भ्रूण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राना रुगोसा या बेडकाच्या एका प्रजातीतील भ्रूण आणि एक डिंबक

भ्रूण म्हणजे पहिल्या पेशीविभाजनपासून ते जन्मापर्यंत, उबवणीपर्यंत किंवा अंकुरणापर्यंत विकासाच्या आरंभीच्या अवस्थेत असलेला बहुकोशीय द्विगुणित दृश्यकेंद्रकी (यूकॅरिओट) होय. मानवामध्ये, फलनानंतर सुमारे आठ आठवड्यांपर्यंत (म्हणजे अंतिम रजोकालापासून दहा आठवड्यांपर्यंत) त्यास भ्रूण आणि तद्नंतर गर्भ म्हटले जाते.

भ्रूणाच्या विकासास भ्रूणजनन असे म्हणतात. लैंगिक प्रजनन होणार्‍या प्राण्यांमध्ये एकदा शुक्रजंतूने अंडकोशिकेचे फलन केले की, द्वियुग्मनज नावाची कोशिका तयार होते. या कोशिकेत दोन्ही जनक पेशींचा अर्धे-अर्धे डिऑक्सिरायबोन्युक्लिक अ‍ॅसिड असतात. वनस्पती, प्राणी आणि काही प्रोटिस्टांमध्ये द्वियुग्मनज सूत्रीविभाजनाने आपल्यासारख्या पेशी तयार करू लागतो. या प्रक्रियेच्या परिणामस्वरूप भ्रूण तयार होतो.