पौगंडावस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माणसाची वाढ व विकास हे जन्मापासून (त्याही आधी गर्भधारणेपासून) सुरू असले तरी त्यांच्या भ्रूण, बाळ/नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ, इ. अनेक टप्प्यांपैकी दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या संक्रमणाच्या कालखंडाला किशोरवय म्हणतात. या कालखंडात अपरिपक्व मुलाचे (कुमाराचे) पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या व मानसिक-सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ तरुणात रूपांतर होते. याच वयात होणार्‍या माणसाच्या लैंगिक वाढ व विकासाच्या टप्प्याला पौगंडावस्था म्हणतात.

पौगंडावस्था हा लैंगिक संक्रमणाचा कालखंड आहे. सर्वसाधारणपणे मुलीत या कालखंडाची सुरुवात वयाच्या 10 ते 11व्या वर्षी[१] होते आणि 15 ते 17व्या वर्षापर्यंत लैंगिक विकास पूर्ण होऊन हा कालखंड संपतो. वयाच्या 12 ते 13व्या वर्षी पहिली मासिक पाळी येणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा होय. मुलात या कालखंडाची सुरुवात थोडी उशीरा, वयाच्या 11 ते 12व्या वर्षी होते आणि 16 ते 18व्या वर्षापर्यंत हा कालखंड संपतो. त्यामधे वयाच्या 13व्या वर्षाच्या सुमाराला पहिले वीर्यस्खलन होणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा आहे.

मेंदूकडून जननग्रंथींकडे विशिष्ट वयात येणार्‍या अंत:स्रावांच्या स्वरूपातील संदेशांमुळे पौगंडावस्थेची सुरुवात होते. या संदेशांमुळे मुलामधे वृषणाची आणि मुलीमधे बीजांडकोषाची वाढ होते. मुलामधे वृषणातून टेस्टोस्टेरॉन व मुलीमधे बीजांडकोषातून ईस्ट्रोजेनप्रोजेस्टेरॉन या अंतःस्रावांची निर्मिती सुरू होते. त्यांच्या प्रभावामुळे मुलात शुक्रजंतू व वीर्य निर्मिती आणि मुलीत स्त्रीबीज निर्मिती व मासिक पाळी सुरू होणे ही लैंगिक कार्ये सुरू होतात. मुलामधे शिश्नाची व मुलीमधे गर्भाशययोनीमार्गाची वाढ होते. त्याचबरोबर फार शारीरिक फरक नसलेल्या मुलात मुलगा व मुलगी असे स्पष्ट बाह्य भेद दाखवणारी, बाह्य जननेंद्रियांवर केस उगवणे, मुलाचा आवाज फुटणे, दाढी-मिशा उगवणे, इत्यादी आणि मुलीमधे स्तनांची वाढ होणे, शरीराला गोलवा येणे, इत्यादी चिन्हेही दिसू लागतात. त्यांना दुय्यम लैंगिक चिन्हे असे म्हणतात.

हे सर्व होत असतानाच, लैंगिक जाणीवा विकसित होणे, लैंगिक भावना मनात येणे, लैंगिक आकर्षण निर्माण होणे, असे मानसिक आणि वैचारिक बदलही होत असतात.

या सर्वांचा परिणाम म्हणून या टप्प्याच्या शेवटी मुलगा आणि मुलगी अनुक्रमे पुरुष आणि स्त्रीमधे लैंगिकदृष्ट्या विकसित होऊन प्रजननक्षम बनतात.

इंग्रजीत प्युबर्टी (Puberty) हा शब्द लॅटीनमधील "प्युबेस' या शब्दावरून आला आहे. प्युबेस म्हणजे जननेंद्रियावरील केस. हे केस उगवू लागले की व्यक्ती वयात आली असं पूर्वी मानण्यात येत असे.

किशोरवय हा मुख्यतः मानसिक-सामाजिक परिपक्वतेचा काळ आहे. पौगंडावस्था आणि किशोरवय हे दोन्ही कालखंड काही काळ एकमेकांबरोबर समांतर जात असले तरी किशोरवयाचा वैशिष्ट्यपूर्ण कालखंड जास्त पसरट असून त्याची व्याप्ती शारीरिक-बौद्धिक-मानसिक-समाजिक अशी सर्वसमावेशक आहे. त्यातील बौद्धिक-मानसिक-समाजिक परिपक्वतेची प्रक्रिया पुढे तारुण्यात व प्रौढावस्थेतही चालू राहाते. पौगंडावस्था हा त्यातील फक्त लैंगिक संक्रमणाचा कालखंड असून लैंगिक विकास पूर्ण होऊन प्रजननक्षमता आल्यावर तो संपतो.

अनुक्रमणिका

किशोरवय[संपादन]

किशोरवय हा संक्रमणाचा कालखंड साधारणपणे पौगंडावस्थेपासून किंवा थोडा आधी सुरू होतो व माणसाचे पूर्ण विकसित प्रौढ व्यक्तीत रूपांतर झाल्यावर संपतो. त्यामधे माणसाच्या शारीरिक व लैंगिक किकासाबरोबरच मानसिकचा व सामाजिक वाढ व विकासाचा समावेश होतो. या सर्व प्रक्रिया थोड्या पुढे-मागे सुरू होतात. सर्वसामान्यपणे दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या कालखंडाला किशोरावस्था मानण्यात येते. मुलींत हा कालखंड मुलांपेक्षा आधी सुरू होऊन आधी संपतो. मुलाची सामाजिक-आर्थिक-कौटुंबिक परीस्थिती, पोषण, भोवतालचे वातावरण, त्या ठिकाणची प्राकृतिक-सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्ये इत्यादींवर तो अवलंबून असतो.

किशोरावस्थेतील लैंगिक विकासाच्या कालावधीला पौगंडावस्था (Puberty) असे म्हणतात. मेंदूमधून विशिष्ट वयात येणाऱ्या संदेशांनुसार उत्तेजित झालेल्या अंतःस्रावी ग्रंथींच्या नियंत्रणाखाली हा लैंगिक गुणधर्मांचा व लैंगिक अवयवांचा विकास होतो व व्यक्ती प्रजननक्षम बनते. मुलाच्या लैंगिक विकासापेक्षा मुलीचा लैंगिक विकास वेगळ्या पद्धतीने होतो.

मुलांची लैंगिक वाढ व विकास[संपादन]

मुख्य लैंगिक अवयवांची वाढ व विकास[संपादन]

वृषण[संपादन]

1 वर्षे वयाच्या मुलाचे वृषण 2-3 सेंमी लांब आणि 1.5-2 सेंमी रुंद असतात व त्यांच्या आकारात पौगंडावस्था सुरू होईपर्यंत बदल होत नाही. पौगंडावस्था सुरू होताना पोष ग्रंथीकडून येणार्‍या संदेशांमुळे वृषणांची वाढ व विकास सुरू होतो. हे पौगंडावस्था सुरू होण्याचे मुलांमधील पहिले बाह्य शारीरिक लक्षण असते. त्यानंतर साधारण 6 वर्षांनंतर त्यांची वाढ पूर्ण (सरासरी 5 x 2 x 3 सेंमी) होते. शुक्रजंतू तयार करणे आणि टेस्टोस्टेरॉन हे पुरुष-संप्रेरक निर्माण करणे ही वृषणाची दोन मुख्य कार्ये आहेत.

पौगंडावस्थेतील नंतरचे बरेचसे बदल ’टेस्टोस्टेरॉनच्या’ प्रभावामुळे होतात. टेस्टोस्टेरॉनमुळे प्रोस्टेट आणि सेमिनल व्हेसिकल्स (शुक्राशय) या वीर्यनिर्मिती करणार्‍या ग्रंथींचाही विकास होतो आणि त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवले जाते.

वाढ झालेल्या वृषणाचा बराचसा भाग शुक्रजंतू निर्माण करणार्‍या ऊतीने भरलेला असतो. पौगंडावस्था सुरू झाल्यानंतर साधारण एक वर्षानंतर मुलच्या लघवीत शुक्रजंतू आढळू लागतात. यामुळे 13व्या वर्षांच्या सुमारास मुलात प्रजननक्षमता येते. पण पूर्ण प्रजननक्षमता 14-16 वर्षे वयापर्यंत येत नाही.

बाह्य जननेंद्रीय – शिश्न[संपादन]

हे समागमाचे पुरुष इंद्रिय आहे. वृषणाची वाढ व विकास सुरू होऊन साधारण एक वर्ष झाल्यावर टेस्टोस्टेरॉनच्या प्रभावामुळे शिश्नाची लांबी व नंतर रुंदी वाढू लागते. याबरोबरच शिश्नमणी आणि स्पंजसारख्या ऊतीने बनलेल्या दंडगोलाकृती पोकळ्या (corpora cavernosa)[२] यांचीही वाढ सुरू होते. शिश्नाची वाढ 17 वर्षांपर्यंत पूर्ण होते.

अग्रत्वचा मागे सरकणे: पौगंडावस्थेत अग्रत्वचेचे पुढचे भोक मोठे होऊ लागते. तिचा आतील पृष्ठभाग शिश्नमण्याला जोडणार्‍या पापुद्र्याचा हळूहळू र्‍हास होत जातो. त्यामुळे अग्रत्वचा शिश्नमण्यापासून सुटी होऊन ती शिश्नावरून आणि शिश्नमण्यामागेपर्यंत सरकणे जास्त जास्त सुलभ होऊ लागते. पुढे समागम करताना त्रास होऊ नये म्हणून हे आवश्यक असते. तसेच शिश्नाचा आकार ताठरल्यावर मोठा झाला तरी शिश्नास सामावून घेण्याइतकी शिश्नावरील त्वचा सैल असते. पौगंडावस्थेच्या सुरुवातीनंतर अग्रत्वचा शिश्नमण्यामागेपर्यंत सरकू शकणार्‍या मुलांचे प्रमाण वाढत जाऊन 16-17 वर्षांपर्यत 95% मुलांना ते शक्य होते. उरलेल्यांपैकी काहींना निरूद्धमणी (अग्रत्वचेचे पुढचे भोक आकुंचित राहिल्यामुळे ती शिस्नाग्रावरून मागे न सरकणे - Phimosis) या समस्येला सामोरे जावे लागते.

अग्रत्वचा मागे सरकायला लागल्यानंतर तिचा आतील पृष्ठभाग व शिश्नमणी यांची पाण्याने धुवून स्वच्छता करणे शक्य होते व रोज स्नानाच्यावेळी ती करणे व लघवी करताना अग्रत्वचा मागे सरकवणे आवश्यक आहे. त्यामुळे शिश्नाच्या अनेक आजारांना प्रतिबंध होतो.  

शिश्न ताठरणे: शिश्नातील दंडगोलाकृती पोकळ्यांमधील स्पंजसारख्या उतींमध्ये रक्त साठून राहिले म्हणजे शिश्न ताठ होते. झोपेत, जागे होताना किंवा दिवसभरात केव्हाही सहजच विनाकारण शिश्न ताठरणे नैसर्गिक असते. हे नवजात बालकापासून प्रौढांपर्यंत सर्वांत आढळते. पण पौगंडावस्थेत हे होण्याचे प्रमाण वाढून शिश्न ताठरणे वारंवार होऊ लागते. रात्री झोपेत ते ताठरल्याने जाग येते व काही वेळा अचानक वीर्यस्खलन होते. याला बोली भाषेत स्वप्नावस्था येणे किंवा स्वप्नदोष असे म्हणतात. पण हा दोष नसून हे नैसर्गिक आहे. परंतु यामुळे व दिवसा काम करताना, समाजात वावरताना शिश्न ताठरल्यास लाज वाटून बेचैनी येते. हे नैसर्गिक आहे हे न समजल्यास त्याचे मानसिक परिणाम होऊ शकतात. 

हस्तमैथुन: या वयात होंणारी लैंगिक अवयवांची वाढ, वाढती लैंगिक जाणीव, मुलांचे शिश्न वारंवार ताठणे व स्वप्नावस्थेचा अनुभव आणि या वयातील वाढते कुतूहल यांचा परिणाम म्हणून मुलगा व मुलगी दोघांतही लैंगिक अवयव हाताळून बघण्याची इच्छा निर्माण होते. या हाताळणीचा अनुभव सुखद आल्याने वारंवार हस्तमैथुन करण्यची प्रवृत्ती वाढते. पण गोपनीयता, अज्ञान, चुकीची माहिती किंवा सामाजिक बंधनांमुळे अपराधभावना किंवा काहीतरी चुकीचे करत असल्याची भावना निर्माण होते. हस्तमैथुन करणे नैसर्गिक आहे हे न समजल्यास त्याचे मानसिक परिणाम होऊ शकतात.   

दुय्यम लैंगिक चिन्हे[संपादन]

बाह्य जननेंद्रीयाभोवतीचे केस[संपादन]

पौगंडावस्थेत साधारण 12 वर्षे वयाच्या सुमाराला शिश्नाची वाढ सुरू झाल्यानंतर लगेचच जांघेच्या भागात केस वाढायला सुरुवात होते. शिश्नाच्या मुळापाशी पोटाकडच्या बाजूला प्रथम केस दिसायला सुरुवात होते. पुढच्या 6 ते 12 महिन्यांत ते न मोजता येण्याइतके उगवतात. नंतर ते ’जांघेचा त्रिकोन’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या भागात दाट वाढतात व नंतर खाली मांड्यांवर आणि पोटावर बेंबीकडे वाढतात. मुलगा व मुलगी दोघांच्याही या भागात हे केस वाढत असले तरी या वाढीत वैशिष्ट्यपूर्ण फरक असतो.

दाढी-मिशा आणि इतर शरीरावरील केस[संपादन]

मुलांच्या जननेंद्रीयांभोवती व जांघेत केसांची वाढ सुरू झाल्यावर पुढील काही वर्षांत शरीराच्या इतर भागांवर ’पुरुषी’ केस दिसू लागतात. काखा, गुदद्वाराभोवतालचा भाग, वरच्या ओठांवरचा भाग (मिशा), कानांच्या पुढचा भाग (कल्ले) आणि गाल व हनुवटीचा भाग (दाढी) या क्रमाने सर्वसाधारणपणे केस दिसू व वाढू लागतात. अर्थात, हा क्रम व्यक्तीव्यक्तींत बदलू शकतो.

हात, पाय, छाती, पोट आणि पाठीवरचे केस त्या मानाने सावकाश वाढतात. दाढी व छातीवरील केस पौगंडावस्थेनंतरही काही वर्षे वाढत राहातात. या केसांच्या वाढीची सुरुवात, क्रम, वाढीचे प्रमाण व दाटपणा यांत व्यक्तीव्यक्तींत, निरनिराळ्या जाती-जमातींत व निरनिराळ्या वंशाच्या लोकांत खूप फरक आढळतो.

या बदलांबरोबरच मुलांचे डोक्यावरचे केस जास्त जाड व राठ होतात.

स्वरयंत्राची वाढ आणि आवाजातील बदल[संपादन]

याच वयात संप्रेरकांच्या प्रभावामुळे मुलगा व मुलगी या दोघांतही स्वरयंत्राची[३] वाढ होते. पण मुलातील वाढ जास्त असते व गळघाटीच्या स्वरूपात (Adam's Apple[४]) ठळकपणे दिसते. मुलाचा आवाजही खालच्या पट्टीतील व घोगर होतो (आवाज फुटणे). काही काळ तो अस्थिरही असतो. प्रौढ आवाजाची पट्टी साधारणपणे 15व्या वर्षी प्राप्त होते व 20व्या वर्षापर्यंत स्थिरावते.

हाडे, स्नायू आणि शरीराकृती[संपादन]

पौगंडावस्थेच्या शेवटी मुलाची हाडे मुलीपेक्षा जास्त जड आणि बळकट होतात. जबडा व खांद्याची हाडे प्रमाणाबाहेर वाढतात आणि श्रोणीची हाडे (Pelvis[५]) मुलीपेक्षा वेगळ्या प्रकारे वाढतात. त्यामुळे जबडा जाड, खांदे रुंद आणि श्रोणी निमुळती दिसते. मुलीच्या तुलनेत मुलाच्या अंगावर स्नायू जवळजवळ दुप्पट प्रमाणात वाढतात आणि चरबीचे प्रमाण कमी असते. सरासरी तरुणाचे चरबीविरहित शरीर-वस्तुमान सरासरी तरुणीच्या 150% आणि चरबीचे प्रमाण तरुणीच्या 50% असते. त्यामुळे तरुणाच्या अस्थि-सांगाड्याची व एकूणच शरीराची आकृती तरुणीपेक्षा वेगळी दिसते. स्नायूंची वाढ व ताकद पौगंडावस्थेनंतरही वाढत राहाते.

छातीवरील चरबी व स्तनाग्रे काही प्रमाणात मुलातही वाढतात. पण पुरुष-संप्रेरकांच्या विरोधी प्रभावामुळे ही वाढ मर्यादितच राहाते.

तारुण्यपीटिका आणि शरीराचा वास[संपादन]

त्वचेवरील घर्मग्रंथी आणि केसांच्या मुळाशी असणार्‍या तैलग्रंथी पौगंडावस्थेच्या सुमारास पुरुष-संप्रेरकांच्या प्रभावामुळे सक्रीय होतात. त्यामुळे त्वचा तेलकट होते व जास्त घाम येऊ लागतो. त्यामुळे या काळात त्वचेवर केसांच्या मुळाशी तेल साठून फोड येऊ लागतात. काही वेळा त्यात रोगजंतूंचा प्रादुर्भावही होतो. या फोडांना तारुण्यपीटिका (Acne[६]) असे म्हणतात कारण पौगंडावस्था व तारुण्याच्या काळात, विशेषतः चेहेर्‍यावर, छातीवर व पाठीवर त्या जास्त प्रमाणात दिसतात. परंतु लहान मुलांत व क्वचित प्रौढ वयातही त्या आढळतात. त्या मुलगे व मुली दोघांतही आढळतात. व्यक्ती-व्यक्तींत जात, वंश, राहाणीमान, इत्यादींनुसार त्यांचे प्रमाण वेगवेगळे आढळते. त्या येणे नैसर्गिक असले तरी फार जास्त प्रमाणात आल्यास व फोड गेल्यावर तिथे राहाणार्‍या व्रणांचे प्रमाण जात असल्यास चेहेरा विद्रूप दिसतो. त्यांच्याबद्दल अज्ञान व गैरसमजही फार आढळतात. त्यामुळे, विशेषतः मुलींमधे, चिंता, न्यूनगंड, औदासीन्य व तीव्र परीस्थितीत आत्महत्येचे विचार अशा मानसिक स्थिती निर्माण होऊ शकतात.

याच काळात मुलगा व मुलगी दोघांच्याही शरीरावरचे, विशेषतः काखा व जांघेतील केस वाढू लागल्याने तेथील घाम व त्वचेवर नेहमी आढळणार्‍या जंतूंच्या प्रक्रियेमुळे विशिष्ट शरीरगंध येऊ लागतो. घामातील रसायनिक द्रव्ये व जंतूंच्या प्रकारानुसार तो व्यक्तिविशिष्ट असतो. लैंगिक अवयवांच्या भोवती हे वास जास्त येत असल्याने त्यांचा जोडीदाराची निवड आणि लैंगिक आकर्षणाशी संबंध सूचित होतो.

मुलींची लैंगिक वाढ व विकास[संपादन]

मुख्य लैंगिक अवयवांची वाढ व विकास[संपादन]

बीजांडकोष[संपादन]

पौगंडावस्था सुरू होताना पोष ग्रंथीकडून येणार्‍या संप्रेरकांच्या स्वरूपातील संदेशांमुळे बीजांडकोषांची वाढ व विकास सुरू होतो. बीजांडकोषांत सुप्तावस्थेत असलेल्या स्त्रीबीजांचा विकास सुरू होतो व त्याबरोबरच ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही स्त्री-संप्रेरके स्त्रवण्याचे चक्र आणि मासिक पाळीचे चक्र सुरू होते.

गर्भाशय व अंडवाहिनी[संपादन]

या संप्रेरकांच्या प्रभावामुळे गर्भाशयाची व त्याबरोबरच अंडवाहिन्यांची वाढ सुरू होते. पौगंडावस्थेआधी गर्भाशयाची लांबी 4-5 सेंमी असते ती पुढील 2 वर्षांत वाढून पौगंडावस्थेनंतर 7.6 सेंमीइतकी होते. गर्भाशय-बुध्न आणि गर्भाशय-ग्रीवा यांचे एकमेकाबरोबर गुणोत्तर 1:1 असते ते नंतर 2:1 किवा 3:1 होते. गर्भाशयाच्या वाढीबरोबरच संप्रेरकांच्या स्रवण्याच्या चक्राप्रमाणे गर्भाशयातील अंतःत्वचेची वाढ व मासिक पाळीचे चक्रही सुरू होते.

स्तनांची वाढ सुरू झाल्यावर साधारण 2 वर्षांनी, वयाच्या सरासरी 12.5व्या वर्षी, पहिली मासिक पाळी येते. पण मासिक पाळी येण्याच्या या वयात अनेक कारणांनी बदल होतो. साधारण 8 ते 16 वर्षे हे पहिली मासिक पाळी येण्याचे नैसर्गिक वय समजले जाते. पहिली काही वर्षे मासिक पाळ्या अनियमित असतात व त्यांतील अनेकांत स्त्रीबीज तयार होत नाही. काही वर्षांनंतर मासिक पाळीच्या चक्रांत स्त्रीबीज नियमितपणे तयार होऊ लागते व मासिक पाळीतही नियमितपणा येतो. स्त्रीबीजनिर्मिती सुरू झाली की मुलीमधे प्रजननक्षमता येते.

योनीमार्ग[संपादन]

पौगंडावस्थेत योनीमार्गाचीही वाढ होते. शिवाय ईस्ट्रोजेन या स्त्री-संप्रेरकांच्या प्रभावामुळे योनीमार्गाची अंत:त्वचा अधिक जाड व अनेक स्तरांची होते. त्यामुळे तिचा रंग आधीपेक्षा फिक्कट होतो. अंत:त्वचेच्या पेशींमधील ग्लायकोजेनचे प्रमाण वाढते. योनीमार्गात आढळणार्‍या जंतूंमुळे ग्लायकोजेनचे लॅक्टिक आम्लात रूपांतर झाल्याने योनिमार्गाची आम्लता वाढते आणि परजीवींची वाढ सहसा होत नाही. ईस्ट्रोजेनमुळे योनीमार्गातील लाळेसारख्या स्रावाचे प्रमाण वाढल्याने आतील ओलसरपणा वाढतो. हे सर्व बदल मुलीला समागमासाठी शारीरिकदृष्ट्या तयार करतात.

बाह्य जननेंद्रिये[संपादन]

योनिमुख व त्याभोवतीच्या अवयवांना स्त्रीचे बाह्य जननेंद्रिय, गुप्तांग किंवा भग (Vulva[७]) असे म्हणतात. पौगंडावस्थेमधे योनिमुखाभोवती असणार्‍या मुख्यतः लघुभगोष्ठांची वाढ होते. बृहत्भगोष्ठांचीही वाढ झाल्याने ते जास्त फुगीर होतात आणि योनीमुख, भगशिश्न आणि भगप्रकोष्ठ जास्त झाकले जातात. ईस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे फिओमेलॅनीन या रंगद्रव्याच्या अधिक निर्मितीमुळे लघुभगोष्ठ आणि काही मुलींत बृहत्भगोष्ठ (आणि ओठ) यांना विशेष लाल रंग येतो.

भगशिश्न आणि त्यातील उत्थानक्षम ऊतीची वाढ टेस्टोस्टेरॉनच्या प्रभावामुळे होते. या भागाच्या रक्तवाहिन्या आणि चेतातंतूंच्या पुरवठ्यातही वाढ होते. योनिमुखाच्या दोन्ही बाजूस असलेल्या प्रघ्राणग्रंथींची (Bartholin's glands[८]) वाढ होऊन त्याही कार्यक्षम बनतात.

दुय्यम लैंगिक चिन्हे[संपादन]

स्तनांची वाढ व विकास[संपादन]

स्तनाग्रांभोवतीच्या एका किंवा दोन्ही चकत्यांखाली घट्ट फुगवटा दिसू लागणे हे मुलींमधे पौगंडावस्थेचे पहिले चिन्ह असते. ते सरासरी 10.5 वर्षे वयाच्या सुमाराला दिसते. त्यांना स्तनांच्या कळ्या किंवा कळे असे म्हणतात. त्यानंतर 6 ते 12 महिन्यांत हे फुगवटे दोन्ही बाजूंना चकत्यांच्या बाहेर पसरायला लागलेले दिसतात आणि त्यांना मऊपणा येतो. यावेळी मुख्यतः स्तनग्रंथींमधील नलिकांच्या जाळ्यांची वाढ होत असते. ईस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे फिओमेलॅनीन या रंगद्रव्याच्या अधिक निर्मितीमुळे स्तनाग्रे व त्याभोवतीच्या चकत्याही अधिक गडद होतात. आणखी 1 ते 2 वर्षांत स्तनांची वाढ आकारमान व आकाराच्या दृष्टीने पूर्णत्वाकडे होत राहाते. पण या काळात स्तनाग्रे आणि त्याभोवतीच्या चकत्या यांचे स्वतंत्र उंचवटे दिसतात. यावेळी ईस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे मुख्य स्तनग्रंथींची वाढ होते. नंतर पूर्ण वाढ झालेल्या स्तनांत हे दुय्यम उंचवटे स्तनाच्या सर्वसाधारण आकारात मिसळून जातात. या स्तनग्रंथी व नलिकांच्या जाळ्यांच्या वाढीबरोबरच त्यांभोवतीच्या चरबीच्या थरातही वाढ होत राहाते व स्तनांना तरुण वयातील विशिष्ट आकार प्राप्त होतो.

पूर्ण वाढ झालेल्या स्तनांचे आकारमान; त्यांतील ग्रंथी आणि चरबीचे प्रमाण आणि त्यांचा आकार यांत व्यक्तीव्यक्तीनुसार खूप फरक आढळतात. स्तनांचा विकास पुढे गर्भावस्थेतप्रसूतीनंतरही होतो.

मुलांमधे टेस्टोस्टेरॉनच्या विरोधी प्रभावामुळे स्तनांची वाढ रोखली जाते. पण काही वेळा पौगंडावस्थेच्या सुरुवातीला स्तनाग्रांखाली लहान घट्ट गाठ आढळते व नंतर काही महिन्यांत विरून जाते.

बाह्य जननेंद्रीयाभोवतीचे केस[संपादन]

स्तनांची वाढ सुरू झाल्यावर काही महिन्यांतच बाह्य जननेंद्रीयाभोवती केस दिसू लागतात. हे पौगंडावस्था सुरू झाल्याचे सहसा दुसरे बाह्य लक्षण असते. ते प्रथम बृहत्भगोष्ठांभोवती दिसू लागतात. नंतर 6 ते 12 महिन्यांत ते मोजता न येण्याइतके वाढतात व जघनास्थीच्या उंचवट्यावरही (Mons pubis - Mound of Venus[९]) दिसतात. त्यानंतर ते ’जांघेचा त्रिकोन’ या भागात व नंतर काही वेळा मांड्यांच्या आतील भागांवर वाढतात. क्वचित ते पोटावर बेंबीकडे वाढतात. पण मुलगा व मुलगी दोघांच्याही या भागावरील केसांच्या वाढीत वैशिष्ट्यपूर्ण फरक असतो.

इतर शरीरावरील केस: ईस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे मुलींच्या डोक्यावरचे केस मुलांपेक्षा जास्त मऊ होतात. काखांमधे मुलांप्रमाणेच पण जरा लवकर केस दिसू लागतात. इतर शरीरावर मात्र फक्त बारीक व विरळ लव असते. मुलांप्रमाणे हे केस वाढत नाहीत. काही मुलींमधे हात, पाय व पोटावर बेंबीखाली आणि क्वचित चेहेर्‍यावर कल्ल्यांच्या जागी व वरच्या ओठांवर केस दिसतात पण ते लव या स्वरूपात आखुड, मऊ आणि विरळ असतात.

शरीराकृती आणि चरबीची शरीरातील विभागणी[संपादन]

ईस्ट्रोजेनच्या प्रभावामुळेच श्रोणी-अस्थींचा खालचा भाग (जन्ममार्ग) रुंद होतो. श्रोणी-अस्थींच्या एकूण आकारात मुलगा व मुलगी असा वैशिष्ट्यपूर्ण स्पष्ट फरक दिसू लागतो. यामुळे मुलींचे नितंब रुंद होतात. शिवाय मुलांच्या तुलनेत शरीरावर विशिष्ट भागात (स्तन, नितंब, मांड्या आणि दंड) जास्त चरबी साठते. यांमुळे आणि स्तनांच्या वाढीमुळे शरीराला गोलवा येतो आणि वैशिष्ट्यपूर्ण स्त्री-आकृती प्राप्त होते. त्वचेखालील चरबीचे एकूण प्रमाणही मुलींत मुलांपेक्षा दीडपट जास्त असते. त्यामुळे शरीराला मऊपणा येतो.

तारुण्यपीटिका आणि शरीराचा वास[संपादन]

मुलांप्रमाणेच मुलींतही त्वचेवरील तेलाच्या प्रमाणात वाढ होते व त्यामुळे तारुण्यपीटिका, विशेषतः चेहेर्‍यावर, जास्त प्रमाणात दिसू लागतात. तसेच जननेंद्रीये, काखा व मुख्यतः डोक्यावरच्या केसांमुळे त्या भागांत घाम जास्त येतो. त्यावर जंतूंची प्रक्रिया झाल्याने शरीराला व केसांना वैशिष्ट्यपूर्ण वास येतो.

किशोरवयात मुलांमधे (मुलगे व मुली) होणारे बदल[संपादन]

किशोरवयातील बदलांचे शारीरिक बदल, मानसिक बदल, बौद्धिक बदल व सामाजिक बदल असे वर्गीकरण करता येईल.

शारीरिक बदल[संपादन]

सर्वसाधारण वाढ व विकास[संपादन]

पूर्णत्वाकडे जाणारी शारीरिक वाढ आणि निरनिराळ्या अवयवांचा परिपक्वता आणि प्रौढत्वाकडे होणारा विकास या प्रकारे या वयात शारीरिक बदल होतात.

या वयात उंची व वजनात एकदम वाढ होते. बांध्यामधे मुलगा किंवा मुलीला अनुरूप बदल होतात. उंची व रुंदी दोन्हींमधे मुलाचा बांधा थोराड दिसतो आणि मुलीचा बांधा त्या मानाने लहानखोरा आणि नाजुक दिसतो. स्नायूंची वाढ होते. पण त्यातही, मुलांमधे चपळता व ताकदीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्नायूंचे, तर मुलींमधे न थकता दीर्घकाळ काम करू शकणाऱ्या स्नायूंचे प्रमाण वाढते. चरबीच्या प्रमाणातही वाढ होते. पण शरीरात चरबीचे वाटप मुलांमधे व मुलींमधे वेगवेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण प्रकारे होते. यामुळे मुलांचे शरीर भरदार दिसते व मुलींच्या शरीराला गोलवा येतो.

त्वचाकेसांत बदल होतात. त्वचेतील घर्मग्रंथींच्यातैलग्रंथींच्या प्रमाणात वाढ झाल्याने मुलाच्या व मुलीच्या शरीराला वैशिष्ट्यपूर्ण वास येतो व तारुण्यपीटिका येतात. मुलाचे केस राठ व कडक होतात व मुलीचे केस मऊ होतात. पूर्वी जवळजवळ न दिसणारी लव असलेल्या शरीराच्या अनेक भागांवर (जननेंद्रियावर) नव्याने लांब राठ व जास्त कुरळेपणा असणारे केस येतात. मुलात व मुलीत ही केसांची वाढ वैशिष्ट्यपूर्ण असते (दुय्यम लैंगिक बदल).

आवाजात बदल होतात. आधी (कुमारवयात) मुलगा व मुलीचा आवाज साधारण सारखाच असतो. पण किशोरवयात वयातील कवटीच्या हाडांतील पोकळ्यांच्या (Sinuses) व मुलांमधे स्वरयंत्राच्या[१०][११] वाढीमुळे मुलाचा आवाज खालच्या पट्टीतील घुमणारा व घोगरा होतो व मुलीच्या वरच्या पट्टीतील आवाजात गोडवा व गोलवा येतो.

अंतःस्रावी ग्रंथींचा विकास[संपादन]

मेंदूतील गावदुम ग्रंथीकडून[१२] येणाऱ्या संदेशांमुळे पोष/पीयुष ग्रंथि[१३] उत्तेजित होते. तिच्यातून स्रवणाऱ्या पोषक अंतःस्रावांच्या चालनेमुळे व नियंत्रणाखाली इतर अंतःस्रावी ग्रंथींचा (अवटु ग्रंथि[१४], अधिवृक्क ग्रंथि[१५], जननग्रंथि[१६], इ.) विकास होतो. त्यांतून स्रवणाऱ्या अंतःस्रावांच्या चालनेमुळे व नियंत्रणाखाली संपूर्ण शरीरात अनेक बदल होतात.

लैंगिक वाढ व विकास[संपादन]

मेंदूतून हायपोथॅलॅमसद्वारे (Hypothalamus) येणार्‍या संदेशांमुळे उत्तेजित झालेल्या पीयुष/पोष ग्रंथीच्या चालनेमुळे व नियंत्रणाखाली जननग्रंथींची (मुलांमधे वृषण व मुलींमधे बीजांडकोष) वाढ होते व त्यांचे कार्य (बीज-निर्मिती व विशिष्ट अंतःस्रावांची निर्मिती) सुरू होते. मुलांमधे वृषणातून स्रवणाऱ्या टेस्टोस्टेरॉनच्या चालनेमुळे व नियंत्रणाखाली शिश्न, सेमिनल व्हेसिकल्स, प्रोस्टेट, इ. ची वाढ व विकास होतो. मुलींमधे बीजांडकोषातून स्रवणाऱ्या ईस्ट्रोजेनप्रोजेस्टेरॉनच्या) चालनेमुळे व नियंत्रणाखाली योनी, गर्भाशयअंडवाहिन्यांची वाढ व विकास होतो. त्याचबरोबर जननग्रंथींमधे बीजांची (मुलांमधे वृषणात शुक्रजंतूंची व मुलींमधे बीजांडकोषात स्त्रीबीजांची) निर्मिती सुरू होते.

याच लैंगिक विकासाच्या कालखंडाला पौगंडावस्था असे म्हणतात. परिणामी मुलांमधे अधूनमधून शिश्न-ताठरता व स्वप्नावस्था (अचानक झोपेत असतांना वीर्यस्खलन होते.) येते व मुलींमधे मासिक पाळीची सुरुवात होते व या कालखंडाच्या शेवटी दोघांमधेही पुनरुत्पादन क्षमता निर्माण होते.

या बदलांबरोबरच दुय्यम लैंगिक अवयवांची वाढ होते व बाह्यतः दुय्यम लैंगिक चिन्हे दिसू लागतात. मुलांमधे वृषणांचीशिश्नाची वाढ दिसून येते; दाढी-मिशा वाढू लागतात; काखा व बाह्य जननेंद्रीयाभोवती केसांची वैशिष्ट्यपूर्ण वाढ होते व संपूर्ण अंगावर (विशेषतः छाती, पोट, हातपाय) राठ व कुरळे केस येतात. मुलींमधे बाह्य जननेंद्रियाची (विशेषतः बाह्य व आंतरोष्ठ) वाढ होते; एका टप्प्यापर्यंत स्तनांची वाढ होते;नितंबांची वाढ होऊन त्यांना गोलवा येतो आणि काखा व बाह्य जननेंद्रीयांभोवती केसांची वैशिष्ट्यपूर्ण वाढ होते. या सर्वांच्या परिणामी मुलगा व मुलीचे किशोरावस्थेमधून पूर्ण विकसित व पुनरुत्पादनक्षम तारुण्यावस्थेत रूपांतर होते.

मानसिक – भावनिक बदल[संपादन]

या वयातील कल्पना, संकल्पना, विचार व भावना मुलाच्या पुढील संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतात.

या वयातील मुलांना स्वतःचे, स्वतःच्या बाह्य जननेंद्रियांचे व त्यांच्या कार्याचे; भिन्नलिंगी व्यक्तींचे; भोवतालच्या जगाचे; नाविन्याचे, अज्ञाताचे व भविष्याचे प्रचंड कुतूहल असते. त्यांना नवीन गोष्टी करून बघण्याची, नवीन अनुभव घेण्याची व शोध घेण्याची तीव्र इच्छा (व कामेच्छा – बाह्य जननेंद्रियांचा वापर करून बघण्याची इच्छा) असते.

मुले न ऐकणारी, अनादर करणारी, उद्धट, हातबाहेर गेलेली, बेफिकीर व बेदरकार वाटतात (विशेषतः मुलगे) तर दुसरीकडे ती हळवी, स्वप्नाळू, अस्थिर, भेदरलेली, प्रलोभनांना पट्कन बळी पडू शकणारी वाटतात व ती धोक्यांना बळी पडण्याची शक्यता वाढते (विशेषतः मुली). पण दोन्ही प्रकारच्या वृत्तींचे वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रमाणातील मिश्रण प्रत्येक मुलात आढळते.

या वयात अनेक गोष्टींचे आकर्षण वाटते. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण तर साहजिकच असते.

बौद्धिक बदल[संपादन]

या वयातील वैशिष्ट्यपूर्ण मानसिकता, विचारांची पद्धत व वागण्याची पद्धत हे या वयातील बौद्धिक बदलांचेच परिणाम म्हणता येतील.[१७]

वैचारिक बदल[संपादन]

अधिमस्तिष्काच्या विकासामुळे मुलांच्यात वैचारिक बदल होतात. मुख्यतः नातेसंबंध, समाजव्यवस्था, धर्म, नीती, योग्य-अयोग्य, न्याय-अन्यय, खरे-खोटे, इ. संबंधी विचार ती करू लागतात. वर्तमान परीस्थिती, तिची भूतकाळाशी पडताळणी व भविष्य-नियोजन यांसाठीही ती विचार करतात. या काळात त्यांच्यात चलबिचल; भावनिक गोंधळ आणि वागण्यात उत्स्फूर्तता दिसते. अर्थातच, या वयात मुले योग्य व्यक्तींच्या सहवासात राहिल्यास, त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे घडते. अन्यथा त्यांच्यातील वैचारिक गोंधळ वाढतो व भावनिक दृष्ट्या ती अस्थिर व कमकुवत राहू शकतात.

या वयात मुलगामुलगी यांच्या विचार करण्याच्या पद्धतींत व विषयांत फरक पडतो. मुलगे विशेषतः शिक्षण, संरक्षण, सामाजिक-राजकीय-आर्थिक-जागतिक परीस्थिती, पितृत्वभावना यांविषयी व्यावहारिक व जास्त तार्किक स्वरूपाचा विचार करतात. मुली आकर्षक दिसणे, नटणे, संसार, मुले, पोषण, संस्कर, संस्कृती, स्थैर्य, मातृत्वभावना इत्यादींसंबंधी जास्त भावनिक स्वरूपाचा विचार करतात व कल्पनांत जास्त रमतात.

सामाजिक बदल[संपादन]

स्वतःची ओळख[संपादन]

या वयातील मुले मुख्यतः स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. याची सुरुवात स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करण्यापासून होते. मुले स्वतःचा आणि स्वतःच्या प्रतिमेचा (स्व-संकल्पना[१८] – मला कसे आणि कोण व्हायचे आहे?) विचार करू लागतात आणि स्वतःपासून स्वतःच्या प्रतिमेपर्यंत (प्रत्यक्षापासून आदर्शापर्यंत) व्यक्तिमत्व विकास[१९] घडवण्याचा प्रयत्न करतात. स्वतःची ओळख बाह्य गोष्टींतून (कपडे, केसांचे वळण, आवडी-निवडी, फॅशन, इ.) व व्यक्तिमत्त्व विकासातून निर्माण करण्याचा ती प्रयत्न करतात. मुली आकर्षक दिसण्याचा व लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. इतरांना आधार किंवा मदत देतात व उपयोगी पडतात. मुले स्वतःला सिद्ध करण्याचा व इतरांवर (विशेषतः मुलींवर) प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. आपल्या बरोबरच्या मुला-मुलींत उठून दिसण्यासाठी व आपले वेगळेपण दाखवण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते.

वाढते सामाजिक संबंध व सामाजिक वर्तन[संपादन]

या वयात मुलांचा समाजातील जास्त-जास्त घटकांशी संबंध येऊ लागतो. कुटुंबात व समाजात आपली विशिष्ट ओळख निर्माण व्हावी, आपल्याला महत्त्व मिळावे व आपले मत विचारात घेतले जावे असे त्यांना वाटते. स्वतःचे हक्क व कर्तव्ये; सामाजिक नातेसंबंध; योग्य सामाजिक वर्तन (आदर्श व वस्तुस्थिती); न्याय-अन्याय; नियम-कायदे; शिस्त-स्वयंशिस्त; इत्यादींसंबंधी ती विचार करत असतात व त्यानुसार आपले सामाजिक वर्तन ती तपासून पाहात असतात. त्यासाठी सर्वसंमत व समाजमान्य वर्तनाच्या विरुद्ध किंवा बंडखोर वर्तनही ती बर्‍याच वेळा करतात. त्यामुळे त्यांचे कुटुंबातील मोठ्यांशी (विशेषतः मुलीचे आईशी व मुलाचे वडिलांशी) मतभेद होतात. समाजात आपले विशिष्ट स्थान निर्माण करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो.

वाढते सामर्थ्य[संपादन]

या वयात सर्व प्रकारच्या शक्ती, क्षमता व सामर्थ्यांत वाढ होते. वाढत्या शारीरिक शक्तीचा उपयोग वाढत्या जबाबदाऱ्या पेलणे, मोठी कामे करणे, रक्षण करणे (स्वतःचे; अवलंबून असलेल्यांचे; इतरांचे – लहान, दुर्बल, अपंग इत्यादींचे; स्वतःच्या मालकीच्या गोष्टींचे व हितसंबंधांचे; इ.); कठीण प्रसंगांना तोंड देणे इत्यादींसाठी होतो. सहनशक्तीही वाढते. मानसिक शक्तींच्या विकासामुळे विचारपूर्वक निर्णयानुसार वर्तनासाठी निर्भयता, धैर्य, संकटाचे वेळी न डगमगणे, प्रश्नाला सामोरे जाणे इत्यादी क्षमतांची वाढ होते. बौद्धिक सामर्थ्य हे माणसाचे प्रमुख सामर्थ्य व वैशिष्ट्य आहे. या वयात ते वाढल्याने त्याचा उपयोग त्याला स्वतःला व समाजाला उपयोगी शिक्षण घेणे, स्वतःचा स्वतंत्र पण समाजाभिमुख विचार करणे, नवीन कल्पना करणे व नवनिर्मिती इत्यादींसाठी होतो.

या सर्व सामर्थ्यांच्या वाढीमुळे आत्मसन्मानाची[२०] जाणीव होते, तो वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात व आत्मविश्वासात वाढ होते. अर्थात, अती आत्मविश्वास, प्रौढी, घमेंड, दुसऱ्यांना कमी समजणे, त्यांना किंमत न देणे, त्यांच्यावर वर्चस्व गाजवणे इत्यादी गोष्टीही त्याबरोबर येऊ शकतात व या सर्व सामर्थ्यांच्या वाढीचा दुरुपयोगही केला जाऊ शकतो.

सामर्थ्यांच्या वाढीचा मुलावर/मुलीवर कसा परिणाम होणार ते या वयातील संस्कारांवर अवलंबून असते.

लैंगिक शिक्षण[संपादन]

बऱ्याच मुलांची वा मुलींची या नैसर्गिक बदलांशी जुळवून घेताना दमछाक होते. कारण याबरोबर पालकांची मानसिकता, त्यांची मते, मित्रमैत्रिणींचे स्वभाव, जीवनाविषयक दृष्टीकोन अशा सर्व गोष्टी इथे संलग्न असतात. मुले संभ्रमित वा गोंधळून जाऊ नयेत, करीअरची दिशा भटकू नये म्हणून विश्वासार्ह लैंगिक शिक्षण हे योग्य स्त्रोतातून मिळेल याची पालकांनी खात्री करून घ्यावी असा आधुनिक वैद्यकीय दृष्टीकोन आहे.

सोहळे आणि विधी[संपादन]

[२१]

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.