सालबाईचा तह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सालबाईचा तह हा १७ मे, इ.स. १७८२ रोजी मराठे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात महादजी शिंदे याच्या मध्यस्थीने झालेला एक तह होता. या तहामुळे सात वर्षे चाललेल्या पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती झाली.या तहाने इंग्रजांना ठाणे व साष्टी बेट देण्यात आले

पार्श्वभूमी[संपादन]

राघोबाने पेशवाईच्या मोहापायी इंग्रजांची मदत मागितली होती. त्यानुसार इंग्रजांनी राघोबाशी सुरतचा तह केला. त्यानुसार इंग्रजांनी राघोबाला पेशवाई मिळवून दिली आणि मोबदल्यात महत्त्वाचे प्रदेश व पैसे मागितले. इंग्रजांची मदत मिळाल्याने इंग्रज फौजेसह राघोबाने पुण्यावर चाल केली पण महादजी शिंद्याने त्यांना तळेगावपाशी हरवले. वॉरन हेस्टिंग्जला हे मान्य न होऊन त्याने बऱ्हाणपूर मुक्कामी असलेल्या गोडार्ड या इंग्रज सेनापतीस युद्धाचा आदेश दिला. आणि इ.स. १७८१ मध्ये पुन्हा युद्ध सुरू झाले. या वेळी गुजरातचा फत्तेसिंग गायकवाड इंग्रजांना मिळाला. तरीही इंग्रज मराठ्यांना हरवू शकणार नाहीत, हे लक्षात येऊन हेस्टिंग्जने महादजीमार्फत तहाचा प्रस्ताव मांडला.

तहातील कलमे[संपादन]

सालबाईच्या तहातील करारात एकूण सतरा कलमे होती.

  • पुरंदरच्या तहानंतर ब्रिटिशांनी मराठ्यांचा जो प्रदेश जिंकला होता तो मराठ्यांना परत करण्याचे ठरले. यात वसईचाही समावेश होता. साष्टी बेट आणि एलिफन्टा, कारंजा आणि हॉग या लहान बेटांचा अपवाद करण्यात येऊन ती बेटे इंग्रजांकडेच ठेवण्यात आली.
  • ब्रिटिशांनी ग्वाल्हेरचा किल्ला आणि यमुनेच्या पश्चिमेकडील जिंकलेला शिंद्यांचा सर्व प्रदेश त्यांना परत केला.
  • ब्रिटिशांनी सवाई माधवराव पेशवे यांना अधिकृत पेशवा म्हणून मान्यता दिली आणि येथून पुढे राघोबाला साहाय्य न करण्याचे ठरविले.
  • गुजरातमधील जो प्रदेश, किल्ले आणि शहरे राघोबाने ब्रिटिशांना दिली होती किंवा त्यांच्याकडे गहाण ठेवली होती, ती सर्व पुणे सरकारच्या हवाली करण्यात आली.
  • राघोबाचे समर्थक फत्तेसिंह गायकवाड यांना पुणे येथील पेशव्याच्या प्रभुत्वाखालील स्वतंत्र शासक म्हणून मान्यता देण्यात आली.
  • या तहानुसार गायकवाड युद्धापूर्वी जी वार्षिक खंडणी पेशव्याच्या पुणे दरबारात देत होते ती त्यांनी यापुढेही द्यावी व पेशव्यांप्रती एकनिष्ठ राहून मराठा राज्याची पूर्वीप्रमाणेच सेवा करावी.
  • मराठ्यांनी ब्रिटिश सोडून इतर कोणत्याही युरोपियन सत्तांशी संपर्क ठेवू नये व या मोबदल्यात ब्रिटिशांनी मराठ्यांच्या शत्रूला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी कोणतीही मदत करू नये.
  • रघुनाथरावाने दरसाल तीन लाखांची नेमणूक घेऊन कोपरगावी स्वस्थ रहावे.[१]
  • शिंद्यांस त्यांच्या मध्यस्थीबद्दल भडोच द्यावे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "मराठी विश्वकोश खंड-२ इंग्रज-मराठे युद्धे".[permanent dead link]