भवानी मंदिर (राजकीय पत्रक)
भवानी मंदिर हे क्रांतिकारक अरविंद घोष यांनी १९०५ मध्ये निनावीपणे लिहिलेले एक राजकीय पत्रक होते.[१] ही पुस्तिका बंगालच्या फाळणीच्या वेळी तयार करण्यात आली होती. अरविंद घोष यांनी ती पुस्तिका लिहिली तेव्हा ते बडोदा संस्थानाच्या सेवेत कार्यरत होते.
बंगाली लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८८२ मध्ये आनंदमठ ही कादंबरी लिहिली होती. त्यापासून प्रेरणा घेत अशा मंदिराच्या उभारणीची संकल्पना श्री. बारीन्द्र घोष (अरविंद घोष यांचे धाकटे बंधू व क्रांतिकारक) यांच्या मनात निर्माण झाली. त्यासाठीचे लेखन अरविंद घोष यांनी केले. [१]
पुस्तिकेचा आशय
[संपादन]भारतमाता हीच भवानी देवी अशी संकल्पना यामध्ये मांडण्यात आलेली आहे. देशभक्त संन्यासी किंवा ब्रह्मचारी लोकांना स्वातंत्र्य मिळवण्यात सहभागी होता यावे या दृष्टीने, त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी अरविंद घोष यांनी एका क्रांतिकारी समाजाची संकल्पना ‘भवानी मंदिर’ या पुस्तिकेमध्ये प्रस्तावित केली होती.
भवानी मंदिर ही पुस्तिका म्हणजे एक राजकीय जाहीरनामा आहे. यामध्ये घोष यांनी भारतीयांमध्ये राजकीय इच्छाशक्ती आणि एकता नसल्याचा निषेध केला आहे. युरोपीय शक्तींशी स्पर्धा करण्यासाठी ज्या जपानने स्वतःमध्ये परिवर्तन केले, त्याचे उदाहरण त्यांनी येथे दिले आहे. यामध्ये त्यांनी भारतीयांना राष्ट्रदेवतेच्या सेवेत पूर्णपणे वाहून घेण्याचे आवाहन केले आहे.[२]
भवानी मंदिर निर्माण करण्याची कल्पना श्री. अरविंद घोष यांनी ‘राष्ट्रमत’चे संपादक श्री. हरिभाऊ मोडक आणि वसईचे वकील श्री. काकासाहेब पाटील यांच्याकडे मांडली होती. परंतु बंगालच्या विभाजनामुळे परिस्थितीने वेग घेतला आणि भवानी मंदिराची संकल्पना अमूर्तच राहिली. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‘हिंदुस्थान स्टँडर्ड’मध्ये ऑक्टोबर १९५६ मध्ये ती पुस्तिका पुनर्प्रकाशित करण्यात आली.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ Sri Aurobindo (2002). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
- ^ "Bhawani Mandir by Aurobindo Ghose". INDIAN CULTURE (इंग्रजी भाषेत). 2023-04-29 रोजी पाहिले.
- ^ "बंदे मातरम्". अभीप्सा मराठी मासिक. ऑक्टोबर २०२३.