Jump to content

गंजिफा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एक प्रकारचा गंजिफा

गंजिफा हा पत्त्यांचा बैठा खेळ असून याची विविधांगी प्रगती भारतात झाली. प्रचलित पत्त्यांच्या खेळांपेक्षा गंजिफा वेगळ्या पद्धतीने खेळला जातो. सध्या गंजिफा खेळणाऱ्यांची संख्या नगण्य आहे आणि केवळ जुन्या पिढीतील काही व्यक्ति खेळू शकतात.

इतिहास[संपादन]

सध्या सर्वत्र माहीत असणाऱ्या पत्त्यांच्या खेळाचा उगम मूळचा युरोपातून आहे हा अंदाज गंजिफ्याशी संबंधित दस्तावेजांच्या माहितीनंतर चुकीचा ठरला. युरोपामध्ये पत्त्यांच्या खेळाचा पहिला उल्लेख सुमारे सहा शतकांपूर्वी आढळतो (ही कालनिश्चिती जुलिअन दिनदर्शिकेनुसार करण्यात आलेली आहे). सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात कधीतरी गंजिफा इराण किंवा मध्य आशिया येथून मुघलांनी भारतात आणला. कदाचित या सर्व खेळांचे मूळ चीन असावे जेथून मंगोल सम्राटांनी पश्चिम आशियात आणले. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी तुर्कांनी जे मध्य-पूर्व आशिया भागातल्या वंशांचे सामरिक प्रतिनिधित्व करीत असत. तेथून हा खेळ युरोपमध्ये पसरला.

दशावतार चित्रे असलेला गंजिफा

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी गंजिफ्याचा भारतातील पहिला उल्लेख आढळतो, परंतु त्याच्या बऱ्याच आधी हा खेळ लोकप्रिय होता. बाबरनामा या आत्मचरित्रात मुघल बादशाह बाबर याने गंजिफ्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार इ.स. १५२७ साली जून महिन्यात गंजिफ्याचा एक संच त्याचा मित्र शाह हुसैनला तट्टा (सिंध) येथे मीर अली कोर्ची यांच्या हाती पाठविल्याचे लिहिले आहे. तसेच शाह हुसैनला हा खेळ अतिशय प्रिय होता आणि बाबराला त्याने विनंती केली होती की बाबराकडील एखादा उत्तम संच त्यांनी पाठवून द्यावा. भारताबाहेर गंजिफा शब्द मात्र बाबरानंतरच्या काळातच आढळून येतो.

याच सुमारास आणखी एक गुंतागुत निर्माण झाली जेव्हा इ.स. १५०० साली पोर्तुगीज खलाशांनी त्यांच्या सोबत इटालियन आणि स्पॅनिश बनावटीचे पत्ते आणले. लवकरच हे पत्ते उच्चवर्तुळात आणि राजदरबारात खेळण्यात येऊ लागले. बाबरानंतरच्या काळातील गंजिफ्याचे वर्णन अकबराच्या अबुल फजल अल्लामी ऐन-ए-अकबरी या ग्रंथांसाठी अकबरांचे सहलेखक होते. त्यातील एका भागात त्यांनी बुद्धिबळ आणि गंजिफ़ा या दोन खेळांसंबधीची माहिती दिलेली आहे, जे अकबर स्वतः खेळत असे. त्यांनी लिहून ठेवले आहे की हा तत्कालिन अतिशय लोकप्रिय पत्त्यांचा खेळ भारतापर्यंतच मर्यादित होता आणि स्वतः बादशहा हे दोन खेळत. पुढे हा खेळ मुघलांपासून इतरत्र विशेषतः राजांच्या दरबारात पसरला, जसे की राजस्थान, हिमाचल प्रदेश, ओडिशा, बंगाल, दक्षिण भारतातील राज्ये वगैरे. हिंदू राजे आणि मुघल राजे यांचे खेळ आणि पत्ते भिन्न असत. भारतातील तत्कालिन उच्चवर्तुळात जसे अमीर, उमराव, वगैरेंमध्ये लवकरच हे खेळ प्रिय बनले. त्यांचे पत्तेदेखील महागड्या गोष्टींचे बनविल्या जात. हस्तिदंत, सोने, चांदी, मोती इत्यादिंचा वापर करून बनविण्यात आलेले गंजिफा संच आजदेखील पहावयास मिळतात. हस्तिदंती गंजिफा संच अवध आणि बंगाल मध्ये बनविले जात. अशाच एका मुर्शिदाबाद येथे बनविलेल्या मोठ्या हस्तिदंताचा गंजिफ्यांचा संच रॉबर्ट क्लाईव्ह यांच्याकडे होता आणि सध्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथे ठेवला आहे.

सर्वात अधिक संख्येने आणि विविध प्रकाराने ओडिशा येथे गंजिफ़ा बनविले जात. तेथे पत्त्यांवर चित्रे आणि इतर रंगरंगोटी करणे ही आजदेखील एक चालू परंपरा आहे. ओरिसातल्या चित्रकारांनी पत्त्यांवर विविध प्रकारची चित्रे काढली ज्यामध्ये रामायण, महाभारत, कृष्णलीला, दशावतार वगैरेंशी संबंधीत प्रसंग रंगविले जात.

खेळाचे प्रकार[संपादन]

मुख्यतः गंजिफ्याच्या पत्त्यांचा आकार गोल असतो. अबुल फजलच्या वर्णनानुसार हा पत्त्यांचा खेळ मूलतः १२ संच आणि प्रत्येक संचात १२ पत्ते असे एकूण १४४ पत्त्यांचा होता. बादशहा अकबराला हा खेळ मूळ स्वरूपात आवडत नसे आणि त्यांनी त्यात बदल केले, जसे गंजिफा बाराऐवजी आठ संचांचा बनविला आणि ९६ पत्त्यांसह गंजिफा खेळला जाऊ लागला. यातील प्रत्येक संचाला आणि प्रत्येक पत्त्याला नाव दिलेले असे, जसे अश्वपती वगैरे. अकबर अश्वपती, गजपती या नावांच्या पत्त्यांचे संच वापरत असे.

यापैकी मूळ बारा संचांचा खेळ रणनीतीवर आधारित होता. भारतीय सैन्यामध्ये असणारे विविध विभाग जसे घोडदळ, पायदळ, चिलखती पायदळ, गजदळ, किल्ले किंबहुना आरमार देखील असे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक सुवर्ण कोश सांभाळणारा कोशाध्यक्ष किंवा धनपती असे. या व्यतिरिक्त पाच संचांध्ये प्रत्येकी एक संच स्त्री, सुर, असुर, पशु आणि सर्प यांच्यासाठी असे. शेवटच्या चार संचावरून हिंदू संस्कृतीची झलक दिसून येते. संचाची संख्या आठ, दहा किंवा बारा हे खेळाचा आशय ठरवित असे. उदाहरणार्थ अष्टदिग्पाल गंजिफा आठ संचांचा, दशावतार गंजिफा दहा संचांचा तर बारा राशींचा राशी गंजिफा होता. काही ठिकाणी नवग्रह गंजिफा नऊ संचांसह खेळला जाई. म्हैसूर येथील राजांचा स्वतःचा वेगळा संच होता.

पत्यांचे प्रकार[संपादन]

अश्वपती[संपादन]

गजपती[संपादन]

इतर प्रकार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]