Jump to content

प्रार्थना आणि ध्यान (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीमाताजी लिखित 'प्रेअर्स अँड मेडिटेशन्स' [] या ग्रंथातील निवडक प्रार्थनांचा अनुवाद समाविष्ट असलेले पुस्तक म्हणजे प्रार्थना आणि ध्यान. मुळात या प्रार्थना फ्रेंच भाषेत आहेत. यातील काही निवडक प्रार्थना श्रीअरविंद यांनी इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत. श्रीमती विमल भिडे यांनी हा अनुवाद केला आहे.

लेखनकाळ

[संपादन]
प्रार्थना आणि ध्यान
लेखक श्रीमाताजी
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)Prayers and Meditations
अनुवादकविमल भिडे
भाषाफ्रेंच-मराठी
देशभारत
साहित्य प्रकारदैनंदिनी
प्रकाशन संस्थाश्रीअरविंद आश्रम
प्रथमावृत्ती१९६९
चालू आवृत्ती२००८
मालिकाश्रीमातृ-जन्म-शताब्दी ग्रंथमाला, पुष्प चवथे
पृष्ठसंख्या६६

योगसाधना करत असताना आलेल्या अनुभवांच्या नोंदी श्रीमाताजींनी १९१२ ते १९१७ या कालावधीत केल्या होत्या. त्यातील ३१३ प्रार्थना श्रीमाताजींनी निवडल्या आणि त्यातून 'प्रेअर्स अँड मेडिटेशन्स' या ग्रंथाची निर्मिती झाली. १९३२ साली फ्रेंचमध्ये तर १९४१ साली त्या इंग्रजीमध्ये प्रकाशित झाल्या.

उपयुक्तता

[संपादन]

मुख्यत: पुढील तीन प्रकारच्या साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, असे याच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे.

  • भगवंताकडे नेणारा मार्ग शोधून काढण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना
  • आत्मविजय मिळविण्याची जे साधना करत आहेत त्यांना
  • भगवत्कार्याला वाहून घेण्याची ज्यांची अभीप्सा आहे त्यांना []

पुस्तकाचे आशयसूत्र

[संपादन]

श्रीमाताजी जेव्हा प्रार्थना आणि ध्यान दैनंदिनी रूपात लिहीत होत्या तेव्हा त्यांची आंतरिक अवस्था कशी होती? त्यांची भूमिका काय होती ते लक्षात घेतल्यास या पुस्तकाचा आशय नीट लक्षात येतो.

'प्रार्थना आणि ध्यान' लिहिताना श्रीमाताजींची आंतरिक अवस्था बहुस्तरीय होती.

  • त्यांनी या प्रार्थना ज्या जाणिवेतून लिहिल्या आहेत, ती जाणीव 'अगदी बालपणातही आंतरिकरित्या मानवी पातळीच्या पलीकडची' होती.
  • प्रार्थनांची रचना होण्यापूर्वीच त्यांच्या ठायी गहन आध्यात्मिक ज्ञान विकसित झालेले असल्यामुळे त्या एकाच वेळी पार्थिव चेतना आणि उच्च दिव्य चेतना या दोन्हींमध्ये वास्तव्य करत होत्या आणि त्या पार्थिव चेतनेच्या संतुलनात सुस्थिर राहून उच्च दिव्य चेतनेच्या संतुलनाप्रति प्रार्थना करत होत्या.
  • दैनंदिनी लिहिणे ही एक आध्यात्मिक निकड म्हणून त्यांना जाणवली होती, त्यामुळे त्यांचे आंतरिक अनुभव पूर्ण आणि स्थिर झाले.
  • त्या पूर्ण शरणागती आणि आंतरिक शून्यतेच्या अवस्थेत होत्या, सर्व मानसिक बंधनांपासून मुक्त होऊन, "जे शब्दांत व्यक्त होत नाही पण जे 'आहे' त्या गोष्टीच्या सार्वभौम शांतीत" विसावल्या होत्या.
  • त्या पृथ्वी-चेतनेला रूपांतरित करण्याच्या सक्रिय साधनेत मग्न होत्या  आणि त्याअंतर्गत कार्य करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक तिच्या मर्यादा स्वीकारल्या होत्या.
  • त्याच वेळी श्रीमाताजी मानवजातीसमोर आकांक्षा, समर्पण आणि ईश्वराप्रति प्रार्थनेचा मार्ग आदर्श म्हणून सादर करत होत्या.

या सर्व परिस्थितींमुळे 'प्रार्थना आणि ध्यान'हा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनतो. तो केवळ मानवाच्या आध्यात्मिक शोधाची नोंद नसून, जगाच्या परिवर्तनासाठी पार्थिव अस्तित्वाच्या परिस्थितीत कार्यरत असलेल्या एका दिव्य चेतनेचा जाणीवपूर्वक केलेला आत्माविष्कार आहे, असे म्हणता येते.

संदर्भ

[संपादन]
  1. The Mother (2003). Prayers and Meditations. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 01 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-670-4.
  2. The Mother (१९८२). Prayers and meditations [प्रार्थना आणि ध्यान]. विमल भिडे द्वारे भाषांतरित. पुडुचेरी: श्रीअरविंद आश्रम.