पंचांग
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हिंदू पंचांग हे फार जुन्या काळापासून भारतात प्रचलित असलेल्या हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक आहे. भारतांतील राज्याराज्यांत वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी त्यांत काही समान गोष्टी आहेत. या सर्व पंचांगांत दैनंदिन कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या पाच अंगांची माहिती यात असते म्हणून या कोष्टकाला पंचांग म्हणतात.
पंचांगात वर दिलेल्या पाच बाबींशिवाय आणखीही बरीच माहिती असते. यात सर्व ग्रहांचे योग वर्तवलेले असतात. पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक, खगोलशास्त्रीय माहिती व ज्योतिष्यांना लागणारी माहिती दिलेली असते. विवाह-मुंज मुहूर्त, वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण, उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या, यात्रा, रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहिती, धार्मिक कृत्यांविषयीचे निर्णय आदी गोष्टी पंचांगांत सापडतात. पंचांगात हिंदूंव्यतिरिक्त अन्य भारतीयांच्या दैनंदिन कालगणनेची थोडक्यात दिलेली माहितीदेखील असते. भारतीय राष्ट्रीय पंचांग हे हिंदूंच्या पंचांगांपेक्षा काही बाबतीत वेगळे असते.
पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यांनी शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले.
तसेच पंचांगात अनेक धार्मिक व सामाजिक रुढी/विधी/परंपरा आदींविषयी विवेचन असते. त्यापैकी काही गोष्टी खालीलप्रमाणे -
- अवकहडा चक्र
- अशौच निर्णय
- कोकणस्थ, कऱ्हाडे आणि क्वचित् देशस्थ ब्राह्मणांची आडनावे आणि गोत्रे, वंशावळी
- गणिताची आकडेमोड वाचवणारी कोष्टके
- गर्भाधान संस्कार
- गुणमेलन
- गृहप्रवेश
- ग्रह उपासना
- ग्रहदशा
- ग्रहपीडा
- रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती
- ग्रहांच्या अंतर्दशा
- चंद्र व सूर्य यांचे उदयास्त, नक्षत्रभ्रमण आणि त्यांची ग्रहणे
- जत्रा
- ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेली ग्रहगती
- दाने व जप
- धर्मशास्त्रीय शंका समाधान
- नवग्रह स्तोत्र
- नवमांश
- नांगरणी-पेरणीपासून ते धान्य भरण्यापर्यंत
- बारसे
- पायाभरणी
- मासिक भविष्य
- भूमिपूजन
- मकरसंक्रांत
- मुंज/उपनयनसंस्कार
- मुहूर्त
- यात्रा
- राजकीय व सामाजिक भविष्ये
- राशींचे घातचक्र
- लग्नसाधन
- वार
- वास्तुशांती
- व्रत वैकल्ये
- विवाह
- ९६ कुळी मराठा समाजातील वंश, गोत्र, देवक
- शाखा उपशाखा
- सण
- संतांची जयंती व पुण्यतिथी
- हवामान व पर्जन्यविचार, इत्यादी.
तिथी
[संपादन]चंद्र व सूर्य यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात. तिथीचा संबंध हा धार्मिक कृत्याशी लावला गेला आहे.
तिथीचा क्षय व वृद्धी
[संपादन]पंचांगात एखादी तिथी पाठोपाठच्या दोन सूर्योदयांच्या वेळी आलेली असते तर एखाद्या तिथी कोणत्याच सूर्योदयाच्या वेळी नसते. याचे कारण चंद्र व पृथ्वी यांची परस्परावलंबी सापेक्ष गती. ही कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते. सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते ती त्या दिवसाची तिथीम्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी तिथी सूर्योदयानंतर चालू होते व दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते. त्यामुळे त्या तिथीचा क्षय झाला असे समजतात. तिथीचा क्षय म्हणजे ती तिथI आलीच नाही असा होत नाही. प्रत्येक तिथी १९ ते २६ तासांकरता येतेच. (तिथिलोपाचे उदाहरण : रविवारी ६:३२ला सूर्योदय. तेव्हा नवमी आहे, म्हणून त्या पूर्ण दिवसाची नवमीशी सांगड. मग ६:५०ला दशमी सुरू होते, आणि ती सोमवारी पहाटे ५:१०ला संपून एकादशी सुरू होते. सोमवारी ६:३४ला सूर्योदय होतो, तेव्हा एकादशी. अशा प्रकारे दशमीचा क्षय वा लोप होतो.) तर कधीकधी, एका सूर्योदयाला चालू असलेली तिथी दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतरच संपते, त्यामुळे ती तिथी पंचांगात लागोपाठ दोन दिवशी दाखवावी लागल्याने तिची वृद्धी झाली असे म्हणले जाते. वृद्धीचे उदाहरण : रविवारी पहाटे ५:४२ अष्टमीची सुरुवात, आणि ६:०८चा सूर्योदय. सोमवारी ६:०९चा सूर्योदय, तेव्हा अष्टमी, म्हणून त्या पूर्ण दिवसाची सागड परत अष्टमीशीच. सोमवारी सूर्योदयानंतर ७:१५ला अष्टमी समाप्त. म्हणजे अष्टमी लागोपाठ दोन दिवस आली, म्हणजे तिची वृद्धी झाली. चन्द्राच्या पृथ्वीपासून कमी-अधिक अन्तरानुसार केपलरच्या सूत्रानुसार (Kepler's Law) तिथीचा काल १९ ते २६ तास असल्यामुळे या घटना घडतात. एका रोमन तारखेला तीन तिथ्या येऊ शकतात, अनेकदा येतात. आणि एका तिथीला तीन तारखा शक्य असतात, आणि अनेकदा हा प्रकारही होतो.
तिथींचे प्रकार
[संपादन]ज्योति़शास्त्रानुसार तिथींचे सहा प्रकार आहेत.
- नंदा तिथी : प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी
- भद्रा तिथी : द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी.
- जया तिथी : तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी
- रिक्ता तिथी : चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी
- पूर्णा तिथी : पंचमी, दशमी, पौर्णिमा आणि अमावास्या
- शून्या तिथी (एकूण १९): चैत्र कृष्ण अष्टमी, वैशाख कृष्ण नवमी, ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी, ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी, आषाढ कृष्ण षष्ठी, श्रावण कृष्ण द्वितीया और तृतीया, भाद्रपद कृष्ण प्रतिपदा व द्वितीया, आश्विन कृष्ण दशमी व एकादशी, कार्तिक कृष्ण पंचमी व शुक्ल चतुर्दशी, मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी व अष्टमी, पौष कृष्ण चतुर्थी व पंचमी, माघ कृष्ण पंचमी व माघ शुक्ल तृतीया या तिथींना शून्या तिथी समजले जाते.
वार
[संपादन]वार हा प्राचीन भारताने जगाला दिलेला विचार आहे. होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एका अहोरात्रीचे म्हणजे दिवसाचे २४ समान भाग केले असता त्यातील एक भाग म्हणजे होरा. हल्लीच्या तास या अर्थानेही हा भाग घेतला जातो. प्रत्येक होऱ्याला कुठलातरी ग्रह अधिपती असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे.
सूर्यसिद्धान्त या ग्रंथात भूगोलाध्याय या विभागात पुढील वर्णन आहे.
मन्दात् अधः: क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपा:। होरेशा: सूर्यतनयादधोधः क्रमशस्तथा॥
तसेच "उदयात् उदयेत् वारः" एका सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी तो वार असा या सूत्राचा अर्थ आहे.
धार्मिक सोयींसाठी हिंदू पंचांगात सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ होतो असे समजले जाते. मुसलमानी हिजरी पद्धतीनुसार सूर्यास्ताला नवीन वार सुरू होतो तर, इंग्रजी गेगोरियन आंतरराष्ट्रीय कालगणनेनुसार मध्यरात्री बारा वाजता नवीन वाराची सुरुवात होते. असे असले तरी, तिन्ही पद्धतींनुसार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एकच एक समान वार असतो.
"आमंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा:" असे वारांचे सूत्र आहे. म्हणजे मंद ग्रहापासून शीघ्र ग्रहापर्यंत होऱ्यानुसार.
मंदग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत -- शनी (ज्योतिष), गुरू (ज्योतिष), मंगळ (ज्योतिष) , रवी (ज्योतिष), शुक्र (ज्योतिष), बुध (ज्योतिष), चंद्र (ज्योतिष). प्रत्येक ग्रहाचा एक होरा असतो.
शनिवारी पहिला होरा अथवा तास हा शनीचा, पुढील तास गुरूचा, तिसरा मंगळाचा, चौथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन वेळा झाल्यावर २१ होरे होतात. त्यानंतर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा येतो, असे २४ तास पूर्ण होतात. त्यानंतर दुसरा दिवस रवीच्या होऱ्याने सुरू होतो, त्यामुळे शनिवारनंतर रविवार येतो. पुन्हा २४ होरे मोजले की तिसऱ्या दिवसाचा पहिला होरा चंद्राचा म्हणजे सोमाचा. म्हणून रविवारनंतरचा वार सोमवार.
वारांची अन्य नावे
[संपादन]- रविवार - भानुवासर, आदित्यवासर, आदित्यवार; बोली भाषेत आइतवार. उर्दू-हिंदीत इतवार. Sunday.
- सोमवार - इंदुवार (पीर). Monday.
- मंगळवार - भौमवार (मंगल). Tuesday.
- बुधवार - सौम्यवार (बुध). Wednesday.
- गुरुवार - बृहस्पतिवार (जुमेरात). Thursday.
- शुक्रवार - भृगुवासर (जुम्मा). Friday.
- शनिवार - मंदवार (शनीचर, हफ्ता). Saturday
संवत्सर
[संपादन]वर्षाच्या कालगणनेसाठी संवत्सर ही संकल्पना आहे. एक विशिष्ट अनुक्रमांक असलेले संवत्सर वर्षाने संपते आणि पुढचा क्रमांक येतो.
इसवी सन, शक संवत्सर आणि विक्रम संवत ह्या भारतभर वापरात असलेल्या संवत्सर मालिका आहेत.
संवत्सरांची प्रदीर्घ यादी संवत्सर या पानावर आहे.
पंचांगातील पौराणिक कालगणना
[संपादन]६० संवत्सरे (मानवी वर्षे) = १ संवत्सर चक्र
३६० संवत्सरे = १ दिव्य वर्ष
१२०० दिव्य वर्षे = १ कलियुग
२४०० दिव्य वर्षे = १ द्वापारयुग
३६०० दिव्य वर्षे = १ त्रेतायुग
४८०० दिव्य वर्षे = १ सत्ययुग
४ युगे = १ महायुग
७१ महायुगे = १ मनु
१४ मनु = १ कल्प (ब्रह्मदेवाचा एक दिवस)
३६,००० कल्प = ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य
१००० ब्रह्मदेवाची आयुष्ये = वि़ष्णूंची एक घटका
१००० विष्णूच्या घटिका = १ शिवनिमिष
१००० शिवनिमिष = १ महामाया निमिष
महिने
[संपादन]महिन्यातल्या पौर्णिमेला ज्या नक्षत्रात चंद्र बहुतेकवेळा असतो, त्या नक्षत्राचे नाव त्या हिंदू महिन्याला देतात. उदा० चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात (किंवा जवळपासच्या नक्षत्रात) असतो.
- चैत्र : हा शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होतो. पौर्णिमान्त पंचांगात हा १५ दिवस आधीच सुरू होतो. मात्र नव्या शकसंवत्सराचा पहिला दिवस पाडवाच असतो.
जर चैत्राचा महिना अधिकमास असेल तर वर्षारंभ पाडव्याच्याही एक महिना आधी होतो.
चैत्र महिन्याच्या शेवटी शेवटी सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो.
चैत्राला चैत्रिक आणि मधू असे आणखी दोन संस्कृत शब्द आहेत. हिंदीत चैतही म्हणतात. चैत्र पौर्णिमेला चैती (हिंदी) किंवा चैत्री (संस्कृत) ही नावे आहेत.
- वैशाख : या महिन्याला संस्कृतमध्ये माधव आणि राध असे दोन अधिकचे शब्द आहेत. वैशाख पौर्णिमेला वैशाखी म्हणतात.
- ज्येष्ठ (गुजराथीत जेठ) : संस्कृतमध्ये ज्येष्ठ आणि शुक्र.
- आषाढ (गुजरातीत अ़षाढ, मराठी बोलीभाषेत आखाड) (संस्कृतमध्ये शुचि हा अधिकचा शब्द.) (शुक्ल एकादशीला आषाढी)
- श्रावण (हिंदीत सावन) : संस्कृतमध्ये नभस् सुद्धा. (पौर्णिमेला श्रावणी)
- भाद्रपद (गुजरातीत भादवो-भादरवा) (संस्कृतमधील आणखीचे शब्द - प्रौष्ठपद, नभस्य)
- आश्विन (गुजरातीत आसो, संस्कृतमध्ये आश्वयुज्, इष; हिंदीत कुआर, क्वॉंर) (पौर्णिमेला आश्विनी)
- कार्तिक (गुजराती कारतक) (संस्कृतमध्ये ऊर्ज, बाहुल हे जास्तीचे शब्द) (पौर्णिमेला आणि शुक्ल एकादशीला कार्तिकी)
- मार्गशीर्ष (हिंदीत अगहन; गुजरातीत मागशर) (संस्कृतमध्ये सहस् आणि आग्रहायण)
- पौष (बोलीभाषेत पुसाचा महिना) (गुजरातीत पोष) (संस्कृतमध्ये तैष आणि सहस्य)
- माघ (गुजरातीत महा) (संस्कृतमध्ये तपस्) (पौर्णिमेला माघी)
- फाल्गुन (हिंदी बोलीभाषेत फागन; गुजरातीत फागण) (फाल्गुनाला संस्कृतमध्ये तपस्य हाही शब्द आहे)
( आधार - अमरकोश : (१.४.२८१) मार्गशीर्षे सहा मार्ग आग्रहायणिकश्च सः
(१.४.२८२) पौषे तैषसहस्यौ द्वौ तपा माघेऽथ फाल्गुने
(१.४.२८३) स्यात्तपस्यः फाल्गुनिकः स्याच्चैत्रे चैत्रिको मधुः
(१.४.२८४) वैशाखे माधवो राधो ज्येष्ठे शुक्रः शुचिस्त्वयम्
(१.४.२८५) आषाढे श्रावणे तु स्यान्नभाः श्रावणिकश्च सः
(१.४.२८६) स्युर्नभस्यप्रौष्ठपदभाद्रभाद्रपदाः समाः
(१.४.२८७) स्यादाश्विन इषोऽप्याश्वयुजोऽपि स्यात्तु कार्तिके/कार्त्तिके
(१.४.२८८) बाहुलोर्जौ कार्तिकिको.........
पौर्णिमान्त पंचांगांत सर्वच महिने हे अमावास्यान्त पंचांगांतल्यापेक्षा १५ दिवस आधी सुरू होतात.
हिंदू पंचांगात एखाद्या वर्षी एखादा जास्तीचा महिना येतो, त्यावेळी त्याला अधिक महिना म्हणतात. त्याच्या नंतरच्या निज महिन्याचे नाव अधिक महिन्याला असते. पौर्णिमान्त असो की अमावास्यान्त, दोन्ही पंचांगांतले अधिक महिने व त्यांचे शुक्ल-वद्य पक्ष एकाच दिवशी सुरू होतात आणि एकाच वेळी संपतात.
मुसलमानी महिने (मराठी नावे)
[संपादन]मुसलमानी महिना शुक्लपक्षातील चंद्रदर्शनानंतर सुरू होतो. चंद्रदर्शन प्रतिपदेला झाले तर द्वितीयेपासून, आणि नाहीतर (द्वितीयेच्या चंद्रदर्शनानंतर-हे नक्की होते!) तृतीयेपासून सुरू होतो. त्यामुळे प्रत्येक महिन्यात २९ किंवा ३० दिवस असतात. नव्या तिथीची सुरुवात सूर्यास्तानंतर होते.
- मोहरम
- सफर
- रबिलावर
- रबिलाखर
- जमादिलावर
- जमादिलाखर
- रज्जब
- साबान
- रमजान
- सव्वाल
- जिल्काद
- जिल्हेज
मुसलमानी फसली महिने
[संपादन]- आजूर (३० दिवस)
- दय २९ दिवस)
- बहमन (३० दिवस)
- इस्पिंदाद (३० दिवस)
- फरवर्दीन (३१ दिवस)
- आर्दिबेहस्त (३१ दिवस)
- खुर्दाद (३१ दिवस)
- तीर (३१ दिवस)
- अमरदाद (३१ दिवस)
- शेहरेवार (३१ दिवस)
- मेहेर (३० दिवस)
- आबान (३० दिवस)
पारशी महिने
[संपादन]- फरवर्दीन
- आर्दिबेहस्त
- खुरदाद
- तीर
- अमरदाद
- शेहरेवार
- मेहेर
- आबान
- आदर
- दय
- बेहमन
- अस्पंदार्मद
नक्षत्र
[संपादन]नक्षत्रे (Constellations)आणि राशी (Zodiac sign) म्हणजे अवकाशातील विशिष्ट पट्ट्यातील ठळक तारका समूह. सूर्य, चंद्र आणि ग्रह आकाशातून ज्या पट्ट्यातून फिरत फिरत पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात त्या पूर्ण पट्ट्याचे ३६० अंश कल्पून त्या मार्गाचे ३०-३० अंशाचे बारा भाग पाडले आहेत. त्या एका भागाला रास किंवा राशी म्हणतात. तसे २७ भाग पाडले तर प्रत्येक भागात एक अशी २७ नक्षत्रे होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा होतो. ही नक्षत्रे म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूह. त्यातील एका ठळक ताऱ्याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात. प्रत्येक नक्षत्राचे चार पाद (चरण) असतात. त्यामुळे सव्वा दोन नक्षत्रांची म्हणजे नऊ चरणांची एक रास होते.
नक्षत्रातल्या ताऱ्यांनी व्पापलेली आकाशातली जागा आणि ३० अंश आकाशाने व्यापलेली जागा तंतोतंत समान नसते. त्यामुळे नक्षत्राचे काही तारे राशीच्या बाहेर राहिलेले असू शकतात किंवा नक्षत्राच्या ताऱ्यांनी व्यापूनही राशीची थोडीफार जागा रिकामी असू शकते.
२७ नक्षत्रे आणि सूर्याचे विशिष्ट नक्षत्रात प्रवेश करण्याचे दिवस (अंदाजे)
[संपादन]१. अश्विनी - १४ एप्रिल
२. भरणी - २७ एप्रिल
३. कृत्तिका - ११ मे
४. रोहिणी - २५ मे
५. मृग - ८ जून
६. आर्द्रा -२२ जून
६ पुनर्वसू - ६ जुलै
७. पुष्य - २० जुलै
८. आश्लेषा - ३ ऑगस्ट
९. मघा - १७ ऑगस्ट
१०. पूर्वा(फाल्गुनी) - ३० ऑगस्ट
११. उत्तरा(फाल्गुनी) - १३ सप्टेंबर
१३. हस्त - २७ सप्टेंबर
१४. चित्रा - १० ऑक्टोबर
१५. स्वाती - २४ ऑक्टोबर
१६. विशाखा - ६ नोव्हेंबर
१७. अनुराधा - १९ नोव्हेंबर
१८. ज्येष्ठा - ३ डिसेंबर
१९. मूळ - १६ डिसेबर
२०. पूर्वाषाढा - २९ डिसेंबर
२१. उत्तराषाढा - १४ जानेवारी
२२. अभिजित - २१ जानेवारी
२३. श्रवण - २४ जानेवारी
२४. धनिष्ठा - ६ फेब्रुवारी
२५. शततारका - १९ फेब्रुवारी
२६. पूर्वाभाद्रपदा - ४ मार्च
२७. उत्तराभाद्रपदा - १८ मार्च
२८. रेवती - ३१ मार्च
२७पैकी पावसाची ९ नक्षत्रे
[संपादन]मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा-फाल्गुनी, उत्तरा-फाल्गुनी आणि हस्त. या नऊ नक्षत्रांत सूर्य असताना भारतात नित्यनेमाने पाऊस पडण्याची अपेक्षा असते. एखादे नक्षत्र कोरडे गेल्यास दुष्काळ संभवतो. म्हणून '२७ वजा नऊ बरोबर शून्य' अशी धारणा आहे.
रास, नक्षत्रे आणि त्यांचे चरण
[संपादन]एका राशीत सव्वा दोन नक्षत्रे-नऊ नक्षत्रचरणे- येतात. एका राशीत ३० अंश असतात. अश्या बारा राशी आहेत. एका नक्षत्रात चार चरणे असतात.
मेष = अश्विनीचे ४ चरण, भरणीचे ४ आणि कृत्तिकाचा पहिला चरण.
वृषभ = कृत्तिकाचे शेवटचे ३ चरण, रोहिणीचे ४ चरण आणि मृग नक्षत्राचे पहिले दोन चरण.
मिथुन = मृग नक्षत्राचे मागले २ चरण, आर्द्राचे ४ चरण आणि पुनर्वसूचे पहिले ३ चरण.
कर्क = पुनर्वसूचा चौथा चरण, पुष्यचे ४ चरण आणि आश्लेषाचे ४ चरण.
सिंह = मघाचे ४ चरण, पूर्वाफाल्गुनीचे ४ चरण आणि उत्तराफाल्गुनीचा पहिला चरण.
कन्या = उत्तराफाल्गुनीचे उरलेले ३ चरण, हस्त नक्षत्राचे ४ चरण आणि चित्राचे पहिले २ चरण.
तुला = चित्राचे बाकीचे २ चरण, स्वातीचे ४ चरण आणि विशाखा नक्षत्राचे पहिले तीन चरण.
वृश्चिक = विशाखाचा चौथा पाद, अनुराधाचे ४ आणि ज्येष्ठा नक्षत्राचे चारही ४ चरण.
धनु = मूळ नक्षत्राचे ४ चरण, पूर्वाषाढाचे ४ आणि उत्तराषाढाचा पहिला चरण.
मकर = उत्तराषाढाचा दुसरा, तिसरा आणि चौथा पाद, श्रवण नक्षत्राचे ४ आणि धनिष्ठाचे पहिले दोन पाद.
कुंभ = धनिष्ठाचे मागचे २ चरण, शततारकाचे ४ चरण आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचे पहिले तीन चरण.
मीन = पूर्वाभाद्रपदाचा चौथा, उत्तराभाद्रपदाचे ४ आणि रेवती नक्षत्राचे ४ चरण.
२८वे नक्षत्र
[संपादन]अभिजित नावाचे फक्त १९ घटी असलेले २८वे नक्षत्र, उत्तराषाढाच्या शेवटच्या १५ घटी आणि श्रवण नक्षत्राच्या सुरुवातीच्या ४ घटी मिळून बनते असे मानले गेले आहे. अभिजितचे चारही चरण मकर राशीत असल्याचे सांगितले जाते. एक घटी म्हणजे नक्षत्राचा साठावा भाग.
अधिक माहिती
[संपादन]बृहत्संहितेत नक्षत्रांचे त्यांच्या गुणांवरून ध्रुव, तीक्ष्ण, चर, मृदु, लघु, उग्र व मृदुतीक्ष्ण असे ७ गट पाडले आहेत. यांशिवाय अधोमुख, ऊर्ध्वमुख, तिर्यङ्मुख, अंध, मंदाक्ष, मध्याक्ष व सुलोचन असेही नक्षत्रांचे प्रकार मानले आहेत.
मृग, चित्रा आणि घनिष्ठा या नक्षत्रांना द्विपाद नक्षत्रे म्हणतात. भद्रा तिथीला यांपैकी एखादे नक्षत्र असेल तर द्विपुष्कर योग होतो. द्विपाद नक्षत्राचे दोन पाय एका राशीत आणि उरलेले दोन पाय पुढल्या राशीत असतात.
कृत्तिका, पुनर्वसु, पूर्वा(फाल्गुनी), उत्तराषाढा आणि पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रांचे तीन पाय एका राशीत आणि चौथा पाय वेगळ्या राशीत असतो म्हणून यांना त्रिपाद नक्षत्रे म्हणतात. ज्या दिवशी भद्रा तिथी, अधिक मंगळवार, शनिवार किंवा रविवार यांपैकी एक वार व एखादे त्रिपाद नक्षत्र असेल तर त्रिपुष्कर योग होतो.
योग
[संपादन]चंद्र व सूर्य यांच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास जेवढा कालावधी लागेल त्याला योग म्हणतात. असे एकूण २७ योग आहेत.
योगांची नावे
[संपादन]`१. विष्कम्भ २. प्रीति ३. आयुष्मान ४. सौभाग्य
५. शोभन ६. अतिगंड ७. सुकर्मा ८. धृति
९. शूल १०. गंड ११. वृद्धि १२. ध्रुव
१३. व्याघात १४. हर्षण १५. वज्र १६. सिद्धि
१७.व्यतिपात १८. वरीयन १९. परीघ २०. शिव
२१. सिद्ध २२. साध्य २३. शुभ २४. शुक्ल
२५. ब्रह्म २६. एन्द्र २७. वैधृति
योग म्हणजे काय?
[संपादन]सूर्य रोज जवळपास ५९ कला एवढे अंतर चालून जातो, तर चंद्र रोज ७९० कला एवढे अंतर चालून जातो, दोघांच्या चालून गेलेल्या अंतराची एकूण बेरीज जर ८०० कला एवढी झाली की, एक योग पूर्ण होतो. असे सत्तावीस योग आहेत. पहिला योग विष्कंभ आहे. पंचांगात योगाची समाप्तीची वेळ दिलेली असते. नक्षत्र व योगाची सुद्धा वृद्धी व क्षय होतो. वैधृती व व्यतिपात हे दोन योग शुभकार्यास वाईट समजले जातात . या योगावर जन्म झाल्यास शांती करावी असे सांगितले जाते.
अन्य योग
[संपादन]जन्म कुंडलीमध्ये दोन किंवा अधिक ग्रहांची युती, दृष्टी किंवा भाव यांपैकी काही असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार त्या कुंडलीत अशुभ योग आहे असे समजले जाते. अशा शुभ-अशुभ योगांची योगांची यादी : -
अंगारक योग, अधम योग, अधियोग, अनफा, अमलकीर्ती योग, अमृतयोग, अमृतसिद्धियोग, अरिष्ट योग, अल्पायु योग, उत्पातयोग, उभयचरी, कपिलाषष्टी योग, काण योग, कालदंड योग, कुज योग, केमद्रुम योग, गजकेशरी योग, गजच्छाया योग, गदा योग, गुरुपुष्य योग, ग्रहण योग, चंद्रमंगल, चंद्राधि योग, चांडाल योग, जाचकयोग, त्याज्य योग, दारिद्ऱ्य योग, त्रिपुष्कर योग, दग्धयोग, द्विपुष्कर योग, दुर्धरा, धनयोग, नाभस योग (हे पाराशर स्मृतीत सांगितल्याप्रमाणे मुळात ३२ आहेत, पण त्यांच्यातील मिश्रणामुळे यांची संख्या १,८००हून जास्त होते.) पंचक योग, बुध-आदित्य योग, भद्रयोग, मालव्य योग, मूसल योग, मृत्युयोग, यमघंटयोग, रविपुष्य योग, रवियोग, रक्ष योग, राजयोग, रुचक योग, लग्नाधि योग, लुंबक योग, वज्र योग, वर्जित योग, वाशी, विषयोग (पुनर्फू योग), वेशी, वैधव्य योग, षड्यंत्र योग, सर्वार्थसिद्धियोग, संवर्तयोग, सस योग, सुनफा, हंस योग, हुताशन योग, ज्ञानयोग.
नाभस योग
[संपादन]महर्षी पाराशर यांनी जे ३२ नाभस योग सांगितले आहेत त्यांचे वर्गीकरण त्यांनीच चार उपवर्गात केले आहे. ते असे :-
१. आकृति योग : अर्धचन्द्र, कमल, कूट, गदा, चक्र, छत्र, दंड, धनु, नौका, यव, यूप, वापी, विहग, वज्र, शकट, शक्ति, शर, शृंगाटक, समुद्र, हल (एकूण २०).
२. आश्रय योग : नल, मुसल व रज्जू (एकूण ३).
३ दल योग : माला व सर्प (एकूण २).
४ संख्या योग : केदार, गोल, दाभ, पाश, युग, वीणा, शूल (एकूण ७).
जन्मकुंडलीत योग
[संपादन]असे सांगितले जाते की, व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राच्या स्थानावरून तीन प्रकारचे शुभ योग बनतात, अनफा, सुनफा आणि दुर्धरा. शिवाय एक अशुभ योग बनतो, त्याचे नाव आहे केमद्रुम. हा योग असेल तर बरेचसे शुभ योग निष्फळ होतात. हा योग माणसाला मानसिक पीड़ा और दारिद्ऱ्य देतो, अशी मान्यता आहे. कुंडलीत चंद्राच्या आजूबाजूला कोणताही ग्रह नसेल आणि चंद्रस्थानावर कुठल्याही ग्रहाची दृष्टी नसेल तर केमद्रुम योग बनतो. या योगाव्यतिरिक्त जन्मकुंडलीतील ग्रहांच्या स्थानानुसार असंख्य योग बनतात. बरेच शुभ असतात, पण काही अशुभही असतात.
अशुभ योग
[संपादन]अरिष्ट योग, अरिष्ट मति भ्रम योग , केमद्रुम योग, दरिद्र योग, निर्भाग्य योग, विषप्रयोग योग, वंचन चोर भीति योग, देहकष्ट योग, कृसंग योग, परान्न योग, वगैरे.
करण
[संपादन]करण हादेखील पंचांगातला एक कालावधी आहे. तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण. अशी एकूण सात करणे आहेत. बव, बालव, कौलव, तैतिल, गर, वणिज, विष्टी. एखाद्या तिथीचा पूर्वार्ध म्हणजे एक करण व उत्तरार्ध म्हणजे पुढचे करण. ही करणे चर म्हणजे गतिशील असून, एका पाठोपाठ एक अशी येतात.
शिवाय अजून ४ करणे आहेत. ती स्थिर आहेत. वद्य चतुर्दशीच्या उत्तरभागी येणारे शकुनी; अमावास्येच्या पूर्वभागी चतुष्पाद; उत्तरभागी नाग आणि प्रतिपदेच्या पूर्वभागी येते ते किंस्तुघ्न, अशी ही जास्तीची चार करणे आहेत.
विष्टी हे या ११ करणांपैकी ७वे करण. याचेच नाव भद्रा. हे करण सदैव गतिशील असते. विष्टी करण असलेला भद्रा काल (नाव भद्रा असले तरी) अशुभ समजला जातो. पंचांगात याचा प्रारंभकाल आणि समाप्तिकाल देण्याचा परिपाठ आहे. त्यांना अनुक्रमे भद्रा प्रवृत्ती आणि भद्रा निवृत्ती असे म्हणतात. पंचांगात हा काल भ.प्र. आणि भ.नि. अशा संक्षिप्त रूपात दर्शवतात.
कथा
[संपादन]पुराणांनुसार भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनीची बहीण आहे. शनीप्रमाणेच ही तापट आहे. भद्रेचा स्वभाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रह्मदेवाने तिला विष्टि करणात स्थान दिले आहे.
ज्योतिषीय संकल्पना
[संपादन]ज्योतिष शास्त्रानुसार वेगवेगळ्या राशींनुसार भद्रा ही स्वर्ग, नरक व पृथ्वी या तिन्ही लोकांत फिरते. जेव्हा चंद्र हा कर्क, सिंह, कुंभ किंवा मीन राशीत असतो आणि विष्टि करण असते, तेव्हा भद्रा ही पृथ्वीलोकात असते आणि या काळात शुभ कार्य करू नये, असे सांगितले जाते.
पर्व
[संपादन]धार्मिक कृत्ये करायच्या दिवसाला पंचागात पर्व असे म्हणलेले असते. ही अनेक आहेत; अमावास्या, अर्धोदय पर्व, चंद्र/सूर्य ग्रहण, चातुर्मास, महोदय पर्व, महाशिवरात्री पर्व, संक्रांति, वगैरे. पर्व म्हणजे सण नव्हे.
अर्धोदय/महोदय पर्व : जर पौष महिन्यातली अमावास्या (मौनी अमावास्या), रविवारी आली आणि त्या दिवशी व्यतिपात योग असून चंद्र श्रवण नक्षत्रात असेल तर त्या दिवसाला अर्धोदय पर्व म्हणतात. यात किंचित न्यून असेल तर महोदय पर्व मानतात.
प्रकार
[संपादन]पंचांगाचे मुख्य दोन प्रकार सायन आणि निरयन.
विविध पंचांगे
[संपादन]- अमेरिकन एफेमेरीज आणि नाॅटिकल अल्मानक (सन १९८१पासूनचे नवीन नाव - The Astronomical Almanac)
- असली पंचांग
- आनंदी वास्तू (आनंद पिंपळकर निर्मित)
- श्री आर्यभट्ट पंचांगम्
- इंडियन एफेमेरीज (इंडियन नॉटिकल अल्मानक- भारत सरकारचे पंचांग)
- कालनिर्णय पंचांग
- श्रीकृष्ण पंचांग (जयपूर/कोटा-राजस्थान)
- कृष्णन पंचांग
- कृष्णमूर्ती पंचांग
- गजेंद्रविजय पंचांग
- श्रीगणेश मार्तंड सौर पंचांग (हे पंचांग उत्तराखंडमधील कुमाऊं प्रदेशात लोकप्रिय आहे. या पंचांगाची सुरुवात कै. राम दत्त जोशी यांनी इ.स. १९०६ साली केली.)
- गीता पंचांग जंत्री
- चिंताहरी जंत्री (भाग्योदय पंचांग, वाराणसी))
- जन्मभूमी पंचांग - गुजरात, मुंबई
- जैन तेरापंथ पंचांग
- टिळक पंचाग - पुणे
- ढवळे (बृहत्) पंचांग - मुंबई
- तीर्थंकर वर्धमान जैन पंचांग
- दाते पंचांग - सोलापूर
- दाते बृहत् पंचांग (सोलापूृर)
- दाते निरयन एफेमेरिज (ए.डी. दाते), सोलापूर
- दाते पंचवार्षिक आणि दशवार्षिक पंचांगे (२२ मार्च १९३९पासून)
- देशपांडे पंचांग (सूर्यसिद्धान्तीय पंचांग, संपादक -पं. गौरव रवींद्र देशपांडे, पुणे)
- धनलक्ष्मी पंचांग
- The Nautical Almanac (Her Majesty Nautical Almanac Office, in United Kingdomद्वारा प्रकाशित)
- निर्णयसागर पंचांग (मुंबई)
- पंचांगदिवाकर (देवी दयालू स्थापित)
- बंगाली पंचांग
- भाग्योदय पंचांग (चिंताहरी जंत्री, वाराणसी)
- मंगलम् पंचांग
- महालक्ष्मी पंचांग (लाटकर पंचांग)
- महेंद्र जैन पंचांग (बंद झाले)
- मॉडर्न जैन पंचांग
- मारवाडी पंचांग
- श्री मार्तंड पंचांगम्
- याज्ञिक प्रत्यक्ष पंचांग
- राजंदेकर महाराष्ट्रीय पंचांग - नागपूर, विदर्भ
- लाला रामनारायन पंचांग - मध्य प्रदेश -(इ.स.१९३३पासून)
- रुईकर पंचांग - मुकुंद उद्धव रुईकर, कराड
- रुपेश ठाकुर प्रसाद पंचांग
- लघु पंचांग
- लाटकर पंचांग - कोल्हापूर
- श्री विश्वविजय पंचांगम् (सोलन-हिमाचल प्रदेश)
- वैदर्भ पंचांग
- व्यास पंचांग
- श्री व्रजभूमि पंचांगम्
- श्रीधर शिवलाल मराठीतले मारवाडी पंचांग (श्रीधर शिवलाल, मुंबई-जोधपूर)
- सनातन पंचांग
- सीमंधर स्वामी जैन पंचांग
- श्री सुभा़ष हिंदी पंचांग (इ.स. १९७१पासून)
- दैनिक सूर्योदय-सूर्यास्त (ए.डी. दाते)
- सोमण पंचांग
- सोमण नॅनो पंचांग
पंचांगवाद - सायन/निरयन
[संपादन]निरयन पक्षाचे म्हणणे असे की, क्रांतिवृत्तावरील एक विशिष्ट बिंदू (संपात बिंदू) स्थिर मानून ते राशीचक्राचे आरंभस्थान मानावे, व त्यानुसार पंचांगाचे गणित करावे. सायन पक्षाच्या मते हा संपात बिंदू स्थिर नसल्याने आरंभस्थान चल आहे. त्याचे चलन वर्षाला ५०.२ विकला आहे.
निरयन पक्षात काही उपपक्ष आहेत - झीटा किंवा रैवत पक्ष, ग्रहलाघव, चित्रा, मद्रास इत्यादी. हा वाद १००हून अधिक वर्षे चालू आहे. लोकमान्य टिळक हे रैवत पक्षाचे. या पक्षाच्या शुद्ध पंचांग प्रवर्तक मंडळाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष. हे पंचांग केरुनाना छत्रे व आबासाहेब पटवर्धन यांनी सन १८६५मध्ये सुरू केले. त्यांच्या गणिताने रेवती नक्षत्रातला झीटा पिशियम तारा हे आरंभस्थान मानले आहे. हे पंचांग 'टिळक पंचांग' म्हणून ओळखले जाते.
आंतरजालावरील पंचांगे
[संपादन]- कुंडलीदर्पण
- सावित्री ठाकुर प्रसाद यश पंचांग (कानपूर)
- दाते पंचांग
- दृक्पंचांग
- पंचांग
- मायपंचांग.com
- लाईव्ह हिंदुस्तान डाॅट काॅम - शुभ पंचांग
- वेब दुनिया पंचांग
भारतीय राष्ट्रीय (सरकारी) पंचांगातील महिने
[संपादन]हे हिंदू पंचांगांतील महिन्यांपेक्षा वेगळ्या दिवशी सुरू होतात. भारतीय पंचांगातील मासिक दिवस आणि महिना सुरू होण्याचा दिवस :-
- १) चैत्र ३०/३१ दिवस २२ मार्च; लीप वर्ष असताना २१ मार्च. ज्या इसवी सनाला ४ने भाग जातो, ते लीप वर्ष असते.
- २) वैशाख ३१ दिवस
- ३) ज्येष्ठ ३१ दिवस
- ४) आषाढ ३१ दिवस
- ५) श्रावण ३१ दिवस
- ६) भाद्रपद ३१ दिवस
- ७) आश्विन ३० दिवस
- ८) कार्तिक ३० दिवस
- ९) मार्गशीर्ष ३० दिवस
- १०) पौष ३० दिवस
- ११) माघ ३० दिवस
- १२) फाल्गुन ३० दिवस
राफेल’चे एफेमेरीज हे खऱ्या अर्थाचे सायन पंचांग असते. पाश्चात्त्य ज्योतिष हे सायनाधारित आहे. इंडियन एफेमेरीज हे संपूर्ण भारतीय पंचांग आहे. भारत सरकार ते दरवर्षी प्रसिद्ध करते. त्याचा उपयोग अन्य पंचांगकर्ते आपापली पंचांगे बनवताना करतात. अमेरिकन एफेमेरीज हेही एक प्रसिद्ध पंचांग आहे.
कालनिर्णय हे निरयन पंचांग आहे.
सूर्यसिद्धान्तावरून बनवली जात असलेली काही भारतीय पंचांगे
[संपादन]- सूर्यसिद्धान्तीय आदित्य पंचांग
- ऋषिकेश पंचांग
- गणेश आप्पा पंचांग
- राजेश्वरशास्त्री यांचे धारवाड पंचांग
- पारनेरकर महाराज पुरस्कृत पारनेर पंचांग
- वंटी कुप्पल पंचांग, वगैरे.
- काशी विश्वविद्यालय प्रकाशित पंडित मदनमोहन मालवीय पुरस्कृत विश्वपंचांग
- दक्षिणेकडील शृंगेरी शंकराचार्यांच्या शारदा पीठावरून प्रसिद्ध होणारे पंचांग
- महाराष्ट्रातील एकमेव धर्मशास्त्रसंमत सूर्यसिद्धान्ताधारित देशपांडे पंचांग
- उत्तरादि मठाचे सूर्यसिद्धान्त पंचांग
- हालाडी पंचांग
मराठी पंचांग छापायची सुरुवात
[संपादन]शके १९३८मध्ये (इ.स. २०१६) या वर्षी छापील पंचांगाचा शतकोत्तर अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. पूर्वी छपाईची कला उपलब्ध नसल्याने पंचांगे ही हस्तलिखित तयार करून त्यातील माहिती तोंडीच सर्वाना करून दिली जात असे. छापील साहित्याला तत्कालीन कर्मठ लोक -शाईत प्राण्यांची चरबी मिसळलेली असते- हे कारण देऊन हातही लावत नसत. अशा काळात धर्माशी संबधित साहित्य उत्तम व सुबकपणे छापले तर ते अशा धर्ममार्तंडाच्या हातात घेतले जाऊन हळूहळू गैरसमज निवळेल असा दूरगामी विचार गणपत कृष्णाजी या मराठी माणसाने केला. हे क्रांतिकारक तंत्रज्ञान रुढ करण्यासाठी पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यानी शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले. त्यासाठी त्यानी संपूर्ण पंचांग स्वतःच्या अक्षरात लिहिले होते. त्या पहिल्या छापील पंचांगाचे गणित रखमाजी देवजी मुले यांनी केले होते.[१] छापील पंचांगाच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त २०१६ सालच्या या नूतन शकवर्षात 'पंचांग' या विषयावर दा.कृ. सोमण ह्यांनी पंच्याहत्तर व्याख्याने दिली होती.[२]
कालगणना
[संपादन]- ६० वर्षे (संवत्सरे) = १ संवत्सर चक्र
- ३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे = १ दिव्य वर्ष
- १२०० दिव्य वर्षे = १ कलि युग
- २४०० दिव्यवर्षे = १ द्वापर युग
- ३६०० दिव्य वर्षे = १ त्रेता युग
- ४८०० दिव्य वर्षे = १ सत्य युग
- ४ युगे = १ महायुग
- ७१ महायुगे = १ मनु
- १४ मनु = १ कल्प (ब्रह्मदेवाचा एक दिवस)
- ३६००० कल्पे = ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य
- १००० ब्रह्माची आयुष्ये = विष्णूची एक घटका
- विष्णूच्या १००० घटिका म्हणजे १ शिवनिमिष
- १००० शिवनिमिषे = १ महामाया निमिष
पहा : तिथी - पंचानां अंगानाम् समाहारः -पंचांग
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ "मराठीतील पहिल्या छापील पंचांगाचे कर्ते दुर्लक्षितच". लोकसत्ता दैनिक. २७ मार्च, इ.स. २०१६.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "शालिवाहन शक १९३८ या नववर्षांत दोनदा गुढी पाडवा". लोकसत्ता दैनिक. ६ एप्रिल, इ.स. २०१६.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)