Jump to content

शम्मी कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शम्मीकपूर या पानावरून पुनर्निर्देशित)
शम्मी कपूर
शम्मी कपूर
जन्म शमशेर राज कपूर
२१ ऑक्टोबर, इ.स. १९३१
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू १४ ऑगस्ट, इ.स. २०११
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा हिंदी

शम्मी कपूर (रोमन लिपी: Shammi Kapoor ;), (२१ ऑक्टोबर, इ.स. १९३१ - १४ ऑगस्ट, इ.स. २०११) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. इ.स. १९५० आणि इ.स. १९६० च्या दशकांमध्ये त्यांचे यशस्वी चित्रपट झळकले.

शम्मीचा जन्म मुंबईत झाला तेव्हा त्याचे नामकरण शमशेर राज कपूर असे झाले. त्याकाळातील नाटक तसेच सिनेमाचे प्रसिद्ध कलावंत पृथ्वीराज कपूर यांच्या तीन मुलांपैकी शम्मी हे दुसरे अपत्य (दुसरे दोन - राज कपूर आणि शशी कपूर). तीनही भावंडांनी आपल्या वडिलांप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत अपार यश संपादन केले.

कारकीर्द

[संपादन]

शम्मीने अनेक विनोदी, खेळकर, तसेच रोमांचक प्रेमकथांवर आधारित चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या; इ.स. १९६० च्या दशकात आपल्या आगळ्या नृत्यशैली, तसेच लकबी आणि दिमाखदार व्यक्तिमत्त्वासाठी शम्मी कपूरला बरेच जण भारताचा एल्विस प्रिसली म्हणत.

शम्मीने अभिनयाची सुरुवात गंभीर भूमिकांपासूनच केली, पण फिल्मिस्तानच्या नासिर हुसेन - दिग्दर्शित तुमसा नही देखा (इ.स. १९५७ अमितासोबत) आणि दिल देके देखो (इ.स. १९५९ आशा पारेखसोबत), ह्या चित्रपटांनंतर शम्मीची एका खेळकर प्लेबॉयची प्रतिमा तयार झाली. जंगली (इ.स. १९६१) मुळे ही प्रतिमा वृद्धिंगत होत गेली आणि नंतरचे बहुतेक चित्रपट ह्याच धर्तीवर आधारित होते. शम्मी कपूर हे आपले पार्श्वगायक म्हणून नेहमी मोहम्मद रफीची निवड करीत. मोहम्मद रफी आणि शम्मी कपूर अतिशय चांगले मित्र होते. आपल्या यशाचे श्रेय मोठ्या प्रमाणात मोहम्मद रफीकडे असल्याचे प्रांजळ मत शम्मी कपूर व्यक्त करत. विशेषतः जंगली (इ.स. १९६१) मधील "याहू !!! चाहे कोई मुझे जंगली कहे" हे सिनेमात शम्मी कपूरच्या धुम-धडाका आणि माकडउड्यांनी तुफान लोकप्रिय झालेले गाणे रफींच्याच आवाजात आहे. गतकाळात शम्मीला प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर दुय्यम दर्जाच्या भूमिका पत्कराव्या लागल्या (उदा. मधुबालासोबत रेलका डिब्बा). तरी इ.स. १९६० च्या दशकात निर्माते त्याची जोडी मोठ्या नायिका - विशेषतः आशा पारेख, सायरा बानू आणि शर्मिला टागोर बरोबर बनवीत असत. आपल्या सर्व नायिकांपैकी शर्मिला टागोर, राजश्री आणि आशा पारेख बरोबर सहज काम जमायचे असे ते म्हणत. शम्मी कपूर आणि आशा पारेखची जोडी चार चित्रपटांमध्ये एकत्र दिसली, त्यापैकी तीसरी मंजिल (इ.स. १९६६) हा विजय आनंददिग्दर्शित आणि राहुल देव बर्मन यांचे बहारदार संगीत असलेला थरारक रहस्यपट सर्वात जास्त गाजला.

पण तीसरी मंजिल (इ.स. १९६६)च्या चित्रीकरणादरम्यान गीता बाली या शम्मीच्या पहिल्या पत्नीचे 'देवी'च्या आजारामुळे निधन झाले आणि वैयक्तिक जीवनात शम्मीला आणि त्यांच्या दोन मुलांना एका खरोखरच्या शोकांतिकेचा सामना करावा लागला. त्यानंतर शम्मीचा मुमताझ (ब्रम्हचारी (इ.स. १९६८)च्या सहनायिका))हिच्याबरोबर संबंध जुळले, पण तेही फार काळ टिकले नाहीत. पुढे इ.स. १९६९ साली शम्मीने 'नीला' हिच्याबरोबर दुसरे लग्न केले. त्यांची 'रोमँटिक हीरो'ची कारकीर्द इ.स. १९७० च्या दशकात शरीराच्या वाढत्या स्थूलपणामुळे संपुष्टात आली. अंदाज (इ.स. १९७१) हा शम्मीचा नायक म्हणून शेवटचा गाजलेला चित्रपट ठरला. '७० च्या दशकात ते यशस्वी चरित्र-अभिनेता म्हणून काम करू लागले. जंगली (इ.स. १९६१) आणि ब्लफ मास्टर (इ.स. १९६४) मध्ये ज्या सायरा बानू बरोबर नायकाचे काम केले होते तिच्याच जमीर (इ.स. १९७५) मध्ये त्यांनी त्याच सायराच्या वडिलांचे काम पत्करले. शम्मीने मनोरंजन (इ.स. १९७४)(इंग्रजी इर्मा ल दूस वर आधारित) आणि बंडलबाज़ (इ.स. १९७६)चे दिग्दर्शन केले. 'मनोरंजन'मध्ये स्वतः चरित्र अभिनयही केला. पुढे इ.स. १९८० आणि इ.स. १९९० च्या दशकांत त्यांनी चरित्र-कलाकार म्हणून काम सुरू ठेवले आणि विधाता (इ.स. १९८२)मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. इ.स. १९९० आणि इ.स. २००० ह्या दशकांमधल्या कालावधीत हळूहळू त्यांनी चित्रपटांमधले काम कमी केले. इ.स. २००६ सालचा सँडविच हा त्यांचा अखेरचा प्रदर्शित चित्रपट होय.

शम्मी कपूरांचे नाव भारतातील इंटरनेट वापरणाऱ्या सुरुवातीच्या व्यक्तींमध्ये गणले जाते[ संदर्भ हवा ]. ते इंटरनेट यूझर्स कम्युनिटी ऑफ इंडिया (आययूसीआय) - या संस्थेचे संस्थापक-चालक होते आणि एथिकल हॅकर्स असोशिएशन यांसारख्या इंटरनेट संस्थांमध्ये कार्यरत होते.

मृत्यू

[संपादन]

मूत्रपिंडांच्या विकारामुळे ७ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी शम्मी कपूरांस मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. १४ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार ०५:१५ वाजता त्यांचे निधन झाले.

पुरस्कार

[संपादन]
  • इ.स. १९६२ - फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारसाठी नामांकन प्राध्यापक
  • इ.स. १९६८ - फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार ब्रम्हचारी
  • इ.स. १९८२ - फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार विधाता
  • इ.स. १९९५ - फिल्मफेर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार
  • इ.स. १९९८ - कलाकार पुरस्कार
  • इ.स. १९९९ - झी सिने अ‍ॅवॉर्ड फ़ॉर लाइफटाइम अचीवमेंट
  • इ.स. २००१ - स्टार स्क्रीन लाइफटाइम अचीवमेंट अ‍ॅवॉर्ड
  • इ.स. २००२ - २००२ - इनव्हॅल्युएबल काँट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा - IIFA कडून
  • इ.स. २००५ - लाइफटाइम अचीवमेंट अ‍ॅवॉर्ड - बॉलिवुड मूव्ही अ‍ॅवॉर्ड्‌स्‌ तर्फे
  • इ.स. २००८ - लाइफटाइम अचीवमेंट अ‍ॅवॉर्ड - भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये
  • भारतीय मनोरंजन उद्योगाला दिलेल्या बहुमोल योगदानासाठी शम्मी कपूर हे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की)च्या 'लिव्हिंग लेजेंड अ‍ॅवॉर्ड'ने पुरस्कृत.

चित्रकीर्द

[संपादन]
चित्रपट वर्ष
जीवन ज्योति इ.स. १९५३
रेल का डिब्बा इ.स. १९५३
ठोकर इ.स. १९५३
लैला मजनू इ.स. १९५३
लड़की इ.स. १९५३
गुल सनोबर इ.स. १९५३
खोज इ.स. १९५३
शमा परवाना इ.स. १९५४
मेहबूबा इ.स. १९५४
एहसान इ.स. १९५४
चोर बाज़ार इ.स. १९५४
टांगेवाली इ.स. १९५५
नक़ाब इ.स. १९५५
मिस कोका कोला इ.स. १९५५
डाकू इ.स. १९५५
सिपाहसलार इ.स. १९५६
रंगीन रातें इ.स. १९५६
मेमसाहिब इ.स. १९५६
हम सब चोर हैं इ.स. १९५६
तुमसा नही देखा इ.स. १९५७
महारानी इ.स. १९५७
मुजरिम इ.स. १९५८
कॉफी हाऊस इ.स. १९५७
मिर्ज़ा साहिबान इ.स. १९५७
दिल देके देखो इ.स. १९५८
उजाला इ.स. १९५९
रातके राही इ.स. १९५९
मोहर इ.स. १९५९
बसंत इ.स. १९६०
कॉलेज गर्ल इ.स. १९६०
सिंगापूर इ.स. १९६०
बॉयफ़्रेन्ड इ.स. १९६१
जंगली इ.स. १९६१ – पहिला रंगीत चित्रपट
दिल तेरा दिवाना इ.स. १९६२
शहीद भगत सिंग इ.स. १९६३
प्रोफ़ेसर इ.स. १९६२
चायना टाऊन इ.स. १९६२
ब्लफ़ मास्टर इ.स. १९६३
राजकुमार इ.स. १९६४
कश्मीर की कली इ.स. १९६४
जानवर इ.स. १९६५
तीसरी मंज़िल इ.स. १९६६
बद्तमीज़ इ.स. १९६६
प्रीत न जाने रीत इ.स. १९६६
अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस इ.स. १९६७
लाट साहब इ.स. १९६७
ब्रम्हचारी इ.स. १९६८
प्रिन्स इ.स. १९६९
तुमसे अच्छा कौन है इ.स. १९६९
सच्चाई इ.स. १९६९
पगला कहींका इ.स. १९७०
अंदाज़ इ.स. १९७१
जवां मोहब्बत इ.स. १९७१
जाने अंजाने इ.स. १९७१
मनोरंजन इ.स. १९७४
छोटे सरकार इ.स. १९७४
रॉकी इ.स. १९८१
नसीब इ.स. १९८१
प्रेम रोग इ.स. १९८२
विधाता इ.स. १९८२
देश प्रेमी इ.स. १९८२
हीरो इ.स. १९८३
बेताब इ.स. १९८३
सोनी महिवाल इ.स. १९८४
इजाज़त इ.स. १९८८
अजूबा इ.स. १९९१
चमत्कार इ.स. १९९२
और प्यार हो गया इ.स. १९९६
क़रीब इ.स. १९९८
जानम समझा करो इ.स. १९९९
ईस्ट इज ईस्ट इ.स. १९९९
ये है जल्वा
वाह! तेरा क्या केहना इ.स. २००२)
भोला इन बॉलिवुड इ.स. २००५)
सँडविच इ.स. २००६)

शम्मी कपूर यांच्यावरची पुस्त्के

[संपादन]
  • शम्मी कपूर : तुमसा नही देखा (मराठी अनुवाद, अनुवादक मुकेश माचकर, मूळ इंग्रजी लेखक - रौफ अहमद)

बाह्य दुवे

[संपादन]