एन. चंद्रबाबू नायडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एन. चंद्रबाबू नायडू
default

कार्यकाळ
८ जून २०१४ – २३ मे २०१९
राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहन
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील वाय.एस. जगनमोहन रेड्डी
मतदारसंघ कुप्पम
कार्यकाळ
१ सप्टेंबर १९९५ – १३ मे २००४
मागील एन.टी. रामाराव
पुढील वाय.एस. राजशेखर रेड्डी

जन्म २० एप्रिल, १९५० (1950-04-20) (वय: ७३)
नरवरी पल्ले, मद्रास राज्य (आजचा आंध्र प्रदेश)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष तेलुगू देशम पक्ष
धर्म हिंदू
नायडूंच्या काळात विकसित केली गेलेली हायटेक सिटी

नारा चंद्रबाबू नायडू (तेलुगू: నారా చంద్రబాబునాయుడు, २० एप्रिल १९५०) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्रीतेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रसिद्ध तेलुगू नट व माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव ह्यांचे जावई असलेले नायडू १९९५ साली सासऱ्यांविरुद्ध बंड करून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर आले. आपल्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आंध्र प्रदेशात अनेक सुधारणा घडवून आणल्या. राजधानी हैदराबादला भारतामधील आघाडीचे माहिती तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी नायडूंनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. हैदराबादला देशातील सर्वात आघाडीच्या शहरांपैकी एक मानले जाते ह्याचे श्रेय प्रामुख्याने नायडू ह्यांच्याकडे जाते. त्यांच्या काळात ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन इत्यादी सामर्थ्यशाली नेत्यांनी हैदराबादला भेट दिली. मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपले अमेरिकेबाहेरचे पहिले कार्यालय उघडण्यासाठी हैदराबादची निवड केली.

हैदराबाद शहरावर व माहिती तंत्रज्ञान उद्योगावर संपूर्ण लक्ष केंद्रित करताना आंध्र प्रदेशमधील इतर ग्रामीण भागांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप नायडू ह्यांच्यावर झाले. विशेषतः शेती उद्योगाकडे नायडूंनी पाठ फिरवल्यामुळे संतापलेल्या आंध्र प्रदेशच्या जनतेचा रोष पत्करून २००४ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नायडू ह्यांना पराभूत व्हावे लागले.

सुमारे १० वर्षे राजकारणामध्ये निष्क्रिय राहिल्यानंतर २०१४ साली आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाल्यानंतर घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तेलुगू देशम पक्षाला १७५ पैकी १०२ जागा मिळाल्या. ८ जून २०१४ रोजी नायडू पुन्हा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर आले. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदीराष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ देणाऱ्या तेलुगू देशमला १६ लोकसभा जागांवर विजय मिळाला. २०१९ आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूकीमध्ये तेलुगु देसम पक्षाला केवळ २५ जागांवर विजय मिळवता आला. वाय.एस. जगनमोहन रेड्डी ह्यांच्या नेतृत्वाखाली वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाने १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवून आंध्र प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली.

अन्य[संपादन]

चंद्रबाबूंचे नाव अनेकदा चंद्राबाबू असे लिहिले जाते.

इ.स. १९७४मध्ये चंद्राबाबू यांनी 'एन. जी. रंगा यांची अर्थनीती' या विषयातील पीएच.डी. अर्धवट सोडली होती.[१]

चंद्राबाबू नायडू यांच्यावरील मराठी पुस्तके[संपादन]

  • एन्. चंद्राबाबू नायडू - रोखठोक (आत्मकथन, मूळ इंग्रजी, लेखिका शेवंती निनान, मराठी अनुवाद - चंद्रशेखर मुरगुडकर)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ दीपक चित्रे. अर्धपक्का आकडेतज्ज्ञ -Maharashtra Times. Maharashtra Times. 25-04-2018 रोजी पाहिले. प्रसिद्धीमाध्यमांत 'आंध्रचा भाग्यविधाता' असे वर्णन होणाऱ्या चंद्राबाबूंना आंध्रच्याच जनतेने २००४मध्ये सत्ताउतार केले. अर्थविषयक पीएच.डी.चे शिक्षण अर्ध्यावर सोडलेल्या चंद्राबाबूंना शहरी आर्थिक प्रगतीची आकडेमोड उत्तम जमली होती |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]