Jump to content

पौगंडावस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माणसाची वाढ व विकास हे जन्मापासून (त्याही आधी गर्भधारणेपासून) सुरू असले तरी त्यांच्या भ्रूण, बाळ/नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध, इत्यादी अनेक टप्प्यांपैकी दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या संक्रमणाच्या कालखंडाला किशोरवय म्हणतात. या कालखंडात अपरिपक्व मुलाचे (कुमाराचे) पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या व मानसिक-सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ तरुणात रूपांतर होते. याच वयात होणाऱ्या माणसाच्या लैंगिक वाढ व विकासाच्या टप्प्याला पौगंडावस्था म्हणतात.

पौगंडावस्था (Puberty[]) हा लैंगिक संक्रमणाचा कालखंड आहे. सर्वसाधारणपणे मुलीत या कालखंडाची सुरुवात वयाच्या 10 ते 11व्या वर्षी होते आणि 15 ते 17व्या वर्षापर्यंत लैंगिक विकास पूर्ण होऊन हा कालखंड संपतो. वयाच्या 12 ते 13व्या वर्षी पहिली [मासिक पाळी] येणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा होय. मुलात या कालखंडाची सुरुवात थोडी उशीरा, वयाच्या 11 ते 12व्या वर्षी होते आणि 16 ते 18व्या वर्षापर्यंत हा कालखंड संपतो. त्यामधे वयाच्या 13व्या वर्षाच्या सुमाराला पहिले वीर्यस्खलन होणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा आहे.

मेंदूकडून प्रजनन ग्रंथींकडे विशिष्ट वयात येणाऱ्या संप्रेरकांच्या स्वरूपातील संदेशांमुळे पौगंडावस्थेची सुरुवात होते. या संदेशांमुळे मुलामधे वृषणाची आणि मुलीमधे बीजांडकोषाची वाढ होते. मुलामधे वृषणातून टेस्टोस्टेरॉन व मुलीमधे बीजांडकोषातून ईस्ट्रोजेनप्रोजेस्टेरॉन या अंतःस्रावांची निर्मिती सुरू होते. त्यांच्या प्रभावामुळे मुलात शुक्रजंतू व वीर्य निर्मिती आणि मुलीत स्त्रीबीज निर्मिती व मासिक पाळी सुरू होणे ही लैंगिक कार्ये सुरू होतात. मुलामधे शिश्नाची व मुलीमधे गर्भाशययोनीमार्गाची वाढ होते. त्याचबरोबर फार शारीरिक फरक नसलेल्या मुलात मुलगा व मुलगी असे स्पष्ट बाह्य भेद दाखवणारी, बाह्य जननेंद्रियांवर केस उगवणे, मुलाचा आवाज फुटणे, दाढी-मिशा उगवणे, इत्यादी आणि मुलीमधे स्तनांची वाढ होणे, शरीराला गोलवा येणे, इत्यादी चिन्हेही दिसू लागतात. त्यांना दुय्यम लैंगिक चिन्हे असे म्हणतात.

हे सर्व होत असतानाच, लैंगिक जाणीवा विकसित होणे, लैंगिक भावना मनात येणे, लैंगिक आकर्षण निर्माण होणे, असे मानसिक आणि वैचारिक बदलही होत असतात.

या सर्वांचा परिणाम म्हणून या टप्प्याच्या शेवटी मुलगा आणि मुलगी अनुक्रमे पुरुष आणि स्त्रीमधे लैंगिकदृष्ट्या विकसित होऊन प्रजननक्षम बनतात.

इंग्रजीत प्युबर्टी (Puberty) हा शब्द लॅटीनमधील "प्युबेस' या शब्दावरून आला आहे. प्युबेस म्हणजे जननेंद्रियावरील केस. हे केस उगवू लागले की व्यक्ती वयात आली असं पूर्वी मानण्यात येत असे.

किशोरवय हा मुख्यतः मानसिक-सामाजिक परिपक्वतेचा काळ आहे. पौगंडावस्था आणि किशोरवय हे दोन्ही कालखंड काही काळ एकमेकांबरोबर समांतर जात असले तरी किशोरवयाचा वैशिष्ट्यपूर्ण कालखंड जास्त पसरट असून त्याची व्याप्ती शारीरिक-बौद्धिक-मानसिक-समाजिक अशी सर्वसमावेशक आहे. त्यातील बौद्धिक-मानसिक-समाजिक परिपक्वतेची प्रक्रिया पुढे तारुण्यात व प्रौढावस्थेतही चालू राहाते. पौगंडावस्था हा त्यातील फक्त लैंगिक संक्रमणाचा कालखंड असून लैंगिक विकास पूर्ण होऊन प्रजननक्षमता आल्यावर तो संपतो.

किशोरवय

[संपादन]
मुख्य लेख: किशोरवय

किशोरवय हा संक्रमणाचा कालखंड साधारणपणे पौगंडावस्थेच्या थोडा आधी सुरू होतो व माणसाचे पूर्ण विकसित प्रौढ व्यक्तीत रूपांतर झाल्यावर संपतो. त्यामधे माणसाच्या शारीरिक व लैंगिक विकासाबरोबरच मानसिक, बौद्धिक व सामाजिक असा सर्वसमावेशक विकास होतो. या सर्व प्रक्रिया थोड्या पुढे-मागे सुरू होतात व संपतात. सर्वसामान्यपणे दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या कालखंडाला किशोरावस्था मानण्यात येते. मुलींत हा कालखंड मुलांपेक्षा आधी सुरू होऊन आधी संपतो. मुलाची सामाजिक-आर्थिक-कौटुंबिक परीस्थिती, पोषण, भोवतालचे वातावरण, त्या ठिकाणची प्राकृतिक-सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्ये इत्यादींवर तो अवलंबून असतो.

किशोरवयात मुलांमधे (मुलगे व मुली) होणारे बदल

[संपादन]

शारीरिक बदल: पूर्णत्वाकडे जाणारी सर्वसाधारण शारीरिक वाढ आणि निरनिराळ्या सर्व अवयवांचा परिपक्वता आणि प्रौढत्वाकडे होणारा विकास या प्रकारे या वयात शारीरिक बदल होतात. शरीरातील सर्वच अंतःस्रावी ग्रंथींचा विकास थोडा आधीपासूनच सुरू झालेला असतो. त्यांतील लैंगिक अंतःस्रावांच्या प्रभावामुळे मुख्य (प्राथमिक) व दुय्यम लैंगिक अवयवांची वाढ होते व बाह्यतः दुय्यम लैंगिक चिन्हे दिसू लागतात.

मानसिक–भावनिक बदल: या वयात अनेक गोष्टींचा आणि अनुभवांचा परिणाम म्हणून मुलांचा (मुलगा-मुलगी दोघांचाही) एका किंवा अनेक प्रकारच्या लैंगिक वृत्तीच्या व्यख्तींकडे असणारी लैंगिक अभिमुखता (कल)[] ठरत असतो. त्यांना अनेक गोष्टींचे आकर्षण वाटते. (सर्वसाधारणपणे) भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण (लैंगिक कल असेल त्याप्रमाणे) तर असतेच. त्याचबरोबर त्यांना बाह्य जननेंद्रियांचे व त्यांच्या कार्याचे आणि भिन्नलिंगी व्यक्तींचे कुतूहल असते. त्यांना बाह्य जननेंद्रियांचा वापर करून बघण्याचीही तीव्र इच्छा – कामेच्छा – निर्माण होते. शिवाय त्यामागे प्रजननाची नैसर्गिक अंतःप्रेरणाही असते.

किशोरवयातील मुलांच्या इतरही अनेक कल्पना, संकल्पना, विचार व भावना बदलत व हळूहळू स्थिरावत असतात. मुलाच्या पुढील संपूर्ण आयुष्यावर या गोष्टी परिणाम करतात.

बौद्धिक बदल: या वयात अधिमस्तिष्काचा व त्याच्या कार्यपद्धतीचा विकास होतो. या वयातील वैशिष्ट्यपूर्ण मानसिकता; विचारांची व वागण्याची पद्धत; संकल्पना व कल्पना; अमूर्त विचार, नवनिर्मिती क्षमता हे या बौद्धिक बदलांचेच परिणाम म्हणता येतील[].

सामाजिक बदल: स्वतःची ओळख; स्वतःचे स्थान; स्वतःच्या प्रतिमेचा (स्व-संकल्पना[] – मला कसे आणि कोण व्हायचे आहे) विचार व विकास (व्यक्तिमत्त्व विकास[]); आत्मसन्मानाची[] जाणीव; वाढते सामाजिक संबंध व सामाजिक वर्तन आणि कुटुंबात व समाजात आपली विशिष्ट ओळख व स्थान निर्माण करणे या प्रकारे हे सामाजिक बदल होत असतात.

वाढत्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतांचा वापर करून बघणे ही वृत्ती या वयात प्रामुख्याने दिसते. या वृत्तीप्रमाणे वर्तन करताना त्यामागच्या विधायक किंवा विघातक विचारांमुळे मुलांचे प्रत्यक्ष सामाजिक वर्तन बदलते आणि ते संस्कारांवर अवलंबून असते.

पौगंडावस्था

[संपादन]

किशोरवयातील लैंगिक विकासाच्या कालावधीला पौगंडावस्था (Puberty) असे म्हणतात. मेंदूमधून विशिष्ट वयात येणाऱ्या संदेशांनुसार उत्तेजित झालेल्या अंतःस्रावी ग्रंथींच्या नियंत्रणाखाली हा लैंगिक गुणधर्मांचा व लैंगिक अवयवांचा विकास होतो व व्यक्ती प्रजननक्षम झाल्यावर तो संपतो. या कार्यांत प्रत्यक्ष सहभागी मुख्य लैंगिक अवयवांना प्राथमिक लैंगिक गुणधर्म असे म्हणतात. याशिवाय या वयात मुलगा किंवा मुलगी सहजपणे ओळखता येईल अशी काही चिन्हे शरीरावर विकसित होतात त्यांना दुय्यम लैंगिक चिन्हे असे म्हणतात. ती प्रत्यक्ष प्रजननसंस्थेचा भाग नसतात पण ती लैंगिक कार्यात अप्रत्यक्षपणे सहभागी असतात. ही चिन्हे सक्षमता, वैशिष्ट्य व प्रजननक्षमता दर्शवतात आणि त्यांचा उपयोग जोडीदाराची निवड करताना होतो असे समजले जाते.

मुलाच्या लैंगिक विकासापेक्षा मुलीचा लैंगिक विकास वेगळ्या पद्धतीने होतो.

मुलांची लैंगिक वाढ व विकास

[संपादन]

मुख्य लैंगिक अवयवांची वाढ व विकास

[संपादन]

वृषण

[संपादन]

1 वर्षे वयाच्या मुलाचे वृषण 2-3 सेंमी लांब आणि 1.5-2 सेंमी रुंद असतात व त्यांच्या आकारात पौगंडावस्था सुरू होईपर्यंत बदल होत नाही. पौगंडावस्था सुरू होताना पोष ग्रंथीकडून येणाऱ्या संदेशांमुळे वृषणांची वाढ व विकास सुरू होतो. हे पौगंडावस्था सुरू होण्याचे मुलांमधील पहिले बाह्य शारीरिक लक्षण असते. त्यानंतर साधारण 6 वर्षांनंतर त्यांची वाढ पूर्ण (सरासरी 5 x 2 x 3 सेंमी) होते. शुक्रजंतू तयार करणे आणि टेस्टोस्टेरॉन हे पुरुष-संप्रेरक निर्माण करणे ही वृषणाची दोन मुख्य कार्ये आहेत.

पौगंडावस्थेतील नंतरचे बरेचसे बदल ’टेस्टोस्टेरॉनच्या’ प्रभावामुळे होतात. टेस्टोस्टेरॉनमुळे प्रोस्टेट आणि सेमिनल व्हेसिकल्स (शुक्राशय) या वीर्यनिर्मिती करणाऱ्या ग्रंथींचाही विकास होतो आणि त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवले जाते.

वाढ झालेल्या वृषणाचा बराचसा भाग शुक्रजंतू निर्माण करणाऱ्या ऊतीने भरलेला असतो. पौगंडावस्था सुरू झाल्यानंतर साधारण एक वर्षानंतर मुलच्या लघवीत शुक्रजंतू आढळू लागतात. यामुळे 13व्या वर्षांच्या सुमारास मुलात प्रजननक्षमता येते. पण पूर्ण प्रजननक्षमता 14-16 वर्षे वयापर्यंत येत नाही.

बाह्य जननेंद्रीय – शिश्न

[संपादन]

हे समागमाचे पुरुष इंद्रिय आहे. वृषणाची वाढ व विकास सुरू होऊन साधारण एक वर्ष झाल्यावर टेस्टोस्टेरॉनच्या प्रभावामुळे शिश्नाची लांबी व नंतर रुंदी वाढू लागते. याबरोबरच शिश्नमणी आणि स्पंजसारख्या ऊतीने बनलेल्या दंडगोलाकृती पोकळ्या (corpora cavernosa)[] यांचीही वाढ सुरू होते. शिश्नाची वाढ 17 वर्षांपर्यंत पूर्ण होते.

अग्रत्वचा मागे सरकणे: पौगंडावस्थेत अग्रत्वचेचे पुढचे भोक मोठे होऊ लागते. तिचा आतील पृष्ठभाग शिश्नमण्याला जोडणाऱ्या पापुद्र्याचा हळूहळू ऱ्हास होत जातो. त्यामुळे अग्रत्वचा शिश्नमण्यापासून सुटी होऊन ती शिश्नावरून आणि शिश्नमण्यामागेपर्यंत सरकणे जास्त जास्त सुलभ होऊ लागते. पुढे समागम करताना त्रास होऊ नये म्हणून हे आवश्यक असते. तसेच शिश्नाचा आकार ताठरल्यावर मोठा झाला तरी शिश्नास सामावून घेण्याइतकी शिश्नावरील त्वचा सैल असते. पौगंडावस्थेच्या सुरुवातीनंतर अग्रत्वचा शिश्नमण्यामागेपर्यंत सरकू शकणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढत जाऊन 16-17 वर्षांपर्यत 95% मुलांना ते शक्य होते. उरलेल्यांपैकी काहींना निरूद्धमणी (अग्रत्वचेचे पुढचे भोक आकुंचित राहिल्यामुळे ती शिस्नाग्रावरून मागे न सरकणे - Phimosis) या समस्येला सामोरे जावे लागते.

अग्रत्वचा मागे सरकायला लागल्यानंतर तिचा आतील पृष्ठभाग व शिश्नमणी यांची पाण्याने धुऊन स्वच्छता करणे शक्य होते व रोज स्नानाच्यावेळी ती करणे व लघवी करताना अग्रत्वचा मागे सरकवणे आवश्यक आहे. त्यामुळे शिश्नाच्या अनेक आजारांना प्रतिबंध होतो.  

शिश्न ताठरणे: शिश्नातील दंडगोलाकृती पोकळ्यांमधील स्पंजसारख्या उतींमध्ये रक्त साठून राहिले म्हणजे शिश्न ताठ होते. झोपेत, जागे होताना किंवा दिवसभरात केव्हाही सहजच विनाकारण शिश्न ताठरणे नैसर्गिक असते. हे नवजात बालकापासून प्रौढांपर्यंत सर्वांत आढळते. पण पौगंडावस्थेत हे होण्याचे प्रमाण वाढून शिश्न ताठरणे वारंवार होऊ लागते. रात्री झोपेत ते ताठरल्याने जाग येते व काही वेळा अचानक वीर्यस्खलन होते. याला बोली भाषेत स्वप्नावस्था येणे किंवा स्वप्नदोष असे म्हणतात. पण हा दोष नसून हे नैसर्गिक आहे. परंतु यामुळे व दिवसा काम करताना, समाजात वावरताना शिश्न ताठरल्यास लाज वाटून बेचैनी येते. हे नैसर्गिक आहे हे न समजल्यास त्याचे मानसिक परिणाम होऊ शकतात. 

हस्तमैथुन: या वयात होंणारी लैंगिक अवयवांची वाढ, वाढती लैंगिक जाणीव, मुलांचे शिश्न वारंवार ताठणे व स्वप्नावस्थेचा अनुभव आणि या वयातील वाढते कुतूहल यांचा परिणाम म्हणून मुलगा व मुलगी दोघांतही लैंगिक अवयव हाताळून बघण्याची इच्छा निर्माण होते. या हाताळणीचा अनुभव सुखद आल्याने वारंवार हस्तमैथुन करण्यची प्रवृत्ती वाढते. पण गोपनीयता, अज्ञान, चुकीची माहिती किंवा सामाजिक बंधनांमुळे अपराधभावना किंवा काहीतरी चुकीचे करत असल्याची भावना निर्माण होते. हस्तमैथुन करणे नैसर्गिक आहे हे न समजल्यास त्याचे मानसिक परिणाम होऊ शकतात.   

मुलात आढळणारी दुय्यम लैंगिक चिन्हे

[संपादन]
पौगंडावस्थेत शरीरावर उगवणारे केस, ते उगवण्याची सर्वसाधारण ठिकाणे आणि मुलगा-मुलगी यांच्यात आढळणारे फरक

बाह्य जननेंद्रीयाभोवतीचे केस

[संपादन]

पौगंडावस्थेत साधारण 12 वर्षे वयाच्या सुमाराला शिश्नाची वाढ सुरू झाल्यानंतर लगेचच जांघेच्या भागात केस वाढायला सुरुवात होते. शिश्नाच्या मुळापाशी पोटाकडच्या बाजूला प्रथम केस दिसायला सुरुवात होते. पुढच्या 6 ते 12 महिन्यांत ते न मोजता येण्याइतके उगवतात. नंतर ते ’जांघेचा त्रिकोन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागात दाट वाढतात व नंतर खाली मांड्यांवर आणि पोटावर बेंबीकडे वाढतात. मुलगा व मुलगी दोघांच्याही या भागात हे केस वाढत असले तरी या वाढीत वैशिष्ट्यपूर्ण फरक असतो.

दाढी-मिशा आणि इतर शरीरावरील केस

[संपादन]

मुलांच्या जननेंद्रीयांभोवती व जांघेत केसांची वाढ सुरू झाल्यावर पुढील काही वर्षांत शरीराच्या इतर भागांवर ’पुरुषी’ केस दिसू लागतात. काखा, गुदद्वाराभोवतालचा भाग, वरच्या ओठांवरचा भाग (मिशा), कानांच्या पुढचा भाग (कल्ले) आणि गाल व हनुवटीचा भाग (दाढी) या क्रमाने सर्वसाधारणपणे केस दिसू व वाढू लागतात. अर्थात, हा क्रम व्यक्तीव्यक्तींत बदलू शकतो.

हात, पाय, छाती, पोट आणि पाठीवरचे केस त्या मानाने सावकाश वाढतात. दाढी व छातीवरील केस पौगंडावस्थेनंतरही काही वर्षे वाढत राहातात. या केसांच्या वाढीची सुरुवात, क्रम, वाढीचे प्रमाण व दाटपणा यांत व्यक्तीव्यक्तींत, निरनिराळ्या जाती-जमातींत व निरनिराळ्या वंशाच्या लोकांत खूप फरक आढळतो. या बदलांबरोबरच मुलांचे डोक्यावरचे केस जास्त जाड व राठ होतात.

स्वरयंत्राची वाढ आणि आवाजातील बदल

[संपादन]

याच वयात संप्रेरकांच्या प्रभावामुळे मुलगा व मुलगी या दोघांतही स्वरयंत्राची[] वाढ होते. पण मुलांतील वाढ जास्त असते व गळघाटीच्या स्वरूपात (Adam's Apple[]) ठळकपणे दिसते. कुमारवयात मुलगा व मुलगी यांचा दोघांचाही आवाज साधारण सारखाच असतो. पण किशोरवयात स्वरयंत्राच्या व कवटीच्या हाडांतील नाकाशेजारच्या पोकळ्यांच्या (Paranasal Sinuses[१०]) जास्त वाढीमुळे मुलांचा आवाजही खालच्या पट्टीतील व घोगर होतो (आवाज फुटणे). काही काळ तो अस्थिरही असतो. प्रौढ आवाजाची पट्टी साधारणपणे 15व्या वर्षी प्राप्त होते व 20व्या वर्षापर्यंत स्थिरावते.

मुलींचा वरच्या पट्टीतील आवाज मात्र तसाच रहातो पण वाढीबरोबर त्यात गोलवा व गोडवा येतो.

हाडे, स्नायू आणि शरीराकृती

[संपादन]

पौगंडावस्थेच्या शेवटी मुलाची हाडे मुलीपेक्षा जास्त जड आणि बळकट होतात. जबडा व खांद्याची हाडे प्रमाणाबाहेर वाढतात आणि श्रोणीची हाडे (Pelvis[११]) मुलीपेक्षा वेगळ्या प्रकारे वाढतात. त्यामुळे जबडा जाड, खांदे रुंद आणि श्रोणी निमुळती दिसते. मुलीच्या तुलनेत मुलाच्या अंगावर स्नायू जवळजवळ दुप्पट प्रमाणात वाढतात. त्यातही, मुलांमधे चपळता व ताकदीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्नायूंचे प्रमाण वाढते. चरबीचे प्रमाणही कमी असते. सरासरी तरुणाचे चरबीविरहित शरीर-वस्तुमान सरासरी तरुणीच्या 150% आणि चरबीचे प्रमाण तरुणीच्या 50% असते. मुलांची वाढ मुलींपेक्षा उशीरा सुरू होते, रेंगाळत जास्त काळ चालू राहाते आणि उशीरा थांबते. पौगंडावस्थेआधी मुले मुलींपेक्षा सरासरी 2 सेंमी कमी उंचीची असतात परंतु पूर्ण वाढ झालेला तरुण तरुणीपेक्षा सरासरी 13 सेंमी उंच असतो. या सर्वांमुळे तरुणाच्या अस्थि-सांगाड्याची व एकूणच शरीराची आकृती तरुणीपेक्षा वेगळी दिसते.

स्नायूंची वाढ व ताकद पौगंडावस्थेनंतरही वाढत राहाते. छातीवरील चरबी व स्तनाग्रे काही प्रमाणात मुलातही वाढतात. पण पुरुष-संप्रेरकांच्या विरोधी प्रभावामुळे ही वाढ मर्यादितच राहाते.

तारुण्यपीटिका आणि शरीराचा वास

[संपादन]

त्वचेवरील घर्मग्रंथी आणि केसांच्या मुळाशी असणाऱ्या तैलग्रंथी पौगंडावस्थेच्या सुमारास पुरुष-संप्रेरकांच्या प्रभावामुळे सक्रीय होतात. त्यामुळे त्वचा तेलकट होते व जास्त घाम येऊ लागतो. त्यामुळे या काळात त्वचेवर केसांच्या मुळाशी तेल साठून फोड येऊ लागतात. काही वेळा त्यात रोगजंतूंचा प्रादुर्भावही होतो. या फोडांना तारुण्यपीटिका (Acne[१२]) असे म्हणतात कारण पौगंडावस्था व तारुण्याच्या काळात, विशेषतः चेहेऱ्यावर, छातीवर व पाठीवर त्या जास्त प्रमाणात दिसतात. परंतु लहान मुलांत व क्वचित प्रौढ वयातही त्या आढळतात. त्या मुलगे व मुली दोघांतही आढळतात. व्यक्ती-व्यक्तींत जात, वंश, राहाणीमान, इत्यादींनुसार त्यांचे प्रमाण वेगवेगळे आढळते. त्या येणे नैसर्गिक असले तरी फार जास्त प्रमाणात आल्यास व फोड गेल्यावर तिथे राहाणाऱ्या व्रणांचे प्रमाण जात असल्यास चेहेरा विद्रूप दिसतो. त्यांच्याबद्दल अज्ञान व गैरसमजही फार आढळतात. त्यामुळे, विशेषतः मुलींमधे, चिंता, न्यूनगंड, औदासीन्य व तीव्र परीस्थितीत आत्महत्येचे विचार अशा मानसिक स्थिती निर्माण होऊ शकतात.

याच काळात मुलगा व मुलगी दोघांच्याही शरीरावरचे, विशेषतः काखा व जांघेतील केस वाढू लागल्याने तेथील घाम व त्वचेवर नेहमी आढळणाऱ्या जंतूंच्या प्रक्रियेमुळे विशिष्ट शरीरगंध येऊ लागतो. घामातील रसायनिक द्रव्ये व जंतूंच्या प्रकारानुसार तो व्यक्तिविशिष्ट असतो. लैंगिक अवयवांच्या भोवती हे वास जास्त येत असल्याने त्यांचा जोडीदाराची निवड आणि लैंगिक आकर्षणाशी संबंध सूचित होतो.

मुलींची लैंगिक वाढ व विकास

[संपादन]

मुख्य लैंगिक अवयवांची वाढ व विकास

[संपादन]

बीजांडकोष

[संपादन]

पौगंडावस्था सुरू होताना पोष ग्रंथीकडून येणाऱ्या संप्रेरकांच्या स्वरूपातील संदेशांमुळे बीजांडकोषांची वाढ व विकास सुरू होतो. बीजांडकोषांत सुप्तावस्थेत असलेल्या स्त्रीबीजांचा विकास सुरू होतो व त्याबरोबरच ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही स्त्री-संप्रेरके स्त्रवण्याचे चक्र आणि मासिक पाळीचे चक्र सुरू होते.

गर्भाशय व अंडवाहिनी

[संपादन]

या संप्रेरकांच्या प्रभावामुळे गर्भाशयाची व त्याबरोबरच अंडवाहिन्यांची वाढ सुरू होते. पौगंडावस्थेआधी गर्भाशयाची लांबी 4-5 सेंमी असते ती पुढील 2 वर्षांत वाढून पौगंडावस्थेनंतर 7.6 सेंमीइतकी होते. गर्भाशय-बुध्न आणि गर्भाशय-ग्रीवा यांचे एकमेकाबरोबर गुणोत्तर 1:1 असते ते नंतर 2:1 किवा 3:1 होते. गर्भाशयाच्या वाढीबरोबरच संप्रेरकांच्या स्रवण्याच्या चक्राप्रमाणे गर्भाशयातील अंतःत्वचेची वाढ व मासिक पाळीचे चक्रही सुरू होते.

स्तनांची वाढ सुरू झाल्यावर साधारण 2 वर्षांनी, वयाच्या सरासरी 12.5व्या वर्षी, पहिली मासिक पाळी येते. पण मासिक पाळी येण्याच्या या वयात अनेक कारणांनी बदल होतो. साधारण 8 ते 16 वर्षे हे पहिली मासिक पाळी येण्याचे नैसर्गिक वय समजले जाते. पहिली काही वर्षे मासिक पाळ्या अनियमित असतात व त्यांतील अनेकांत स्त्रीबीज तयार होत नाही. काही वर्षांनंतर मासिक पाळीच्या चक्रांत स्त्रीबीज नियमितपणे तयार होऊ लागते व मासिक पाळीतही नियमितपणा येतो. स्त्रीबीजनिर्मिती सुरू झाली की मुलीमधे प्रजननक्षमता येते.

योनीमार्ग

[संपादन]

पौगंडावस्थेत योनीमार्गाचीही वाढ होते. शिवाय ईस्ट्रोजेन या स्त्री-संप्रेरकांच्या प्रभावामुळे योनीमार्गाची अंतःत्वचा अधिक जाड व अनेक स्तरांची होते. त्यामुळे तिचा रंग आधीपेक्षा फिक्कट होतो. अंतःत्वचेच्या पेशींमधील ग्लायकोजेनचे प्रमाण वाढते. योनीमार्गात आढळणाऱ्या जंतूंमुळे ग्लायकोजेनचे लॅक्टिक आम्लात रूपांतर झाल्याने योनिमार्गाची आम्लता वाढते आणि परजीवींची वाढ सहसा होत नाही. ईस्ट्रोजेनमुळे योनीमार्गातील लाळेसारख्या स्रावाचे प्रमाण वाढल्याने आतील ओलसरपणा वाढतो. हे सर्व बदल मुलीला समागमासाठी शारीरिकदृष्ट्या तयार करतात.

बाह्य जननेंद्रिये

[संपादन]

योनिमुख व त्याभोवतीच्या अवयवांना स्त्रीचे बाह्य जननेंद्रिय, गुप्तांग किंवा भग (Vulva[१३]) असे म्हणतात. पौगंडावस्थेमधे योनिमुखाभोवती असणाऱ्या मुख्यतः लघुभगोष्ठांची वाढ होते. बृहत्भगोष्ठांचीही वाढ झाल्याने ते जास्त फुगीर होतात आणि योनीमुख, भगशिश्न आणि भगप्रकोष्ठ जास्त झाकले जातात. ईस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे फिओमेलॅनीन या रंगद्रव्याच्या अधिक निर्मितीमुळे लघुभगोष्ठ आणि काही मुलींत बृहत्भगोष्ठ (आणि ओठ) यांना विशेष लाल रंग येतो.

भगशिश्न आणि त्यातील उत्थानक्षम ऊतीची वाढ टेस्टोस्टेरॉनच्या प्रभावामुळे होते. या भागाच्या रक्तवाहिन्या आणि चेतातंतूंच्या पुरवठ्यातही वाढ होते. योनिमुखाच्या दोन्ही बाजूस असलेल्या प्रघ्राणग्रंथींची (Bartholin's glands[१४]) वाढ होऊन त्याही कार्यक्षम बनतात.

मुलीत आढळणारी दुय्यम लैंगिक चिन्हे

[संपादन]

स्तनांची वाढ व विकास

[संपादन]
किशोरवयापासून तरुण स्त्रीपर्यंतच्या स्तनांच्या वाढीचे टप्पे दर्शवणारी आकृती

स्तनाग्रांभोवतीच्या एका किंवा दोन्ही चकत्यांखाली घट्ट फुगवटा दिसू लागणे हे मुलींमधे पौगंडावस्थेचे पहिले चिन्ह असते. ते सरासरी 10.5 वर्षे वयाच्या सुमाराला दिसते. त्यांना स्तनांच्या कळ्या किंवा कळे असे म्हणतात. त्यानंतर 6 ते 12 महिन्यांत हे फुगवटे दोन्ही बाजूंना चकत्यांच्या बाहेर पसरायला लागलेले दिसतात आणि त्यांना मऊपणा येतो. यावेळी मुख्यतः स्तनग्रंथींमधील नलिकांच्या जाळ्यांची वाढ होत असते. ईस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे फिओमेलॅनीन या रंगद्रव्याच्या अधिक निर्मितीमुळे स्तनाग्रे व त्याभोवतीच्या चकत्याही अधिक गडद होतात. आणखी 1 ते 2 वर्षांत स्तनांची वाढ आकारमान व आकाराच्या दृष्टीने पूर्णत्वाकडे होत राहाते. पण या काळात स्तनाग्रे आणि त्याभोवतीच्या चकत्या यांचे स्वतंत्र उंचवटे दिसतात. यावेळी ईस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे मुख्य स्तनग्रंथींची वाढ होते. नंतर पूर्ण वाढ झालेल्या स्तनांत हे दुय्यम उंचवटे स्तनाच्या सर्वसाधारण आकारात मिसळून जातात. या स्तनग्रंथी व नलिकांच्या जाळ्यांच्या वाढीबरोबरच त्यांभोवतीच्या चरबीच्या थरातही वाढ होत राहाते व स्तनांना तरुण वयातील विशिष्ट आकार प्राप्त होतो.

पूर्ण वाढ झालेल्या स्तनांचे आकारमान; त्यांतील ग्रंथी आणि चरबीचे प्रमाण आणि त्यांचा आकार यांत व्यक्तीव्यक्तीनुसार खूप फरक आढळतात. स्तनांचा विकास पुढे गर्भावस्थेतप्रसूतीनंतरही होतो.

मुलांमधे टेस्टोस्टेरॉनच्या विरोधी प्रभावामुळे स्तनांची वाढ रोखली जाते. पण काही वेळा पौगंडावस्थेच्या सुरुवातीला स्तनाग्रांखाली लहान घट्ट गाठ आढळते व नंतर काही महिन्यांत विरून जाते.

बाह्य जननेंद्रीयाभोवतीचे केस

[संपादन]

स्तनांची वाढ सुरू झाल्यावर काही महिन्यांतच बाह्य जननेंद्रीयाभोवती केस दिसू लागतात. हे पौगंडावस्था सुरू झाल्याचे सहसा दुसरे बाह्य लक्षण असते. ते प्रथम बृहत्भगोष्ठांभोवती दिसू लागतात. नंतर 6 ते 12 महिन्यांत ते मोजता न येण्याइतके वाढतात व जघनास्थीच्या उंचवट्यावरही (Mons pubis - Mound of Venus[१५]) दिसतात. त्यानंतर ते ’जांघेचा त्रिकोन’ या भागात व नंतर काही वेळा मांड्यांच्या आतील भागांवर वाढतात. क्वचित ते पोटावर बेंबीकडे वाढतात. पण मुलगा व मुलगी दोघांच्याही या भागावरील केसांच्या वाढीत वैशिष्ट्यपूर्ण फरक असतो.

इतर शरीरावरील केस: ईस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे मुलींच्या डोक्यावरचे केस मुलांपेक्षा जास्त मऊ होतात. काखांमधे मुलांप्रमाणेच पण जरा लवकर केस दिसू लागतात. इतर शरीरावर मात्र फक्त बारीक व विरळ लव असते. मुलांप्रमाणे हे केस वाढत नाहीत. काही मुलींमधे हात, पाय व पोटावर बेंबीखाली आणि क्वचित चेहेऱ्यावर कल्ल्यांच्या जागी व वरच्या ओठांवर केस दिसतात पण ते लव या स्वरूपात आखुड, मऊ आणि विरळ असतात.

शरीराकृती आणि चरबीची शरीरातील विभागणी

[संपादन]

मुलींची वाढ मुलांपेक्षा लवकर सुरू होते, तिचा झपाटा जास्त असतो आणि ती लवकर थांबल्याने पुढे मुलींची उंची वाढणे बंद होते. ईस्ट्रोजेनच्या प्रभावामुळेच श्रोणी-अस्थींचा खालचा भाग (जन्ममार्ग) रुंद होतो. श्रोणी-अस्थींच्या एकूण आकारात मुलगा व मुलगी असा वैशिष्ट्यपूर्ण स्पष्ट फरक दिसू लागतो. स्नायूंची वाढ होताना मुलींमधे न थकता दीर्घकाळ काम करू शकणाऱ्या स्नायूंचे प्रमाण वाढते. शिवाय मुलांच्या तुलनेत शरीरावर विशिष्ट भागात (स्तन, नितंब, मांड्या आणि दंड) जास्त चरबी साठते. यामुळे आणि श्रोणीच्या विशिष्ट आकारामुळे मुलींचे नितंब रुंद आणि फुगीर होतात आणि स्तनांच्या वाढीमुळे शरीराला गोलवा येतो. त्वचेखालील चरबीचे एकूण प्रमाणही मुलींत मुलांपेक्षा दीडपट जास्त असते. त्यामुळे शरीराला मऊपणा येतो. या सर्वांमुळे मुली मुलांपेक्षा सरासरी 13 सेंमी बुटक्या असतात; त्यांचा बांधा त्या मानाने लहानखोरा आणि नाजुक दिसतो आणि त्यांना वैशिष्ट्यपूर्ण स्त्री-आकृती प्राप्त होते.

तारुण्यपीटिका आणि शरीराचा वास

[संपादन]

मुलांप्रमाणेच मुलींतही त्वचेवरील तेलाच्या प्रमाणात वाढ होते व त्यामुळे तारुण्यपीटिका, विशेषतः चेहेऱ्यावर, जास्त प्रमाणात दिसू लागतात. तसेच जननेंद्रीये, काखा व मुख्यतः डोक्यावरच्या केसांमुळे त्या भागांत घाम जास्त येतो. त्यावर जंतूंची प्रक्रिया झाल्याने शरीराला व केसांना वैशिष्ट्यपूर्ण वास येतो.

पौगंडावस्थेची सुरुवात

[संपादन]

पौगंडावस्थेच्या सुरुवातीला[१६] अधश्चेतक ग्रंथीमधे (Hypothalamus) 'प्रजननग्रंथीपोषी स्रावी संप्रेरकाच्या' (Gonadotrophin Releasing Hormone – GnRH) लाटा उत्पन्न होतात. त्यामुळे पौगंडावस्था सुरू झाल्याचा संदेश पोषग्रंथीला मिळतो आणि पोषग्रंथीत 'प्रजननग्रंथीपोषी संप्रेरकांच्या' (Gonadotrophins: FSH & LH) निर्मितीला चालना मिळते. त्यामुळे या संप्रेरकांची रक्तातील पातळी अचानक वाढते व त्यांच्या प्रभावाखाली वृषण व अंडाशयाची वाढ (व कार्य) सुरू होते.

मुळात अधश्चेतक ग्रंथीमधे या लाट का उत्पन्न होतात हे अजून पूर्णपणे माहीत नाही. पण समाधान-संप्रेरक - 'लेप्टीन' (Leptin), 'किस्स्पेप्टीन' (Kisspeptin) व किस्स्पेप्टीनच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवणारे 'न्यूरोकायनीन-बी' (Neurokinine B) यांचा यात सहभाग असावा. कारण त्यांची पातळी या सुमारास वाढलेली आढळते. या लाटा कधी उत्पन्न व्हाव्यात हे अनुवंशिकतेमुळेही ठरत असावे.

पौगंडवस्थेची सुरुवात लवकर आणि उशिरा होण्याचे परिणाम

[संपादन]

पौगंडवस्थेची सुरुवात लवकर किंवा उशीरा होण्याचे परिणाम वेगवेगळे दिसतात आणि ते मुलींमधे आणि मुलांमधेही वेगवेगळे दिसतात

मुलींवर होणारे परिणाम

[संपादन]

सर्वसाधारणपणे ज्या मुलींची पौगंडावस्था उशीरा सुरू होते त्यांच्यात किशोरवयात व तारुण्यात सकारात्मक परिणाम दिसतात.

याउलट पौगंडावस्था फार लवकर सुरू होणाऱ्या मुलींत नकारात्मक परिणाम दिसू शकतात. हे परिणाम जास्त करून मानसिक असतात व त्यांचा संबंध शरीर-प्रतिमेशी असतो. या मुली त्यांच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा जास्त थोराड व स्थूल दिसू लागतात. इतरांच्या सहज दृष्टीस पडणारी दुय्यम लैंगिक चिन्हे, विशेषतः वाढणारे स्तन, त्यांच्या मनात लाज उत्पन्न करतात. लवकर सुरू झालेली मासिक पाळी त्यांना बेचैन करते. यामुळे नकारात्मक शरीरप्रतिमा, कमीपणाची भावना व औदासीन्य असे मानसिक परिणाम दिसू शकतात. किंवा काही वेळा खादाडपणा, आक्रमक वृत्ती, त्यांच्या गटात दादागिरी, अशा विकृती दिसतात. वयापेक्षा मोठे दिसणे व लैंगिक आकर्षण यांमुळे त्या मोठ्या मुलांच्या संपर्कात येऊन लैंगिक व इतर धोक्यांना बळी पडू शकतात.

मुलांवर होणारे परिणाम

[संपादन]

मुलांमधे पौगंडावस्था लवकर सुरू झाल्यास किशोरवयात सकारात्मक परिणाम, उदाहरणार्थ, स्वतःची चांगली प्रतिमा, आत्मान्मानाची भावना, आत्मविश्वास, धडाडी, गटातील लोकप्रीयता, नेतृत्वगुण, इ. दिसतात असा समज होता. काही मुलांच्या बाबतीत ते खरेही आहे. परंतु आता त्याचे धोकेच जास्त आहेत असे लक्षात येते आहे. अशा मुलांत आक्रमकता, बेछूटपणा, कायदा मोडण्याची प्रवृत्ती, राग, विध्वंसक प्रवृत्ती आणि व्यसनाधीनता हे धोके जास्त संभवतात. त्यामुळे पालक, शाळा-कॉलेज, समाज, न्यायव्यवस्था यांच्याबरोबर समस्या निर्माण होऊ शकतात. त्याबरोबरच लैंगिक वर्तन लवकर सुरू झाल्याने त्यांच्यामुळे मुलींमधे किशोरवयातील गर्भधारणा, लैंगिक रोग, एड्स, बलात्कार या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या इतर समस्या उद्भवतात.

पौगंडावस्था उशीरा सुरू झाल्यास कमीपणाची भावना, आत्मविश्वासाचा अभाव, चिंता, नैराश्य, औदासीन्य, लैंगिक वर्तनाची भिती, लैंगिक समस्या, इत्यादी प्रश्न निर्माण होऊ शकतात. हे प्रश्न आणि धोके कमी होण्यासाठी लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे.

पौगंडावस्थेतील फरक

[संपादन]
लैंगिक वाढ, दुय्यम लैंगिक चिन्हांच्या विकासाचे टप्पे, टप्प्यांचे कालावधी आणि मुलगा-मुलगी यांच्या लैंगिक विकासातील फरक दाखवणारा तक्ता

मुलगा व मुलगी

[संपादन]

पौगंडावस्था सुरू होण्याचे वय आणि ती घडवून आणणारे मुख्य संप्रेरक हे दोन मुलगा व मुलगी यांच्या पौगंडावस्थेतील मुख्य फरक आहेत.

पौगंडावस्था सुरू होण्याच्या वयात एकूणच खूप फरक दिसत असले तरी मुलींमधे पौगंडावस्था मुलांपेक्षा सरासरी 1 वर्ष आधी सुरू होते. आणि 1-2 वर्षे आधी पूर्ण होते. तसेच मुलींत पौगंडावस्था सुरू झाल्यावर साधारण 4 वर्षांत प्रजननक्षमतेतील परिपक्वता येते तर मुलांमधे हे बदल पौगंडावस्था सुरू झाल्यावर पुढे 6 वर्षेपर्यंत सावकाश होतात.

पौगंडावस्थेच्या सुरुवातीला मुलींमधे लैंगिक संप्रेरकांची निर्मिती टेस्टोस्टेरॉनपासून (पुरुष संप्रेरक) सुरू होते. पण त्याचे रूपांतर बीजांडकोषात लगेच ईस्ट्रॅडिऑल या ईस्ट्रोजेनमधे होत असल्याने टेस्टोस्टेरॉनचे परिणाम न दिसता स्तनांची व गर्भाशयाची वाढ हे ईस्ट्रोजेनचे ’स्त्रीत्वाचे’ परिणाम दिसतात. मुलींमधे लैंगिक संप्रेरकांची निर्मिती जास्त गुंतागुंतीचीही असते. त्यात सुरुवातीला टेस्टोस्टेरॉन, नंतर स्त्रीबीजनिर्मिती सुरू झाल्यावर स्रवणारे प्रोजेस्टेरॉन आणि प्रोलॅक्टीन(Prolactin[१७]) या संप्रेरकांचाही सहभाग असतो. मुलींमधील बरीच दुय्यम लैंगिक चिन्हे हा टेस्टोस्टेरॉनचा परिणाम असतो.

वाढीला चालना देणे हाही ईस्ट्रोजेनचा परिणाम आहे. त्यामुळे मुलींत या वयात वाढीचा झपाटा दिसतो. पण हाडांची वाढणारी टोके बंद करणे (epiphyseal closure[१८]) हाही ईस्ट्रोजेनचा परिणाम असल्याने मुलींची वाढ (व ऊंचीची वाढ) लवकर थांबते.

याउलट मुलांमधे टेस्टोस्टेरॉन हे लैंगिक विकास घडवणारे व 'पुरुषी' गुणधर्मांचा विकास करणारे प्रमुख पुरुष-संप्रेरक आहे. मुलांमधे त्याचे रूपांतर ईस्ट्रॅडिऑलमधे सावकाश होते व ईस्ट्रॅडिऑलची पातळीही मुलींपेक्षा खूप कमी असते. त्याचा एक परिणाम म्हणजे मुलांची वाढ उशीरा सुरू होते, सावकाश चालू राहाते व जास्त काळ चालू राहाते. हाडांची वाढणारी टोकेही उशीरा बंद झाल्याने ती उशीरा थांबते. त्यामुळे पूर्ण वाढ झालेला तरुण तरुणीपेक्षा सरासरी 13 सेंमी उंच असतो.

पौगंडावस्था सुरू होण्याचे वय

[संपादन]

हे वय ठरवणे त्यामागचे दृष्टीकोन (शरीरिक किंवा अंतःस्रावांतील बदल) आणि हेतूंवर (समाजिक, मानसशास्त्रीय किंवा वैद्यकीय मानके ठरवणे) अवलंबून असते. शरीरावर बाह्य खुणा दिसायला लागणे हे सर्वसाधारणपणे पौगंडावस्था सुरू होण्याचे वय समजले जाते. कारण या खुणाच चेतासंस्थेतील व अंतःस्रावांतील शरीरांतर्गत बदलांच्या बाह्य निदर्शक असतात.

पौगंडावस्था सुरू होण्याचे वय 10 ते 18 वर्षे वयापर्यंत बदलते. हे वय व्यक्ती-व्यक्तीनुसार, लिंगानुसार आणि जाती-जमाती-वंशानुसार बदलते.

अनेक अभ्यासांतून आता असे निदर्शनास येत आहे की हे वय गेल्या शतकापासून हळूहळू कमी होत आहे.काही प्रगत देशांत 1840 साली ते 16-17 होते ते आता 10 वर्षांच्या आसपास आहे.[१९] याचा संबंध राहाणीमान आणि आहाराशी असावा असे वाटते.

पौगंडावस्था सुरू होण्याच्या वयावर अनुवंशिक आणि परिसरातील अशा दोन्ही प्रकारच्या घटकांचा प्रभाव दिसतो.

अनुवंशिक घटकांचा प्रभाव

[संपादन]

परिसरातील घटकांचा प्रभाव समान असलेल्या मुलांतील कमीतकमी 46% मुलांमधे पौगंडावस्था सुरू होण्याचे वय ठरवण्यात अनुवंशिक घटक थेट कारणीभूत असल्याचे आढळले.[२०][२१][२२][२३] हा अनुवंशिक संबंध आई आणि मुलगी यांच्यात जास्त घट्ट आढळला. पण याच्याशी संबंधित विशिष्ट जनुके कोणती ते अद्याप नक्की माहीत नाही.[२०]

परिसरातील घटकांचा प्रभाव

[संपादन]

परिसरातील घटकांचा प्रभावही तितकाच महत्त्वाचा आहे. हा प्रभाव मुलांपेक्षा मुलींच्या वयात येण्यावर व त्यांची पहिली मासिक पाळी सुरू होण्यावर जास्त आढळतो.

संप्रेरके, स्टेरॉईड्स आणि रसायने:

शेती व जनावरांच्या पैदाशीत वापरल्यावर पर्यावरणात शिल्लक राहिलेली व साठलेली संप्रेरके, औषधे, सौंदर्यप्रसाधने व इतर रसायने यांचा मानवी लैंगिक विकासावर परिणाम होत असावा अशी काळजी व्यक्त केली जाते. (मांस-उत्पादनासाठी लैंगिक संप्रेरकांच्या वापरावर अनेक देशांत बंदी आहे पण ती किती प्रमाणात वापरली जात असावीत हे माहीत नाही.) प्लॅस्टिक, विशेषतः बाळांसाठी दुधाच्या, पाण्याच्या, पेयाच्या, फळांच्या रसांच्या इ. बाटल्या बनवण्यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक बनवण्यासाठी वापरले जाणारे ’बिस्फेनॉल ए’ (Bisphenol A - BPA) ईस्ट्रोजेनच्या कार्यात अडथळा आणते पण ईस्ट्रोजेनसारखे कार्य करते. ते बाटल्यांमधील पाण्यात व खाद्यपदार्थांत, विशेषतः बाटल्या गरम केल्यास, पाझरते. बालकांच्या आणि मुलांच्या शरीरात ते लक्षणीय प्रमाणात आढळते. त्याच्यामुळे, विशेषतः मुलींमधे अकाली पौंगंडावस्था येण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

आहार:

पौगंडावस्था सुरू होण्याच्या वयावर परिणाम करणाऱ्या परिसरातील घटकांपैकी आहार हा, विशेषतः मुलींमधे, सर्वात प्रभावी घटक आहे. उंच डोंगराळ भागांत राहाणाऱ्या मुलांमधे पौगंडावस्था उशीरा सुरू होते ही खूप पूर्वीच प्रथम निदर्शनास आलेली गोष्ट आहे. पण त्याचाही संबंध आहाराची उपलब्धता आणि गुणवत्ता यांच्याशीच असावा असे आता मानले जाते.   आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जेचे (कॅलरीज्‌) शरीरातील चरबीत रूपांतर होते. चरबीची साठवण ही पौगंडावस्था (अप्रत्यक्षपणे प्रजननक्षमता) सुरू होण्यासाठी पुरेशी तरतूद झाल्याची निदर्शक असते व तसा संदेश मेंदूकडे जातो.

निरनिराळ्या समाजांमधील आणि एकाच समाजातील निरनिराळ्या स्तरांमधील आहारातील फरक हे पौगंडावस्थेचे वय ठरवणारा प्रमुख घटक आहे असे गेल्या काही शतकांतील पुराव्यावरून निदर्शनास येते आहे. सर्व जगभरात गेल्या काही वर्षांतील मांसाहाराचे (प्राणिज प्रथिने) वाढलेले प्रमाण, आहारातील बदल (फास्ट फूड, जंक फूड), खाण्याच्या सवयींतील बदल (खादाडपणा, हॉटेलमधील खाणे, बाजारातील तयार पदार्थ खाणे, इ.) आणि किशोरवयातील स्थूलपणाचे वाढते प्रमाण यांमुळे पौगंडावस्थेचे वय कमीकमी होत आहे.

पण त्याचबरोबर आहाराची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. प्रथिनांची कमतरता आणि चोथ्याचे (Dietary Fiber) जास्त प्रमाण यांमुळे शुद्ध शाकाहारी मुलींमधे पौगंडावस्था उशीरा सुरू होऊ शकते आणि जास्त काळ रेंगाळते.

यावरून असाही निष्कर्ष काढता येतो की एखाद्या समाजातील मुलींच्या पौगंडावस्था सुरू होण्याच्या वयाचा मध्यांक हा त्या समाजातील कुपोषित मुलींच्या प्रमाणाचा निर्देशांक असू शकतो आणि या वयांच्या खालच्या आणि वरच्या मर्यादेतील अंतर हा त्या समाजातील आर्थिक आणि अन्न-वितरणातील विषमतेचा निर्देशांक असू शकतो.

स्थूलता आणि व्यायाम:

स्थूलता हे 9 वर्षे वयाआधीच स्तनांची वाढ सुरू होणे आणि 12 वर्षे वयाआधीच पहिली मासिक पाळी येणे यांचे महत्त्वाचे कारण आहे असे संशोधनाअंती वैज्ञानिकांना वाटते. शिवाय स्थूलता आणि लवकर वयात येणे ही भविष्यातील अनारोग्याची नांदी असू शकते.

दिवसातील जास्त सरासरी हालचाल आणि व्यायाम यांमुळे प्रजननासाठी उपलब्ध ऊर्जा कमी पडते आणि त्यामुळे पौगंडावस्था उशीरा सुरू होते. शरीरातील चरबीचे प्रमाण आणि रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी असणे यांमुळे व्यायामाचा हा परिणाम आणखी वाढतो.

शारीरिक-मानसिक रोग:

दीर्धकाळ रेंगाळणाऱ्या आजारांमुळे मुलगे आणि मुली दोघांतही पौगंडावस्था उशीरा सुरू होते. विशेषतः अशा रोगांमुळे कुपोषण होत असेल तर हा परिणाम जास्त दिसतो. अंतःस्रावांच्या परिणामामुळे या वयात मेंदूमधेही अनेक बदल होत असतात. त्याचा एक परिणाम म्हणजे या काळात मानसिक, विशेषतः मनःस्थितीशी (mood) निगडित विमनस्कता, औदासीन्य, स्किझोफ्रेनिया (Schizophrenia[२४]), इ. असे विकार जास्त प्रमाणात आढळतात. खादाडपणा (Bulimia[२५]) व बऱ्याच मुलींत भूक मंदावणे (Anorexia Nervosa[२६]) हेही विकार आढळतात. अशा मुलामुलींत, मुख्यतः कुपोषणामुळे, पौगंडावस्था लवकर किंवा उशीरा सुरू होते.

तणावजनक सामाजिक घटकः

पर्यावरणातील अनेक घटकांमुळे व बऱ्याच मानसिक-सामाजिक कारणांमुळे पौगंडावस्था सुरू होण्याच्या वेळेत बदल होत असावेत असे वाटते. पण हे परिणाम सौम्य आणि अप्रत्यक्ष असतात आणि ते कसे होतात हे नीट माहीत नाही. या वयात मुलांवर मुख्यतः कौटुंबिक प्रभाव असल्याने कुटुंबरचना आणि कौटुंबिक वातावरणाच्या पौगंडावस्थेवर होणाऱ्या परिणामांवर संशोधन केले गेले आहे. पण ते मुख्यतः मुलींची मासिक पाळी सुरू होण्याच्या वयावर आधारित, आकडेवारीवर (Statistical) आधारित, अपुरे, पूर्वग्रहदूषित व वादग्रस्त असण्याची शक्यता आहे.

असुरक्षित (मुख्यतः लैंगिक दृष्ट्या) वातावरणात वाढणाऱ्या मुलींची मासिक पाळी काही महिने (सरासरीच्या) लवकर सुरू होते आणि सुरक्षित, एकत्र कुटुंबांत व आई-वडील दोघांच्या संरक्षणात वाढलेल्या मुलींची मासिक पाळी उशीरा सुरू होते असे या संशोधनातील सर्वसाधारण निरीक्षण आहे.

युद्ध, निर्वासित अवस्था इ. अस्तित्वासाठी संघर्षाच्या व अत्यंतिक तणावाच्या परीस्थितीत मासिक पाळी उशीरा सुरू होते. त्यात अशा परीस्थितीत झालेली उपासमारही कारणीभूत असते.

पौगंडावस्थेतील घटनांचा क्रम

[संपादन]

पौगंडावस्थेच्या कालावधीत घडणाऱ्या निरनिराळ्या धटना, निरनिराळ्या अवयवांचा विकास आणि इतर दुय्यम लैंगिक चिन्हे दिसणे यांचा क्रम सर्वसाधारणपणे वर सांगितल्याप्रमाणे असला तरी त्यात बदल होऊ शकतात. काही वेळा हे बदल नैसर्गिक फरकांमुळे होत असले तरी त्यांसाठी वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरते. कारण त्यांमागच्या गुंतागुंतीच्या अंतःस्रावी व इतर घटनांतील बिघाडाचे ते निदर्शक असू शकतात.

चेता-अंतःस्रावी प्रक्रिया

[संपादन]

पौगंडावस्था ही मुळात एक गुंतागुंतीची चेता-अंतःस्रावी प्रक्रिया आहे. तिचा उद्देश अपरिपक्व मुलाला परिपक्व आणि प्रजननक्षम तरुण बनवणे हा आहे. या प्रक्रियेत चेतासंस्थेतील मध्यवर्ती चेतासंस्थाअधश्चेतक (Hypothalamus) आणि अंतःस्रावी प्रजननसंस्थेतील पोष ग्रंथी/पीयूष ग्रंथी, प्रजनन ग्रंथी आणि अधिवृक्क ग्रंथी यांचा समावेश होतो. एका ग्रंथीतून स्रवणाऱ्या अंतःस्रावांच्या संदेशांना प्रतिसाद म्हणून दुसऱ्या ग्रंथीतून अंतःस्राव निर्माण होतात आणि त्यांचे एकमेकांवर उत्तेजक किंवा प्रतिबंधक प्रभावाने नियंत्रण असते. शरीरातील इतर अंतःस्रावी ग्रंथी व संस्थांकडून मिळणारी माहिती आणि नियंत्रणावरही त्यांचा प्रतिसाद अवलंबून असतो.

चेता-अंतःस्रावी प्रक्रियेत सहभागी अवयव व त्यांचे कार्य

[संपादन]
अंतःस्रावी ग्रंथींचे लैंगिक वाढ-विकास व कार्यावरील नियंत्रण दर्शवणारी आकृती. 

मध्यवर्ती चेतासंस्था: योग्य वेळ येईपर्यंत मध्यवर्ती चेतासंस्था अधश्चेतकातील आर्क्वेट केंद्रकाला पौगंडावस्था सुरू करण्याचे कार्य सुरू करण्यास प्रतिबंध करते व नंतर प्रजननग्रंथी, मेद ऊतक, शरीरातील इतर संस्था व मेंदूतील इतर भागांकडून येणाऱ्या संदेशांचा अर्थ लावून योग्य वेळी आर्क्वेट केंद्रकाला प्रतिबंधमुक्त करते.

अधश्चेतकातील आर्क्वेट केंद्रकः प्रजनन संस्थेचे कार्य सुरू करणारा व पुढे योग्य रीतीने चालू ठेवणारा हा मुख्य नियंत्रक आहे. यातील चेतापेशींतून स्रवणारे संप्रेरक पोष ग्रंथीला उत्तेजित करतात.

पोष ग्रंथी: अधश्चेतकाने उत्तेजित केल्यावर या ग्रंथीतून प्रजनन ग्रंथींना उत्तेजित करणारे संप्रेरक स्रवतात आणि रक्तामार्फत प्रजनन ग्रंथींपर्यंत पोचतात.

प्रजनन ग्रंथी: पोष ग्रंथीतून स्रवलेल्या संप्रेरकांमुळे पुरुषामधे वृषण आणि स्त्रीमधे बीजांडकोष या प्रजनन ग्रंथी उत्तेजित होतात आणि अनुक्रमे टेस्टोस्टेरॉन आणि ईस्ट्रोजेन या संप्रेरकांची निर्मिती करतात. या संप्रेरकांमुळे मुलगा व मुलीत अनुक्रमे पुरुषत्वाचे व स्त्रीत्वाचे गुणधर्म विकसित होतात. शिवाय या संप्रेरकांचा अधश्चेतकावर प्रतिबंधक प्रभाव असतो.

अधिवृक्क ग्रंथी: या ग्रंथी प्रजनन ग्रंथींच्या आधी 1-2 वर्षे विकसित होतात आणि त्यांचे कार्य सुरू होते. त्यातून स्रवणाऱ्या अधिवृक्कजन्य पुरुषजनक संप्रेरकांमुळे मुलगा व मुलगी या दोघांतही काही दुय्यम लैंगिक गुणधर्मांचा विकास होतो.

मुख्य सहभागी अंतःस्राव

[संपादन]

1.  न्यूरोकायनीन बी (Neurokinin B[२७])आणि किस्पेप्टीन (Kisspeptin[२८]): अधश्चेतकामधील चतापेशींमधे असणारी ही न्यूरोपेप्टाईड गटातील रासायनिक द्रव्ये त्या पेशींत प्रजननग्रंथीपोषी स्रावी संप्रेरक (Gonadotropin Releasing Hormones – GnRH) निर्मितीला व स्रवण्याला सुरुवात करून देतात. याबरोबर पौगंडावस्थेची सुरुवात होते.

2.  प्रजननग्रंथीपोषी स्रावी संप्रेरक (Gonadotropin-Releasing Hormone - GnRH[२९]): हा पेप्टाईड संप्रेरक पोष ग्रंथीतील प्रजननग्रंथीपोष पेशींना (Gonadotropic Cells[३०]) 'पुटक उद्दीपक संप्रेरक' व 'ल्यूटीनकारी संप्रेरक' या पोषी संप्रेरकांची (Gonadotropic Hormones[३१]) निर्मिती करण्यासाठी उत्तेजित करतो.

3.  पुटक उद्दीपक संप्रेरक (Follicle-Stimulating Hormone - FSH[३२]):  हा प्रथिन-स्वरूपातील पोषी संप्रेरक (Gonadotropic Hormone) प्रजननग्रंथीपोष पेशींतून स्रवतो आणि रक्तप्रवाहात मिसळतो. पौगंडावस्थेच्या सुरुवातीला याचे रक्तातील प्रमाण जवळजवळ 2.5 पट वाढते. याच्यामुळे बीजांडकोषातील बीजांडपुटके उत्तेजित होतात आणि वृषणातील शुक्रजंतूजनक आणि 'सर्टोली' पेशी (Sertoli Cells[३३]) उत्तेजित होतात.

4.  ल्यूटीनकारी संप्रेरक (Luteinizing Hormone - LH[३४]): हाही प्रथिन-स्वरूपातील पोषी संप्रेरक (Gonadotropic Hormone) प्रजननग्रंथीपोष पेशींतून स्रवून रक्तप्रवाहात मिसळतो. पौगंडावस्थेच्या सुरुवातीला याचे रक्तातील प्रमाण अचानक जवळजवळ 25 पट वाढते (पुटक उद्दीपक संप्रेरकाच्या 10 पट) वाढते. याच्यामुळे वृषणातील 'लेडिग' पेशी (Leydig cells[३५]) आणि बीजांडकोषातील 'थीका' पेशी (Theca cells[३६]) उत्तेजित होतात.

5.  टेस्टोस्टेरॉन (Testosterone[३७]): हा स्टेरॉईड स्वरूपातील संप्रेरक मुख्यतः वृषणातील 'लेडिग' पेशींतून स्रवतो. काही प्रमाणात तो बीजांडकोषातील 'थीका' पेशींतून आणि अधिवृक्क बाह्यकातूनही स्रवतो. सस्तन प्राण्यांतील तो 'मूळ' उपचयी स्टेरॉईड असून प्रमुख पुरुष-संप्रेरक (पुरुषत्वजनक संप्रेरक - Androgen) आहे. संपूर्ण शरीरातील अनेक ठिकाणच्या ऊतकांत असलेल्या आणि या संप्रेरकाला प्रतिसाद देणाऱ्या पुरुषकारी ग्राहकांवर तो प्रभाव पाडतो. या प्रभावामुळे त्या ऊतकांत पुरुषी गुणधर्मांचा विकास होतो.

6.  ईस्ट्रॅडिऑल (Estradiol[३८]): हा टेस्टोस्टेरॉनपासून निर्माण होणारा स्टेरॉईड स्वरूपातील मुख्य स्त्री-संप्रेरक (स्त्रीत्वजनक संप्रेरक - Estrogen) आहे. तो मुख्यतः स्त्रियांच्या बीजांडकोषातील 'ग्रॅन्युलोझा' पेशींपासून (Granuloza cells[३९]) निर्माण होत असला तरी थोड्या प्रमाणात अधिवृक्क ग्रंथींतून आणि पुरुषांच्या वृषणांतून स्रवणाऱ्या टेस्टोस्टेरॉनपासूनही निर्माण होतो. संपूर्ण शरीरातील अनेक ठिकाणच्या ऊतकांत असलेल्या आणि या संप्रेरकाला प्रतिसाद देणाऱ्या स्त्रीकारी ग्राहकांवर तो प्रभाव पाडतो. या प्रभावामुळे त्या ऊतकांत स्त्रीत्वाच्या गुणधर्मांचा विकास होतो.

7.  अधिवृक्कजन्य पुरुषकारी संप्रेरक (Adrenal Androgens[४०]): हे अधिवृक्क ग्रंथींच्या बाह्यपटलातील जालिकामय क्षेत्रात निर्माण होणारे स्टेरॉईड स्वरूपातील पुरुषत्वजनक संप्रेरक आहेत. हे मुलगा व मुलगी या दोघांतही निर्माण होतात. पौगंडावस्थेच्या सुरुवातीच्या काळात मुलांमधे आणि मुलींमधेसुद्धा होणाऱ्या काही पुरुषकारी दुय्यम लैंगिक गुणधर्मांच्या (उदाहरणार्थ, शरीरावरील केसांची वाढ) विकासाला ते हातभार लावतात.

8.  इन्शुलीनसदृश वाढ-घटक 1 (Insulin-like growth factor 1 - IGF 1[४१]): वाढ संप्रेरकाच्या वाढत्या पातळीला प्रतिसाद म्हणून या संप्रेरकाच्या पातळीत पौगंडावस्थेत लक्षणीय वाढ होते. पौगंडावस्थेत दिसणाऱ्या अचानक वाढीच्या झपाट्याचा/झटक्याचा हा मुख्य प्रवर्तक असावा.

9.  लेप्टीन - ’समाधान-संप्रेरक’ (Leptin[४२]): हा प्रथिन स्वरूपातील संप्रेरक मेद-ऊतकातून स्रवतो. अधश्चेतक हा याचा मुख्य लक्ष्य अवयव आहे. भुकेचे, समाधानाचे आणि ऊर्जेच्या चयापचयाचे नियंत्रण करण्यासाठी मेंदूला (मुख्यतः अधश्चेतकाला) शरीरातील मेदसाठ्याची आणि शरीर-वस्तुमानाची अंदाजे कल्पना असणे आवश्यक असते. ही माहिती लेप्टीनची पातळी देत असावी असे वाटते. शरीरात पुरेसा मेदसाठा आणि पुरेसे शरीर-वस्तुमान असल्याशिवाय पौगंडावस्थेला (मुख्यत मुलींच्या) सहसा सुरुवात होत नाही. म्हणून पौगंडावस्थेला सुरुवात करण्यास (आणि त्यामुळे नंतर स्त्री प्रजननक्षम होण्यास) अनुकूलता दर्शवणारा संप्रेरक म्हणूनही तो काम करतो.

चेता-अंतःस्रावी प्रक्रियेतील मुख्य टप्पे

[संपादन]

गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी गर्भातील अंतःस्रावी प्रजननसंस्था कार्यरत होते. जन्म होण्याच्या सुमारास वृषण आणि बीजांडकोष तात्पुरते निष्क्रीय होतात परंतु पुढे काही महिने पुन्हा कार्यरत राहातात. त्यानंतर लैंगिक स्टेरॉईड्स्ना नकारात्मक प्रतिसाद देणारी मेंदूतील यंत्रणा परिपक्व होऊन अधश्चेतकामधील आर्क्वेट केंद्रकाचे कार्य पौगंडावस्थेपर्यंत दडपले जाते.

यामुळे बालवयात प्रजननग्रंथीपोषी संप्रेरक आणि लैंगिक स्टेरॉईड संप्रेरकांची (टेस्टोस्टेरॉन, ईस्ट्रॅडिऑल, इ.) पातळी (सध्या उपलब्ध असलेल्या पद्धतींनी) न मोजता येण्याइतकी खालावते. (पण या काळात या संप्रेरकांच्या पातळीत होणाऱ्या सूक्ष्म चढ-उतारांमुळे बीजपेशी - भावी बीजांडे - आणि त्याभोवतीच्या पुटकांची संख्या जवळजवळ दुप्पट होते असे दर्शवणारे पुरावे नवीन संशोधनातून उपलब्ध होत आहेत.)

खऱ्या पौगंडावस्थेची सुरुवात मध्यवर्ती चेतासंस्थेतील गुंतागुंतीच्या प्रक्रियांतून होते. शरीरावर पौगंडावस्थेचे पहिले चिन्ह बाह्यतः दिसण्याआधी 1 ते 2 वर्षे (8 ते 10 वर्षे वयाच्या सुमारास) या प्रक्रिया सुरू होतात.

मेंदूच्या इतर क्षेत्रांत निर्माण होत असलेले, अधश्चेतकातील आर्क्वेट केंद्रकाला दडपणारे, प्रतिबंधक संकेत बंद होतात. त्याचबरोबर  प्रजननग्रंथी, मेद ऊतक व शरीरातील इतर संस्था यांच्याकडून येणाऱ्या अंतःस्रावांच्या स्वरूपातील संदेशांमुळे आर्क्वेट केंद्रकामधील चेतापेशी उत्तेजित होतात आणि नैसर्गिक पौगंडवस्थेची सुरुवात होते. (मेंदूच्या इतर क्षेत्रांत निर्माण होत असलेले हे प्रतिबंधक संकेत आणि त्यांचा आर्क्वेट केंद्रकावरील प्रभाव दूर करणाऱ्या यंत्रणा यांच्यावर अनेक वर्षे संशोधन सुरू आहे. याबद्दलचे आकलन अजून अपूर्ण आहे. पण 'समाधान-संप्रेरक' लेप्टीनची पातळी बालवयात सतत वाढत असते आणि ती आर्क्वेट केंद्रकाला प्रतिबंधमुक्त करून कार्यरत करण्यात सहभागी असते.)

आर्क्वेट केंद्रकातील चेतापेशींत असणारी रासायनिक द्रव्ये (न्यूरोपेप्टाईड्स न्यूरोकायनीन बी आणि किस्स्पेप्टीन) त्या पेशींत प्रजननग्रंथीपोषी स्रावी संप्रेरकाच्या (GnRH) निर्मितीला व लाटांच्या स्वरूपात स्रवण्याला सुरुवात करून देतात. (मुळात अधश्चेतकामधे ही लाट का उत्पन्न होते हे अजून पूर्णपणे माहीत नाही. पण 'लेप्टीन', 'किस्स्पेप्टीन' व किस्स्पेप्टीनच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवणारे 'न्यूरोकायनीन-बी' यांचा यात सहभाग असावा. कारण त्यांची पातळी या सुमारास वाढलेली आढळते. ही लाट कधी उत्पन्न व्हावी हे अनुवंशिकतेमुळेही ठरत असावे.)

प्रजननग्रंथीपोषी स्रावी संप्रेरक लाटांच्या स्वरूपात पोष ग्रंथीतील प्रवेशिका नीलेत (Pituitary Portal System) प्रवेश करतो आणि पोष ग्रंथीला उत्तेजित करतो. त्यामुळे पौगंडावस्था सुरू झाल्याचा संदेश पोष ग्रंथीला मिळतो आणि पोष ग्रंथीत पुटक उद्दीपक संप्रेरक (Follicle Stimulating Hormone – FSH) आणि ल्यूटीनकारी संप्रेरक (Luteinizing hormone – LH) या प्रजननग्रंथीपोषी संप्रेरकांची निर्मिती सुरू होते आणि ते लाटांच्या स्वरूपात रक्तातून प्रसारित केले जातात. या संप्रेरकांच्या उत्तेजनामुळे प्रजननग्रंथींची (बीजांडकोष आणि वृषणाची) वाढ (व कार्य) सुरू होते आणि त्यांत अनुक्रमे स्त्री-संप्रेरक ईस्ट्रोजेन आणि पुरुष-संप्रेरक टेस्टोस्टेरॉनची निर्मिती सुरू होते. या संप्रेरकांमुळे अनुक्रमे मुलींत स्त्रीबीजांची (बीजांडे) आणि मुलांत पुरुषबीजांची (शुक्रजंतूंची) निर्मिती सुरू होते. याबरोबरच दोघांतही पौगंडावस्थेचे इतर बदलही सुरू होतात.

मध्यवर्ती चेतासंस्थेतील जीएन्‌आरएच (GnRH) स्पंदकातून येणारे उत्तेजक संदेश स्पंदनस्वरूपात येत असल्याने 'प्रजननग्रंथीपोषी स्रावी संप्रेरकही (GnRH)' लाटांच्या स्वरूपात स्रवतो आणि परिणामी पोष ग्रंथीतून 'ल्यूटीनकारी संप्रेरक' आणि 'पुटक उद्दीपक संप्रेरकही'  लाटांच्या स्वरूपात स्रवतात. शारीरिक पौगंडावस्था सुरू होण्याआधी सुरुवातीला या लाटा फक्त झोपेतच निर्माण होतात पण नंतर पौगंडावस्थेच्या शेवटी त्या दिवसरात्र निर्माण होत राहातात. 

या बदलांच्या थोडे आधीच (6 ते 11 वर्षे वयात) अधिवृक्क ग्रंथींची वाढ आणि कार्य (अधिवृक्कविकासारंभ - Adrenarche[४३]) सुरू झालेले असते. त्यांतून स्रवणाऱ्या स्टेरॉईड स्वरूपातील अधिवृक्कजन्य पुरुषकारी संप्रेरकांमुळे (Adrenal androgens) पौगंडावस्थेतील काही दुय्यम लैंगिक गुणधर्मांचा (मुलगा व मुलगी या दोघांतीलही जननेंद्रीयांवरील व इतर शरीरावरील केसांची वाढ; त्वचेवरील घर्मग्रंथी व शरीरगंध; केसांच्या मुळाशी असणाऱ्या तैलग्रंथी आणि तारुण्यपीटिका; इत्यादी) विकास सुरू होतो. पण अधिवृक्कविकासारंभ (Adrenarche) आणि प्रजननग्रंथीविकासारंभ (Gonadarche) यांच्यातील परस्पर संबंधाचे आकलन अजून पूर्णपणे झालेले नाही. त्या कदाचीत एकापुढे एक किंवा बरोबर चालणाऱ्या स्वतंत्र प्रक्रियाही असू शकतील. म्हणून जननेंद्रीयांवरील केसांच्या वाढीवरून एखाद्या मुलात जननग्रंथीविकासारंभ व पौगंडावस्थेचा आरंभ झाला हा निष्कर्ष काढता येईलच असे नाही.

या कालावधीत एकदम होणाऱ्या शारीरिक वाढीत 'पोष ग्रंथीतून' स्रवणारा वाढसंप्रेरकअवटु ग्रंथीचाही (Thyroid[४४]) सहभाग असतो.

लैंगिक शिक्षण

[संपादन]

बऱ्याच मुलांची वा मुलींची या नैसर्गिक बदलांशी जुळवून घेताना दमछाक होते. कारण याबरोबर पालकांची मानसिकता, त्यांची मते, मित्रमैत्रिणींचे स्वभाव, जीवनाविषयक दृष्टीकोन अशा सर्व गोष्टी इथे संलग्न असतात. मुले संभ्रमित वा गोंधळून जाऊ नयेत, करीअरची दिशा भटकू नये म्हणून विश्वासार्ह लैंगिक शिक्षण हे योग्य स्त्रोतातून मिळेल याची पालकांनी खात्री करून घ्यावी असा आधुनिक वैद्यकीय दृष्टीकोन आहे.

सोहळे आणि विधी

[संपादन]

[४५]मुंज

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://en.wikipedia.org/wiki/Puberty
  2. ^ https://mr.wikipedia.org/wiki/किशोरवय#सामाजिक_बदल
  3. ^ http://en.wikipedia.org/wiki/Adolescence#Cognitive_development
  4. ^ http://en.wikipedia.org/wiki/Adolescence#Social_development
  5. ^ http://en.wikipedia.org/wiki/Personality_development
  6. ^ http://en.wikipedia.org/wiki/Adolescence#Self-esteem
  7. ^ http://en.wikipedia.org/wiki/Human_Penis#Structure
  8. ^ http://en.wikipedia.org/wiki/Larynx
  9. ^ http://en.wikipedia.org/wiki/Adam's_apple
  10. ^ https://en.wikipedia.org/wiki/Paranasal_sinuses
  11. ^ http://en.wikipedia.org/wiki/Pelvis
  12. ^ http://en.wikipedia.org/wiki/Acne_vulgaris
  13. ^ http://en.wikipedia.org/wiki/Vulva
  14. ^ http://en.wikipedia.org/wiki/Bartholin's_glands
  15. ^ http://en.wikipedia.org/wiki/Mons_pubis
  16. ^ https://mr.wikipedia.org/wiki/पौगंडावस्था#चेता-अंतःस्रावी_प्रक्रिया
  17. ^ http://en.wikipedia.org/wiki/Prolactin
  18. ^ http://en.wikipedia.org/wiki/Epiphyseal_plate
  19. ^ Whincup PH, Gilg JA, Odoki K, Taylor SJ, Cook DG (2001). "Age of menarche in contemporary British teenagers: survey of girls born between 1982 and 1986". BMJ. 322 (7294): 1095–6. doi:10.1136/bmj.322.7294.1095. PMC 31261. PMID 11337438.
  20. ^ a b Ge, Xiaojia; Natsuaki, Misaki N.; Neiderhiser, Jenae M.; Reiss, David (2007). "Genetic and Environmental Influences on Pubertal Timing: Results From Two National Sibling Studies". Journal of Research on Adolescence. 17: 767–788. doi:10.1111/j.1532-7795.2007.00546.x.
  21. ^ Mustanski BS, Viken RJ, Kaprio J, Pulkkinen L, Rose RJ (2004). "Genetic and environmental influences on pubertal development: longitudinal data from Finnish twins at ages 11 and 14". Developmental Psychology. 40 (6): 1188–1198. doi:10.1037/0012-1649.40.6.1188. PMID 15535766.
  22. ^ Treloar SA, Martin NG (1990). "Age at menarche as a fitness trait: nonadditive genetic variance detected in a large twin sample". American Journal of Human Genetics. 47 (1): 137–148. PMC 1683767. PMID 2349942.
  23. ^ Kaprio J, Rimpelä A, Winter T, Viken RJ, Rimpelä M, Rose RJ (1995). "Common genetic influences on BMI and age at menarche". Human biology; an international record of research. 67 (5): 739–753. PMID 8543288.
  24. ^ http://en.wikipedia.org/wiki/Schizophrenia
  25. ^ http://en.wikipedia.org/wiki/Bulimia_nervosa
  26. ^ http://en.wikipedia.org/wiki/Anorexia_Nervosa
  27. ^ http://en.wikipedia.org/wiki/Neurokinin_B
  28. ^ http://en.wikipedia.org/wiki/Kisspeptin
  29. ^ http://en.wikipedia.org/wiki/Gonadotropin-Releasing_Hormone
  30. ^ http://en.wikipedia.org/wiki/Gonadotropic_cell
  31. ^ http://en.wikipedia.org/wiki/Gonadotrophin
  32. ^ http://en.wikipedia.org/wiki/Follicle-Stimulating_Hormone
  33. ^ http://en.wikipedia.org/wiki/Sertoli_cell
  34. ^ http://en.wikipedia.org/wiki/Luteinizing_Hormone
  35. ^ http://en.wikipedia.org/wiki/Leydig_cell
  36. ^ http://en.wikipedia.org/wiki/Theca_of_follicle
  37. ^ http://en.wikipedia.org/wiki/Testosterone
  38. ^ http://en.wikipedia.org/wiki/Estradiol
  39. ^ http://en.wikipedia.org/wiki/Granulosa_cell
  40. ^ http://en.wikipedia.org/wiki/Androgen
  41. ^ http://en.wikipedia.org/wiki/Insulin-like_growth_factor_1
  42. ^ http://en.wikipedia.org/wiki/Leptin
  43. ^ http://en.wikipedia.org/wiki/Adrenarche
  44. ^ http://en.wikipedia.org/wiki/Thyroid
  45. ^ निरंजन घाटे

बाह्य दुवे

[संपादन]