मासिक पाळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मासिक पाळीचे चक्र व हार्मोन्सची भूमिका

मासिक पाळी


मासिकपाळी चक्र व अवस्था[संपादन]

मासिक पाळी चक्र
मासिक पाळीतील हार्मोन्स नियंत्रण ओघतक्ता

आयुर्वेद शास्त्रानुसार[संपादन]

आयुर्वेद शास्त्रानुसार प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरु होते आणि साधारण पन्नास वर्षे वयाला थांबते.आयुर्वेदानुसार या महत्वाच्या दिवसात स्त्रीने विश्रांती घेतली पाहिजे तसेच काही नियम पाळले पाहिजेत ज्यामुळे तिला या दिवसात शारीरिक दृष्ट्या ताणरहित वाटेल. मासिकपाळी सामान्यपणे प्रत्येक स्त्रीमध्ये दर २८ दिवसांनी मासिकपाळी येते मासिकपाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्याअगोदर दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परीपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होते.

कालावधी[संपादन]

पण विशीतील मुली आणि रजोनिवृती पुर्व काळातील स्त्रिया त्यांच्या दृष्टीने ‘नियमित’ ही तुलनात्मक संज्ञा आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी ही कधीच नियमित नसते. पहिल्या पाळीच्या अनुषंगाने पुढची पाळी कधी येईल याचा अंदाज वर्तविणेच शक्य नसते. जास्त ताण पडणे, आजारपण, संतती नियमनांच्या गोळ्यांचा वापर अथवा त्यासाठी काही हार्मोन्सचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाळी अनियमीत येणे शक्य असते. म्हणूनच संततिनियमनासाठी “तालबध्द प्रक्रिया" ( रिदम मेथड) ही अत्यंत असुरक्षित पद्धत समजली जाते.

शरीराचे नैसर्गिक ऋतुचक्र शरीरात महिन्याचे २८ दिवस सतत स्त्री- संप्रेरकांमध्ये (हार्मोन्स) काही बदल होत असतात. यालाच वैद्यकीय भाषेत फॉलिक्यूलर फेज, ल्यूटील फेज, मिडसायकल फेज असे म्हटले जाते. यातील फॉलिक्यूलर टप्प्याचा काळ साधारणपणे १४ दिवसांचा असतो व नंतरचा ल्यूटील टप्प्याचा काळ १४ दिवसांचा असतो. या संपूर्ण काळात संप्रेरकांचा स्राव चालू असतो. २८ दिवसांच्या शेवटी हा स्राव बंद होतो व नैसर्गिकरीत्या बंद होणारा संप्रेरकांचा स्राव जर कृत्रिमरीत्या हॉर्मेन्सच्या गोळ्या घेऊन चालू ठेवला तर पाळी पुढे ढकलली जाते. म्हणजेच पाळीच्या अपेक्षित तारखेअगोदर सहा ते सात दिवस गोळ्या चालू केल्या जातात व जोपर्यंत पाळी नको आहे तोपर्यंत घेतल्या जातात. आपले ठरवलेले काम संपले म्हणजे मग या गोळ्या बंद करायच्या की लगेच पाळी सुरू होते. म्हणजेच आपल्या मेंदूतील पिच्युटरी ग्रंथींच्या संदेशाद्वारे होणारे संप्रेरकांचे नैसर्गिक चक्र बाहेरून कृत्रिम संप्रेरके घेऊन बिघडवायचे! पुढे ढकलायला किंवा लवकर आणायला पाळी म्हणजे काही एखादी पूर्व नियोजित भेट नाही की जी आपण आपल्या मनाप्रमाणे किंवा सोयीप्रमाणे बदलू शकतो.

पाळी पुढे करायची औषधे देण्याने काय परिणाम होतात, हे जर नीट समजावून सांगितले तर बऱ्याच स्त्रियांना पटते, परंतु त्यावर त्यांची प्रतिक्रिया जरा विचित्र असते. ‘मला तुम्ही सांगताय ते सर्व पटतंय डॉक्टर, पण घरातल्या वडील मंडळींना कोण समजावणार? म्हणून तरी काही औषध द्या, जेणेकरून पाळी पुढे किंवा अगोदर येऊन जाईल. ‘ मुळात अशा वेळेस थोडीशी चर्चा या वडील माणसांचीही केलेली बरी. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या पुरुषप्रधान रूढी- परंपरांचा विचार जर शास्त्रीयदृष्ट्या केला तर आपल्याला यामागची कारणे नक्की कळतील.

विटाळ संकल्पना आणि धार्मिक दृष्टीकोन[संपादन]

प्राचीन धर्मशास्त्रकारांनीही स्त्रीला या चार दिवसात धार्मिक कृत्यात सहभागी होण्यास मनाई केली आहे तसेच घरातील दैनंदिन कामापासूनही तिने दूर रहावे असे सुचविले आहे. कृत्यकल्पतरु या ग्रंथात नोंदविले आहे की मासिक पाळी स्त्रीला अस्पर्श बनवते. शिक्षापत्री या ग्रंथात मासिक पाळीच्या काळात स्त्रीला रज:स्वला असे संबोधिले आहे आणि या काळाला ‘मासिक व्रत’ असे म्हटले आहे.या ग्रंथांनी ,मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ केल्यानंतरच स्त्री घरातील कामात भाग घेवू शकते तसेच देव आणि पितृकार्यात सहभागी होवू शकते असे नियम सांगितले आहेत.या नियमांनुसार स्त्रीने या काळात जमिनीवर झोपावे. माती वा लोखंडाच्या ताटात जेवावे.तीन दिवस अंघोळ न करता रक्तस्रावाचे जुने कपडेच धारण करावेत!. डोक्याला तेल न लावणे, दात न घासणे,दिवसा न झोपणे असेही काही नियम यात आहेत. अग्नी प्रज्वलित करणे,देवाच्या पूजेसाठी फुले गोळा करणे ,आकाशातील ग्रह तारे पाहणे या गोष्टीही तिला वर्ज्य असत.[१] पूर्वी स्त्रीची पाळी चालू झाली असेल तर तिला ‘बाहेरची आहे‘ असे संबोधले जायचे. अजूनही काही घरी हा प्रकार चालतो. सामाजिक सुधारणांमुळे हल्ली अशा स्त्रीला वेगळे बसवले जाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. ‘आज की नारी‘ मुळात घरी कमी काळ असते. घरचे व कार्यालयाचे सर्रास सर्व व्यवहार व्यवस्थितपणे तीच करते. त्यामुळे तिला बाजूला बसणे/बसवणे शक्यही नाही. पण तरीही घरातली एखादी श्रावणातील पूजा, गणपती, लग्न, मुंज यांसारख्या कार्यांच्या वेळी पाळी येऊ नये, यासाठी बऱ्याच जणींचा आटापिटा असतो. कारण ‘विटाळ‘ ही संकल्पना अजून अनेकांच्या मनात ठाण मांडून बसली आहे. मग कार्यालयात ती अगदी कितीही वरिष्ठ पदाधिकारी असो. काही सुशिक्षित किंवा सुधारित कुटुंबे आपल्या लेकी-सुनांना पूजा, लग्नकार्य अशा धार्मिक प्रसंगांत पाळी असताना सहभागी करून घेतातही. पण एकतर अशांचे प्रमाण आजही नगण्य आहे. आणि ते ही बाब जाहीर बोलूनही दाखवत नाहीत.ज्ञानार्णवतन्त्र या ग्रंथात सांगितले आहे- ‘ज्याला धर्म आणि अधर्म याचे ज्ञान आहे , त्याच्या दृष्टीने विष्ठा,मूत्र,मासिक स्राव,नखे आणि हाडे प्रत्येक गोष्ट शुद्ध आहे.शरीरच मासिक पाळीचे रक्त तयार करते ,त्यामधून कोणी मुक्तीपर्यंत पोचेल असा दोष का द्यावा?’[२]

मासिक पाळीचा स्राव ज्या वेळेस स्त्रीला होतो त्या वेळेस अनेकींना अशक्तपणा जाणवत असतो. पूर्वीच्या काळी घरात, स्वयंपाकात स्त्रियांना अतिशय श्रमाचे काम करावे लागायचे. अशा वेळी त्यांना सक्तीची विश्रांती मिळावी या प्रयोजनाने त्यांना सक्तीने कोपऱ्यात बसविले जाण्याची प्रथा सुरू झाली. दुसरे कारण म्हणजे होणारा रक्तस्राव. पूर्वीच्या काळी कापडी रक्तशोषक घड्या (सॅनिटरी नॅपकिन्स) वगैरेंचा शोध लागलेला नसल्याने, चिंध्या-फडकी ठेवून काम भागवले जायचे. तरीही जर अतिश्रमाने स्राव जास्त झाला आणि त्याच्या काही खुणा जर घरातील जमिनीवर आढळल्या तर सणासुदाला अथवा पूजेला जमणाऱ्या गर्दीत ते पटकन कुणाच्याही नजरेत येऊ शकेल, म्हणून कदाचित या स्त्रियांना वेगळे ठेवले गेल्याची शक्यता आहे.

अन्यथा जर शरीरातील या उत्सर्जन स्रावाच्या वेळी वेगळे राहायचे ठरविले तर कोणीही प्रातर्विधी व लघुशंकाही करायला नको! शेवटी हीसुद्धा उत्सर्जन द्रव्येच नाहीत काय? या संगणक, गतिमान युगात अशा या निरर्थक, काहीही शास्त्रीय कारणमीमांसा नसलेल्या परंपरा पाळण्याचे कारणच काय? तरी या बायकासुद्धा श्रावणातील साधी नेहमीची पूजा आपल्या पाळीच्या तारखा बघून ठरवतात. जसे काही पाळी चालू असताना त्या पवित्र गोष्टी केल्या की, त्या लगेच अमंगळ होणार आणि आपल्याला पाप लागणार! प्रवासाच्या दृष्टीने किंवा कामाच्या दृष्टीने विचार केला तर एक वेळ ठीक आहे. नेमक्या लांबच्या प्रवासाच्या दिवसांतच पाळीच्या डेटस्‌ येत असतील तर पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घेणे एक वेळ सयुक्तिक ठरेल, कारण आपल्याकडे स्वच्छतागृहाच्या सोयी पुरेशा नसतात. परंतु उगाच ऊठसूट या अशा प्रकारच्या गोळ्या घेणे नक्कीच बरोबर नाही.ते आरोग्यदृष्ट्या हानीकारक आहे असे वैद्यक शास्त्र मानते.

संतती नियमन[संपादन]

गरोदर रहाण्याची भीती न बाळगता समागम करण्याचा काळ अगोदर ठरविणे अथवा निश्‍चीत करणे अयोग्य समजले जाते. बीजांड परीपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होण्याच्या काळात केलेला समागम देखील धोकादायक ठरू शकतो कारण बीजांडाचे आयुष्य एकच दिवस असले तरी शुक्रजंतु जवळजवळ पाच दिवस कार्यरत राहतात. त्यामुळे या काळाच्या अलिकडील पाच दिवसात तर स्त्री समागम केला असेल तर आपण गरोदर राहू शकता. मासिकपाळीच्या काळात समागम केल्यास आपण गरोदर राहत नाही अशी एक चुकीची कल्पना आहे जर आपली पाळी सात दिवस लांबली आणि शुक्रजंतु पाच दिवस राहिले आणि मासिक पाळीचा काळ २८ दिवसांपासून कमी असेल तर गरोदर होऊ शकते.[३]

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. कृत्य कल्पतरू-भट्ट लक्ष्मीधर
  2. ज्ञानार्णवतंत्र
  3. मराठी आरोग्य.कॉम

बाह्यदुवे[संपादन]