वर्णनात्मक भाषाशास्त्र
भाषाशास्त्र [विशिष्ट अर्थ पहा] |
---|
तात्विकभाषाशास्त्र |
वर्णनात्मक भाषाशास्त्र |
उपयोजित भाषाशास्त्र |
संबधित लेख |
दालन |
वर्णनात्मक भाषाविज्ञानास एककालिक वर्णनात्मक विज्ञान असेही म्हणतात. या भाषाविज्ञानात कोणत्याही एकाच कालखंडातील व बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास केला जातो. एकाच कालखंडातील भाषा अभ्यासासाठी घेतल्यामुळे या पद्धतीला 'एककालिक अभ्यासपद्धती' असेही म्हटल्या जाते. अ एकाच काळातील भाषेचे वर्णन केले जाते म्हणून त्यास 'वर्णनात्मक भाषाविज्ञान' असे म्हणतात.
आधुनिक भाषाविज्ञानात ऐतिहासिक पद्धतीचे विश्लेषण टाळून वैज्ञानिक पद्धतीच्या संकल्पना वा भाषातत्त्वे विकसित करणे ही भूमिका वर्णनात्मक भाषाविज्ञानाने स्वीकारली आहे. भाषेच्या एककालिक अभ्यासाला महत्त्व आणि त्याच्या संरचनेचा अभ्यास हा वर्णनात्मक भाषाविज्ञानाचा विशेष होय.
फेर्दिना द सोस्यूर या स्विस अभ्यासकाने आधुनिक भाषाविज्ञानाचा पाया घातला असे म्हणले जाते. त्याने भाषाभ्यासात रूप व्यवस्था व संरचना या अमूर्त संकल्पनांना महत्त्व दिले. तसेच पारंपरिक व्याकरणाच्या मूल्यमापनाला विरोध करून ऐतिहासिक दृष्टिकोणापेक्षा एककालिक व संरचनात्मक भाषाविल्शेषणाचे विवेचन केले. भाषा एक चिन्हव्यवस्थाआहे, असे त्याने प्रतिपादन केले. अशाप्रकारे भाषेच्या चिन्हव्यवस्थेचे श्रेय सोस्यूरकडेच जाते.[१]
सोस्यूरचे योगदान
[संपादन]सोस्यूरने भाषेकडे पाहण्याचा त्या काळात प्रचलित असलेल ऐतिहासिक दृष्टिकोन टाळून भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासाला महत्त्व दिले. त्याच्या मते, भाषेकडे ऐतिहासिक भाषा-मूल्यमापन या दृष्टीने न पाहता निरीक्षणात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. भाषेचा अभ्यास म्हणजे लिखित भाषेचा, ग्रंथातील ऐतिहासिक भाषेचा अभ्यास नव्हे, तर बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यस होय, असे त्याचे मत होते. भाषा कशी होती या पेक्षा भाषा कशी वापरली जाते, त्याचे काटेकोर वर्णन करणे, त्या वर्णनासाठी तत्त्वज्ञान किंवा व्याकरण यांच्या संकल्पना न वापरता वैज्ञानिक संकल्पनां व तत्त्वे वापरणे गरजेचे आहे, असे त्याने ठामपणे प्रतिपादन केले. त्यातून वर्णनात्मक या पद्धतीच्या अभ्यासाचा पाया घातल्या गेला.
सोस्यूरने भाषेच्या अभ्यासामध्ये ‘रूपव्यवस्था’ आणि ‘संरचना’ या संकल्पनांना भाषेच्या अभ्यासात स्थान देऊन आणि पारंपरिक व्याकरणाला विरोध करून आपली भाषा अभ्यासविषयक भूमिका मांडळी. त्याने, भाषा ही चिन्हव्यवस्था आहे, असे मत मांडले. सोस्यूरने मांडलेल्या या तत्त्वानुसार भाषेच्या संरचनेचे नियम निर्धारित करण्याची पद्धत विकसित झाली आणि त्यातून वर्णनात्मक भाषाविज्ञानाला प्रारंभ झाला.
वर्णनात्मक भाषाविज्ञान : अभ्यासपद्धतीचे घटक
[संपादन]वर्णनात्मक भाषाशास्त्राचे स्वरूप वर्णनात्मक भाषाशास्त्रात भाषेचा पुढील घटकांच्या आधारे अभ्यास केला जातो.
१. ध्वनी
२. स्वनिमविचार
३. पदिमविचार
४. वाक्यविचार
५. अर्थविचार
ध्वनी संकल्पना
[संपादन]बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास म्हणजे वर्णनात्मक भाषाविज्ञान होय, ही भूमिका केंद्रस्थानी आल्यामुळे, स्वाभाविकच मानवी मुखावाटे केल्या जाणाऱ्या ध्वनींच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे वर्णनात्मक भाषाविज्ञानाच्या अभ्यासाचा प्रारंभ ध्वनींच्या निर्मितीचा स्रोत असलेल्या मुखेंद्रियापासून होतो. मानवी मुखावाटे विविध ध्वनी निर्माण केले जातात, मात्र ते सर्वच ध्वनी भाषेत वापरल्या जात नाही. त्यामुळे मानवी भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींना ‘ध्वनी’ असे न म्हणता, ‘स्वन’ (phone) अशी संज्ञा वापरण्यात आली आहे. यातूनच पुढे ‘स्वनविज्ञान’ या शाखेचा उगम झाला.
स्वनिमविचार
[संपादन]भाषेत वापरले जाणारे मूळध्वनी म्हणजे ‘स्वन’ असले तरी प्रत्येक माणसाच्या मुखाची रचना भिन्न भिन्न असल्यामुळे तसेच स्वनांच्या मागेपुढे येणाऱ्या दुसऱ्या स्वनामुळे स्वनांच्या उच्चारावर परिणाम होतो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या स्वनांच्या विविध रूपांना ‘स्वनांतर’ ही संज्ञा वापरली जाते. म्हणजे या ‘क’ या हा स्वन व्यक्तिपरत्वे क१, क२, क३ असा उच्चारला जातो. त्यांना ‘क’ची स्वनांतरे असे म्हणतात. मात्र क१ आणि क२ एकमेकांच्या ऐवजी वापरले तरी ते अर्थबदल घडवत नाही अशावेळी त्यांचा एक आदर्श गट मानला जातो. अशा आदर्श गटाला ‘स्वनिम’ असे म्हणतात. अशाप्रकारे वर्णनात्मक भाषाविज्ञान बोलल्या जाणाऱ्या भाषेचा ध्वनींच्या पातळीवर स्वन, स्वनिम, स्वनांतरच्या माध्यमातून अभ्यास करते.
पदिमविचार
[संपादन]भाषेत ध्वनींची पातळी असली तरी तिचे मुख्य ध्येय अर्थ व्यक्त करणे हे आहे. त्यामुळे अर्थाची पातळी हा देखील वर्णनात्मक भाषाविज्ञानाच्या अभ्यासाचा विषय आहे. ही अर्थाची पातळी पदिमविचारापासून सुरू होते. पद दोन किंवा अधिक स्वन एकत्र येऊन पद किंवा पदबंध केले जातात. हे पदबंध म्हणजेच जोडशब्द असतात. अशा पदांचा अभ्यासच ‘शब्दांच्या जाती’ म्हणून पारंपरिक व्याकरणात अभ्यासल्या जात असे. त्यामुळे नाम पदबंध, विशेषण पदबंध, क्रियापद पदबंध या संकल्पनांचा वापर करून अर्थाच्या पातळीवर वर्णनात्म्क भाषाविज्ञानामध्ये अभ्यास केला जातो.
वाक्यविचार
[संपादन]वर्णनानात्मक भाषाविज्ञानाच्या मते, भाषेतील वाक्य ही एक रचना असते. त्यामुळे वाक्याचा अभ्यास या पद्धतीत रचनेच्या पातळीवर केला जातो. त्या दृष्टीने पदिमांची अर्थपूर्ण रचना म्हणजे वाक्य असते. या पद्धतीत वाक्याचा, वाक्याची पृष्ठस्तरीय रचना आणि अंतःस्तरीय रचना यांचा; तसेच केवल वाक्यरचना, मिश्र वाक्यरचना, संयुक्त वाक्यरचना या पातळीवर अभ्यास केला जातो. वाक्याचे उद्देश आणि विधेय असे वर्गीकरण करून अभ्यास करण्याची पद्धत वर्णनात्मक भाषाशास्त्रात वापरली जाते.
अर्थविचार
[संपादन]मानवी भाषेचे अंतिम उद्दिष्ट अर्थ व्यक्त करणे हे असून अर्थाच्या पातळींवर अभ्यास वर्णनात्मक भाषाशास्त्रात केला जातो. या अर्थाचे पुढील प्रकार आहेत.
१. सांकल्पनिक अर्थ २. सहचारी अथवा साहचर्यपर अर्थ ३. शैलिगत अर्थ ४. भावपर अर्थ ५. परावर्तित अर्थ ६. साहचर्यपर अर्थ ७. विषय अर्थ
सांकल्पनिक अर्थ
[संपादन]शब्दांचा मूळ गाभा किंवा मूळ अर्थ असतो, त्याला सांकल्पनिक अर्थ असे म्हणतात.
उदा. ‘पुरुष’, ‘स्त्री’ व ‘मूल’ या शब्दांचे सांकल्पनिक अर्थ असे आहेत: पुरुष = [+प्रौढ ] [+नर ] [-मादी ] [+विवाहित] [+अविवाहित ] [-पशू ] स्त्री = [+प्रौढ ] [-नर ] [+मादी ] [+विवाहित] [+अविवाहित ] [-पशू ] मूल = [-प्रौढ ] [+नर ] [-मादी ] [+मादी] [-विवाहित] [+अविवाहित ] [-पशू ]
सहचारी अथवा साहचर्यपर अर्थ
[संपादन]मूळ सांकल्पनिक शब्दार्थांना प्रत्यक्ष संवादात वेगळा अर्थ प्राप्त होतो, त्या अर्थाला सहचारी अर्थ असे म्हणतात. उदा. ‘बाई’, ‘नार’, ‘पत्नी’ हे शब्द ‘स्त्री’ या शब्दाचे संकल्पनिक अर्थ आहेत, तरी त्यांचे सहचारी अर्थ वेगवेगळे आहेत.
शैलिगत अर्थ
[संपादन]भाषेचा अर्थव्यापार वेगवेगळ्या परिस्थितीच्या संदर्भाने निश्चित झालेला असतो. अशा वेगवेगळ्या संदर्भांनी सीमित होणाऱ्या किंवा प्रकटणाऱ्या अर्थाला शैलिगत अर्थ असे म्हणतात. उदा. ठावठिकाणा, मुक्क्कम, वास्तव्य या शब्दांचे सांकल्पनिक अर्थ एकच आहेत. परंतु ते वापरण्याचे संदर्भ भिन्न भिन्न असतात.
भावपर अर्थ
[संपादन]वाक्यात अनेकदा शब्द आणि वाक्ये यांच्यावर आघात करून किंवा सुरावली वापरून संवादाची परिणामकारकता वाढवली जाते. त्यामुळे मूळ शब्दाचे अर्थ बदतात. अशा अर्थाना भावपर अर्थ असे म्हणतात
परावर्तित अर्थ
[संपादन]वक्ता जो शब्द बोलत असतो त्याचा अर्थ ऐकणारा दुसराच घेत असतो, त्याला परावर्तित अर्थ असे म्हणतात. उदा. ‘माल’ या शब्दांचा शिक्षकाचा सामान असा अर्थ विद्यार्थी दुसराच घेतात. सहचारी अर्थ एकमेकांना जोडून येणाऱ्या शब्दांनी व्यक्त होणाऱ्या अर्थाला सहचारी अर्थ असे म्हणतात. उदा. दुख:द निधन, साष्टांग नमस्कार, लोभ असावा इ.
विषय अर्थ
[संपादन]वाक्यातील उद्देश आणि विधेय यांच्या मांडणीत बदल केल्यास वाक्याचा मूळ अर्थ बदलून त्याला वेगळा अर्थ प्राप्त होतो, त्याला विषय अर्थ म्हणतात. उदा. ‘शिक्षक आले आणि मुले बाहेर पडली’ या वाक्याचे उद्देश आणि विधेय बदलले की अर्थ बदलतो. उदा. ‘मुले बाहेर पडली आणि शिक्षक आले अशाप्रकारे वर्णनात्मक भाषाविज्ञानात स्वनिमविचार, पदिमविचार, वाक्यविचार आणि अर्थविचार या पातळ्यांवर वर्णनात्मक भाषाविज्ञानात भाषेचा अभ्यास केल्या जातो.
अलिकडे डो.रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणीचा अभ्यास अशा पद्धतीने मांडला आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ आधुनिक भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिक, मिलिंद स मालशे, लोकवाङ्मय प्रकाशन, मुंबई