मुंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंज झालेल्या महाराष्ट्रीय बटूचे चित्र. मुंजीमध्ये शिखाबंधनासाठी बटूच्या डोक्याचे क्षौर करण्यात येते.]] मुंज/उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रियवैश्य या वर्णांतील तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठीच सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.

काही वर्षांपर्यंत फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य वर्णांतील पुरुषांना हा संस्कार करवून घेण्याचा अधिकार असे. नवीन मतप्रणालीनुसार, विशेषत: नागरी महाराष्ट्रात, हे बंधन शिथिल होत चालले आहे. धर्म/जातींविषयी निरपेक्षता/उदासीनतेचा हा प्रभाव आहे.

'धर्मशास्त्रीय संकेत'[संपादन]

उपनयन म्हणजे काय?[संपादन]

गायत्रीमंत्राचा उपदेश, 'देवसवितरेष ते ब्रह्मचारी' आणि मंगलाष्टकानंतर बटूचे आचार्य जे मुखनिरीक्षण करतो, यापैकी प्रत्येकाला उपनयन समजणारे तीन पक्ष होतात. वेदाध्ययनाला सुरवात या दृष्टीने गायत्रीमंत्राच्या उपदेशाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात येते. आपल्या हिंदू धर्माचा, या विश्वाचा मूळ जो प्रजापति त्याला बटु(कुमर) अर्पण करणे हा ऐतिहासिक व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्याचे सोळा संस्कारात परंपरा या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. यज्ञोपवीत जानवे वगैरे प्रजापतीचे रूप घेण्याची साधने आहेत. उपनयन म्हणजे आपला मूळ जो प्रजापति, आत्म्याने त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे, त्याची विद्या आपण मिळविण्याचा प्रयत्न करणे, केवळ या प्रमाणावरून पाहता ज्यांना वेदाधिकार पाहिजे असेल त्यांनी हा संस्कार करावयाचा आणि वैदिक व्हावयाचे असा मूळ उद्देश उपनयन संस्कारात दिसतो. सर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. तसेच त्याला वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो.

महत्त्व[संपादन]

शास्त्रतः हा संस्कार त्रैवर्णिकांना करण्याचा अधिकार आहे. परंतु सध्या हा संस्कार विशेषतः ब्राह्मणात, फार थोड्या क्षत्रियात आणि वैश्यात करण्यात येतो. याला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे. पहिला जन्म आई-बापांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो, असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.

उपनयन म्हणजे गुरुंच्या जवळ जाणे. गुरुच्या जवळ राहून , ब्रह्मचारी म्हणून चांगल्याप्रकारे ,एकाग्रचित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक होते. त्या नियमांनी स्वत:ला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. सारांश, ब्रह्मचारी म्हणून स्वत:च्या शरीराला , मनाला आणि बुद्धीला जाणीवपूर्वक वळण लावावे लागते. ज्याप्रमाणे कंदिलाच्या बाहेरची काच जर खराब असेल तर दिव्याच्या वातीचे तेज बाहेर नीट पडत नाही ; त्यासाठी कंदिलाची काच स्वच्छ असावी लागते त्याप्रमाणे योगाची जी आठ अंगे आहेत त्यांचे अनुष्ठान केल्याने चित्तातील अशुद्धीचा क्षय होत जातो आणि ज्ञानशक्ती प्रदीप्त होते आणि प्रज्ञेचा विकास होतो. १ भारतीय संस्कृतीत प्रत्येक आश्रमानुसार ब्रह्मचर्याचे स्वरूप वेगवेगळे सांगितले आहे. पण प्रत्येक टप्प्यावर ब्रह्मचर्याचा अभ्यास करीत असताना आपली संयमशक्ती वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यासाठीही योगाभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.[१]

उपनयनाचा काल[संपादन]

प्रत्येक वर्णाच्या लोकांना उपनयनाचा काल वेगळा सांगितला आहे. आठ, अकरा व बारा अशा क्रमाने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांना काल सांगितला आहे. अनुक्रमे सोळा, बावीस व चोवीस वयाच्या पुढे तरी उपनयन राहता उपयोगी नाही. (आश्व. १-१९).तरी प्रगत महाराष्ट्रात हा विधी ब्राह्मणांत वयाच्या आठव्या वर्षी, क्षत्रियांत सोळाव्या वर्षापर्यंत, तर वैश्यांमध्ये हा बाराव्या वर्षी करण्याचे संकेत आहेत.

उपनयन संस्कार बंद पडल्यास प्रायश्चित्त[संपादन]

उपनयन संस्कार तीन पिढ्या बंद पडला असल्यास चौथ्या पिढीत प्रायश्चित्त देऊन पुनः संस्कार सुरू करण्याविषयी सर्व ग्रंथकारांचे एकमत आहे. काही ग्रंथकारांच्या मताने बारा पिढ्यांपर्यंतही संस्कार बंद पडला असल्यास सुरु करता येतो आणि काहींचे मताने केव्हाही प्रायश्चित्तपूर्वक हा संस्कार पुनः सुरू करता येतो. या सर्वांची विचारसरणी त्या त्या ग्रंथात पाहणेच सोयीचे होईल. थोडक्यात त्यांचे स्वरूप असे-

अथ यस्य पिता पितामह इत्युनुपेतो स्यातां ते ब्रह्महसंस्तुतास्तेषामभ्यागमनं भोजनं विवाहविधि वर्जयेत् ।

तेषामिच्छितां प्रायश्चित्त यथा प्रथमेऽतिक्रमे ऋतुरेवं सवत्सरं प्रतिपुरुष संख्याय संवत्सरा यावन्तोऽनुपेताः स्युः ।

अथ यस्य पितामहादि नानुस्मर्यते उपनयनं ते स्मशानसंस्तुतास्तेषामभ्यागमनं विवाहमिति वर्जयेत्तेषामिच्छतां प्रायश्चित्त द्वादशवर्षाणि त्रैविद्यकं ब्रह्मचर्यं चरेत्तत उपनयनमथोदकोपस्पर्शनं पावमान्यादिभिः ॥
आपस्तम्बधर्मसूत्रम् ।
अर्थ - ज्यांचा बाप व आजा उपनयन न झालेला आहे आणि स्वतःचीही ज्यांची मुंज झालेली नाही, त्यांना ब्रह्महत्या करणारे असे ज्ञानी लोकांकडून म्हटले जाते. अर्थात् त्यांच्याशी सहवास, भोजन, विवाह वर्ज्य करावा. अशांची जर इच्छा असेल तर त्यांना पुढीलप्रमाणे प्रायश्चित्त द्यावे. जर प्रथमच कालातिक्रम झाला असेल तर एक ऋतूपर्यंत ब्रह्मचर्याचे सर्व नियमांप्रमाणे वागावे आणि नंतर उपनयन करावे; आणि यापुढे जितके पुरुष म्हणजे बाप, आजा वगैरे तितक्या पिढ्यांकरिता एक एक वर्षपर्यंत ब्रह्मचाऱ्याच्या नियमांप्रमाणे राहून नंतर उपनयन करावे.

पितामह म्हणजे आजा. त्याच्या पूर्वीचे जर अनुपनीत असतील तर त्यांच्याशीही ब्रह्मघ्नाप्रमाणे सर्व व्यवहार वर्ज्य करावेत व इच्छा असल्यास पणजोबापासून प्रत्येक पुरुषाला बारा वर्षाप्रमाणे ब्रह्मचर्याचे नियम पाळून नंतर उपनयन करावे. नंतर पावमानी ऋचांनी (यदन्ति यच्च दूरके ०) दररोज पुढे अभिमंत्रण करावे.

काही गौण विधि[संपादन]

घाणा भरणे हा एक धार्मिक विधीच्यापेक्षाही महत्त्वाचा विधि होऊन बसला आहे. वास्तविक घाणा भरणे म्हणजे सर्व कार्याची तयारी झाल्यामुळे उखळ, मुसळ वगैरे व्यवस्थित बांधून बाजूस ठेवणे. परंतु त्याला बायकांच्या साम्रज्यात काही विशेष महत्त्व आले आहे.

मंडप प्रतिष्ठा याचाही असाच प्रकार आहे. मांडव न घालता मंडपाच्या वेगवेगळ्या भागावर स्थापन करावयाच्या देवता सुपात मांडून ठेवावयाच्या ही गोष्ट केवळ थट्टास्पद होऊन बसते. तसेच पूर्वांगात आणि उत्तरांगात अनेक विधि शिरले आहेत. ते काढून टाकून विधीचे स्वरूप मुख्य भागावर आणून बसविणे हे आपले कर्तव्य आहे.

अधिकारी[संपादन]

उपनयन करण्यास मुख्य अधिकारी बाप होय. त्यानंतर आजोबा भाऊ, जातीचा कोणी तरी हे होत. ज्याची मुंज करावयाची त्याच्यापेक्षा तो वडील असावा म्हणजे झाले.

'उपनयन विधी १'[संपादन]

उपनयनकर्ता - (सपत्‍नीकः कृतनित्यक्रियः कृतमाङगलिकस्नानः स्वलंकृतो बद्धशिखः द्विराचमेत् । पवित्रपाणिः प्राणानायम्य, इष्टदेवता गुर्वादींश्च नमस्कृस्य । देशकालौ संकीर्त्य ।)

(उपनयन संस्कार करणाऱ्याने नित्यकर्म आटोपल्यानंतर तेल लावून ऊन पाण्याने स्नान करावे व कपाळीकेशराचे किंवा कुंकवाचे गंध लावावे. शेंडीला गाठ द्यावी व दोनदा आचमन करावे. पवित्रके घालावीत.
प्राणायाम करावा. इष्टदेवता, गुरु, आईबाप व ब्राह्मण यांस नमस्कार केल्यावर देशकालाचा उच्चार करावा.)

संकल्पः - मम उपनेतृत्वाधिकारसिद्धये कृच्छ्रत्रयप्रायश्चित्तं द्वादशसहस्त्रगायत्रीजपं च करिष्ये ।

संकल्प - मला उपनयन संस्कार करण्याचा अधिकार प्राप्त होण्यासाठी मी तीन कृच्छ्र प्रायश्चित्त व बारा हजार गायत्री जप करीन.

कुमारः- (आचम्य) मम कामाचार-कामवाद-कामभक्षणादि दोषापनोदार्थ कृच्छ्रत्रयं प्रायश्चित्तं प्रतिकृच्छ्‌रं तत्प्रत्याम्नायगोनिष्क्रयीभूतनिष्कपादार्धपरिमितरजतद्रव्यदानेन (अथवा) प्रतिकृच्छ्‌रं
तत्प्रत्याम्नायगोनिष्क्रयीभूतकार्षापणपरिमितताम्रमूल्यव्यावहारिकद्रव्यदानेन अहमाचारिष्ये ।

कुमार - (केवल आचमन करून) मला इच्छेस वाटेल तसे वागणे, इच्छेस वाटेल तसे बोलणे व इच्छेस वाटेल तसे खाणे वगैरे आचरण करण्यापासून उत्पन्न झालेल्या दोषांचे दूरीकरण होण्यासाठी मी तीन कृच्छ्र प्रायश्चित्त, किंवा त्याच्या प्रतिनिधीभूत द्रव्य देऊन आचरण करीन.

कर्ता - अस्य कुमारस्य

१ गर्भाधान

२ पुंसवन

३ सीमन्तोन्नयन

४ अनवलोभन

५ जातकर्म

६ नामकरण

७ निष्क्रमण

८ अन्नप्राशन

९ चौलान्तानां

नवसंस्काराणा कालातिप्तत्तिप्रत्यवायपरिहारद्वरा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं प्रतिसंस्कारं, ॐ भूर्भुवः स्वःस्वहेत्येकैकाज्याहुतिं करिष्ये ।

तथा च - उक्तसंस्काराणां लोपजनितप्रत्यवायपरिहारद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं प्रतिसंस्कार पादकृच्छ्‌रं चौलस्य चार्धकृच्छ्‌रं प्रायश्चित्त तत्प्रत्याम्नायगोनिष्क्रयीभूतद्रव्यप्रदान करिष्ये

कर्ता - ह्या कुमाराचे

१. गर्भाधान

२. पुंसवन

३. सीमंतोन्नयन

४. अनवलोभन

५. जातकर्म

६. नामकरण

७. निष्क्रमण

८. अन्नप्राशन

९. चौल

ह्या नऊ संस्कारांचा कालातिक्रम झाल्याबद्दलचा दोष दूर होऊन श्रीपरमेश्वराची कृपा होण्यासाठी प्रत्येक संस्काराचा

'ॐ भुर्भुवः स्वः स्वाहा'

असे म्हणून एक एक तुपाची आहुति व संस्कारांचा लोप झाल्यामुळे संस्काराला पादकृच्छ, व चौलाबद्दल अर्धकृच्छ्र याप्रमाणे प्रत्यक्श किंवा प्रतिनिधिद्वारा (द्रव्य वगैरे देऊन) प्रायश्चित्त करीन.

तथा च - अस्य कुमारस्य द्विजत्वासिद्ध्या वेदाध्ययनाधिकारसिद्ध्यर्थं उपनयनं करिश्ये ।

कर्ता - (कृतमंगलस्नानमलंकृतं कुमारं मात्रा सह भोजयित्वा)

कर्ता - ह्यास द्विजत्व प्राप्त होऊन वेदाध्ययनाचा अधिकार उत्पन्न होण्यासाठी उपनयन संस्कार करीन.

(कर्त्याने अभ्यंगस्नान केलेल्या आणि अलंकृत केलेल्या अशा कुमारास आईचे सांगत जेऊ घालून आपणाजवळ बसवावे.)

संकल्प - अस्य कुमारस्य उपनयनं कर्तुं तत्प्राच्यांगभूतं वापनादि करिष्ये (वपनं कारयित्वा, स्नापितं, बद्धशिखं कुमारं मंगलतिलकं कुर्यात् । अत्र मौहूर्तिक सत्कृत्य तदुक्ते शुभे मुहूर्ते आचार्यो वेद्यां प्राङ्‌मुख उपविश्य बटुं प्रत्यङ्‌मुखं स्थापयेत् । अन्तरा पट धृत्वा सुवासिन्यो मंगलाष्टकपद्यानि ब्राह्मणा मन्त्रांश्च पठेयुः । तत आचार्यः कुमारं समीपमानीय तन्मुखं सम्यगीक्षेत । कृतनमस्कारं च तं स्वांके कुर्वीत । ततो बटुमाचार्यः स्वदक्षिणत उपवेशयेत्)

इति उपनयनपूर्वांगकृत्यं समाप्तम् ।

कर्ता - आचमनं प्राणायामः ।

संकल्प - ह्या कुमाराचे उपनयन करण्याकरिता त्यांचे पूर्वांगभूतकेशवापन करतो.

(वपन करवून, स्नान घालून, शेंडीला गाठ द्यावी. कपाळी कुंकुमतिलक लावावा. या वेळी ज्योतिष्याची गंधाक्षता, दक्षिणा, विडा देऊन पूजा करावी आणि त्यांनी सांगितलेल्या शुभमुहुर्तावर आचार्याने बहुल्यावर पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि पश्चिमेकडे तोंड करून बटूला उभे करावे मध्ये आन्तरपट धरून सुवास्नींनी मंगलाष्टके व ब्राह्मणांनी मंत्र म्हणावेत.

(मंगलाष्टके शेवती दिली आहेत. हा प्रकार लौकिक आहे.)

नंतर अचार्याने त्या बटूस जवळ घेऊन त्याचे तोंड चांगल्या तर्‍हेने निरीक्षावे आणि स्वतःला नमस्कार करवून त्याला स्वतःच्या मांडीवर बसवावे, व नंतर त्याला आपल्या उजव्या बाजूला बसवावे.

आचमन , प्राणायाम करावा.

संकल्प - अमुकशर्मणः कुमारस्य द्विजत्वसिद्धया वेदाध्ययनाधिकारार्थं उपनयनहोमं करिष्ये ।

(ततः समुद्भवनामानमग्निं गृहीत्वा स्थालीपाकतंत्रेण वैश्वदेवतंत्रेण वाग्निकार्यं कृत्वा)

संकल्प - अमुक नावाच्या कुमाराला द्विजत्व प्राप्त होऊन वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून उपनयन होम करतो.

स्थालीपाकतंत्राने किंवा वैश्वदेवतंत्राने पूर्वांग अग्निकार्य करावे.

वासोधारणम् - (कौपीनार्थं त्रिवृतं कार्पाससूत्रं कटावाबध्य कौपीनं परिधाप्य) युवं वस्त्राणीत्यस्य औचथ्यो दीर्घतमा, मित्राक्‍रुणौ त्रिष्टुभ् वासोधारणे विनियोगः ।

ॐ युवं वस्त्राणि पीवसा वसाथे युवोराच्छिद्रा मन्तवो ह सगाः । अवातिरतमनृतानि विश्‍वा ऋतेन मित्रावरुणा सचेथे ॥१॥

(इति मंत्रेण अहतं शुक्ल वासः परिधाप्य अन्येन काषायवाससा तेनैव मंत्रेण तथैव प्रावारेत्)

वासोधारण - लंगोटीकरता तिहेरी वळलेला कापसाचा दोरा कंबरेला बांधून लंगोटी घालावी. 'युवं वस्त्राणि' ह्या मंत्राचा औचथ्य दीर्घतमा हा ऋषि, मित्रावरुण हे देव, व त्रिष्टुभ् हा छंद होय. वस्त्रधारणाकरिता उपयोग.

'ॐ युवं वस्त्राणि'

१. हा मंत्र म्हणून नवे पांढरे वस्त्र नेसवून आणि त्याच मंत्राने नवे पिवळे वस्त्र अंगावर घालावे.

अजिनधारणम्- मित्रस्य चक्षुरित्यस्य वामदेवोऽजिनं त्रिष्टुभ् अजिनधारणे विनियोगः ।

ॐ मित्रस्य चक्षुर्धरुण बलीयस्तेजो यशस्वी स्थविर समिद्धम् ।

अनाहनस्यं वसन जरिष्णु परीदं वाज्यजिनं दधेऽहम् ॥२॥

(इत्यजिनं धारयेत्)

अजिनधारणम् - मित्रस्य चक्षुः' ह्या मंत्राचा वामदेव हा ऋषि, अजिन ही देवता आणि त्रिष्टुभ् हा छंद होय. अजिनधारणाकडे उपयोग. वस्त्र किंवा अजिन यापैकी एक घेतले तरी चालते. सध्या दोन्ही घालण्याची चाल आहे.

'ॐ मित्रस्य'

ह्या मंत्राने अजिन म्हणजे कातडे धारण करवावे.

यज्ञोपवीतधारणम् - (ततो गायत्र्या दशकृतो मंत्रिताभिरदिभरुपवीतं प्रोक्ष्य धारयेत् ) यज्ञोपव्तमित्यस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता त्रिष्टुभ छन्दः ।

यज्ञोपवीतधारणे विनियोगः ।

( इति मंत्र वाचयित्वा दक्षिणबाहुमुद्धार्य उपवीतं धारयित्वा कुमारमात्मनो‍ग्नेश्च मध्येन अग्नेरुत्तरभागं गमयेत् ।)

यज्ञोपवीतधारण - (गायत्रीमंत्र दहा वेळा म्हणून अभिमंत्रित केलेल्या पाण्याने प्रोक्षण करून यज्ञोपवीत धारण करण्याकरिता बटूच्या हातात द्यावे.)

'यज्ञोपवीत' या मंत्राचा परब्रह्म हा ऋषि, परमात्मा ही देवता आणि त्रिष्टुभ हा छंद होय. यज्ञोपवीतधारणाकडे उपयोग.

ॐ यज्ञोपवीतं परम पवित्रं प्रजापतये सहज पुरस्तात् ।

आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः ॥३॥

कुमारः - आचमनम्-केशवाय नमः... श्रीकृष्णायनमः । पुनस्तथैवानीय स्वदक्षिणत उपवेश्य भूर्भुवः स्वः स्वाहेति प्रायश्चित्तस्य नवाहुतीर्दद्यात् । )

ॐ यज्ञोपवीत० (३) हा मंत्र कुमाराकडून म्हणवून त्याचा उजवा हात वर करून त्यातून यज्ञोपवीत धारण करवावे.

मग आपल्या व अग्नीच्या मधून बटूला अग्नीच्या उत्तरेकडे आणुन तेथे आचमन करवून पुन्हा तसेच परत आणून आपल्या उजवीकडे बसविल्यावर

'भूर्भुवः स्वः स्वाहा'

असे म्हणून प्रायश्चित्ताच्या नऊ आहुति द्याव्यात.

चित्रदालन[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


संदर्भ[संपादन]

  1. योगाङ्ग्नुष्ठानाद्शुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्याते: | पातञ्जल योगसूत्र २.२८