • जुन्नर ते कुकडेश्वर: सकाळी ११, दुपारी ३:३०

नाणेघाट ते जुन्नर

[संपादन]
  • अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर (कुकडेश्वर)वरून : सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०

सद्यस्थिती:

[संपादन]
कुकडेश्वर मंदीराच्या खांबावरील कोरीव काम

मंदिराची उंची साधारण १५ फूट असावी. प्रत्येक भिंतीवर आतून, बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेले आढळते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही. पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे. दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दारावरील कोरीव गणेशपट्टी, उंबरठ्याजवळील दोन कीर्तिमुखे, दारासमोरचा नंदी आणि गणेश, वेलबुट्टी आणि अलंकारणे, शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती अशी अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आतील भागातही लक्षवेधी नक्षीकाम केलेले आढळते. मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. त्या भागातही शिल्पखंड आणि नागशिळा मांडून ठेवल्या आहेत.

हे शिव मंदिर पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे सुस्थितीत आहेत. मंदिराचा कळस पडला असून त्याची डागडुजी करण्याचे काम चालू आहे. केवळ दगडात केलेले कोरीव काम तसेच शाबूत ठेवून सिमेंटने कळस न बांधायचा निर्णय झाला आहे. त्यानुसार मोठे दगड येथे आणून त्यावर कोरीव काम करून कळस उभारण्यात येणार आहे. या खर्चिक कामासाठी सरकारी निधी मंजूर झाला आहे.

प्रवेशद्वारावरील शिल्पे

[संपादन]

मंदिरासमोरच दगडात खोदून तयार केलेला नंदी आहे. याच्या डाव्या बाजूस अजून एक छोटेसे मंदिर आहे. त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे आहेत.मंदिराला आधार देणारे खांब पूर्णतः नक्षीकाम केलेले होते. येथे सर्वात वरती गणपती कोरलेला दिसतो आहे. खांबाच्या इतर दोन्ही बाजूस सारखेच शिल्प आहे. त्याखाली ढोल वाजवतानाच्या व्यक्तीप्रतिमांचे शिल्प आहे. त्याखाली तोरणासदृश्य नक्षीकाम आहे.

त्याच्या पुढच्याच/समोरच्या खांबावर कोरलेले एक नृत्यशिल्प आहे. गावातील वृद्धांकडून मंदिराचा इतिहास तपशिलात ऐकावयास मिळू शकतो.


राहायची व्यवस्था

[संपादन]

गावातील काही ग्रामस्थांकडे जेवणाची व्यवस्था होऊ शकते. रात्रीच्या निवासासाठी मंदिरासमोर पुजारी रहातात त्या घरासमोर समोर मोठी ओसरी आहे. रात्री १५-२० लोक तेथे झोपू शकतात.

इतर पुरवणी माहिती

[संपादन]
  • महाराष्ट्र सरकारने या शिवालयाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्याने त्याचे विकासकाम हाती घेणे शक्य झाले आहे.
  • कुकडेश्वर मंदिर हे 'क- वर्गीय' मंदिर असून त्या मंदिरामागील डोंगरामधून कुकडी नदीचा उगम आहे. गावातील लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'पूर' गावातील डोंगर व दाऱ्या घाटातील डोंगरामध्ये शिखरावर कुकडी नदीचा उगम असून त्यानंतर तेथून नदीचा प्रवाह लुप्त झालेला आहे. तो लुप्त झालेला प्रवाह कुकडेश्वर मंदिरापासून चालू होतो. जेथे प्रवाह चालू होतो (नदीचा नव्याने उगम होतो) तेथे छोटेसे मंदिर बांधले आहे. कितीही पाणी टंचाई आली तरी येथे बारमाही पाणी असते.
  • पुढे कुकडी नदीवरच माणिकडोह धरण बांधलेले आहे.
  • कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास थेट दाऱ्या घाटात पोहोचता येते. तेथूनच दुर्ग ढाकोबाला जाता येते.
  • ५ दिवस हाताशी असतील तर माणिकडोहला प्रदक्षिणा मारता येते. तो मार्ग असा :

जुन्नर → चावंड → कुकडेश्वर → जीवधन→ नानाचा अंगठा → नाणेघाट → निमगिरी → हडसर → माणिकडोह वाघ्र प्रकल्प → शिवनेरी → जुन्नर

बाह्य दुवे

[संपादन]