उपयोजित भाषाशास्त्र
मानववंशविज्ञान, समाजभाषाविज्ञान आणि मनोभाषाविज्ञानाच्या अभ्यासातून जे निष्कर्ष निघतात त्यांचे उपयोजन करणारे शास्त्र म्हणजे उपयोजित भाषाशास्त्र होय. भाषाभ्यासाचे संशोधनातून जे निष्कर्ष निघतात त्याचे उपयोजन कसे केले पाहिजे. उपयोजन करताना त्याची कार्यपद्धती कशी असली पाहिजे त्याचा विचार भाषाशास्त्रात होत असतो. उदा. शालेय महाविद्यालयीन शिक्षण कोणत्या भाषेत द्यावे. शासकीय व्यवहाराची भाषा कोणती असावी. संगणकाच्या शिक्षणात माध्यम म्हणून कोणती भाषा वापरली पाहिजे. अशी सर्व प्रश्नोत्तरे ही उपयोजित भाषाविज्ञानाच्या संबंधी वापरली जातात. भाषेचा अभ्यास करतांना लहान मुले बोलतात ती प्रथम भाषा, त्यानंतरची जराशी प्रगत द्वितीय भाषा, त्यापुढे तृतीय भाषा अशी वर्गवारी भाषाभ्यास करतांना केली जाते. अशी भाषा शिकतांना भाषेची सामाजिक पार्श्वभूमी, भाषा बोलणाऱ्यांचे वय, भाषा शिकण्याचा हेतू, भाषेचे व्याकरण व नियम, भाषेच्या होणाऱ्या चुका वगैरेंचा विचार उपयोजित भाषाशास्त्रात केला जातो. स्थळ, वेळ व काळानुरूप भाषेत बदल घडून येणाऱ्या बदलाचा अभ्यास ह्यात केला जातो.